Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

ऋणानुबंध


"हे काय.. हॅरिसन कुठे ?" शेजारच्या घराचे बदलले बाह्यरूप पाहून मी गाडी पार्क करणार्‍या बहिणीला विचारले.
"गेले सोडून." मग माझ्याकडे वळून ती म्हणाली, "हॅरिसनला miss करतीयेस की त्याच्या वडिलांना?" मी नुसतीच हसले.

गेल्या वेळेस अशीच तिच्याकडे पोहोचल्यावर गाडी पार्क करताना बाहेर पाहिलं तर तिचा धाकटा लेक त्याच्या मिचमिच्या डोळ्यांच्या चायनीज मित्राला, भारतातील 'मावशी' ही संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्‍न करीत होता. माझे कुतुहल..
"हे कोण ?"
"हॅरिसन. नवे शेजारी. अलीकडे अमेरिकेत राहाणारे अनेक चायनीज, अमेरिकन टोपण नावं घेतात, उच्चारायला सोप्पं म्हणून.".. बहीण.

दुसऱ्या दिवशी पहाटेपहाटे जाग आली. कदाचित jet lag. कदाचित रोजची सवय. बाकिच्यांना त्रास होऊ नये म्हणून मी जे नेहमी करते तेच केलं. वाफाळलेला कॉफीचा कप, एखादं पुस्तक आणि घराला जाग येई पर्यंत मुक्काम बाहेरच्या लॉनवर.

साधारण सातच्या सुमारास शेजारच्या हॅरिसनच्या घरातून खूप जोरात रागावण्याचा आवाज ऐकू आला. थोड्या वेळाने घराचे दार उघडले गेले आणि..
हॅरिसनच्या बाबांना, हॅरिसनच्या आईने घराबाहेर ढकलून दिले.. दार जोरात आपटून आतून बंद केले.

माझ्या दृष्टीने प्रसंग फारच गंभीर होता. हॅरिसनचे वडील मात्र त्यामानाने शांत. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. हसणे शक्यच नव्हते. त्यांनी नुसतेच "काय करणार... life !" अशा अर्थाने खांदे उडवले आणि लॉनवर चक्कर मारायला लागले. काही वेळाने लॉनवर आडवे झाले. एखादी डुलकीही काढली बहुतेक. साधारणत: पाऊण तासांनी त्यांनी स्वत:च्या घराची बेल वाजवली. दार उघडले गेले आणि ते आत गेले.

बहिण उठल्यावर मी हे सर्व तिला सांगितले. मग आम्ही दोघींनी, एखाद्या भारतीय नवरोबावर ही परिस्थिती येईल का? आणि आली तर तो हे सर्व कसे हाताळेल यावर अतिशय गंभीरपणे चर्चा केली.

कॉफी व पुस्तक हे माझे रोजचेच routine होते. दोन दिवस शांतपणे गेले.
तिसर्‍या दिवशी पुन्हा गेल्या वेळचाच प्रकार. आणि काय सांगू.. दर दोन-तीन दिवसांनी.. हे नेहमीचेच !

मग या सगळ्यातला गंभीरपणा सरळ नाहीसा होत गेला. हॅरिसनच्या वडिलांचे आज काय झाले, हा अगदी सहज गप्पांचा किंवा खरं तर चेष्टेचाच विषय झाला. बहिणीचा मोठा लेक तर झोपेतून उठल्याउठल्या फक्त खुणेनेच thumps up or down विचारायचा आणि उत्तर कळले की 'चलो ठीक आहे' च्या आविर्भावात बाकीच्या कामांना लागायचा.

आता तो माझा सकाळचा उद्योग झाला होता. आज 'in' or 'out' असा विचार करताकरता मी रोज जशी हॅरिसनच्या बाबांची, घराबाहेर येण्याची जशी वाटच पहायला लागले. माझ्या महिनाभराच्या मुक्कामात मी आणि ते, एकदाही, एकमेकांकडे पाहून साधे हसलो सुद्धा नाही, बोलणे तर दूरच. संवाद फक्त एकच- त्यांचे माझ्याकडे बघून दर वेळेस helplessness च्या भावनेने खांदे उडवणे. हॅरिसनच्या आईला मी, 'काळी की गोरी' हे पण पाहिले नाही.. म्हणजे ती गोरीच असणार.. पण 'काळी की गोरी' हे म्हणायची पद्धत म्हणून.

घरी परत दुबईला आले तेव्हा बहिणी इतकंच हॅरिसनच्या वडिलांना miss केलं...... आणि बहुतेक प्रत्येक वेळेस तिकडे गेले की करेन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS