RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Territorial war


पुण्यातलं आमचं घर नदीच्याकाठी आहे.
नदी, पलीकडचा घाट.. अगदी थेट ‘पैल घंटा घुमे राउळी’ सारखा.. छान मोकळी जागा.... आणि त्यामुळे भरपूर पक्षी.
पाच वर्षांपूर्वी तिथे राहायला गेल्यावरच्या पहिल्या पावसाळ्यात खिडकीच्या गजांवर ओले पक्षी येऊन बसले आणि मी घरातल्या प्रत्येकाला बोलावून बालकवी वर्णन करतात ते ‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती’ कसं असतं, ते उत्फुल्ल मनाने दाखवलं.

पण थोड्याच दिवसात त्या गजांवर गळलेली पिसं, त्या पक्ष्यांची शी, शू, वळचणीला घरटी, ती बांधण्यासाठी त्यांनी शोधून शोधून आणलेल्या काड्या, जुन्या वायरींचे तुकडे.. मग पिलांची अंडी, त्यातून पिल्लं बाहेर पडताना सुटलेला वास, अंड्याची टरफलं…. असं सुरू झालं आणि माझ्या पक्षीप्रेमाचा पार धुव्वा उडाला.
ती ‘बगळ्यांची माळ’ अंबरातच उडत आहे आणि ते ‘द्विजगण अवघे वृक्षीं’च आहेत, तोपर्यंतच ठीक. आता पारव्याचं घुमणं माझ्या छातीत एक वेगळीच धडधड वाढवतं.. आल्या का या कबुतरीणबाई बाळंतपणाला !!
उलटपक्षी माझं असं स्पष्ट मत झालं आहे- कुठल्याही कवीला, एका कबुतरणीचं एक जरी बाळंतपण निस्तरायची वेळ आली तर ते ‘कबूतर जा जा..’ फार वेगळ्या अर्थाने म्हणतील.

गेल्या माझ्या मुक्कमात मी एका कबुतरीणबाईंशी full on.. territorial war लढले.. त्याची ही कहाणी.

तिची territory कुठली? याचं किंचित वर्णन करायला लागेल. एका गच्चीला POPचं छत घालून त्याखाली एक छानसं जेवणाचं टेबल ठेवलं आहे. POP वर पाणी पडू नये म्हणून त्यावर जाड प्लॅस्टीकचं शीट आहे. POPचं छत आणि plastic-sheet, यात साधारण पाच इंचाची जागा आहे आणि नेमक्या याच जागेत एका कपोत युग्माने गेले दोन-तीन वर्षे मुक्काम ठोकलेला.

आम्ही या घरी काही कायमचे राहात नाही. वर्षाकाठी जेव्हा केव्हा मी इथे येते, तेव्हा बराच वेळ त्यांना आवर घालणं, हा एक मोठा उद्योग असतो. महिनाभरात परत गेले की पुन्हा त्यांचंच राज्य. पण इतक्या कमी उंचीच्या जागेतील त्यांच्या उच्छादाने काही इतर प्रश्‍न निर्माण झाले आणि यावेळेस त्यांना विस्थापित करणे, हा मुद्दा ऐरणीवर आणावा लागला.

एकदा वरती चढून तिथे काय परिस्थिती आहे ते पहावं तरी, म्हणून एक शिडी घेतली. त्यावर चढले. मग एक पाय शिडीवर, एक जवळच्या गजांवर, एका हाताने ड्रेनेजचा पाईप पकडून... असं सगळं करत जेमेतेम नजर पोचेल इतकी उंची गाठली. पाहते तर काय.. चांगली मोठ्ठी झालेली दोन पिल्लं माझ्यापासून आठ इंचांवर. त्यांच्या डोळ्यातले भाव पाहून मी ‘क्राइम पेट्रोल’ मधली मुलं पळवून नेणारी बाई आहे की काय, असं वाटलं. ते मला घाबरले- तितकंच मी त्यांना घाबरून खाली उतरले. आता ती उडून जाईपर्यंत थांबणं आलं.. तीन-चार दिवसांनी ती उडून गेली.
चला.... हीच ती वेळ, हाच तो क्षण.......

आमची कामवाली बाई रेखा म्हणाली, कबूतरं काळ्या रंगाला घाबरतात. तू तिथं एक काळं कापड बांध. मग एक जुनी काळी साडी शोधली.. तिचे तीन चार तुकडे केले.. वेगेवेगळ्या उंचीच्या काठ्यांना ते बांधले आणि निषेधाचं, बंडांचं पहिलं काळं निशाण रोवलं.

माझं असं म्हणणं होतं... प्लॅस्टीक शीटवरचं सगळं आभाळ तिचं- कबुतरणीचं..... आणि पीओपी छताखालचं घर माझं...
मधली पाच इंचांची जागा no man’s land तर होतीच, तशीच ती no bird’s land ही असायला हवी. पण कबुतरीणबाईंना ते साफ अमान्य होतं. ’कसेल त्याची जमीन, राहिल त्याचं घर’ हा कुळ-कायदा माझ्यापुढे फडकवत, तिथं दोन वर्षे मुक्काम असल्याचा हक्क सांगितला. मी रोवलेल्या निषेधाच्या निषाणांची पायमल्ली केली. आपल्या पंखांनी सगळे झेंडे उधळले व जागेवरचा ताबा सोडायला स्पष्ट नकार दिला.

पुढील घरगुती उपाय म्हणून तिथे डांबराच्या गोळ्या टाकल्या, हीट मारलं, जे म्हणून काही उग्र वासाचं सापडलं त्यांचा वर चढून मारा केला. पण छे ! ह्या बयेचं माझ्या डोक्यावर नाचणं, शब्दश: आणि लाक्षणिक, दोन्ही अर्थाने थांबेचना मेलं. तिच्या पावलांचा आवाज ऐकला रे ऐकला की मी हाताशी ठेवलेली काठी घेऊन पळायचं आणि खालून टकटक करून तिला हाकलायचं..
पण कृतनिश्वयी सौ. कबूतर, श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेच्या ३र्‍या अध्यायाची- कर्मयोगाची- जन्मल्यापासून रोज पारायणे करत असल्यासारख्या ध्येय आणि कर्म दोन्ही सोडायला तयार नव्हत्या.
नानाच्या (पाटेकर) मते ‘एक मच्छर...’ तुमची वाट लावतो इथे तर हे एक अख्खं कबूतर होतं.

हे काही खरं नाही. आता आपण Google नावाच्या Oracle कडे हा प्रश्‍न घेऊन जावा. त्याच्याकडे सर्व उत्तरं असतात..
त्याने दोन उपाय सुचवले. एक म्हणजे फळीला खिळे ठोकायचे आणि ती उलटी करून कबूतरं बसतात त्या ठिकाणी ठेवायची. छे छे !! हे असलं अघोरी काम होणं नाय... दुसरं म्हणजे CDs उलट्या ठेवायच्या. चमकणारा भाग वरच्या दिशेने. त्यात कबुतरांना त्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं की ते घाबरतात... इति गूगल.

भराभरा घरात सापडलेल्या जुन्या CDs घेतल्या. त्यांची वेगवेगळे कोन करून रचना केली. त्या पडू नये म्हणून फेविकॉलचा ठिपका देऊन चिकटवल्या. वरची वळचणीची जागा आणि त्या भोवतीची भाग, महाराणी पद्मिनीच्या आरसे महालाला लाजवेल असा करून मी आणि रेखा वाट पाहू लागलो. एक दिवस शांतता. दुसर्‍या दिवशी सकाळपासून ही शंभी महाराणीच्याच तोर्‍यात त्या विवक्षित जागेत प्रवेश करती झाली.

मग मात्र मी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष महामहीम श्री. ट्रंप यांच्याकडून प्रेरणा घेतली. एका POPचं काम करणार्‍या माणसाला बोलावलं. त्याने काही तास काम करून एक भिंत बांधून अनधिकृत घुसखोरीचा मार्ग कायमचा बंद केला.
कबुतरीणबाईंनी दोन दिवस माझ्याकडे खूप रागाने बघितलं. मान गरागरा फिरवली. वेगवेगळे भीतीदायक आवाज काढले.. त्या भिंतीवर चार-पाच धडकाही देऊन पाहिल्या.
एकीकडे मी मात्र दुबईला परतण्याच्या तयारीला लागले.

विमानतळाकडे निघताना शेवटचं, सगळं नीट बंद केलंय नं, असं तपासत फिरत होते तो काय.. दुसर्‍या गच्चीतल्या inverter वर बसून ही गंगी शांतपणे सर्वेक्षण करत होती.

टॅक्सीत बसल्याबसल्या कबुतरीणबाईंऐवजी मीच श्री. ट्रंप यांना tweet केलं.... "भिंत बांधून अनधिकृत घुसखोरी थांबवता येत नाही. पुरावा आहे."
... आणि पुढच्यावेळचं theatre of war काय असेल याचा विचार करू लागले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

'यमक'श्री गदिमा


"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतेस्थळावर आज मितीस उपलब्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्‍त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक’ हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर ’यमक’ हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं ’त्या तिथे, पलीकडे... झाड एक वाकडे’ किंवा ’घननिळा लडिवाळा’ सारखं अनेक वेळा उद्धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू...

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू...

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका’तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र’ रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्‍त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव’ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि ’व’चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता...
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण’ हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा... प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा.... सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

( फोटो सौजन्य- आंतरजाल )


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS