RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

जित्या गळ्याचा माणूस


( हा लेख सुप्रसिद्ध मराठी भावगीत गायक श्री. अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ या आत्मचरित्रात प्रसिद्ध झालेला आहे.
शब्दांकन - सुलभा तेरणीकर : मोरया प्रकाशन, पुणे : प्रथम आवृत्ती - ४ मे २०१६ )

थोर कलाकारांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असते. या कुतूहलाचे निवारण वेळोवेळी, त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर- त्याच्यांवरील लेखांमधून, त्यांच्या मुलाखतींमधून होत जातं. पण काही माणसं अशी असतात की त्यांना कितीही जाणून घेतलं तरी अजून काही जाणणं दशांगुळे उरतंच. ‘अरुण दाते’ या कलाकार आणि व्यक्तिमत्त्व, अशा दोन्ही अर्थाने टोलेजंग माणसाविषयी नेमकं हेच म्हणता येईल.

तब्बल सहा दशकांची सांगीतिक कारकीर्द, २६०० हून अधिक, फक्त स्वतः गायलेल्या गाण्यांचे जगभर केलेले कार्यक्रम.. यामुळे रसिकांचा प्रचंड आदर, प्रेम ‘याचि देही याचि डोळा’ बघण्याचे भाग्य अरुणजींना लाभले आहे. जी. एन्‌. जोशी, बबनराव नावडीकर, गजाननराव वाटवे यांनी घालून दिलेल्या पायावर मराठी भावगीत परंपरेची उत्तुंग इमारत अरुणजींनी उभारली. या इमारतीस जवळपास पाच पिढ्यांचे मजले आहेत. या मजल्यांमधून अरुणजींनी गायलेल्या गीतांचं प्रसन्‍न वारं झुळझुळत असतं. त्या वार्‍याला काळाचा शिळेपणा अजिबात शिवलेला नाही, शिवूच शकत नाही. कुणीही रसिकाने येथे आश्रयास यावं. या वार्‍याची एक लहर अंगावर घ्यावी आणि ताजंतवानं होऊन जावं.

अरुणजींनी ही भावगीते जनसामान्यांपर्यंत नेऊन पोचवली. ती रसिकांच्या मनांना भिडली, हृदयांवर राज्य करू लागली. आज देखील आकाशवाणीच्या ‘आपली आवड’ सारख्या कार्यक्रमात दाते साहेबांचं गाणं वाजलं नाही असा दिवस विरळाच असेल. बोजड नसलेले शब्द, वेधक चाली आणि त्यावरचा कळस असलेला अरुणजींचा मार्दवपूर्ण आवाज, शैली.. खानदानी शालीनतेचा साज ही गीते गेली ६० वर्षे मिरवीत आहेत.
याला समांतर आणि अरुणजींच्या समकालीन उदाहरण गझल गायक जगजीत सिंह यांचं देता येईल. जगजीतजींच्या आधी आणि त्याच वेळेस अनेक गायक उर्दू गझल गात असत. पण जगजीतजींनी गझलेला रसिकांच्या मनांत रुजवलं आणि गळ्यावर चढवलं.

१९६२ च्या सुमारास अरुणजी त्यांचं पहिलं मराठी भावगीत ‘शुक्रतारा मंदवारा’ गायले. शुक्र ग्रह अवकाशात कधी जन्माला आला माहित नाही पण पाडगांवकर-खळे-दाते या त्रयीच्या ‘शुक्रतारा’ने जन्म घेतला आणि तेव्हापासून ही ‘शुक्राची चांदणी’ मराठी भावसंगीताच्या अवकाशातलं आपलं अढळ स्थान राखून आहे. ‘भारलेल्या या स्वरांनी’ रसिकांचा जन्‍म भारला गेला तो कायमचाच.

‘हात तुझा हातातुन’, ‘पहिलीच भेट झाली’, ‘येशिल येशिल राणी’, ‘श्रीरंस सांवळा तू, मी गौरकाय राधा’, ‘मज सांग सखे तू सांग मला’ सारख्या गाण्यांनी प्रेमाची परिभाषा निर्माण केली. ‘सच्ची मुहब्बत’चे तरल स्वर- मृदू, संयत आवाजात रसिकांपर्यंत पोहोचू लागले.

पण हा आवाज फक्त प्रेमतरंगांवर लहरत राहिला, असं नाही. ‘भातुकलीच्या खेळा’मधली तडप, ‘वाळवंटातून भीषण वैराण’ मधला अंगावर येणारा एकटेपणा, ‘धुके दाटलेले’ मधले औदासिन्य, ‘या जन्मावर या जगण्यावर’ मधली जिंदादिली, ‘असेन मी नसेन मी’ मधली शाश्वतता, ‘सोबती’ चित्रपटतील ‘देवाघरच्या फुलातली’ असहय्यता, ‘डोळ्यांत सांजवेळी’ मधला समजूतदारपणा, ‘अखेरचे येतील माझ्या’ मधली फकिरी, ‘जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌’ मधलं लावण्य (पाडगांवकरांनी खास अरुणजींच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी लिहिलेला हा ‘लावणा’).... हे सर्व अरुणजींनी आपल्यापर्यंत तितक्याच दृढतेने पोचवलं.

मराठी भावसंगीतावर त्यांनी उमटवलेला ठसा, इतका ठळक आणि खोल आहे की जणु ‘मराठी भावगीत’ आणि ‘अरुण दाते’ हे समानार्थी शब्द व्हावेत. मी हे धाडशी विधान करण्याचं कारणही तसंच आहे. त्याचं झालं असं, स्‍नेहासिस चॅटर्जी नावाचे माझे एक बंगाली मित्र आहेत. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर त्यांनी खूप आभ्यास, लेखन केलं आहे. लताबाईंच्या मराठी गाण्यांसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आमच्या अनेकवेळा चर्चा झाल्या. स्वाभाविकपणे दिदींच्या भावगीतांचा उल्लेख आला. तेव्हा स्‍नेहासिस म्हणाले होते.... "भावगीत तो वहीं होता हैं ना जो अरुण दातेजी गाते हैं।"

कवी सुधीर मोघे हे मला गुरुस्थानी. त्यांच्याकडे गेले की हा एक प्रश्न नेहमी चर्चेत असायचा. ‘गाणं नेमकं कोणाचं ? संगीतकाराचं की गायकाचं ?’ इथे ‘चर्चा’ किंवा ‘गप्पा’ म्हणणं खरं तर अवघड अशासाठी- की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे.
त्यांच्या मते गाणं- हे त्याच्या अंतीम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भुमिकांबद्द्लची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. कधी एकाच्या बाजूने पारडं जड तर कधी दुसर्‍याच्या. (खरं तर ते स्वत: कवी / गीतकार / संगीतकार. पण व्यक्तीश: त्यांच्यासाठी एकदा कविता कागदावर उतरली की ती तिच्या मार्गाने, तिच्या नशिबाने जाते आणि कवी त्याच्या.)

मी त्यांना एकदा म्हंटलेलं, ‘गायक’ हा त्या गाण्याचा प्रवक्ता किंवा चेहरा असतो. म्हणून जर गीताच्या शब्दरचनेविषयी किंवा चालीविषयी बोललं जात नसेल तर उरलेला पूर्णवेळ गाणं हे (लौकिक अर्थाने) गायकाचं असतं. याची पुष्टी म्हणून आज मला हे एक उदाहरण देता येईल. ‘संगदिल’ या हिंदी चित्रपटात ‘दिल में समा गयें सजन’ असं एक गाणं आहे. त्याच्या वजनावर, मराठीतल्या एका वेगळ्या छंदात, गंगाधर महाम्बरे यांनी एक गीत लिहिलं आणि त्याला हृदयनाथांनी चाल लावली. ‘संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी..’ जेव्हा कधी या गाण्याच्या इतिसासात, खोलात जाण्याची वेळ येते तेव्हाच या तपशीलाचं महत्त्व. अन्यथा आपल्यासाठी ते फक्त अरुण दातेंचं गाणं असतं.
दाते साहेबांनी, त्यांनी गायलेल्या सर्व गाण्यांना असं सर्वाथाने आपलं करून घेतलं आहे.

जाताजाता अरुणजींच्या नावावर नसलेल्या तीन गाण्यांचा मला मुद्दामहून उल्लेख करायचा आहे. ’काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही’,’पाऊस कधीचा पडतो’ आणि ‘उष:क्काल होता होता’. ही गाणी अरुणजींच्याही आवाजात ऐकता येतात. त्या गाण्याचे प्रचलित गायक आणि अरुणजींसारख्या सिद्धहस्त गायकाने केलेला त्यांचा आविष्कार, हे दोन्ही पाठोपाठ ऐकण्याचा आनंद काही वेगळा आहे.

आणि त्यांच्या दोन युगुलगीतांच्या ध्वनीमुद्रीत स्वरुपाच्या शोधात मी बरेच वर्षे आहे. दोन्ही गीते शांताबाई शेळके यांची आहेत आणि सहगायिका आहेत कुंदा बोकिल. ‘हा मंद मंद वारा ही धुंद रातराणी, आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी’ आणि ‘जे सत्य मानले मी आभास तो ठरावा, दोघांतला कसा हा साहू अता दुरवा’. पूर्वी कधीतरी आकाशवाणीवर ऐकलेली ही गाणी. आज इतक्या वर्षांनी देखील त्यांचे शब्द नजरेसमोर आले तर स्वर मनात रुंजी घालू लागतात.

असा हा ‘जित्या गळ्याचा माणूस’. कविवर्य मंगेश पाडगांवकर उगीच त्याला गर्दीत आणि कोलाहलात शोधत होते. तो खरं तर त्यांना केव्हाच सापडला होता.. तो त्यांचीच गाणी गात गेली कित्येक वर्षे रसिकरंजन करतो आहे.

{ कोलाहलात सार्‍या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
..
काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी
..
-मंगेश पाडगांवकर
}

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

'यमक'श्री गदिमा


"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळावर आज मितीस उपलब्द्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्‍त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक' हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर 'यमक' हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं 'त्या तिथे, पलीकडे... झाड एक वाकडे' किंवा 'घननिळा लडिवाळा' सारखं अनेक वेळा उद्‌धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू...

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू...

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका'तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र' रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्‍त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव’ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि ’व’चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता...
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण' हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा... प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा.... सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

Territorial war


पुण्यातलं आमचं घर नदीच्याकाठी आहे.
नदी, पलीकडचा घाट.. अगदी थेट ‘पैल घंटा घुमे राउळी’ सारखा.. छान मोकळी जागा.... आणि त्यामुळे भरपूर पक्षी.
पाच वर्षांपूर्वी तिथे राहायला गेल्यावरच्या पहिल्या पावसाळ्यात खिडकीच्या गजांवर ओले पक्षी येऊन बसले आणि मी घरातल्या प्रत्येकाला बोलावून बालकवी वर्णन करतात ते ‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती’ कसं असतं, ते उत्फुल्ल मनाने दाखवलं.

पण थोड्याच दिवसात त्या गजांवर गळलेली पिसं, त्या पक्ष्यांची शी, शू, वळचणीला घरटी, ती बांधण्यासाठी त्यांनी शोधून शोधून आणलेल्या काड्या, जुन्या वायरींचे तुकडे.. मग पिलांची अंडी, त्यातून पिल्लं बाहेर पडताना सुटलेला वास, अंड्याची टरफलं…. असं सुरू झालं आणि माझ्या पक्षीप्रेमाचा पार धुव्वा उडाला.
ती ‘बगळ्यांची माळ’ अंबरातच उडत आहे आणि ते ‘द्विजगण अवघे वृक्षीं’च आहेत, तोपर्यंतच ठीक. आता पारव्याचं घुमणं माझ्या छातीत एक वेगळीच धडधड वाढवतं.. आल्या का या कबुतरीणबाई बाळंतपणाला !!
उलटपक्षी माझं असं स्पष्ट मत झालं आहे- कुठल्याही कवीला, एका कबुतरणीचं एक जरी बाळंतपण निस्तरायची वेळ आली तर ते ‘कबूतर जा जा..’ फार वेगळ्या अर्थाने म्हणतील.

गेल्या माझ्या मुक्कमात मी एका कबुतरीणबाईंशी full on.. territorial war लढले.. त्याची ही कहाणी.

तिची territory कुठली? याचं किंचित वर्णन करायला लागेल. एका गच्चीला POPचं छत घालून त्याखाली एक छानसं जेवणाचं टेबल ठेवलं आहे. POP वर पाणी पडू नये म्हणून त्यावर जाड प्लॅस्टीकचं शीट आहे. POPचं छत आणि plastic-sheet, यात साधारण पाच इंचाची जागा आहे आणि नेमक्या याच जागेत एका कपोत युग्माने गेले दोन-तीन वर्षे मुक्काम ठोकलेला.

आम्ही या घरी काही कायमचे राहात नाही. वर्षाकाठी जेव्हा केव्हा मी इथे येते, तेव्हा बराच वेळ त्यांना आवर घालणं, हा एक मोठा उद्योग असतो. महिनाभरात परत गेले की पुन्हा त्यांचंच राज्य. पण इतक्या कमी उंचीच्या जागेतील त्यांच्या उच्छादाने काही इतर प्रश्‍न निर्माण झाले आणि यावेळेस त्यांना विस्थापित करणे, हा मुद्दा ऐरणीवर आणावा लागला.

एकदा वरती चढून तिथे काय परिस्थिती आहे ते पहावं तरी, म्हणून एक शिडी घेतली. त्यावर चढले. मग एक पाय शिडीवर, एक जवळच्या गजांवर, एका हाताने ड्रेनेजचा पाईप पकडून... असं सगळं करत जेमेतेम नजर पोचेल इतकी उंची गाठली. पाहते तर काय.. चांगली मोठ्ठी झालेली दोन पिल्लं माझ्यापासून आठ इंचांवर. त्यांच्या डोळ्यातले भाव पाहून मी ‘क्राइम पेट्रोल’ मधली मुलं पळवून नेणारी बाई आहे की काय, असं वाटलं. ते मला घाबरले- तितकंच मी त्यांना घाबरून खाली उतरले. आता ती उडून जाईपर्यंत थांबणं आलं.. तीन-चार दिवसांनी ती उडून गेली.
चला.... हीच ती वेळ, हाच तो क्षण.......

आमची कामवाली बाई रेखा म्हणाली, कबूतरं काळ्या रंगाला घाबरतात. तू तिथं एक काळं कापड बांध. मग एक जुनी काळी साडी शोधली.. तिचे तीन चार तुकडे केले.. वेगेवेगळ्या उंचीच्या काठ्यांना ते बांधले आणि निषेधाचं, बंडांचं पहिलं काळं निशाण रोवलं.

माझं असं म्हणणं होतं... प्लॅस्टीक शीटवरचं सगळं आभाळ तिचं- कबुतरणीचं..... आणि पीओपी छताखालचं घर माझं...
मधली पाच इंचांची जागा no man’s land तर होतीच, तशीच ती no bird’s land ही असायला हवी. पण कबुतरीणबाईंना ते साफ अमान्य होतं. ’कसेल त्याची जमीन, राहिल त्याचं घर’ हा कुळ-कायदा माझ्यापुढे फडकवत, तिथं दोन वर्षे मुक्काम असल्याचा हक्क सांगितला. मी रोवलेल्या निषेधाच्या निषाणांची पायमल्ली केली. आपल्या पंखांनी सगळे झेंडे उधळले व जागेवरचा ताबा सोडायला स्पष्ट नकार दिला.

पुढील घरगुती उपाय म्हणून तिथे डांबराच्या गोळ्या टाकल्या, हीट मारलं, जे म्हणून काही उग्र वासाचं सापडलं त्यांचा वर चढून मारा केला. पण छे ! ह्या बयेचं माझ्या डोक्यावर नाचणं, शब्दश: आणि लाक्षणिक, दोन्ही अर्थाने थांबेचना मेलं. तिच्या पावलांचा आवाज ऐकला रे ऐकला की मी हाताशी ठेवलेली काठी घेऊन पळायचं आणि खालून टकटक करून तिला हाकलायचं..
पण कृतनिश्वयी सौ. कबूतर, श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेच्या ३र्‍या अध्यायाची- कर्मयोगाची- जन्मल्यापासून रोज पारायणे करत असल्यासारख्या ध्येय आणि कर्म दोन्ही सोडायला तयार नव्हत्या.
नानाच्या (पाटेकर) मते ‘एक मच्छर...’ तुमची वाट लावतो इथे तर हे एक अख्खं कबूतर होतं.

हे काही खरं नाही. आता आपण Google नावाच्या Oracle कडे हा प्रश्‍न घेऊन जावा. त्याच्याकडे सर्व उत्तरं असतात..
त्याने दोन उपाय सुचवले. एक म्हणजे फळीला खिळे ठोकायचे आणि ती उलटी करून कबूतरं बसतात त्या ठिकाणी ठेवायची. छे छे !! हे असलं अघोरी काम होणं नाय... दुसरं म्हणजे CDs उलट्या ठेवायच्या. चमकणारा भाग वरच्या दिशेने. त्यात कबुतरांना त्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं की ते घाबरतात... इति गूगल.

भराभरा घरात सापडलेल्या जुन्या CDs घेतल्या. त्यांची वेगवेगळे कोन करून रचना केली. त्या पडू नये म्हणून फेविकॉलचा ठिपका देऊन चिकटवल्या. वरची वळचणीची जागा आणि त्या भोवतीची भाग, महाराणी पद्मिनीच्या आरसे महालाला लाजवेल असा करून मी आणि रेखा वाट पाहू लागलो. एक दिवस शांतता. दुसर्‍या दिवशी सकाळपासून ही शंभी महाराणीच्याच तोर्‍यात त्या विवक्षित जागेत प्रवेश करती झाली.

मग मात्र मी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष महामहीम श्री. ट्रंप यांच्याकडून प्रेरणा घेतली. एका POPचं काम करणार्‍या माणसाला बोलावलं. त्याने काही तास काम करून एक भिंत बांधून अनधिकृत घुसखोरीचा मार्ग कायमचा बंद केला.
कबुतरीणबाईंनी दोन दिवस माझ्याकडे खूप रागाने बघितलं. मान गरागरा फिरवली. वेगवेगळे भीतीदायक आवाज काढले.. त्या भिंतीवर चार-पाच धडकाही देऊन पाहिल्या.
एकीकडे मी मात्र दुबईला परतण्याच्या तयारीला लागले.

विमानतळाकडे निघताना शेवटचं, सगळं नीट बंद केलंय नं, असं तपासत फिरत होते तो काय.. दुसर्‍या गच्चीतल्या inverter वर बसून ही गंगी शांतपणे सर्वेक्षण करत होती.

टॅक्सीत बसल्याबसल्या कबुतरीणबाईंऐवजी मीच श्री. ट्रंप यांना tweet केलं.... "भिंत बांधून अनधिकृत घुसखोरी थांबवता येत नाही. पुरावा आहे."
... आणि पुढच्यावेळचं theatre of war काय असेल याचा विचार करू लागले.

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

ग्रेस


एक विहीर असावी. अंधारी.. surreal असल्यासारखी.. तिच्या भोवतीचं सगळंच अगम्य, दुर्बोध. तिच्या दिशेने पाऊल टाकलं की अंगावर शहार्‍याचे कोंब फुटावेत.
मी दोन-तीन पाउले टाकते... आणि मागे फिरते.
आत डोकावून पाहणं झेपेल ? नको. शक्यतो बाजुबाजूनेच जावं.
पण विहिर परतू देत नाही. तिच्याबद्दलच्या आकर्षणाने कुतुहल, उत्सुकतेच्या मर्यादा कधीच पार केलेल्या असतात. fatal attraction.
सर्वत्र ओला, गूढ-काळा वास. त्या वलयात मी गुरफटायला लागते. वाट अधिकच निसरडी होते.
शेवाळलेला फुटका दगडी कठडा. कालातीत असल्यासारखा. कशीबशी त्याला रेलेते. त्याच्या आधाराने डोळे गच्च मिटून आत डोकावते.
ऐकू येते ती घुमणारी शांतता. डोळे उघडावे की नाही ? काय असेल.. आणि आपल्याला काय दिसेल ? पाणी खोल असेल ? की तिला तळच नसेल ? असलाच तळ तर तळाशी......
असतील कदाचित काही नि:श्वास, उमेदी सुद्धा...
आता हळहळू डोळे उघडायचे...
उडी मारणं, डुंबणं, तळ गाठणं वगैरे..... कुणास ठाऊक ..............

हे नातं आहे, कवि ग्रेस यांच्या कवितांचं आणि माझं ..

’गांव’
आभाळ जिथें घन गर्जे
तें गांव मनाशीं निजलें;
अंधार भिजे धारांनी
घर एक शीवेवर पडलें....

अन्‌ पाणवठ्याच्या पाशीं
खचलेला एकट वाडा;
मोकाट कुणाचा तेथें
कधि हिंडत असतो घोडा....

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो;
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो....

गावांतिल लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती;
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळींने मळती......

( फोटो सौजन्य- आंतरजाल )

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

पाऊस


तो तसा सर्द-चिंब पावसाळा, ते वय आणि ते शहर मागे टाकल्यानंतर कधीच भेटला नाही.

आईचं घर, लहानपण, ’अद्वैत’ नावाची ती नावाला जागणारी कॉलनी, त्या कॉलनीत असलेलं आमच्या घराचं विशिष्ट असं भौगोलिक स्थान, नाशिक .... आणि कोसळून-कोसळून चराचरांत मुरलेला बेबंद पाऊस.. ह्या सगळ्यांचे जमून आलेलं ते रसायन होतं.

आता घर असलं तरी आई नाही. मनात मूलपण जपलं असलं तरी वय लहान नाही. नाशिकला देखील ’तसा’ पाऊस पडतो, असं वाटत नाही....पण अंदाजे साडेतीन दशकांपूर्वीच्या पावसाळ्यांनी सोडलेल्या त्या पाऊसखुणा, पुसट काही झाल्या नाहीत. आजच्या पावसाने काही मागे ठेवलंय का? हे भिंग घेऊन शोधत फिरताना उलट त्या अधिकच ठळक होतात.

माझ्या जन्माच्या सुमारास बांधलेलं आमचं घर काही जंगलात नव्हतं. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या कॉलनीतच... पण तिच्या सगळ्यात आतल्या टोकाला होतं. कॅनडा कॉर्नरहून आत शिरलं की एक डावं-एक उजवं-एक डावं अशी वळणं घेत तिथं पोचायचं... सगळी वर्दळ, गजबज मागे पडलेली असायची.

घराच्या मागच्या दोन बाजुंना लांबच्या लांब पसरलेली काळीभोर शेत जमीन. हे शेत पायी ओलांडायचं म्हंटलं तर तब्बल पंधरा मिनिटे लागायची... घराच्या मागे पडकी विहीर... उंचच्या उंच गवत... हे सगळं पार करून पुढे गेलं की पुन्हा घरं, दुकानं, गिरणीवाल्या बाईंची पीठाची गिरणी, इस्‍त्रीवाला, सायकलवाला, शाळा, कॉलेज असं सगळं....
जसं काही शहराने वाढतावाढता दम लागून एक श्वास घेण्यासाठी थांबलं असावं, तसं...

या सगळ्यामुळे पहिला पाऊस, मातीचा वास, वळीव.. हे काही फक्त कवितेत भेटलं नाही. गरमागरम तापलेली काळ्याभोर मातीची ढेकळं. त्यावर आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब.. वाफाळलेला सुगंध... अशा वातावरणात आम्हा भावंडांवर पावसात भिजण्यावर नाही, तर न भिजण्यावर बंदी होती.

’ये ग ये ग सरी, माझे मडके भरी’ अशी सुरुवात केलेला पाऊस, पुढच्या चार महिन्यात आपली वेगवेगळी रुपे दाखवत ’पाऊस कधीचा पडतो...’ असा प्रवास करायचा. मातीच्या ढेकळांचा हळूहळू गच्च चिखल व्हायचा. त्यावरही संततधार पडत राहिली की सगळीकडे पाणीच पाणी.. शेतातलं पाणी कंपाउंडच्या भिंतीवरून बागेत यायचं. घराची तिसरी पायरी बुडली की रेनकोट घालून, कुदळ-फावडे घेऊन बाहेर शेतात जायचे. मधेमधे छेद देऊन पाणी मोकळे करायचे. त्या मोकळ्या झालेल्या, खळाळत धावणार्‍या पाण्याचा आवाज.... त्या पाण्याबरोबर वाहत येऊन पोटर्‍यांना अडलेले लव्हाळे... आणि ई.. शी.. करत त्याला भराभरा बाजूला काढणं.....

दहा-दहा दिवस, उभ्या सरळ रेषेत पडणार्‍या पावसाबरोबर अनेक पाहुणेमंडळी घरी यायची. शेतातली त्यांची घरं पाण्यात पार बुडून गेलेली असायची. चिक्कट आणि फिक्कट गुलाबी रंगाचं गांडूळ फारसं कुणालाच आवडायचं नाही. रात्रभर प्रेमसंवाद करणारे श्रीयुत आणि श्रीमती बेडुक... शेतात पाणी जितकं खोल, गच्च आणि जुनं, तितका या बेडकांचा अंदाज रुमानी.... आम्ही मुलं तर त्यांच्या ’डराव’च्या स्टाईल वरून त्यांना नावं द्यायचो आणि कोण कोणाच्या मागे लागलंय... कोणाचं कोणाशी जमलंय याचा अंदाज लावायचो.
काडी लावली की गोल वेटोळे करून बसणारा लाल-तपकिरी रंगाचा आणि शंभर पायांचा पैसा... मखमली लाल रंगाचा, तूतीची पानं खाऊन वाढणारा किडा. रिकाम्या काड्यापेटीला भोकं पाडून, त्यात खाली गवत अंथरून त्यावर याला ठेवायचं. तीव्र-उंच-चिरक्या आवाजांचे रातकिडे... पण हे सगळे तसे निरुपद्रवी.

काही भीतीदायक पाहुण्यांचे स्वागत मात्र व्हायचे नाही. आताच्या निसर्गमित्रांना हे फारसे आवडणार नाही. पण कॉलनीतल्या छोट्या मुलांची संख्या बघता हे स्वाभाविकच होते. विंचू दिसला की चपलेने मारलाच जायचा. ४-५ फुट लांबीची सापाने टाकलेली कात बागेत सहज मिळायची. ती दिसायची सुंदर पण तिची भीती वाटायची. एकदा बागेतल्या कारंजाच्या नळाच्या खोबणीत पाय सोडून बसलेल्या भावाच्या पायाला लागूनच एक पिवळा जर्द साप गोल करून बसलेला होता. अशा प्रसंगांना घाबरूनच साप-नाग-धामण-मण्यार दिसले की जोरात ओरडायचे. मग शेजारचे सगळे काका-दादा काठ्यालाठ्या घेऊन धावत यायचे. मारल्या गेलेल्या नागदेवतेने त्रास देऊ नये म्हणून रीतसर पूजा करून, दुधाचा नैवेद्य दाखवून त्याला अग्‍नी दिला जायचा. अनेकवेळा या साप-नागांची बोटभर लांबीची पिल्लं घरात सापडायची. ती पिटुकली पिल्लं सुद्धा काय सुंदर फणा काढायची !

एकदा एक गंमत झाली. तुडुंब पावसाळा आणि शेतात भरलेलं गुडघाभर पाणी.... मध्यरात्री झाली की कुणी स्‍त्री कण्हल्यासारखा आवाज यायचा. १०-१२ दिवस भरपूर पाऊस झालेला होता. त्यामुळे आधी वर्णन केलेले अनेक निर्वासित प्राणीमात्र बाहेर पाण्यावर तरंगत फिरत होते. रात्रीच्या मध्य प्रहरी बाहेर जायची कोणाचीच हिमंत होईना. चार दिवसांनी बाबा बॅटरी घेऊन गेलेच. तेव्हा लक्षात आलं कंपाउंडचा खिळखिळा झालेला एक खांब आणि त्याला बांधलेली काटेरी तार, वारं एका विशिष्ट दिशेने आले की एकमेकांना घासले जात होते आणि त्याचा तो आवाज होता.

घरची बाग या काळात फळा-फुलांनी भरून गेलेली असायची. काय नव्हतं तिथं? मोगरा, जाई-जुई-सायली, पाच रंगाच्या जास्वंदी, हिरव्या रंगाची अबोली, गुलाब (आणि त्यावर कलम करायला येणारे म्हातारे काका), द्राक्षाचे वेल, ऑगस्ट मध्ये पिकणारा हापूस, मलगोवा-पायरी अंबा, गुलमोहर, चिकू, पेरू, लिंबू, नारळ, मघई पान .....

आईचं घर आणि पाऊस यांचा आणखी एक ऋणानुबंध आहे.
ती गेली तेव्हाही आभाळ गच्च भरलेलं होतं आणि पाऊस खरोखरीच रिमझिम निनादत होता... आसमंत जसा दु:खाच्या मंद स्वराने भारलेला !!

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

कान तुटका


तसे घरात पाणी पिण्यासाठी काचेचे अनेक ग्लास होते. एकसारखे, संचातले. पण त्यामुळे फार गोंधळ उडायचा. कुणाचा कुठला? हा प्रश्न सतत चर्चेत रहायचा. त्यावर एक साधा-सरळ उपाय म्हणजे ग्लास विसळून ठेवणे. त्याने एका नवीन वादाला तोंड फुटायचे. विसळण्याची जबाबदारी कुणाची? खरं तर पाणी पिऊन झाल्यावर विसळून ठेवायला हवा, पण..... तसे झाले नसेल तर ? ..... confusion, अविश्वास....
साधारण चार साडेचार वर्षांपूर्वी यावर मी एक उपाय सुचवला. घरातील प्रत्येकाने आपल्या व्यक्तीमत्वाला साजेसे असे दर डोई तीन mugs आणायचे. त्यांचा वापर पाणी-चहा-कॉफी अशा सामान्य, दैनंदिन आणि वैयक्तीक पेयपानासाठी करायचा. अर्थातच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्याच्या-त्याच्या डोक्यावर.
तसे मी जाऊन सगळ्यांसाठी विकत आणू शकले असते... "ह्या रंगाचे हे तुझे तीन", वगैरे. पण आपल्या ’व्यक्तिमत्वाला साजेसे’ असा एक catch टाकून ’mugs’ हा प्रश्न मी अस्मितेचा आणि तत्वाचा केला आणि गुपचूप त्या जबाबदारीतून सुटका मिळवली.

नवर्‍याने एका दिवसात एकसारखे आणि संपूर्णत: काळ्या रंगाचे mugs आणले आणि ’Black is beautiful, simple.' असं म्हणत फार मूलभूत निवड केल्याचा आव आणला.
लेकाने बाजारात mugs या प्रकारात जितके म्हणून चित्र-विचित्र रंग-आकार शोधता येतील तेवढे शोधले, त्यासाठी तब्बल तीन आठवडे घेतले आणि तीन भन्नाट mugs माझ्यासमोर आणून ठेवले.
मी मात्र फार विचार केला नाही. कारण ’व्यक्तीमत्व’ वगैरे gimmick, हे निव्वळ माझ्या कमी काम करण्याच्या सोयीचे, म्हणून होते. मध्यम मार्ग स्विकारत त्या दोघांच्याही निवडकक्षेत नसतील असे पण जरा बरे वाटणारे तीन, जवळच्याच सुपर मार्केटमधून उचलले.

आणल्याच्या तीसर्‍याच दिवशी माझ्या एका mugला छोटासा अपघात झाला आणि त्याचा कान तुटला. "टाकून दे ग, कशाला ठेवतेस ?" दोघांचं टुमणं. इतक्या लगेच, केवळ कान तुटला म्हणून, त्याला कचर्‍याची टोपली दाखवणे मला संपूर्णत: अमान्य होते. कारण बाकी त्यावर ओरखडा सुद्धा नव्हता.

जशी मी त्याला वापरत राहिले तसे त्याचे ’कान तुटका’ हे संबोधन प्रचलित होत गेले. मी ते फारसे मनावर घेतले नाही, त्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता.
असे काही महिने गेले. मग वाटले, त्याच्या तुटक्या कानाचे कंगोरे फारच बेढब दिसतात. मग एक छानशी कानस आणली. stone grinding करतात तसे पाणी वापरून, कानसने घासतघासत ते कंगोरे नाहीसे केले.
या घटनेला चारहून अधिक वर्षे झाली. त्याच्याबरोबर आणलेल्या आठ जणांनी एक-एक करून आमची साथ सोडली. ’कान तुटका’ मात्र आहे तस्साच आहे.

दरम्यान ’तुटका कान’ हे त्याचे व्यंग न राहता ती त्याची identity झाली आहे.

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

विलक्षण ’पु.ल. क्षण' : काळजी


सुरभी नीमाची सून आणि नीमा जुनी मैत्रीण, असं सांगितलं तर वाटतं..... तितका काही हा 'बादरायणी' संबंध नव्हता.
त्यामुळे नवीन लग्‍न करून सुरभी दुबईला रहायला आली, तेव्हापासून ती, मला माझीच जबाबदारी वाटत होती. तसं नीमाला मी म्हंटलं देखील.. "नको ग काळजी करूस. तू आणि मी काही वेगळ्या नाही. मी बघते त्या दोघांचं अडलं-नडलं."

आणि असे अडल्या-नडल्याचे प्रसंग आलेही चिक्कार. नवीन संसार, नवा देश, नव्या नोकर्‍या...
नवी नवरी ते पहिल्यांदा येणारे आईपण असा सुरभीचा दोन वर्षांचा प्रवास मी नुसता काठावर बसून नाही बघितला. अनेकवेळा धावून गेले. प्रसंगानुरूप कधी घरीही घेऊन आले. कधी एखादी रेसिपी, इतकं साधं तर कधी पाच महिन्यांची गरोदर असताना गेलेला तोल, इतकं कठीण. काही महिन्यांपूर्वी सुरभी तिच्या बाळंतपणासाठी माहेरी गेली.

जानेवारीत भारतात गेले तेव्हा सुरभीला-बाळाला भेटावसं वाटलं म्हणून नीमाकडून तिच्या आईचा फोन नंबर घेतला, दिवस-वेळ ठरवली...
सुरभीच्या आईने दार उघडले. त्यांच्या छोटेखानी, दुमजली बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ती दोघं आहेत आणि लवकरच खाली येतील, बसा.. असं म्हणाल्या.

दरम्यान आम्ही बेल वाजवल्यापासून दोन्ही मजल्यांच्या मधल्या जिन्यात बांधलेलं त्यांचं ’पाळीव’ श्वान, त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडत होतं... म्हणून त्या बाईंनी aplomb bearing घेऊन ’मॅक्स’ला शांत करायला सुरुवात केली. तेवढ्यात फोन वाजला.

त्या प्रचंड गोंधळात फोनवरचं, एका बाजूचं जे संभाषण ऐकू आलं ते असं.. "हो आलेत... नाही, तो ठीक आहे. खायला दिलंय आधीच... नको.. बाहेर नको.. बाहेर ऊन आहे." वगैरे.

फोन बंद झाल्यावर त्या वळल्या आणि म्हणाल्या, "ह्यांचा ऑफिसमधून फोन होता. तुम्ही येणार माहित होतं नं, म्हणून चौकशी करत होते.... तशी यांना मॅक्सची खूपच काळजी असते.............!!!"

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

’पेट’ स्‍नो


समोरच्या फ्लॅटमध्ये जेमिमा राहते. गेली काही दिवस ती, तिच्या गावी इंग्लंडला सुट्टीसाठी गेली होती. त्यामुळे तिचा अडीच वर्षांचा मुलगा जेम्स आणि त्याची पाळलेली कुत्र्याची दोन पिल्लं, यांचा दंगा नव्हता आणि ती शांतता आम्हाला आवडत नव्हती.
काल रात्रीपासून परत कल्ला सुरू झालेला. आली असावी. तिच्याशी थोडं बोलावं म्हणून दार उघडलं.

"कशी गेली सुट्टी ?"
"मस्त.. छान बर्फ होता ह्यावेळेस.... आणि जेम्सने पहिल्यांदाच बर्फ बघितला."
"मग ? आवडला का त्याला.. white winter ?"
"खूपच.... पण त्यामुळे आमच्यावर एक प्रसंग ओढवलेला.
जेम्सला नं बर्फ ...... ’pet’ म्हणून पाळायचा होता. "

"अरे बापरे ! तू कसं सांगितलंस त्याला.. हे शक्य नाही म्हणून."

"नाही नाही.. मी तसं का करू ?
उलट तो आणि मी, आम्ही दोघं रोज बाहेर जायचो. थोडा बर्फ गोळा करून आणायचो आणि घरात वेगवेगळ्या जागी ठेवायचो."

माझी उत्सुकता शिगेला.
"कधी त्याच्यासाठी एखादी बास्केट तयार करून तिच्यात किंवा टॉवेलची गादी करून त्यावर....
पण कुठेही ठेवलं तरी बर्फच तो, वितळून जायचा.
मग जेम्सला कळलं.... बर्फाला घरात आणलं की त्याला खूप रडू येतं.
इतकं.... की तो संपून जातो.
सात-आठ दिवसांनी हा प्रकार बंद झाला.

आता जेम्सला स्वत:ला कधीही रडू आलं की एक-दोन मिनिटातच सावरतो आणि म्हणतो,
I won't cry so much.. Otherwise, I will be over too."

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें


संत तुकारामांचा अभंग आहे, ’वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें’

अलीकडे पर्यावरण हा विषय निघाला की या ओळीचा वापर हमखास होतो.
रस्त्याच्या कडेने पाट्या असतात, ’झाडे लावा झाडे वाचवा’ आणि लगेच ’वृक्षवल्ली आम्हां ..’

पण या रचनेचा विषय ’पर्यावरण’ हा नाही.

या अभंगाचा गाभा काही वेगळाच आहे .. जो त्याच्या शेवटच्या दोन ओळींमधे व्यक्त होतो.
त्या अशा आहेत .............

तुका म्हणे होय, मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी

तुकोबा जेंव्हा विजनवासात .. एकांतात असतात .. तेंव्हा काय होतं ?

सभोवतीची झाडं-वेली-प्राणीमात्र त्यांना सगे-सोयरे वाटायला लागतात. आकाश डोईचे छप्पर होते आणि पृथ्वी बसायचे आसन.. जाडीभरडी वस्त्रे आणि एक कमंडलु एवढेच काय ते, देहाचे म्हणून जे उपचार त्यासाठी पुरेसे होते. अशा वातावरणात कुठलेही अमंगळ भाव तुकोबांच्या मनात येत नाहीत.....

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या minimalistic वातावरणात तुकोबा म्हणतात, माझा.. माझ्याशी उहापोह चालू होतो.

वाद-संवाद जेव्हां दुसर्‍याशी होतो तेंव्हा त्यात चढाओढ, ईर्ष्या येते ... पण इथे मंडनही आपलंच आणि खंडनही आपलंच.

आपुलाचि वाद आपणांसी ... म्हणजे, स्वत:शी भांडण उभे करणे नव्हे ......
तर एक विषय घेतला की त्याची सर्वांगीण चर्चा .. आपणच आपल्याशी करायची.

तुका म्हणे होय...... मनासी संवाद !!

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

झिणिझिणि वाजे बीन


झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

बा. भ. बोरकरांची काय सुंदर कल्पना आहे पहा.
कविता संपूर्णत: अध्यात्मिक वळणाने जाते.
ते म्हणतात ..

हे जे माझे, अव्यंग शरीर-मन आहे, ते बीन म्हणजे.. एखाद्या पुंगी-वाद्यासारखे आहे.
कवितेत ते या शब्दांत येतं .........
' सौभाग्ये या सुरांत तारा '

आणि त्यातून हा जो प्राणवायू आत-बाहेर करतोय त्यामुळे, हरघडी.. हरक्षणी एक वेगळीच सुरावट, अनोखी लयकारी बाहेर पडते.
ती कधी शांत-प्रसन्न मंत्रघोषासारखी असते .. तर कधी उगीच वायफळ .. अर्थहीन तराण्यासारखी .. तर कधी फारच कठीण .. जीवाचा लचका तोडणार्‍या अवघड तानेसारखी.

आणि हे वाजवणारा ..
या शरीररूपी वाद्यातून .... प्राणवायू फुंकून .... ही सुरावट काढणारा ... आहे तरी कोण ? ......
अर्थात ... साक्षात परमेश्वर.......
तो तर काय .. अलख निरंजन...... सहजपणात प्रवीण .....

जसा पारा हातात पकडायचा प्रयत्‍न केला तरी हाती लागत नाही.. तसा ह्या शरीररूपी वाद्याच्या तारा छेडणारा परमेश्वर आपल्या हाती येत नाही.
त्याचे अस्तित्व तर जाणवते... हे आपल्याकडून कुणीतरी सर्व करून घेत आहे, याची जाणीवही असते... पण ’तो’ मात्र आकलनाच्या पलीकडेच रहातो.

सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन ..

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

आठवणीतली गाणी


'आठवणीतली गाणी’ - स्मरणातील मराठी गीतांचा संग्रह, अशी सोप्पी ओळख सांगणारं हे संकेतस्थळ ... is my labour of love.
..... ह्या एका वाक्यातच खरं तर, या माझ्या उपक्रमाविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरं येतात. गेली अकरा वर्ष अनाहत चालू असलेल्या ह्या माझ्या धडपडीमागची प्रेरणा तर समजतेच आणि त्या मागिल कष्टांचे दुय्यम स्थानही.

गणित, संख्याशास्‍त्र यांची प्राध्यापक म्हणून झालेली माझ्या कारकिर्दिची सुरुवात, संगणक क्षेत्रातील अध्यापनाचं वळण घेत आणि देश बदलत दुबई मुक्कामी पोचली. इथे पहिल्यांदाच थोडं थांबावं, एक श्वास घ्यावा, नेमकं काय हवं आहे ? याचा विचार करावा, असं वाटलं.... आणि अर्थार्जनापेक्षा अर्थपूर्णतेच्या मार्गाने जाण्याचा कौल मनाने दिला.

मग दुबईत Make-A-Wish Foundation ह्या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून ५ वर्षे काम केलं. ही संस्था, असाध्य रोगाने ग्रस्त आणि ज्यांच्या हातात केवळ काही महिन्यांचा अवधी उरल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, अशा १८ वर्षांखालील मुलांसाठी काम करते. ते करताना देखील हातात पुष्कळ वेळ असायचा. प्राध्यापक असणे.. संगणकशास्‍त्रातील ORACLE, ASP यांचे व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे.. यामुळे, सतत एका उत्फुल्ल आणि बुद्धिनिष्ठ जीवनाशी संबंध येते असे. ती उणिव देखिल बर्‍यापैकी जाणवत असायची.
एक असा विचार मनात आला की या उरलेल्या वेळात एक वेबसाईट / संकेतस्थळ तयार करायचं.. ते अवघड नाही.. कारण तेच तर आपण शिकवत होतो. मराठी भाषेचं बाळकडू, मराठी गाण्यांचं प्रेम-वेड या सगळ्यांची सांगड घालत, मराठी गाण्यांचं एक छोटेखानी संकेतस्थळ निर्माण करावं, ज्यात साधारणत: २५० गाण्यांचे शब्द व इतर माहिती असेल. शिवाय ती वेबसाईट असल्याने आपल्या मित्र-मैत्रिणींशी ती सहज शेआर करता येईल. डेटाबेसेसच्या अनुशंगाने विचार करण्याची सवय असल्याने गाण्यांच्या माहितीचे वर्गीकरण आपोआप घडत गेले.. आणि ’आठवणीतली गाणी’चा जन्म झाला. १५ मे २००३.

आंतरजालावर / Internet वर माहितीचा प्रसार ज्या त्वरेने होतो त्याच भन्‍नाट त्वरेने माझ्या मित्रवर्गाने त्यांच्या मित्रवर्गाला या माझ्या प्रयोगाची माहिती कळवली.. तिसर्‍याच महिन्यात दुबईतून प्रसिद्ध होणार्‍या आणि संपूर्ण मध्यपूर्वेत वितरीत होणार्‍या ’गल्फ न्यूज’ या वृत्तपत्रात ज्योत्स्‍नाने (नगरकर), एक आगळा-वेगळा उपक्रम म्हणून त्याची दखल घेतली. त्यानंतर अंगावर आला इमेल्सचा एक धबधबा.. प्रोत्साहन, कौतुक, अपेक्षा, सूचना.. आणि पहिल्यांदाच आपण काय हातात घेतलंय, याची जाणीव झाली. त्यानंतरचा संकेतस्थळाचा प्रवास ’पुढचे पाऊल पुढेच टाका’ या मार्गाने सुरू आहे.

’आठवणीतली गाणी’ ही वेबसाईट तेव्हा जशी दिसत होती तशी आता अजिबात दिसत नाही. तिच्या दृष्यस्वरुपात अनेक बदल घडत गेले. बदलते संगणक तंत्रज्ञान, गाण्यांची संख्या, उपलब्ध माहिती, संकेतस्थळावर होणारी वाढती दरवळ, भेट देणार्‍यांचा वयोगट (१५ ते ९० वर्षे) अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन हे बदल होत गेले. त्यामुळे सतत बदलते तंत्रज्ञान शिकत रहाणे हे सर्वात मोठे आणि एकमेव आव्हान माझ्या समोर असते. बाकी अडचणी अशा खरंच काहीच नाहीत. मराठी भाषेवर उत्कट प्रेम करणारा, मराठी गाणी नसानसांत भिनलेला एवढा मोठा समुदाय, जगभरातून, पाठिशी उभा आहे की खर्‍या अर्थाने ही एक सांगीतिक चळवळ झाली आहे.
’देणार्‍याचे हात हजारो’ याची पदोपदी जाणीव होते आणि माझे दोन हात, दिवसाचे चोविस तास कमी वाटतात.

’आठवणीतली गाणी’ आता एक संपूर्ण, बहु आयामी अनुभव झाला आहे. गाण्याचे शब्द, ते वाचतावाचता गाणे ऐकणे, त्याच्याशी निगडीत गीतकार, संगीतकार, गायक, चित्रपट, नाटक, राग-ताल अशी माहिती, यूट्यूबवर त्या गाण्याची चित्रफीत उपल्ब्ध असेल तर ती; शब्द वाचतावाचता पाहणे, लगेच त्याच गाण्यातील अप्रचलित शब्दांचे अर्थ समजून घेणे... आणि हे सगळे कमी वाटेल म्हणून की काय, ब्लॉग्स.... ! प्रभाकर जोग, सुमित्र माडगूळकर, प्रमोद रानडे यांसारख्या मान्यवरांनी गाण्याचे सांगीतिक-साहित्यीक विश्लेषण, त्यांच्या निर्मितीच्या कथा लिहायला सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वीच सुरू केलेल्या या सुविधेत आज पर्यंत नऊ मान्यवरांनी सत्तेचाळीस ब्लॉग्स लिहिले आहेत आणि ह्यात वाढ होणे चालूच आहे.

वेबसाईट जरी गाण्यांची असली तरी इथे नायिका ही ’मराठी भाषा’ आहे. त्यामुळे गाणी निवडतानाचा मुख्य निकष त्यातील काव्य हा आहे. त्यानंतर मग बरेच काही असू शकते. गाण्याची चाल, गायक / गायिकेचा लागलेला खास स्वर, चित्रपटातील त्या गाण्याशी निगडीत असलेला प्रसंग, गाण्यातील वाद्यमेळ, राग, संगीतकाराने बांधलेली एखादी खास जागा, एखाद्या चालीवर आपसूक थिरकणारे आपले पाय... हेच कारण आहे की आज अकरा वर्षांनंतर सुद्धा संकेतस्थळावरील गाण्यांची संख्या जेमतेम ३००० पर्यंत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर, ’आणिले वेचुनी अमृतकण’ असे म्हणता येईल.

बदलत्या कालखंडानुसार भाषेत, तिच्या लेखनात बदल घडत जातो. काही शब्द काल्बाह्य होत जातात. गाणं / काव्य जर समजलंच नाही तर उमजणे दूर. त्यात इंग्रजी माध्यमातून शिकणारी आपली मराठी मले-मुली यांनाही जर ह्या धारेत आणायचे असेल तर त्यांची नेमकी अडचण आपणच समजून घ्यायला हवी. म्हणून ’शब्दार्थ’ हा विभाग सुरू झाला.
आता चार मराठी शब्दकोष, दोन संस्कृत शब्दकोष, एक उत्तम दर्जाचे हेडफोन्स आणि लॅपटॉप.... हा माझा पत्ता आहे.

’आठवणीतली गाणी’ची जमेची बाजू आहे ती म्हणजे लोकांना या साईटबाबत वाटणारी विश्वासार्हता. अनेकांसाठी कोणत्याही गाण्याचा इथे दिसणारा शब्द हा ’फायनल वर्ड’ असतो. त्यामुळे माझ्यावर असलेल्या जाबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. एकेक गाणं अनेकवेळा ऐकावं लागतं. तज्ञमंडळींशी संपर्क साधावा लागतो. कवी हयात नसतील तर त्यांच्या नातेवाईकांचा / वारसदारांचा शोध घ्यावा लागतो. संपर्काची विविध माध्यमं हाताळावी लागतात. काही वेळा खुद्द कलाकारांनाच इतक्या वर्षांनंतर ते शब्द आठवत नाहीत. काही गाणी एकेका शब्दासाठी अनेक वर्ष अडून राहिली आहेत. ”मी मोठ्ठा होणार किनई मी खूप खूप शिकणार’ या गाण्यातील ’तीनदा नमस्कार’ हे समजायला दोन वर्षं लागली.

साहजिक इथे भेट देणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. सध्या जवळ्पास ३० देशांतून दिवसाला ८,०००+ लोक ४५,००० हून अधिक गाणी ऐकतात. काहींसाठी तर हा रोजच्या सवयीचा भाग आहे. परदेशी विद्यापीठांतून मराठी भाषा शिकणारे विद्यार्थी.. दूरदर्शन वाहिन्यांवरील संगीतस्पर्धांचे संयोजक-स्पर्धक.. संगीत महाविद्यालये.. प्रसिद्ध कवी, गायक, संगीतकार.. संदर्भासाठी या संस्थळाचा वापरतात. मानसोपचार तज्ञ उपचाराचा एक भाग म्हणून.. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील अत्यंत महत्वाचा कार्यभाग सांभाळणारी व्यक्‍ती, विख्यात वैज्ञानिक आणि विविध क्षेत्रातील अनेकजण रोज रात्री ’आठवणीतली गाणी’चा unwind होण्यासाठी वापरतात. हाच अनुभव, नेमक्या याच शब्दांत अनेकांच्या सांगण्यात येत असला तरी कोणाची कुठली तार छेडली जाईल, ते सांगता येत नाही. मात्र एक अतिशय उत्स्फूर्त पण तितकाचा गमतीदार अभिप्राय किमान १८-२० वेळा आला आहे. टोकाचा नॉस्टॅल्जिआ.. भावनेच्या भराते नेमके शब्द न सुचल्याने असेल कदाचित.. एकच वाक्य.. "काय बोलायचे.. फक्त I love you..."

यातील अनेकजण संपर्क साधताना "आपल्या साईटवर आपण हे गाणं टाकायचं का ? तसं करायचं का ?" असा उल्लेख करतात. इतका आपलेपणा दाखवणार्‍यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जेष्ठ कलाकार, त्यांची पुढची पिढी, तसेच नवीन ताज्या जोमाचे आजचे कालाकार त्यांना मिळालेली जुनी गाणी आणून देतात. अवर्जून उल्लेख करायला हवा तो ज्येष्ठ संगीतकार व्हायोलीन वादक प्रभाकर जोग, जेष्ठ कवि सुधीर मोघे यांचा.

या संस्थळाची अधिकृत फेसबूक, ट्विटर आणि गूगल प्लस पानं आहेत. तिथे दर आठवड्याला तीन गाण्यांना प्रकाशझोतात आणले जाते. काही वेळा ही नैमित्तीक असतात. कलाकारांच्या जन्मतिथी, पुण्यतिथी किंवा तात्कालीन घटना... जसे अलीकडे झालेल्या दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या दुर्घटनेनंतर, "अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही नजरेत वासनेचा शृंगार पाहिला मी.. त्या कोवळ्या फुलांचा.." किंवा येत्या ७ डिसेंबरला ध्वजदिनाच्या निमित्ताने जे फिचर केले जाईल ते "अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे.." ही गाणी.

इथे एक महत्वाच्या नोंद आवर्जून करायची आहे.. ’आठवणीतली गाणी’ हा संपूर्णत: ’विना नफा’ ( non-commercial, non-profit ) तत्वावर चालणारा उपक्रम आहे. कलाकारांच्या प्रताधिकारांचे उल्लंघन होऊ नये म्हणून ह्या वेबसाईटवरून गाणी डाऊनलोड करता येत नाहीत. तसेच इथे जाहिराती नाहीत.. कुठल्याही पातळीवर आर्थिक देवाणघेवाण नाही.

’आठवणीतली गाणी’ वर एक कमी किंवा त्रुटी आहे. ती दूर करावी की नाही, असा संदेह नेहमी माझ्या मनात असतो. इथे अजून ’शोध’ किंवा ’सर्च’ सुविधा नाही. काही माहितीचं, ओळखीचं शोधताशोधता बरंच काही अनोळखी सापडावं, अभिरुची अधिकाधिक संपन्‍न होत जावी, हा खरं तर ’शोध’ सुविधा न देण्याचा उद्देश होता. पण गाण्यांची वाढती संख्या बघता ती लवकरच द्यावी लागेल, असे वाटते.
तसेच ’आठवणीतली गाणी’चे android app तयार कारण्याचे काम अमेय सिरपोतदारने सुरू केले आहे, पण मलाच अजून त्यासाठी वेळ देता आलेला नाही. याकडेही त्वरीत लक्ष देणे ही आता काळाची गरज आहे, असे वाटते.

माझ्या पुरतं बोलायचं झालं तर, विंदा करंदिकरांचं एक वाक्य फार लहानपणापासून मनावर कोरलं गेलंय, "एकावेळेस कमीत कमी दोन तरी कामे करावीत." हा दृष्टीकोन मी कळायला लागल्यापासून अंगिकारला आहे. ’आठवणीतली गाणी"चा एक खांबी तंबू सांभाळता सांभाळता वेळ काढून पेन्सील स्केचेस, क्रोशे, ब्लॉग लेखन हे छंद जोपासणे, कधी हे तर कधी ते करत चालू आहे. मात्र लांब पल्ल्याचे पळणे ( Long distance running ) हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्या जानेवारीत होणार्‍या दुबई मॅरॅथोनची तयारी चालू केली आहे. आठवड्यतून ३-४ दिवस, ५ कि.मी. पळणे चालू आहे.
या सगळ्यांचा मेळ साधताना बहिणाबाईंनी सांगितलेला ’स्वयंप्रेरेणेचा’ वसा घेऊन, तो निष्ठेने पाळावा मात्र लागतो.


 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

कवी सुधीर


कवी सुधीर मोघे यांच्यावरचे हे माझे खरं तर दुसरे लिखाण. या आधीचे आणि हे, दोन्हीत एक समान सूत्र आहे आणि काही असमान धागे.
समान असे की या दोन्हींत त्यांची ’जीवनी’ अशी नाही. किती पुस्तके लिहिली? कोणते पुरस्कार मिळाले? यात ते अडकलेलं नाही. पण,
पहिलं .. त्यांच्या निधनाच्या दुसर्‍याच दिवशी लिहिलेलं.. त्यामुळे उत्‍स्‍फूर्त आणि काहिसं अचानक आलेल्या पोरकेपणाने बावरून गेल्यासारखं.. तरी त्यांना वाहिलेली आदरांजली असल्याने त्याचे महत्व वेगळे.
दुसरे आजचे .. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी लिहिलेलं... भावनेच्या पगड्याच्या थोडं बाहेर येत.

त्यांच्या कविता-गाण्यांचे अवलोकन करण्याची किंवा त्यांची साहित्यिक मिमांसा करण्याची माझी योग्यता नाही. ’आठवणीतली गाणी’ या माझ्या उपक्रमामुळे त्यांच्या गीतलेखनात दिसलेले सुधीरजी आणि आमच्या सात-आठ वर्षांच्या ओळखीतून दिसलेले काव्याबाहेरचे सुधीरजी... यांच्याशी झालेल्या चर्चांतून माझे काव्यानुभव समृद्ध झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

अलीकडचे प्रसिद्ध कवी वैभव जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
’रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.. ’

पण जर कुणाला अशी ’एखादी’च नाही .. तर अशा अनेक ’कविता पानोपानी’ सुचल्या असतील तर.. त्यांना काय म्हणावे? कविवर्य, कविश्रेष्ठ? आणि त्याही पुढे जाऊन.. ते जर फक्त शब्दचित्रेच नाही तर रंगचित्रे, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय सादरीकरण, पटकथालेखन .. असंही बरंच काही करत असतील तर?

सुधीर मोघे यांना मात्र त्यांची ’कवी सुधीर’ अशी सुटसुटीत ओळख करून दिलेली अधिक आवडायची. ’Poet Sudheer' अशी झोकदार इंग्रजी सही ते करायचे. कारण कवितेव्यतिरिक्‍त इतर कुठल्याही माध्यामातून व्यक्त होणं, हे त्यांच्या ’कवी’ असण्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटायचं. त्यांच्याच शब्दांत सागायचं तर, "माझ्या प्रत्येक असण्याला माझ्या कवी / poet असण्याचा base आहे, संदर्भ आहे." आमच्या चर्चेत हे त्यांचं कवी असणं भरून असायचं.

टेरिकॉटची पॅंट, ढगळसा झब्बा .. अशी अनौपचारिक वेषभूषा. ’पद्मा फूड्स’ हा अनौपचारिक गप्पांचा तितकाच अनौपचारिक अड्डा. जवळपास पन्‍नास वर्षांची कारर्किर्द. सांगण्यासारखे प्रचंड काही आणि ते सांगता सांगता समोरच्याला जाणून घेण्याची खुबी ..

त्यांची कविता शब्दबंबाळ नाही. शैली मिताक्षरी. थोडक्यात आणि मार्मिक. बुद्धीवादी, तर्कनिष्ठ आणि त्याचवेळी तरल.. scientific temperची झलक असणारी. परमेश्वराच्या सगूण आणि निर्गूण, दोन्ही रूपांचं एकाच तन्मयतेने वर्णन करणारी..

शब्दांवर प्रेम करताना.. त्यांच्या आहारी न जाता. त्यांच्याकडे केवळ माध्यम म्हणून पाहताना, शब्दांविषयी ते म्हंटतात..

शब्दांच्या नकळत येती.. शब्दांच्या ओठी गाणी..
शब्दांच्या नकळत येते.. शब्दांच्या डोळा पाणी..

शब्दांना नसते दु:ख.. शब्दांना सुखही नसते..
ते वाहतात जे ओझे.. ते तुमचे माझे असते..

सुधीरजी एकदा म्हणाले होते, "मुकुंद (फणसळकर) म्हणतो, माझ्या प्रत्येक कवितेत-गाण्यात माझी सही असते. तुला वाटतं तसं?" त्यांचं काव्य-गीत लेखन जवळजवळ मुखोद्गत असल्याने मी लगेचव रुकार दिला. म्हंटलं, "हो. हो. नक्कीच.
’सांज ये गोकुळी’ मध्ये .. ’पर्वतांची दिसे दूर रांग .. काजळाची जणू दाट रेघ’,
’सूर कुठूनसे आले अवचित” मध्ये .. ’रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव’,
’सांज ये गोकुळी’ मध्ये .. ’सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या”,
.. या तुमच्या सह्याच तर आहेत."

'मन' या विषयावर सुधीरजींना खरं तर Ph.D. मिळायला हवी होती. एका कवितेत ते म्हणतात .. ’मन मनास उमगत नाही .. आधार कसा शोधावा ! .. ’चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही .. धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही.’ आणि असंही .. ’मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?” याच कवितेत ’मन’च कसं आपल्या भावविश्वावर नियंत्रण ठेवतं हे सांगताना, ’तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश’. एका ठिकाणी .. ’मनाचिया घावांवरी मनाची फुंकर ..’ आणि 'मन' ते 'कविता' असा प्रवास ...

एकांत, लेखणी, कागद- वाया सारे
मन कागदाहुनी निरिच्छ अणि कोरे
गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे
बोटांवर अवचित मन ओठंगुन आले.

सुरेश भट, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यावर ’झी’ मराठीने केलेल्या ’नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमांचे लेखन सुधीरजींनी केले आहे. एकदा त्यावर बोलत असताना, समोर बसल्याबसल्या त्यांनी संवादिनी घेतली. ती त्यांच्या खोलीत असायचीच .. आणि चक्क सुरेश भटांचं ’रंगुनी रंगात सार्‍या रंग माझात वेगळा’ गायला लागले आणि म्हणाले, "देवकी (पंडीत) अंदाजे सतरा वर्षांची असताना मी तिला हे गाणं शिकवलं ते असं. तेव्हां कोवळ्या वयामुळे तिला गीताचा संपूर्ण अर्थ उमगलाच होता, असं म्हणता येणार नाही. ती, मी शिकवलेली चाल या लयीत म्हणायची. आता थोडी ठायमधे असते. पण हा ’तिचा’ व्यक्त होण्याचा भाव आहे."

’लय’ वरून आठवलं ..

लय एक हुंगिली खोल खोल श्वासात,
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात,
लहडला वेल... तो पहा निघाला गगनी,
देठांना फुटल्या - कविता पानोपानी

सुधीरजी म्हणायचे, "एकदा कविता लिहिली की तिचे नशिब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने जाते .. मी माझ्या .."
एक कवी आपल्या कवितेकडे इतक्या निर्ममपणे तेंव्हाच पाहू शकतो जेव्हां कुठल्यातरी पातळीवर कवितालेखन हे त्याच्यासाठी ध्यानसाधनेसारखं असतं ..

मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना- ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्यागेल्या श्रेयांवरती;
पण पुसट.. कोवळे नाव ठेवुनी गेलो.

ह्या नि:शब्दांच्या आड कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे कविता फक्त असेल

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

The caucus race


कालच्या Dubai Women's Run ( ‪#‎DHWomensRun‬ ) मध्ये ६२.०५ मिनिटांत १० किलोमीटर्स पळाले..... छान वाटलं.
ते नखशिखांत घामात निथळणं.... that sudden rush of energy....
हे ते ’किक’ की काय म्हणतात नं.. तसं असतं.

पण गेल्या वेळपेक्षा तब्बल साडेपाच मिनिटं जास्त लागली... लागू देत.
तो दिवस वेगळा होता.... आजचा वेगळा.
Finish line cross केली आणि स्वत:लाच सांगून टाकलं... yess, I have won !!
कारण व्यक्तीश: माझ्यासाठी हे लांब पल्ल्याचं पळणं, रोजचा दिवस आणि life in general is like the caucus race.


पण हा approach माझा नाही. लेकाने पहिलीत असताना त्याच्याही नकळत शिकवलेला.
शाळेतून घरी आल्यावर त्याने सांगितलं, "उद्या running race आहे."
त्या वयातही पुस्तकांतच नितांत रमणारं माझं हे लेकरू फार काही पळेल अशी अपेक्षा नव्हती. तरी उगीच उत्सुकता म्हणून दुसर्‍या दिवशी विचारलं तर म्हणाला, "मी पहिला आलो."
"कसं शक्य आहे आशय? तुला कोणी सांगितलं?"
"असं कोणी कोणाला सांगत नाही. Alice च्या गोष्टीत नाही का ती caucus race सगळेच जिंकतात... तसं आपणच ठरवायचं असतं."

The caucus race.
Alice's Adventures in Wonderland ह्या पुस्तकात Lewis Carroll यांनी एका छोटेखानी परिच्छेदात वर्णन केलेली.

वरवर लहान मुलांसाठी वाटणार्‍या पुस्तकात, तशा nonsensical वाटणार्‍या अनेक घटना satire पद्धतीने मोठ्यांसाठी एवढं काही सांगून जातात....
Alice च्या अश्रूंच्या तलावात तिच्यासकट अनेक प्राणी बुडून ओले झालेत. कोरडे होण्यासाठी Dodo सगळ्यांना पळण्याची शर्यत सुचवतो. ह्या शर्यतीला जशी सुरुवात नाही तसा शेवटही नाही. ती एका वर्तुळात होते... म्हणजे सगळे एका गोलात फिरतात.. कोणी मधूनच सामील होतं, तर कोणी मधूनच सोडूनही जातं.. आणि तरी सगळे जिंकलेले असतात.

थोडक्यात,
कोणी कुठुनही निघत नाही आणि तसंच कुठेही पोचत नाही.
या गोलगोल फिरण्याच्या शर्यतीत जन्माला येणारा प्रत्येक जीव कुठेतरी सामील होतो..
एखादा मधूनच, अचानक बाहेर पडतो आणि आपल्या पारलौकीक प्रवासास निघून जातो..
आणि दोन बिंदूंमधील अंतर पळताना तो स्वत:ला विजयी ठरवतो.... नव्हे, तो असतोच.
कारण रोजच्या रोज त्याने, त्याच्या स्वत:च्या.. अत्यंत व्यक्तीगत... फक्त त्यालाच जिचं संपूर्ण आकलन आहे अशा.. परिस्थीतीवर मात करण्याचा प्रयत्‍न केलेला असतो.

कालच्या पळण्यास जास्त वेळ लागल्याचं रत्तीभरही दु:ख न होण्याचं... विजयी समजण्याचं, हेच कारण होतं.
नुकतेच झालेले मानेतील bulging disc चं निदान.. त्यामुळे दुखरा उजवा खांदा आणि हात..
माझ्या नेहमीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होऊ नये यासाठी pain management शिकवणारे माझे अतिशय प्रेमळ मित्र डॉ. सुरेंद्रन आणि समिरा..
साडेपाच मिनिटं काहीच जास्त नाही.

दोन वर्षांच्या पिल्लाला stroller मध्ये घेऊन पळणारी एक आई, Dubai maids services चा group........ अशा आम्ही मिळून सार्‍या अंदाजे ५००० जणी, एका स्वयंस्फूर्तीच्या आणि परिपूर्णतेच्या जाणीवेने सामाधानी होतो.


 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

सुधीरजी..


शनिवारी दुपारी ’आठवणीतली गाणी’चा एक आधार तुटला.
कधीही, कुठेही, काहीही अडलं की तुमच्याकडे धाव घ्यायची.. ईमेल / फोन / प्रत्यक्ष.. असा जमेल तसा संपर्क साधायचा.. तुमच्या भोज्याला हात लावायचा आणि आत्मविश्वासाने पुढे जायचे अशी एक सवयच लागली होती.

आपला शेवटचा संपर्क आणि चर्चा ८ जानेवारीची.
विषय होता, ’आठवणीतली गाणी’वर अप्रचलित शब्दांचे अर्थ देण्याची केलेली सुरुवात आणि ’साद देती हिमशिखरे’ मधिल ’ध्वजा कौपिनाची’वर माझे अडकणे. कौपिनेश्वर म्हणजे शंकर, ’कौपिनं’ या संस्कृत शब्दाचे वेगवेगळे अर्थ..
तेंव्हा तुम्ही केलेल्या ईमेलचा काही भाग जसाच्या तसा..
".... मात्र ह्या विशष्ट गाण्याच्या संदर्भात हे इतर व्याकरणसिद्ध अर्थ उपयोगी नाहीत असं मला वाटतं. वसंत कानेटकर ह्यांचं हे पद त्यांच्या मत्स्यगंधा नाटकातील आहे, हा संदर्भ तुला ठाउक आहेच. पण तो प्रसंग ध्यानी घेतला तर त्या शब्दाचा मी जो लावला आहे तो अर्थ अधिक संयुक्तिक वाटेल असं मला वाटतं. मत्स्यगंधेच्या मोहात काही काल गुरफटलेला पराशर भानावर येउन तिचा निरोप घेतो आहे आणि त्याचं ह्या प्रवासाचं मूळ उद्दिष्ट तो तिला सांगतो आहे.
’साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची...’ पुढच्या ओळी ह्या दृष्टीने अधिक बोलक्या आहेत.
कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची.. अढळ त्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची.. मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची ....हे रूपक ध्यानी घेतले तर देवळाचा कळस आणि त्यावरचा (संन्यस्त वृत्तीचा निदर्शक भगवा ध्वज हाच अर्थ कवीच्या मनांत असावा असं वाटतं......"

अशी अनेकवेळा तुमच्याकडे घेतलेली धाव.... आणि काही वेगळं, चांगलं घडण्यास आणि घडवणार्‍यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वृत्तीने आपण वेळोवेळी केलेले मार्गदर्शन..
वानगी दाखल सांगायचे झाले तर..

सुरेश भट यांच्या ’रंगुनी रंगात सार्‍या’ या आपण संगीत दिलेल्या गझलेतील एक अंतरा ’भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो.. अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा’ हा त्या गझलेच्या पुस्तकीय आवृत्तीत कसा नाही?
आणि ’कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे.. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा’ हे त्याच्या ऐवजी आलं की कसं?

’ते मीनकेतनाचे ग मोडिले धनु मी ! त्या चित्त-चोरट्याला का आपुले म्हणू मी ?’
’मीनकेतन’ या शब्दाची व्युत्पत्ती कशी असेल? ’मीनकेतन’ म्हणजे मदन. पण ’मीन’ म्हणजे मासा आणि ’केतन’ म्हणजे ध्वज. मग मदनाचा असा काही ध्वज असून त्यावर मासा, असं आहे का?

’मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका’ आणि ’रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला’ या दोन्ही गाण्यांना वसंत पवारांनी दिलेली एकच चाल.. का वाटलं असेल एका संगीतकाराला काही वर्षांच्या अवधीनंतर तीच चाल पुन्हा वापरावी?

’आला आला वारा’तल्या आपल्याला अभिप्रेत असलेल्या, सासरी निघालेल्या सया कोण? असं बरंच काही....

सुधीरजी..
तुम्हाला ’सर’ म्हंटलेलं आवडायचं नाही म्हणून तुमचं वय, ज्ञान, अनुभव यामुळे आपसूक येणार्‍या ’सर’ला आवर घालत ’सुधीरजी’ म्हणायला शिकले होते....

तुमच्या ’मुक्तछंद’ बंगल्याच्या वरच्या खोलीच्या दोन भिंती, तुम्ही काढलेल्या चित्रांनी नटलेल्या असायच्या. त्या खोलीतून बाहेर पडताना तिथे थबकायचे.. मनभरून ती चित्र पहायची..
मग तुम्ही सांगायचे, "तुला माहित आहे नं, यातील कुठलीही आणि कितीही चित्र तू कधीही घेऊन जाऊ शकतेस.."
आणि मी म्हणायचे, "हा वर मी राखून ठेवत आहे." असा आपला एक रिवाज होता.
पण खरं तर असं कधीही वाटलं नाही की त्या सुंदर मांडणीतल्या एका कुणाला उचलून वेगळं करावं आणि ’एकलकोंडं’ असं आपल्या घरात लावावं..
जितकी नैसर्गिक त्या चित्रांची ती जागा होती तितकंच माझं तिथे दर वेळेस थबकणंही..

’मुक्तछंद’ या आपल्या बंगल्याच्या ठिकाणी आता फ्लॅट सिस्टिम होणार हे सांगितलंत तेंव्हा मी म्हंटलेलं.. ’मुक्तछंद’ आता साचेबद्ध होणार.....
तर म्हणाला होतात, "वास्तू साचेबद्ध होतीये खरी.... आतला माणूस सदैव मुक्तच होता आणि राहील................ !!"

(हा फोटो.. ताजा-ताजा, गरमागरम, फोटोग्राफरकडून घेऊन आलोय... ’आठवणीतली गाणी’साठी... म्हणून दिला होतात) • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

२०१४


पहाटेच्या थंडगार वार्‍यासारखं..... अजून ऊन न झेलेलं..
नव्या कोर्‍या साडीसारखं..... अजून घडी न मोडलेलं..
नुकत्याच केलेल्या कागदाच्या होडीसारखं..... अजून पाण्यात न सोडलेलं............. ⛵

....... एक अख्खं नवं कोरं कॅलेंडर........................
१२ पानांचं आणि ३६५ चौकोनांचं....
.... अगणित अपेक्षांचं ओझं वाहणार्‍या..... मोजून नेमक्या क्षणांचं......

.. उत्साह.. योजना.. उत्कंठा.. प्रार्थना............
या नव्या रोजनिशीचं रोजचं पान लिहिताना.................
हे मना, माझा हात कधीही न थरथरो...... !!

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS