RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

अबोध काहीसे


खिडकीच्या काचेवर टकटक.... कसं शक्य आहे? आत्ता पर्यंत असं कधीच झालं नाही आणि होणं अवघडही.... इतक्या उंचावर कोण येणार?
चक्क चिमणी.

आता भारतातून दिसेनाशी होऊ लागलेली चिऊताई.... इथे दिसते क्वचित कधी.... पण आमच्या घराच्या खिडकीच्या बाहेर प्रथमच.... आमच्या दोघींमध्ये जाड काचेची भिंत.

एवढासा जीव.... काचा उघडूच शकत नाही अशा खिडकीच्या बाहेर, तितक्याच पिटुकल्या आधाराला टेकलेला.... कृष अंगकाठी.... ही आजकालच्या फॅशनला धरून जाणीवपूर्वक की कुपोषीत? पाणी हवंय का हिला? द्यावं तरी कसं? माझं इतकं जवळ जाणं तिला घाबरवत कसं नाही? एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे बघताना मधूनच चोचीने काचेवर केलेली टकटक आणि मधल्या काचेमुळे muted वाटणारी चिवचिव....

काही सांगायचंय का हिला? पण चिमण्या कुठे बोलतात? म्हणजे विचार तरी करू शकतात का? जवळ-जवळ १० मिनिटे चाललेली ही interaction संपूर्णत: निरुद्देष्य कशी असेल?
आमचं घर ३० व्या मजल्यावर, म्हणून मला काही आकाश तितकंसं जवळ नाही.... माझ्या भोवती माझ्या घराच्या भिंती.... तिचं अभाळही तितकं मोकळं नव्हतं का?
हा ’या हृदयीचे- त्या हृदयी’ असा संवाद की.... कल्पनेच्या विलासाला लागलेले चिमणीचे पंख?

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

कहाणी मिडियाची.


( 'ऐका गणेशा तुमची कहाणी' या पारंपारिक कहाण्यांच्या चालीवर. )

ऐका मिडिया तुमची कहाणी.
अनेक भाषा, अगणित वाद.   वाढती प्रजा, त्यांच्या वाढत्या गरजा.
अनेक पक्ष, असंख्य नेते, त्यांचे अमर्याद घोटाळे.
न्यूज चॅनेल्सची मांदियाळी.   मनींचे चॅनल मनीं वसावे.

हा वसा कुणी घ्यावा ? हा वसा कुणीही घ्यावा. स्त्रीयांनी घ्यावा. पुरुषांनी घ्यावा.
एक छानसे चॅनल काढावे. ते चोवीस तास चालवावे. त्याला न्यूज चॅनेल असे नाव द्यावे.
खूपच आविर्भावाने बोलू शकणारी चार-दोन डोकी घ्यावी.
त्यांना ’news anchor' असे खासे नाव द्यावे.
तोंडी ’केंद्राने राज्याच्या तोंडाला पानं पुसली’ अशी भडक भाषा द्यावी.
त्यांनी काय करावे?

दिवसभरातील एक छोटा-मोठा प्रसंग घ्यावा. कॅमेरा आवडणारे आणि कॅमेऱ्याला आवडणारे तेच-तेच चेहरे घ्यावे. त्यांच्यात झुंज लावून द्यावी. त्यास ’विद्वत्तापूर्ण चर्चा’ असे नाव द्यावे. "अमुक असं म्हणतात त्यावर तमुक तुमचे काय म्हणणे आहे?" असे मधून-मधून बरळावे. अशा प्रकारे आपल्याकडे नसलेले संशोधन कौशल्य शिताफीने झाकावे.
राजकीय, खेळ, विज्ञान, भविष्य, करमणूक, स्त्रीया, आरोग्य, असा सगळा मसाला एकत्र करावा.
त्यावर कॅमेराच्या चित्र-विचित्र angles चा आणि loop मध्ये टाकलेल्या स्वल्प चित्रफितींचा overlay द्यावा.

हा वसा कधी घ्यावा? दिसा उजेडी आरंभ करावा. अंधार रात्री संपूर्णास न्यावा.
संपूर्णास काय करावे? जाहिरातींचे उत्पन्न मोजावे.
भ्रष्टाचार, दहशत्वाद, राजकीय नेते, त्यांची व्क्तव्ये, चित्रपट अभिनेते, त्यांची अविद्वत्तापूर्ण भाषणे, यातील कुठल्या विषयाचा TRP जास्त याचा हिशेब मांडावा.
समाजाचा अत्यल्प विचार करावा.
अल्प दान, महापुण्य.

उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये.
ऐसा मिडिया मनीं ध्याइजे, मनीं पाविजे, चिंतिले लाभिजे, कार्यसिध्दि करिजे.
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

कोमेजली कवळी पानं


programming / coding चे चाललेले काही नवे प्रयोग... त्यासाठी करावी लागणारी internet वरची सखोल शोधाशोध... एकाग्रता...
अचानक गळून पडलेल्या झाडाच्या पानाच्या आवाजाने त्या वातावरणाला छेद दिला.

घरात पंचवीस एक ’हिरवी’ चिल्ली-पिल्ली वाढत आहेत. ह्या thermostat controlled 22oc वातावरणात ही कोणी नाराजी दाखवली?
सात-साडे सात फूट ताडमाड वाढलेल्या एका झाडाचे, काहीसे नवीनच, पान खाली पडले होते. मातीची आर्द्रता, बाहेरचे तापमान अशी जुजबी पाहणी केली आणि असं होतं कधीकधी, मनात म्हणत माघारी वळले.

पण गेल्या तीन दिवसात अशी पाच पानं? माझ्या अस्वस्थतेचा कडेलोट.. त्या झाडाचे जवळ-जवळ प्रत्येक पान मागून-पुढून तपासून पाहिलं. काही अनोळखी खुणा... काही वेगळी स्पंदनं... यांचा शोध घेतला. चक्क एक छानसं भिंग घेऊन सुद्धा.

हे सर्व चालू असताना एक वेगळाच विचार मनात आला..
असे गळून पडलेल्या भावनांचे आवाज पण ऐकू आले असते तर? आणि ते ऐकू येण्यासाठी शांतता हवी की संवेदनशीलता?


 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS