Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

विचारांचे दुकान


'विचारांचे घाऊक व किरकोळ व्यापारी. येथे फक्त स्वच्छ आणि सुंदरच विचार मिळतील.'
--------------------------------------------------------------------------------

“हे काय आहे ? नाही, मी पाटी वाचली आहे… पण अर्थ कळला नाही.”

“जे लिहिलं आहे नमकं तेच. आम्ही विचार आणि त्याच्या accessories विकतो. तुम्हाला हवा आहे एखादा ? ”
“No, thanks. पण कुतुहल म्हणून… काय भावाने विकता हो हे, 'विचार' ? ”
“ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. सर्व प्रथम म्हणजे तुमची बौद्धिक दिवाळखोरी किती हे तपासले जाते. ती जितकी जास्त तितके विचार स्वस्त. ”
“आणि ती मोजायची कशी ? ”

“तसं ते अवघड आहे. पण एक guideline म्हणून.. तुम्ही काय-काय करता हे आम्ही पाहतो.
म्हणजे जर तुम्ही राजकीय पुढारी, वृत्तवाहिन्यांचे संपादक, मालिकांचे कार्यकारी निर्माते, चमत्कारी बाबा वगैरे असाल तर तुम्हाला सर्व विचार फुकट.
तुम्ही जर प्राध्यापक असाल तर तुम्हाला कुठलाच विचार स्वतंत्रपणे करायची गरज नाही. दुसऱ्यांचे विचार उत्तम पद्धतीने मांडता यावे लागतात. तेवढं add-on skill घेतलं की झालं.
आणि जर तुम्ही FB किंवा Whatsapp वरचे किडे असाल तर 'कोई भी चिज उठाओ.. ' style सर्व पुस्तकी philosophical विचार क्षुल्लक किमतीत. कारण त्यांचा प्रत्यक्षात वापर करणे, त्यांना सत्यतेची कसोटी लावणे वगैरे, हा तुमचा प्रांत नाही. तुम्हाला ते फक्त copy-paste करायचे असतात.”

“पण मग 'स्वतंत्र' विचार करणाऱ्यांचे काय ?”
“तसा कुठलाच विचार स्वतंत्र नसतो. जन्मापासून अवतीभवती होणारी अखंड बडबड.. आपले विचार घडवत असते. यात पालक, शाळेतला अभ्यासक्रम, तो पोचवणारा शिक्षक, TV, राजकीय परिस्थिती, 'paid news' देणारी वर्तमानपत्रं… थेट घरात होणाऱ्या एखाद्या पूजेनंतर सांगितली जाणारी कहाणी.. हे सर्व आलं.
...... आणि या पलीकडे जाणाऱ्या एखाद्याला हे दुकान दिसंतच नाही.”

“हे भलतंच आहे सगळं ! मग हा घाऊक आणि किरकोळ.. हा काय प्रकार आहे ? ”
“जर तुम्हाला स्वत:ला अंमलात आणायचा असेल तर अशा विचाराला आम्ही single user समजतो. तो किरकोळ भावाने. आणि तो जर समाजमनाला द्यायचा असेल तर तो घाऊक भावाने मिळेल.
मग तुमचं काय ? ”

“नाही, मी अगदी सामान्य माणूस आहे. मी यातलं काहीच करत नाही. ”
“मग तुम्हाला फक्त 'सारासार विचार' आवश्यक आहे आणि तो आहेच तुमच्याकडे. फक्त activated नाही. तो तेवढा करा म्हणजे झालं. ”

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

श्रुती


ते आमचं राहतं घर नव्हतं, पण काही कारणाने तिथे मुक्काम करावा लागणार होता. धो धो कोसळणाऱ्या पावसात काही basic स्वच्छता, व्यवस्था करण्यात एक आठवडा गेला. हे करताना खालच्या ज्ञानेश्वरची (watchman) खूप मदत झाली. त्याच्या बरोबर त्याची दोन वर्षांची मुलगी पण यायची. त्या सगळ्या धमाधमीत त्या पोरीचं नाव ’श्रुती’, ती तिच्या वयापेक्षा खूप छोटी-नाजूक दिसते आणि ती आली की तिच्या हातावर खाऊ ठेवायचा या पलिकडे माझ्या क्षितीजावर तिचं अस्तित्व नव्हतं.

जशी त्या जागेत स्थिरस्थावर झाले, तसा माझ्या क्षितिजाचा परीघ मोठा व्हायला लागलं. थोडं आजुबाजूला लक्ष जाऊ लागलं आणि ऐकू येऊ लागला तो श्रुतीचा सारखा किंचाळण्याचा आवाज. त्या आवाजातला चिरकेपणा, कर्कशता, सातत्य, तडप मला दुसऱ्या मजल्यावरही अस्वस्थ करायला लागली. वाटलं, आजारी पडलं लेकरू. कुठं दुखतंय्‌ ते नीट सांगता येत नाहीये. १५ दिवस झाले तरी ते तसंच. रोज मला भेटायला येणाऱ्या निमाच्याही ही गोष्ट लक्षात आली. मग आम्ही येता-जाता श्रुतीच्या तब्येतीची चौकशी करणे चालू केले.

एक दिवस निमा पळतच वरती आली. म्हणाली, "अगं, ती पोर काही त्रास होतो म्हणून नाही ओरडत. सहज खेळता-खेळता, गप्पा मारल्यासारखी, मधुनच किंचाळते. मी पाहिलं आत्ता."

मग आमच्यातली ’आई’ जागी झाली. चहा घेताघेता मुलांना बोलायला शिकवणं-वाढवणं, चांगल्या/चुकीच्या वर्तनासाठी देण्यात येणारे +ve/-ve re-enforcements, अशी parenting वर आम्ही बरीच चर्चा केली. ’श्रुती’ या शब्दाचा dictionary अर्थ, भारतीय शास्त्रीय संगीतातल्या ’श्रुती’ आणि ह्या लेकराची व्यक्त होण्याची पद्धत यातील विरोधाभास, असं बरंच काही.

म्हणता म्हणता माझा तिथला मुक्काम संपला. परतायची तयारी सुरू. तेवढ्यात ज्ञानेश्वर एक कागद घेऊन आला. कुठल्याशा श्रवणयंत्राच्या माहितीचा तो कागद. म्हणाला, या सारखं काही तुमच्या दुबईला मिळेल का? त्याच्या वयस्कर वडिलांना पाहिलं असल्यानं म्हंटलं, "हो. बघते. पण तुझ्या वडिलांसाठी हे जरा लहान नाही वाटत?"

"वडिलांसाठी नाही हे. श्रुती साठी आहे. ती कधीच ऐकू किंवा बोलू शकणार नाहीये. पण मी आपला करतो प्रयत्न."

निमा जाता-जाता म्हणाली, माणसाचा सगळ्यात अक्षम्य गुन्हा म्हणजे मला वाटतं अलका- त्याचं ’judgmental’ असणं.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

आज मात्र ’सहजच’ नाही...


जंगली महाराज रोड, पुणे. ’बालगंधर्व’ समोर एक पंडाल. त्याच्या बरोबर मागे pizza hut. ह्या pizza hut ला एरव्ही प्रचंड गर्दी असते.

सद्ध्याचं गर्दीचं कारण मात्र संपूर्णत: वेगळं. म्हणजे वेयोगट तोच. कॉलेज मधली सळसळती तरुणाई. आज सगळ्यांनी ’India against corruption' चे t-shirts घातलेले. मुलं-मुली सगळ्यांच्याच डोक्यावर ’I am Anna' च्या टोप्या. गालांवर क्रिकेटच्या मॅचच्या वेळेस दिसतात तसे झेंडे रंगवलेले. ’वंदे मातरम्‌’, ’भारत माता की जय’, ’मैं भी अण्णा, तू भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा’ च्या घोषणा. जवळच post cards ठेवलेली. त्यावर पंतप्रधानांचा पत्ता छापलेला. तुम्ही तुमचा msg अणि हवे असेल तर नाव त्यावर लिहा. जवळची काही मुलं ती पोस्टात टाकणार.

मंचावर बरीच मंडळी उपोषणास बसलेली. तेथून एकजण ध्वनीक्षेपकावरून सांगत होता- "येथून बोलणारा अथवा घोषणा देणारा कोणीही, कुठल्याही राककीय पक्षाचे, पदाधिकाऱ्यांचे किंवा नेत्याचे नाव घेऊ शकत नाही."

तेवढ्यात अर्ध्या तासापूर्वी बाजीराव रोडला भेटलेली, झेंडे घेऊन घोषणा देत फिरणारी दोन टोळकी तिथे आली. सगळ्यांनी मिळून जाम नारेबाजी केली. मग ती टोळकी पुढच्या दिशेने निघून गेली.

तासभर तिथे थांबले. पूर्वी हे सगळं केलेलं. पण मध्यंतरीच्या काळात सगळ्या पिढीचा झालेला तसा एक- disconnect.

माझा लोकपाल विधेयकावर किंवा अण्णांवर फारसा अभ्यास नाही, ही सुरु होऊ घातलेली चळवळ कुठपर्यंत जाईल- किती परिणामकारक होईल? उपोषण करणे आणि भुकेलेल्यांना जेवायला घालणे यात अधिक योग्य काय? या वादातही मला जायचे नाही.

पण ’अलिकडची पिढी’ असं म्हणताना जिथे ’वाया गेलेली’ असा एक छुपा अर्थ असतो, तीच मुलं जेव्हा colleges बुडवून एका योग्य कारणासाठी, सांसदीय मार्गाने react होत असताना, ती योग्य मार्गावर आहेत हा त्यांना विश्वास वाटावा म्हणूनही असेल कदाचीत, उद्या उपोषण करणाऱ्यांच्या यादीत माझं नाव देऊन आले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

A Letter to God


Dear God,
Any future plans?.... or the same old things?
-alka

p.s. सोबत नुकतंच लिहायला शिकलेल्या छोट्यांची काही पत्रं जोडली आहेत.












  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शब्देंविण संवादु


बरेच दिवसांनी खालच्या gym मध्ये गेले. आत कुणीच नव्हतं. फक्त ती एकटीच बसली होती. खुर्ची खिडकीजवळ ओढून. कदाचित खालच्या lagoon कडे पहात किंवा कदाचित शून्यात. हातात cigarette. चेहरा खूपच गंभीर, सहसा तसा नसलेला. मला पाहिल्यावर तिच्या नेहमीच्या melodramatic, loud style ने म्हणाली, ’कुठे होतीस इतके दिवस? किती वाट पाहिली.”

हे वाक्य इथे जरी ’शब्दात’ लिहिलेलं असलं तरी तसं बोललं मात्र गेलं नाही. कारण आमच्या संवादात शब्द आभावनेच येतात. ती इराणची. माझं अरबीचं आणि तिचं English चं ज्ञान मोजून १० शब्दांपलिकडे नाही. शरीरयष्टी, रंग, संस्कृती, भाषा, lifestyle अशा किती तरी मुद्‌द्यांवर संपूर्णत: भिन्न असलेल्या आम्ही दोघी, इन-मीन २० शब्द आणि अगणित हातवारे यांच्या मदतीने अनेक विषयांवर ’बोलतो’. थेट अगदी आपल्याकडे जसा दृष्ट न लागण्यासाठी मीठाचा वापर होतो तसंच इराणमध्ये पण वाईट नजर घरावर पडू नये म्हणून मीठच वापरतात, असल्या चर्चे पर्यंत काहीही. माझ्या कपाळावर अधून-मधून दिसणाऱ्या कुंकवाचा आणि ’नवरा’ या entity चा काहीतरी संबंध आहे, हे तिला आमच्या गप्पांमधून कळलेलं. त्यामुळे माझ्या नवऱ्याची चौकशी करताना ’क्खुंक्खू’ म्हणत प्रश्नार्थक चेहरा करते.

तिला माझं नाव बऱ्यापैकी उच्चारता येतं कारण ’अल्‌’ आणि ’का’ यांचं अरबी मूळाक्षरांशी साम्य आहे. माझ्यासाठी मात्र ती, ’ती’ च.

आज mood एवढा का गेला म्हणून विचारायला तिच्या जवळ गेले. तिच्या हातातली cigarette काढून विझवली. ग्लासभर पाणी घेऊन आले तर तिचेच डोळे पाण्याने गच्च भरलेले. माझे हात पकडून म्हणाली, ’क्खुंक्खू.... संदूक... ’ आणि समोरच्या पाण्यात बुडवण्याची action.

मला कळलं... म्हणजे वैताग नवऱ्यावर आहे तर ! मग फारसं काळजीचं कारण नाही. नेहमीचच. पुन्हा एकदा तिची typical इराणी melodramatic, loud style. आज हिला हिच्या नवऱ्याला एका पेटाऱ्यात बंद करून समोरच्या पाण्यात बुडवण्याची इच्छा होत आहे तर!

’दे टाळी ! मला...’ असं खोडसाळपणे म्हणण्याचा मोह प्रसंगाचं गांभिर्य पाहून आवरला. पुढचा अर्धा तास ती जे काही सांगत होती ते शब्दश: नाही तरी ’त्या हृदयीचे या हृदयी’ खूप छान पोचलं.

मला नं या आमच्या शब्देंवीण संवादाचं कोण अप्रूप आहे. कारण ज्याच्याशी असा संवाद खरं तर जमायला हवा होता, तिथे ’सिखों ना, नजरों कि भाषा पिया’ अशी कथा आहे. पूर्वी एकदा हा प्रयोग मी करून पाहिला होता. १५-१६ माणसांमध्ये diagonally opposite बसलेल्या नवऱ्याला देहबोलीने काहीतरी सूचवायचा प्रयत्न केला तर त्याने खणखणीत आवाजात सांगितलं होतं, “जरा स्पष्ट सांग. मला असल्या खाणाखूणा काही कळत नाहीत.”

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

चेहरा


घरी जाताना दूध घेऊन जावे म्हणून गाडी पहिल्या दिसलेल्या सुपर मार्केटशी थांबवली. घाईतच दुधाचा कॅन उचलला आणि check out ला आले. एक counter बंद. दुसऱ्यावरची attendant आणि एक ग्राहक यांच्यात अरबीत चर्चा की वाद... देव जाणे... काही तरी चालू होते. शांतपणे थांबून राहिले. तब्बल पाच-सात मिनिटे गेली असतील.

तेवढ्यात कुठुनसा, तिथेच काम करणारा एक तरूण आला. counter चालू केले आणि म्हणाला, "इकडे या."
या अरबस्तानात, घरापासून दूर, हा अनोळखी माणूस माझ्याशी सरळ मराठीत बोलतोय? त्याच्या गणवेषावरचे नाव पाहिले. 'सादिक अहमद'.
न राहवून विचारले, "तुम्ही माझ्याशी मराठीत बोलताय. येतं तुम्हाला?"
"हो. मस्त. ठाण्याचा नं मी."
"पण मी मराठी आहे हे तुम्हाला कसं कळलं?"
"चेहऱ्यावरचं मराठीपण काही लपतं का?".

विचारांच्या नादात गाडीपाशी आले. ड्रायव्हींग सीटवर बसून बेल्ट लावता लावता rear view mirror मध्ये वाकून, वाकून बघितलं. कुठे आहे हे चेहऱ्यावरचे मराठीपण? ना गळ्यात मंगळसूत्र, ना कुंकू, ना हातभर बांगड्या. साधं jeans, t-shirt आणि कापलेले केस. कुठलाच typical 'मराठी' साजशृंगार नाही.
की ’मराठीपण’ म्हणजे, मी मगाशी रांगेत दाखवलेली चांगल्या शब्दात 'सबुरी' किंवा स्पष्ट शब्दात 'भिडस्तपणा'?

न राहवून परत दुकानात गेले. त्याला विचारलं, हे चेहऱ्यावरचं ’मराठीपण’ म्हणजे काय? तर म्हणतो कसा, "बस्स का... ते असतंच. असं सांगता नाही येत."
माझ्या डोक्यातील किड्यांच्या वसाहतीत आणखीन एकाची भर पडली.

बेरकी, साळसूद, निरागस, हासरे, आढ्यतेखोर, प्रांजळ अशा अनेक ’पणा’ मिरवणाऱ्या चेहऱ्यांनी परतीच्या प्रवासात घेरून टाकलं. खऱ्या जगातले, FB सारख्या virtual जगातले, प्रसंगी भेटणारे, अप्रसंगी टाळावेसे वाटणारे, कितीतरी... त्यांच्यावरचे हे भाव... किती खरे? की नुसतेच आविर्भाव? की हे भाव म्हणजे बघणाऱ्याचे perception... सापेक्ष.

कुठे तरी वाचलं होतं, 'You can take a person out of his country, but not the country out of the person.' ... इथे चेहऱ्याचं वांशिक मूळ असणार.
असंही म्हणतात की 'चाळिशी नंतरचा चेहरा हा तुमचा खरा चेहरा असतो.' ... म्हणजे चेहऱ्यावरचे भाव ही माणसाची आयुष्यभराची कमाई तर.
की शांताबाई म्हणतात तसं... ’हे रान चेहऱ्यांचे माझ्या सभोवती....... हे रान चेहऱ्यांचे घेरीत मज ये असे, माझ्याही चेहऱ्याची मजला न शाश्वती.’

मी आणि माझ्या डोक्यातली ever increasing entropy !!!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

’उजेडी राहिले उजेड होऊन’


पंडितजींच्या अस्वस्थ तब्येतीच्या वार्ता जशा कानावर यायला लागल्या, तसं कुठेतरी जाणवायला लागलं होतं की या वेळचा प्रसंग जरा अवघड आहे. एका अनामिक हुरहुरीनं ग्रासलं आणि उपाय म्हणून भीमसेनी गायन ऐकण्याचा जसा काही सपाटाच लावला. मिळेल ते, मिळेल तिथून.

त्या कोसळत्या धबधब्यात आकंठ बुडण्याचा विचार होता. पण त्या धबधब्याचा जोश आणि जोर इतका की त्याच्या काठाकाठाने नुसते तुषारच अंगावर घ्यावेत. व्यक्तीमत्वातली आक्रमकता, रग गाण्यात ठासून भरलेली. ’देहभान’ विसरणे म्हणजे काय, त्या वरच्या निराकार-निर्गुणाशी direct uplink connection जोडणे म्हणजे काय? असे प्रश्न पंडितजींना गाताना पाहिलेल्यांना पडत नाहीत.

पं. भीमसेन जोशींवर मी काही बोलावं, असा कुठलाही अधिकार माझ्याकडे नाही. ना माझा आणि त्यांचा वैयक्तिक परिचय की त्यांच्या घरगुती जीवनाबद्दलचे औत्सुक्य शमवावे, ना माझी संगीत साधना एवढी की त्यांच्या गायकीवर विश्लेषणात्मक काही बोलावे. जस्तीतजास्त एवढंच म्हणता येईल त्यांच्या स्वरवर्षावात भिजून गेलेल्या करोडो रसिकांपैकी एक.

मी मांडलेल्या भीमसेनी गान-यज्ञाची सांगता करताना असं वाटलं... भीमसेन ज्या दिव्यत्वाचा ’अनुभव’ घेत होते त्याची ’अनुभूती’ आम्हा रसिकांना फक्त आणि फक्त, त्यांच्याच मुळे मिळाली.

नामदेवांनी वर्णिलेला ’तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ पहाण्यासाठी आमची नामदेवांशी ओळख असण्याची गरज नव्हती. तो आम्हाला पंडितजींनी ’दृक-श्राव्य’ समजावून सांगितला. ’नामा म्हणे मज विठ्ठल सापडला’ म्हणताना तो पांडुरंग पंडितजींच्याही नजरेच्या टप्प्यातच असायचा. ’जो भजे हरि को सदा’ अशा व्यक्तीचे नेमके काय होते, हे ब्रम्हानंदांपेक्षा भीमसेनांमुळे जास्त चांगले समजले. ’रघुवर तुमको मेरी लाज’ सांगणारे तुलसीदास, श्रीरामाकडे, या भीमण्णांपेक्षा अधिक आर्त साकडं घालत असतील, अशी शंकाही कधी आमच्या मनात आली नाही. ’रम्य ही स्वर्गाहून लंका’ असं पंडितजी जेव्हा सांगतात, तेव्हा लंकेचे ऐश्वर्य आणि रावणाचे दशग्रंथी पांडित्यच आमच्या डोळ्यासमोर असतं.

आणि अगदी खरं सांगायचं तर, गदिमांना अभिप्रेत असलेली ’उजेडी राहिले उजेड होऊन’... ही अवस्था, निवृत्ती-सोपान-मुक्ता यांना घेऊन कल्पना करण्यापेक्षा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या रुपाने आम्हा रसिकांनी प्रत्यक्ष पाहिली.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS