Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

वाफ


समोरच्या पातेल्यात भाजी शिजत होती. तिचं ते खदखदणं तिच्या भोवती आणखीनच वाफ निर्माण करत होतं. त्या गच्च साठलेल्या वाफेचा दाब वरचं झाकण मुकाट सहन करण्याच्या प्रयत्नात... पण तो ताण असह्य झाला की ते बापडं किंचित उडी मारायचं आणि आतल्या थोड्याशा वाफेला बाहेर जाऊ द्यायचं. ना त्या वाफेला धग जास्त ना जोर. नुसती मधुनच 'बुडुक' करून बाहेर पडणार. कुणाला दुखावण्याची क्षमताच तिच्यात नव्हतीच.
..... हे सगळं कसं घरातल्या एखाद्या गृहीत धरलेल्या स्त्री सारखं. तिचा वैताग, अस्वस्थता ती शक्यतो आतल्याआतच ठेवणार. बाहेर पडेल तेव्हासुद्धा 'minor irritation' च्या पलीकडे त्याचं कुणालाच महत्त्व नाही.

शेजारीच प्रेशर कुकर. त्यातल्या वाफेचं वागणं पण त्याच्याच सारखं भारदस्त. उगीच अधेमधे बाहेर पडणार नाही. आतल्या आत शांतपणे जमत राहील. पण जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मात्र जोरात. आवाज करत. सगळं घर दणाणून सोडत. तरीही केव्हा थांबायचं हे ह्या वाफेला पक्कं माहिती. हिचा safety valve शक्यतो उडत नाही.
..... जशी कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती. कुठे, केव्हा, किती आवाज चढवायचा यावर संपूर्ण ताबा.

तिस-या शेगडीवरच्या तव्यावर पोळी. हिच्या वाफेला फारसा जोर नाही. पण कुठुन, कधी बाहेर पडेल ते सांगता येत नाही. चटका लावून जाणं हिला चांगलं जमतं. मग हात पाण्याखाली गेला तरी झालेल्या जखमेची हुळहुळती जाणीव बराच वेळ रहाणार. ही मात्र करूनसवरून नामानिराळी.
..... जशी एखादी चंट, तैयार, सगळ्यांना पुरून उरणारी ठमाकी. या unpredictable, hurting nature मुळे सगळे हिच्याशी जपून वागणार.

प्रत्येक वाफेची बाहेर पडण्याची पद्धत वेगळी, परिणाम वेगळा. पण बाहेर पडणं मात्र आवश्यक.

माणसाचं खदखदणारं मन. तिथं साचणारी वाफ.. तिचाही निचरा होणं नितांत गरजेचं. नाही तर काही काळाने depression चा स्फोट किंवा करपलेलं मन !!
पण त्या वाफेची बाहेर पडण्याची पद्धत, हा मात्र ज्याचा त्याचा choice.


Related posts :   एक स्पर्श

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS