Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

Territorial war


पुण्यातलं आमचं घर नदीच्याकाठी आहे.
नदी, पलीकडचा घाट.. अगदी थेट ‘पैल घंटा घुमे राउळी’ सारखा.. छान मोकळी जागा.... आणि त्यामुळे भरपूर पक्षी.
पाच वर्षांपूर्वी तिथे राहायला गेल्यावरच्या पहिल्या पावसाळ्यात खिडकीच्या गजांवर ओले पक्षी येऊन बसले आणि मी घरातल्या प्रत्येकाला बोलावून बालकवी वर्णन करतात ते ‘फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरें सांवरिती’ कसं असतं, ते उत्फुल्ल मनाने दाखवलं.

पण थोड्याच दिवसात त्या गजांवर गळलेली पिसं, त्या पक्ष्यांची शी, शू, वळचणीला घरटी, ती बांधण्यासाठी त्यांनी शोधून शोधून आणलेल्या काड्या, जुन्या वायरींचे तुकडे.. मग पिलांची अंडी, त्यातून पिल्लं बाहेर पडताना सुटलेला वास, अंड्याची टरफलं…. असं सुरू झालं आणि माझ्या पक्षीप्रेमाचा पार धुव्वा उडाला.
ती ‘बगळ्यांची माळ’ अंबरातच उडत आहे आणि ते ‘द्विजगण अवघे वृक्षीं’च आहेत, तोपर्यंतच ठीक. आता पारव्याचं घुमणं माझ्या छातीत एक वेगळीच धडधड वाढवतं.. आल्या का या कबुतरीणबाई बाळंतपणाला !!
उलटपक्षी माझं असं स्पष्ट मत झालं आहे- कुठल्याही कवीला, एका कबुतरणीचं एक जरी बाळंतपण निस्तरायची वेळ आली तर ते ‘कबूतर जा जा..’ फार वेगळ्या अर्थाने म्हणतील.

गेल्या माझ्या मुक्कमात मी एका कबुतरीणबाईंशी full on.. territorial war लढले.. त्याची ही कहाणी.

तिची territory कुठली? याचं किंचित वर्णन करायला लागेल. एका गच्चीला POPचं छत घालून त्याखाली एक छानसं जेवणाचं टेबल ठेवलं आहे. POP वर पाणी पडू नये म्हणून त्यावर जाड प्लॅस्टीकचं शीट आहे. POPचं छत आणि plastic-sheet, यात साधारण पाच इंचाची जागा आहे आणि नेमक्या याच जागेत एका कपोत युग्माने गेले दोन-तीन वर्षे मुक्काम ठोकलेला.

आम्ही या घरी काही कायमचे राहात नाही. वर्षाकाठी जेव्हा केव्हा मी इथे येते, तेव्हा बराच वेळ त्यांना आवर घालणं, हा एक मोठा उद्योग असतो. महिनाभरात परत गेले की पुन्हा त्यांचंच राज्य. पण इतक्या कमी उंचीच्या जागेतील त्यांच्या उच्छादाने काही इतर प्रश्‍न निर्माण झाले आणि यावेळेस त्यांना विस्थापित करणे, हा मुद्दा ऐरणीवर आणावा लागला.

एकदा वरती चढून तिथे काय परिस्थिती आहे ते पहावं तरी, म्हणून एक शिडी घेतली. त्यावर चढले. मग एक पाय शिडीवर, एक जवळच्या गजांवर, एका हाताने ड्रेनेजचा पाईप पकडून... असं सगळं करत जेमेतेम नजर पोचेल इतकी उंची गाठली. पाहते तर काय.. चांगली मोठ्ठी झालेली दोन पिल्लं माझ्यापासून आठ इंचांवर. त्यांच्या डोळ्यातले भाव पाहून मी ‘क्राइम पेट्रोल’ मधली मुलं पळवून नेणारी बाई आहे की काय, असं वाटलं. ते मला घाबरले- तितकंच मी त्यांना घाबरून खाली उतरले. आता ती उडून जाईपर्यंत थांबणं आलं.. तीन-चार दिवसांनी ती उडून गेली.
चला.... हीच ती वेळ, हाच तो क्षण.......

आमची कामवाली बाई रेखा म्हणाली, कबूतरं काळ्या रंगाला घाबरतात. तू तिथं एक काळं कापड बांध. मग एक जुनी काळी साडी शोधली.. तिचे तीन चार तुकडे केले.. वेगेवेगळ्या उंचीच्या काठ्यांना ते बांधले आणि निषेधाचं, बंडांचं पहिलं काळं निशाण रोवलं.

माझं असं म्हणणं होतं... प्लॅस्टीक शीटवरचं सगळं आभाळ तिचं- कबुतरणीचं..... आणि पीओपी छताखालचं घर माझं...
मधली पाच इंचांची जागा no man’s land तर होतीच, तशीच ती no bird’s land ही असायला हवी. पण कबुतरीणबाईंना ते साफ अमान्य होतं. ’कसेल त्याची जमीन, राहिल त्याचं घर’ हा कुळ-कायदा माझ्यापुढे फडकवत, तिथं दोन वर्षे मुक्काम असल्याचा हक्क सांगितला. मी रोवलेल्या निषेधाच्या निषाणांची पायमल्ली केली. आपल्या पंखांनी सगळे झेंडे उधळले व जागेवरचा ताबा सोडायला स्पष्ट नकार दिला.

पुढील घरगुती उपाय म्हणून तिथे डांबराच्या गोळ्या टाकल्या, हीट मारलं, जे म्हणून काही उग्र वासाचं सापडलं त्यांचा वर चढून मारा केला. पण छे ! ह्या बयेचं माझ्या डोक्यावर नाचणं, शब्दश: आणि लाक्षणिक, दोन्ही अर्थाने थांबेचना मेलं. तिच्या पावलांचा आवाज ऐकला रे ऐकला की मी हाताशी ठेवलेली काठी घेऊन पळायचं आणि खालून टकटक करून तिला हाकलायचं..
पण कृतनिश्वयी सौ. कबूतर, श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेच्या ३र्‍या अध्यायाची- कर्मयोगाची- जन्मल्यापासून रोज पारायणे करत असल्यासारख्या ध्येय आणि कर्म दोन्ही सोडायला तयार नव्हत्या.
नानाच्या (पाटेकर) मते ‘एक मच्छर...’ तुमची वाट लावतो इथे तर हे एक अख्खं कबूतर होतं.

हे काही खरं नाही. आता आपण Google नावाच्या Oracle कडे हा प्रश्‍न घेऊन जावा. त्याच्याकडे सर्व उत्तरं असतात..
त्याने दोन उपाय सुचवले. एक म्हणजे फळीला खिळे ठोकायचे आणि ती उलटी करून कबूतरं बसतात त्या ठिकाणी ठेवायची. छे छे !! हे असलं अघोरी काम होणं नाय... दुसरं म्हणजे CDs उलट्या ठेवायच्या. चमकणारा भाग वरच्या दिशेने. त्यात कबुतरांना त्यांचं प्रतिबिंब पडलेलं दिसलं की ते घाबरतात... इति गूगल.

भराभरा घरात सापडलेल्या जुन्या CDs घेतल्या. त्यांची वेगवेगळे कोन करून रचना केली. त्या पडू नये म्हणून फेविकॉलचा ठिपका देऊन चिकटवल्या. वरची वळचणीची जागा आणि त्या भोवतीची भाग, महाराणी पद्मिनीच्या आरसे महालाला लाजवेल असा करून मी आणि रेखा वाट पाहू लागलो. एक दिवस शांतता. दुसर्‍या दिवशी सकाळपासून ही शंभी महाराणीच्याच तोर्‍यात त्या विवक्षित जागेत प्रवेश करती झाली.

मग मात्र मी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष महामहीम श्री. ट्रंप यांच्याकडून प्रेरणा घेतली. एका POPचं काम करणार्‍या माणसाला बोलावलं. त्याने काही तास काम करून एक भिंत बांधून अनधिकृत घुसखोरीचा मार्ग कायमचा बंद केला.
कबुतरीणबाईंनी दोन दिवस माझ्याकडे खूप रागाने बघितलं. मान गरागरा फिरवली. वेगवेगळे भीतीदायक आवाज काढले.. त्या भिंतीवर चार-पाच धडकाही देऊन पाहिल्या.
एकीकडे मी मात्र दुबईला परतण्याच्या तयारीला लागले.

विमानतळाकडे निघताना शेवटचं, सगळं नीट बंद केलंय नं, असं तपासत फिरत होते तो काय.. दुसर्‍या गच्चीतल्या inverter वर बसून ही गंगी शांतपणे सर्वेक्षण करत होती.

टॅक्सीत बसल्याबसल्या कबुतरीणबाईंऐवजी मीच श्री. ट्रंप यांना tweet केलं.... "भिंत बांधून अनधिकृत घुसखोरी थांबवता येत नाही. पुरावा आहे."
... आणि पुढच्यावेळचं theatre of war काय असेल याचा विचार करू लागले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ग्रेस


एक विहीर असावी. अंधारी.
वास्तवाच्या परिघाच्या किंचित बाहेर.. किंवा कदाचित आतही, नक्की ठरवता येत नसावं.
तिच्या भोवतीचं सगळंच अगम्य, दुर्बोध. तिच्या दिशेने पाऊल टाकलं की अंगावर शहार्‍याचे कोंब फुटावेत.

मी दोन-तीन पाउले टाकते.. आणि मागे फिरते.
पण विहीर परतू देत नाही.
आत डोकावून पाहणं झेपेल? नको. शक्यतो कडेकडेनेच जावं.
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने एव्हाना कुतुहल, उत्सुकतेच्या मर्यादा पार केलेल्या असतात.
विहीरही तिचा अदृश्य पगडा घट्ट.. आणखी घट्ट करते.

सर्वत्र ओला, गूढ-काळा वास. त्या वलयात मी गुरफटायला लागते. वाट अधिकच निसरडी होते.
शेवाळलेला फुटका दगडी कठडा. कालातीत असल्यासारखा. कशीबशी त्याला रेलते. त्याच्या आधाराने डोळे गच्च मिटून आत डोकावते.
ऐकू येते ती घुमणारी शांतता. डोळे उघडावे की नाही? काय असेल..आणि आपल्याला काय दिसेल?
पाणी खोल असेल? की तिला तळच नसेल? आणि असलाच तळ तर तळाशी....
असतील कदाचित काही नि:श्वास.. उमेदी सुद्धा.

आता हळूहळू डोळे उघडायचे..
उडी मारणं, डुंबणं, तळ गाठणं वगैरे...
कुणास ठाऊक..

हे नातं आहे, कवि ग्रेस यांच्या कवितांचं आणि माझं..

'गांव'
आभाळ जिथें घन गर्जे
तें गांव मनाशीं निजलें;
अंधार भिजे धारांनी
घर एक शीवेवर पडलें..

अन्‌ पाणवठ्याच्या पाशीं
खचलेला एकट वाडा;
मोकाट कुणाचा तेथें
कधि हिंडत असतो घोडा..

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो;
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो..

गावांतिल लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती;
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळींने मळती....

-ग्रेस


( फोटो सौजन्य- आंतरजाल )

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पाऊस


तो तसा सर्द-चिंब पावसाळा, ते वय आणि ते शहर मागे टाकल्यानंतर कधीच भेटला नाही.

आईचं घर, लहानपण, ’अद्वैत’ नावाची ती नावाला जागणारी कॉलनी, त्या कॉलनीत असलेलं आमच्या घराचं विशिष्ट असं भौगोलिक स्थान, नाशिक .... आणि कोसळून-कोसळून चराचरांत मुरलेला बेबंद पाऊस.. ह्या सगळ्यांचे जमून आलेलं ते रसायन होतं.

आता घर असलं तरी आई नाही. मनात मूलपण जपलं असलं तरी वय लहान नाही. नाशिकला देखील ’तसा’ पाऊस पडतो, असं वाटत नाही....पण अंदाजे साडेतीन दशकांपूर्वीच्या पावसाळ्यांनी सोडलेल्या त्या पाऊसखुणा, पुसट काही झाल्या नाहीत. आजच्या पावसाने काही मागे ठेवलंय का? हे भिंग घेऊन शोधत फिरताना उलट त्या अधिकच ठळक होतात.

माझ्या जन्माच्या सुमारास बांधलेलं आमचं घर काही जंगलात नव्हतं. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या कॉलनीतच... पण तिच्या सगळ्यात आतल्या टोकाला होतं. कॅनडा कॉर्नरहून आत शिरलं की एक डावं-एक उजवं-एक डावं अशी वळणं घेत तिथं पोचायचं... सगळी वर्दळ, गजबज मागे पडलेली असायची.

घराच्या मागच्या दोन बाजुंना लांबच्या लांब पसरलेली काळीभोर शेत जमीन. हे शेत पायी ओलांडायचं म्हंटलं तर तब्बल पंधरा मिनिटे लागायची... घराच्या मागे पडकी विहीर... उंचच्या उंच गवत... हे सगळं पार करून पुढे गेलं की पुन्हा घरं, दुकानं, गिरणीवाल्या बाईंची पीठाची गिरणी, इस्‍त्रीवाला, सायकलवाला, शाळा, कॉलेज असं सगळं....
जसं काही शहराने वाढतावाढता दम लागून एक श्वास घेण्यासाठी थांबलं असावं, तसं...

या सगळ्यामुळे पहिला पाऊस, मातीचा वास, वळीव.. हे काही फक्त कवितेत भेटलं नाही. गरमागरम तापलेली काळ्याभोर मातीची ढेकळं. त्यावर आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब.. वाफाळलेला सुगंध... अशा वातावरणात आम्हा भावंडांवर पावसात भिजण्यावर नाही, तर न भिजण्यावर बंदी होती.

’ये ग ये ग सरी, माझे मडके भरी’ अशी सुरुवात केलेला पाऊस, पुढच्या चार महिन्यात आपली वेगवेगळी रुपे दाखवत ’पाऊस कधीचा पडतो...’ असा प्रवास करायचा. मातीच्या ढेकळांचा हळूहळू गच्च चिखल व्हायचा. त्यावरही संततधार पडत राहिली की सगळीकडे पाणीच पाणी.. शेतातलं पाणी कंपाउंडच्या भिंतीवरून बागेत यायचं. घराची तिसरी पायरी बुडली की रेनकोट घालून, कुदळ-फावडे घेऊन बाहेर शेतात जायचे. मधेमधे छेद देऊन पाणी मोकळे करायचे. त्या मोकळ्या झालेल्या, खळाळत धावणार्‍या पाण्याचा आवाज.... त्या पाण्याबरोबर वाहत येऊन पोटर्‍यांना अडलेले लव्हाळे... आणि ई.. शी.. करत त्याला भराभरा बाजूला काढणं.....

दहा-दहा दिवस, उभ्या सरळ रेषेत पडणार्‍या पावसाबरोबर अनेक पाहुणेमंडळी घरी यायची. शेतातली त्यांची घरं पाण्यात पार बुडून गेलेली असायची. चिक्कट आणि फिक्कट गुलाबी रंगाचं गांडूळ फारसं कुणालाच आवडायचं नाही. रात्रभर प्रेमसंवाद करणारे श्रीयुत आणि श्रीमती बेडुक... शेतात पाणी जितकं खोल, गच्च आणि जुनं, तितका या बेडकांचा अंदाज रुमानी.... आम्ही मुलं तर त्यांच्या ’डराव’च्या स्टाईल वरून त्यांना नावं द्यायचो आणि कोण कोणाच्या मागे लागलंय... कोणाचं कोणाशी जमलंय याचा अंदाज लावायचो.
काडी लावली की गोल वेटोळे करून बसणारा लाल-तपकिरी रंगाचा आणि शंभर पायांचा पैसा... मखमली लाल रंगाचा, तूतीची पानं खाऊन वाढणारा किडा. रिकाम्या काड्यापेटीला भोकं पाडून, त्यात खाली गवत अंथरून त्यावर याला ठेवायचं. तीव्र-उंच-चिरक्या आवाजांचे रातकिडे... पण हे सगळे तसे निरुपद्रवी.

काही भीतीदायक पाहुण्यांचे स्वागत मात्र व्हायचे नाही. आताच्या निसर्गमित्रांना हे फारसे आवडणार नाही. पण कॉलनीतल्या छोट्या मुलांची संख्या बघता हे स्वाभाविकच होते. विंचू दिसला की चपलेने मारलाच जायचा. ४-५ फुट लांबीची सापाने टाकलेली कात बागेत सहज मिळायची. ती दिसायची सुंदर पण तिची भीती वाटायची. एकदा बागेतल्या कारंजाच्या नळाच्या खोबणीत पाय सोडून बसलेल्या भावाच्या पायाला लागूनच एक पिवळा जर्द साप गोल करून बसलेला होता. अशा प्रसंगांना घाबरूनच साप-नाग-धामण-मण्यार दिसले की जोरात ओरडायचे. मग शेजारचे सगळे काका-दादा काठ्यालाठ्या घेऊन धावत यायचे. मारल्या गेलेल्या नागदेवतेने त्रास देऊ नये म्हणून रीतसर पूजा करून, दुधाचा नैवेद्य दाखवून त्याला अग्‍नी दिला जायचा. अनेकवेळा या साप-नागांची बोटभर लांबीची पिल्लं घरात सापडायची. ती पिटुकली पिल्लं सुद्धा काय सुंदर फणा काढायची !

एकदा एक गंमत झाली. तुडुंब पावसाळा आणि शेतात भरलेलं गुडघाभर पाणी.... मध्यरात्री झाली की कुणी स्‍त्री कण्हल्यासारखा आवाज यायचा. १०-१२ दिवस भरपूर पाऊस झालेला होता. त्यामुळे आधी वर्णन केलेले अनेक निर्वासित प्राणीमात्र बाहेर पाण्यावर तरंगत फिरत होते. रात्रीच्या मध्य प्रहरी बाहेर जायची कोणाचीच हिमंत होईना. चार दिवसांनी बाबा बॅटरी घेऊन गेलेच. तेव्हा लक्षात आलं कंपाउंडचा खिळखिळा झालेला एक खांब आणि त्याला बांधलेली काटेरी तार, वारं एका विशिष्ट दिशेने आले की एकमेकांना घासले जात होते आणि त्याचा तो आवाज होता.

घरची बाग या काळात फळा-फुलांनी भरून गेलेली असायची. काय नव्हतं तिथं? मोगरा, जाई-जुई-सायली, पाच रंगाच्या जास्वंदी, हिरव्या रंगाची अबोली, गुलाब (आणि त्यावर कलम करायला येणारे म्हातारे काका), द्राक्षाचे वेल, ऑगस्ट मध्ये पिकणारा हापूस, मलगोवा-पायरी अंबा, गुलमोहर, चिकू, पेरू, लिंबू, नारळ, मघई पान .....

आईचं घर आणि पाऊस यांचा आणखी एक ऋणानुबंध आहे.
ती गेली तेव्हाही आभाळ गच्च भरलेलं होतं आणि पाऊस खरोखरीच रिमझिम निनादत होता... आसमंत जसा दु:खाच्या मंद स्वराने भारलेला !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कान तुटका


तसे घरात पाणी पिण्यासाठी काचेचे अनेक ग्लास होते. एकसारखे, संचातले. पण त्यामुळे फार गोंधळ उडायचा. कुणाचा कुठला? हा प्रश्न सतत चर्चेत राहायचा. त्यावर एक साधा-सरळ उपाय म्हणजे ग्लास विसळून ठेवणे. त्याने एका नवीन वादाला तोंड फुटायचे. विसळण्याची जबाबदारी कुणाची? खरं तर पाणी पिऊन झाल्यावर प्रत्येकाने विसळून ठेवायला हवा, पण..... तसे झाले नसेल तर ? ..... confusion, अविश्वास....
साधारण चार साडेचार वर्षांपूर्वी यावर मी एक उपाय सुचवला. घरातील प्रत्येकाने आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे असे दर डोई तीन mugs आणायचे. त्यांचा वापर पाणी-चहा-कॉफी अशा सामान्य, दैनंदिन आणि वैयक्तिक पेयपानासाठी करायचा. अर्थातच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्याच्या-त्याच्या डोक्यावर.
तसे मी जाऊन सगळ्यांसाठी विकत आणू शकले असते... "ह्या रंगाचे हे तुझे तीन", वगैरे. पण आपल्या 'व्यक्तिमत्त्वाला साजेसे' असा एक catch टाकून 'mugs' हा प्रश्न मी अस्मितेचा आणि तत्त्वाचा केला आणि गुपचूप त्या जबाबदारीतून सुटका मिळवली.

नवर्‍याने एका दिवसात एकसारखे आणि संपूर्णत: काळ्या रंगाचे mugs आणले आणि 'Black is beautiful, simple.' असं म्हणत फार मूलभूत निवड केल्याचा आव आणला.
लेकाने बाजारात mugs या प्रकारात जितके म्हणून चित्र-विचित्र रंग-आकार शोधता येतील तेवढे शोधले, त्यासाठी तब्बल तीन आठवडे घेतले आणि तीन भन्नाट mugs माझ्यासमोर आणून ठेवले.
मी मात्र फार विचार केला नाही. कारण 'व्यक्तीमत्व' वगैरे gimmick, हे निव्वळ माझ्या कमी काम करण्याच्या सोयीचे, म्हणून होते. मध्यम मार्ग स्वीकारत त्या दोघांच्याही निवडकक्षेत नसतील असे, पण जरा बरे वाटणारे, जवळच्याच सुपर मार्केटमधून उचलले.

आणल्याच्या तीसर्‍याच दिवशी माझ्या एका mugला छोटासा अपघात झाला आणि त्याचा कान तुटला. "टाकून दे ग, कशाला ठेवतेस ?" दोघांचं टुमणं. इतक्या लगेच, केवळ कान तुटला म्हणून, त्याला कचर्‍याची टोपली दाखवणे मला संपूर्णत: अमान्य होते. कारण बाकी त्यावर ओरखडासुद्धा नव्हता.

जशी मी त्याला वापरत राहिले तसे त्याचे 'कान तुटका' हे संबोधन प्रचलित होत गेले. मी ते फारसे मनावर घेतले नाही, त्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता.
असे काही महिने गेले. मग वाटले, त्याच्या तुटक्या कानाचे कंगोरे फारच बेढब दिसतात. मग एक छानशी कानस आणली. stone grinding करतात तसे पाणी वापरून, कानसने घासतघासत ते कंगोरे नाहीसे केले.
या घटनेला चारहून अधिक वर्षे झाली. त्याच्याबरोबर आणलेल्या आठ जणांनी एकेक करून आमची साथ सोडली. 'कान तुटका' मात्र आहे तस्साच आहे.

दरम्यान 'तुटका कान' हे त्याचे व्यंग न राहता ती त्याची identity झाली आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विलक्षण ’पु.ल. क्षण' : काळजी


सुरभी नीमाची सून आणि नीमा जुनी मैत्रीण, असं सांगितलं तर वाटतं..... तितका काही हा 'बादरायणी' संबंध नव्हता.
त्यामुळे नवीन लग्‍न करून सुरभी दुबईला रहायला आली, तेव्हापासून ती, मला माझीच जबाबदारी वाटत होती. तसं नीमाला मी म्हंटलं देखील.. "नको ग काळजी करूस. तू आणि मी काही वेगळ्या नाही. मी बघते त्या दोघांचं अडलं-नडलं."

आणि असे अडल्या-नडल्याचे प्रसंग आलेही चिक्कार. नवीन संसार, नवा देश, नव्या नोकर्‍या...
नवी नवरी ते पहिल्यांदा येणारे आईपण असा सुरभीचा दोन वर्षांचा प्रवास मी नुसता काठावर बसून नाही बघितला. अनेकवेळा धावून गेले. प्रसंगानुरूप कधी घरीही घेऊन आले. कधी एखादी रेसिपी, इतकं साधं तर कधी पाच महिन्यांची गरोदर असताना गेलेला तोल, इतकं कठीण. काही महिन्यांपूर्वी सुरभी तिच्या बाळंतपणासाठी माहेरी गेली.

जानेवारीत भारतात गेले तेव्हा सुरभीला-बाळाला भेटावसं वाटलं म्हणून नीमाकडून तिच्या आईचा फोन नंबर घेतला, दिवस-वेळ ठरवली...
सुरभीच्या आईने दार उघडले. त्यांच्या छोटेखानी, दुमजली बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ती दोघं आहेत आणि लवकरच खाली येतील, बसा.. असं म्हणाल्या.

दरम्यान आम्ही बेल वाजवल्यापासून दोन्ही मजल्यांच्या मधल्या जिन्यात बांधलेलं त्यांचं ’पाळीव’ श्वान, त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडत होतं... म्हणून त्या बाईंनी aplomb bearing घेऊन ’मॅक्स’ला शांत करायला सुरुवात केली. तेवढ्यात फोन वाजला.

त्या प्रचंड गोंधळात फोनवरचं, एका बाजूचं जे संभाषण ऐकू आलं ते असं.. "हो आलेत... नाही, तो ठीक आहे. खायला दिलंय आधीच... नको.. बाहेर नको.. बाहेर ऊन आहे." वगैरे.

फोन बंद झाल्यावर त्या वळल्या आणि म्हणाल्या, "ह्यांचा ऑफिसमधून फोन होता. तुम्ही येणार माहित होतं नं, म्हणून चौकशी करत होते.... तशी यांना मॅक्सची खूपच काळजी असते.............!!!"

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

’पेट’ स्‍नो


समोरच्या फ्लॅटमध्ये जेमिमा राहते. गेली काही दिवस ती, तिच्या गावी इंग्लंडला सुट्टीसाठी गेली होती. त्यामुळे तिचा अडीच वर्षांचा मुलगा जेम्स आणि त्याने पाळलेली कुत्र्याची दोन पिल्लं, यांचा दंगा नव्हता आणि ती शांतता आम्हाला आवडत नव्हती.
काल रात्रीपासून परत कल्ला सुरू झालेला. आली असावी. तिच्याशी थोडं बोलावं म्हणून दार उघडलं.

"कशी गेली सुट्टी ?"
"मस्त. छान बर्फ होता ह्यावेळेस. आणि जेम्सने पहिल्यांदाच बर्फ बघितला."
"मग ? आवडला का त्याला.. white winter ?"
"खूपच. पण त्यामुळे आमच्यावर एक प्रसंग ओढवलेला.
जेम्सला नं बर्फ ...... 'pet' म्हणून पाळायचा होता."

"अरे बापरे! तू कसं सांगितलंस त्याला.... हे शक्य नाही म्हणून."

"नाही नाही. मी तसं का करू?
उलट तो आणि मी, आम्ही दोघं रोज बाहेर जायचो. थोडा बर्फ गोळा करून आणायचो आणि घरात वेगवेगळ्या जागी ठेवायचो."

माझी उत्सुकता शिगेला.
"कधी त्याच्यासाठी एखादी बास्केट तयार करून तिच्यात किंवा टॉवेलची गादी करून त्यावर....
पण कुठेही ठेवलं तरी बर्फच तो, वितळून जायचा.
मग जेम्सला कळलं. बर्फाला घरात आणलं की त्याला खूप रडू येतं.
इतकं.. की तो संपून जातो.
सात-आठ दिवसांनी हा प्रकार बंद झाला.

आता जेम्सला स्वत:ला कधीही रडू आलं की एक-दोन मिनिटातच सावरतो आणि म्हणतो,
I won't cry so much. Otherwise, I will be over too."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें


संत तुकारामांचा अभंग आहे, ’वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें’

अलीकडे पर्यावरण हा विषय निघाला की या ओळीचा वापर हमखास होतो.
रस्त्याच्या कडेने पाट्या असतात, ’झाडे लावा झाडे वाचवा’ आणि लगेच ’वृक्षवल्ली आम्हां ..’

पण या रचनेचा विषय ’पर्यावरण’ हा नाही.

या अभंगाचा गाभा काही वेगळाच आहे .. जो त्याच्या शेवटच्या दोन ओळींमधे व्यक्त होतो.
त्या अशा आहेत .............

तुका म्हणे होय, मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी

तुकोबा जेंव्हा विजनवासात .. एकांतात असतात .. तेंव्हा काय होतं ?

सभोवतीची झाडं-वेली-प्राणीमात्र त्यांना सगे-सोयरे वाटायला लागतात. आकाश डोईचे छप्पर होते आणि पृथ्वी बसायचे आसन.. जाडीभरडी वस्त्रे आणि एक कमंडलु एवढेच काय ते, देहाचे म्हणून जे उपचार त्यासाठी पुरेसे होते. अशा वातावरणात कुठलेही अमंगळ भाव तुकोबांच्या मनात येत नाहीत.....

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या minimalistic वातावरणात तुकोबा म्हणतात, माझा.. माझ्याशी उहापोह चालू होतो.

वाद-संवाद जेव्हां दुसर्‍याशी होतो तेंव्हा त्यात चढाओढ, ईर्ष्या येते ... पण इथे मंडनही आपलंच आणि खंडनही आपलंच.

आपुलाचि वाद आपणांसी ... म्हणजे, स्वत:शी भांडण उभे करणे नव्हे ......
तर एक विषय घेतला की त्याची सर्वांगीण चर्चा .. आपणच आपल्याशी करायची.

तुका म्हणे होय...... मनासी संवाद !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

झिणिझिणि वाजे बीन


झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

बा. भ. बोरकरांची काय सुंदर कल्पना आहे पहा.
कविता संपूर्णत: अध्यात्मिक वळणाने जाते.
ते म्हणतात ..

हे जे माझे, अव्यंग शरीर-मन आहे, ते बीन म्हणजे.. एखाद्या पुंगी-वाद्यासारखे आहे.
कवितेत ते या शब्दांत येतं .........
' सौभाग्ये या सुरांत तारा '

आणि त्यातून हा जो प्राणवायू आत-बाहेर करतोय त्यामुळे, हरघडी.. हरक्षणी एक वेगळीच सुरावट, अनोखी लयकारी बाहेर पडते.
ती कधी शांत-प्रसन्न मंत्रघोषासारखी असते .. तर कधी उगीच वायफळ .. अर्थहीन तराण्यासारखी .. तर कधी फारच कठीण .. जीवाचा लचका तोडणार्‍या अवघड तानेसारखी.

आणि हे वाजवणारा ..
या शरीररूपी वाद्यातून .... प्राणवायू फुंकून .... ही सुरावट काढणारा ... आहे तरी कोण ? ......
अर्थात ... साक्षात परमेश्वर.......
तो तर काय .. अलख निरंजन...... सहजपणात प्रवीण .....

जसा पारा हातात पकडायचा प्रयत्‍न केला तरी हाती लागत नाही.. तसा ह्या शरीररूपी वाद्याच्या तारा छेडणारा परमेश्वर आपल्या हाती येत नाही.
त्याचे अस्तित्व तर जाणवते... हे आपल्याकडून कुणीतरी सर्व करून घेत आहे, याची जाणीवही असते... पण ’तो’ मात्र आकलनाच्या पलीकडेच रहातो.

सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कवी सुधीर


कवी सुधीर मोघे यांच्यावरचे हे माझे खरं तर दुसरे लिखाण. या आधीचे आणि हे, दोन्हीत एक समान सूत्र आहे आणि काही असमान धागे.
समान असे की या दोन्हीत त्यांची 'जीवनी' अशी नाही. किती पुस्तके लिहिली? कोणते पुरस्कार मिळाले? यात ते अडकलेलं नाही. पण,
पहिलं त्यांच्या निधनाच्या दुसर्‍याच दिवशी लिहिलेलं. त्यामुळे उत्‍स्‍फूर्त आणि काहिसं अचानक आलेल्या पोरकेपणाने बावरून गेल्यासारखं. तरी त्यांना वाहिलेली ती आदरांजली असल्याने त्याचे महत्त्व वेगळे.
दुसरे आजचे.. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी लिहिलेलं. भावनेच्या पगड्याच्या थोडं बाहेर येत.

त्यांच्या कविता-गाण्यांचे अवलोकन करण्याची किंवा त्यांची साहित्यिक मीमांसा करण्याची माझी योग्यता नाही. 'आठवणीतली गाणी' या माझ्या उपक्रमामुळे त्यांच्या गीतलेखनात दिसलेले सुधीरजी आणि आमच्या सात-आठ वर्षांच्या ओळखीतून दिसलेले काव्याबाहेरचे सुधीरजी.. यांच्याशी झालेल्या चर्चांतून माझे काव्यानुभव समृद्ध झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

अलीकडचे प्रसिद्ध कवी वैभव जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
'रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.. '

पण जर कुणाला अशी 'एखादी'च नाही, तर अशा अनेक 'कविता पानोपानी' सुचल्या असतील तर.. त्यांना काय म्हणावे? कविवर्य, कविश्रेष्ठ? आणि त्याही पुढे जाऊन, ते जर फक्त शब्दचित्रेच नाही तर रंगचित्रे, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय सादरीकरण, पटकथालेखन.. असंही बरंच काही करत असतील तर?

सुधीर मोघे यांना मात्र त्यांची 'कवी सुधीर' अशी सुटसुटीत ओळख करून दिलेली अधिक आवडायची. 'Poet Sudheer' अशी झोकदार इंग्रजी सही ते करायचे. कारण कवितेव्यतिरिक्‍त इतर कुठल्याही माध्यामातून व्यक्त होणं, हे त्यांच्या 'कवी' असण्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटायचं. त्यांच्याच शब्दांत सागायचं तर, "माझ्या प्रत्येक असण्याला माझ्या कवी / poet असण्याचा base आहे, संदर्भ आहे." आमच्या चर्चेत हे त्यांचं कवी असणं भरून असायचं.

टेरिकॉटची पॅंट, ढगळसा झब्बा. अशी अनौपचारिक वेषभूषा. 'पद्मा फूड्स' हा अनौपचारिक गप्पांचा तितकाच अनौपचारिक अड्डा. जवळपास पन्‍नास वर्षांची कारर्किर्द. सांगण्यासारखे प्रचंड काही आणि ते सांगतासांगता समोरच्याला जाणून घेण्याची खुबी..

त्यांची कविता शब्दबंबाळ नाही. शैली मिताक्षरी. थोडक्यात आणि मार्मिक. बुद्धीवादी, तर्कनिष्ठ आणि त्याचवेळी तरल. scientific temperची झलक असणारी. परमेश्वराच्या सगूण आणि निर्गूण, दोन्ही रूपांचं एकाच तन्मयतेने वर्णन करणारी..

शब्दांवर प्रेम करताना त्यांच्या आहारी न जाता.. त्यांच्याकडे केवळ माध्यम म्हणून पाहताना, शब्दांविषयी ते म्हंटतात..

शब्दांच्या नकळत येती.. शब्दांच्या ओठी गाणी..
शब्दांच्या नकळत येते.. शब्दांच्या डोळा पाणी..

शब्दांना नसते दु:ख.. शब्दांना सुखही नसते..
ते वाहतात जे ओझे.. ते तुमचे माझे असते..

सुधीरजी एकदा म्हणाले होते, "मुकुंद (फणसळकर) म्हणतो, माझ्या प्रत्येक कवितेत-गाण्यात माझी सही असते. तुला वाटतं तसं?" त्यांचं काव्य-गीत लेखन जवळजवळ मुखोद्गत असल्याने मी लगेचव रुकार दिला. म्हंटलं, "हो. हो. नक्कीच.
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'पर्वतांची दिसे दूर रांग .. काजळाची जणू दाट रेघ',
'सूर कुठूनसे आले अवचित' मध्ये .. 'रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव',
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या',
.. या तुमच्या सह्याच तर आहेत."

'मन' या विषयावर सुधीरजींना खरं तर Ph.D. मिळायला हवी होती. एका कवितेत ते म्हणतात .. 'मन मनास उमगत नाही .. आधार कसा शोधावा ! .. चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही .. धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही.' आणि असंही .. 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' याच कवितेत 'मन'च कसं आपल्या भावविश्वावर नियंत्रण ठेवतं हे सांगताना, 'तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश'. एका ठिकाणी .. 'मनाचिया घावांवरी मनाची फुंकर ..' आणि 'मन' ते 'कविता' असा प्रवास ...

एकांत, लेखणी, कागद- वाया सारे
मन कागदाहुनी निरिच्छ अणि कोरे
गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे
बोटांवर अवचित मन ओठंगुन आले.

सुरेश भट, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यावर 'झी मराठी' या दूरचित्र वाहिनीने केलेल्या 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमांचे लेखन सुधीरजींनी केले आहे. एकदा त्यावर बोलत असताना, समोर बसल्याबसल्या त्यांनी संवादिनी घेतली. ती त्यांच्या खोलीत असायचीच. आणि चक्क सुरेश भटांचं 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझात वेगळा' गायला लागले आणि म्हणाले, "देवकी (पंडीत) अंदाजे सतरा वर्षांची असताना मी तिला हे गाणं शिकवलं ते असं. तेव्हा कोवळ्या वयामुळे तिला गीताचा संपूर्ण अर्थ उमगलाच होता, असं म्हणता येणार नाही. ती, मी शिकवलेली चाल या लयीत म्हणायची. आता थोडी ठायमधे असते. पण हा 'तिचा' व्यक्त होण्याचा भाव आहे."

'लय' वरून आठवलं ..

लय एक हुंगिली खोल खोल श्वासात,
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात,
लहडला वेल... तो पहा निघाला गगनी,
देठांना फुटल्या - कविता पानोपानी

सुधीरजी म्हणायचे, "एकदा कविता लिहिली की तिचे नशिब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने जाते .. मी माझ्या .."
एक कवी आपल्या कवितेकडे इतक्या निर्ममपणे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा कुठल्यातरी पातळीवर कवितालेखन हे त्याच्यासाठी ध्यानसाधनेसारखं असतं.

मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना- ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्यागेल्या श्रेयांवरती;
पण पुसट.. कोवळे नाव ठेवुनी गेलो.

ह्या नि:शब्दांच्या आड कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे कविता फक्त असेल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

The caucus race


कालच्या Dubai Women's Run ( ‪#‎DHWomensRun‬ ) मध्ये ६२.०५ मिनिटांत १० किलोमीटर्स पळाले. छान वाटलं.
ते नखशिखांत घामात निथळणं.... that sudden rush of energy....
हे ते 'किक' की काय म्हणतात नं.. तसं असतं.

पण गेल्या वेळेपेक्षा तब्बल साडेपाच मिनिटं जास्त लागली. लागू देत.
तो दिवस वेगळा होता. आजचा वेगळा.
अंतिम रेषा पार केली आणि स्वत:लाच सांगून टाकलं... येस्स, मी जिंकले !!
कारण व्यक्तीश: हे माझ्यासाठी हे लांब पल्ल्याचं पळणं, रोजचा दिवस आणि आयुष्यच एकंदरीत, 'कॉकस रेस' सारखं आहे.

पण हा दृष्टिकोन माझा नाही. लेकाने पहिलीत असताना त्याच्याही नकळत शिकवलेला.
शाळेतून घरी आल्यावर त्याने सांगितलं, "उद्या पळण्याची शर्यत आहे."
त्या वयातही पुस्तकांतच नितांत रमणारं माझं हे लेकरू फार काही पळेल अशी अपेक्षा नव्हती. तरी उगीच उत्सुकता म्हणून दुसर्‍या दिवशी विचारलं तर म्हणाला, "मी पहिला आलो."
"कसं शक्य आहे आशय? तुला कोणी सांगितलं?"
"असं कोणी कोणाला सांगत नाही. ॲलिसच्या गोष्टीत नाही का ती 'कॉकस रेस' सगळेच जिंकतात.. तसं आपणच ठरवायचं असतं."

The caucus race.
Alice's Adventures in Wonderland ह्या पुस्तकात Lewis Carroll यांनी एका छोटेखानी परिच्छेदात वर्णन केलेली.

वरवर लहान मुलांसाठी वाटणार्‍या या पुस्तकात, तशा nonsensical वाटणार्‍या अनेक घटना satire पद्धतीने मोठ्यांसाठी एवढं काही सांगून जातात.
ॲलिसच्या अश्रूंच्या तलावात तिच्यासकट अनेक प्राणी बुडून ओले झालेत. कोरडे होण्यासाठी डोडो सगळ्यांना पळण्याची शर्यत सुचवतो. ह्या शर्यतीला जशी सुरुवात नाही तसा शेवटही नाही. ती एका वर्तुळात होते... म्हणजे सगळे एका गोलात फिरतात.. कोणी मधूनच सामील होतं तर कोणी मधूनच सोडूनही जातं. आणि तरी सगळे जिंकलेले असतात.

थोडक्यात,
कोणी कुठुनही निघत नाही आणि तसंच कुठेही पोचत नाही.
या गोलगोल फिरण्याच्या शर्यतीत जन्माला येणारा प्रत्येक जीव कुठेतरी सामील होतो.
एखादा मधूनच, अचानक बाहेर पडतो आणि आपल्या पारलौकिक प्रवासास निघून जातो.
आणि दोन बिंदूंमधील अंतर पळताना तो स्वत:ला विजयी ठरवतो. नव्हे, तो असतोच.
कारण रोजच्यारोज त्याने, त्याच्या स्वत:च्या, अत्यंत व्यक्तीगत, फक्त त्यालाच जिचं संपूर्ण आकलन आहे अशा.. परिस्थितिवर मात करण्याचा प्रयत्‍न केलेला असतो.

कालच्या पळण्यास जास्त वेळ लागल्याचं रत्तीभरही दु:ख न होण्याचं, विजयी समजण्याचं, हेच कारण होतं.
नुकतेच झालेले मानेतील bulging disc चं निदान. त्यामुळे दुखरा उजवा खांदा आणि हात.
माझ्या नेहमीच्या दिनक्रमात कुठलाही बदल होऊ नये यासाठी pain management शिकवणारे माझे अतिशय प्रेमळ मित्र डॉ. सुरेंद्रन आणि समिरा..
साडेपाच मिनिटं काहीच जास्त नाही.

दोन वर्षांच्या पिल्लाला stroller मध्ये घेऊन पळणारी एक आई, Dubai maids services चा group........ अशा आम्ही मिळून सार्‍या अंदाजे ५००० जणी, एका स्वयंस्फूर्तीच्या आणि परिपूर्णतेच्या जाणीवेने सामाधानी होतो.


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सुधीरजी..


शनिवारी दुपारी ’आठवणीतली गाणी’चा एक आधार तुटला.
कधीही, कुठेही, काहीही अडलं की तुमच्याकडे धाव घ्यायची.. ईमेल / फोन / प्रत्यक्ष.. असा जमेल तसा संपर्क साधायचा.. तुमच्या भोज्याला हात लावायचा आणि आत्मविश्वासाने पुढे जायचे अशी एक सवयच लागली होती.

आपला शेवटचा संपर्क आणि चर्चा ८ जानेवारीची.
विषय होता, ’आठवणीतली गाणी’वर अप्रचलित शब्दांचे अर्थ देण्याची केलेली सुरुवात आणि ’साद देती हिमशिखरे’ मधिल ’ध्वजा कौपिनाची’वर माझे अडकणे. कौपिनेश्वर म्हणजे शंकर, ’कौपिनं’ या संस्कृत शब्दाचे वेगवेगळे अर्थ..
तेंव्हा तुम्ही केलेल्या ईमेलचा काही भाग जसाच्या तसा..
".... मात्र ह्या विशष्ट गाण्याच्या संदर्भात हे इतर व्याकरणसिद्ध अर्थ उपयोगी नाहीत असं मला वाटतं. वसंत कानेटकर ह्यांचं हे पद त्यांच्या मत्स्यगंधा नाटकातील आहे, हा संदर्भ तुला ठाउक आहेच. पण तो प्रसंग ध्यानी घेतला तर त्या शब्दाचा मी जो लावला आहे तो अर्थ अधिक संयुक्तिक वाटेल असं मला वाटतं. मत्स्यगंधेच्या मोहात काही काल गुरफटलेला पराशर भानावर येउन तिचा निरोप घेतो आहे आणि त्याचं ह्या प्रवासाचं मूळ उद्दिष्ट तो तिला सांगतो आहे.
’साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची...’ पुढच्या ओळी ह्या दृष्टीने अधिक बोलक्या आहेत.
कैलासाचा कळस ध्वजा कौपिनाची.. अढळ त्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकाची.. मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची ....हे रूपक ध्यानी घेतले तर देवळाचा कळस आणि त्यावरचा (संन्यस्त वृत्तीचा निदर्शक भगवा ध्वज हाच अर्थ कवीच्या मनांत असावा असं वाटतं......"

अशी अनेकवेळा तुमच्याकडे घेतलेली धाव.... आणि काही वेगळं, चांगलं घडण्यास आणि घडवणार्‍यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या वृत्तीने आपण वेळोवेळी केलेले मार्गदर्शन..
वानगी दाखल सांगायचे झाले तर..

सुरेश भट यांच्या ’रंगुनी रंगात सार्‍या’ या आपण संगीत दिलेल्या गझलेतील एक अंतरा ’भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो.. अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा’ हा त्या गझलेच्या पुस्तकीय आवृत्तीत कसा नाही?
आणि ’कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे.. मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा’ हे त्याच्या ऐवजी आलं की कसं?

’ते मीनकेतनाचे ग मोडिले धनु मी ! त्या चित्त-चोरट्याला का आपुले म्हणू मी ?’
’मीनकेतन’ या शब्दाची व्युत्पत्ती कशी असेल? ’मीनकेतन’ म्हणजे मदन. पण ’मीन’ म्हणजे मासा आणि ’केतन’ म्हणजे ध्वज. मग मदनाचा असा काही ध्वज असून त्यावर मासा, असं आहे का?

’मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका’ आणि ’रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला’ या दोन्ही गाण्यांना वसंत पवारांनी दिलेली एकच चाल.. का वाटलं असेल एका संगीतकाराला काही वर्षांच्या अवधीनंतर तीच चाल पुन्हा वापरावी?

’आला आला वारा’तल्या आपल्याला अभिप्रेत असलेल्या, सासरी निघालेल्या सया कोण? असं बरंच काही....

सुधीरजी..
तुम्हाला ’सर’ म्हंटलेलं आवडायचं नाही म्हणून तुमचं वय, ज्ञान, अनुभव यामुळे आपसूक येणार्‍या ’सर’ला आवर घालत ’सुधीरजी’ म्हणायला शिकले होते....

तुमच्या ’मुक्तछंद’ बंगल्याच्या वरच्या खोलीच्या दोन भिंती, तुम्ही काढलेल्या चित्रांनी नटलेल्या असायच्या. त्या खोलीतून बाहेर पडताना तिथे थबकायचे.. मनभरून ती चित्र पहायची..
मग तुम्ही सांगायचे, "तुला माहित आहे नं, यातील कुठलीही आणि कितीही चित्र तू कधीही घेऊन जाऊ शकतेस.."
आणि मी म्हणायचे, "हा वर मी राखून ठेवत आहे." असा आपला एक रिवाज होता.
पण खरं तर असं कधीही वाटलं नाही की त्या सुंदर मांडणीतल्या एका कुणाला उचलून वेगळं करावं आणि ’एकलकोंडं’ असं आपल्या घरात लावावं..
जितकी नैसर्गिक त्या चित्रांची ती जागा होती तितकंच माझं तिथे दर वेळेस थबकणंही..

’मुक्तछंद’ या आपल्या बंगल्याच्या ठिकाणी आता फ्लॅट सिस्टिम होणार हे सांगितलंत तेंव्हा मी म्हंटलेलं.. ’मुक्तछंद’ आता साचेबद्ध होणार.....
तर म्हणाला होतात, "वास्तू साचेबद्ध होतीये खरी.... आतला माणूस सदैव मुक्तच होता आणि राहील................ !!"

(हा फोटो.. ताजा-ताजा, गरमागरम, फोटोग्राफरकडून घेऊन आलोय... ’आठवणीतली गाणी’साठी... म्हणून दिला होतात)



  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

२०१४


पहाटेच्या थंडगार वार्‍यासारखं..... अजून ऊन न झेलेलं..
नव्या कोर्‍या साडीसारखं..... अजून घडी न मोडलेलं..
नुकत्याच केलेल्या कागदाच्या होडीसारखं..... अजून पाण्यात न सोडलेलं............. ⛵

....... एक अख्खं नवं कोरं कॅलेंडर........................
१२ पानांचं आणि ३६५ चौकोनांचं....
.... अगणित अपेक्षांचं ओझं वाहणार्‍या..... मोजून नेमक्या क्षणांचं......

.. उत्साह.. योजना.. उत्कंठा.. प्रार्थना............
या नव्या रोजनिशीचं रोजचं पान लिहिताना.................
हे मना, माझा हात कधीही न थरथरो...... !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

लडाख calling


जुले (Juley)……. लडाखी भाषेत- नमस्ते !!
La म्हणजे Pass (खिंड). Dakh म्हणजे land.
लडाख म्हणजे Land of Passes.

अर्थातच निसर्ग या संपूर्ण भागावर अधिराज्य गाजवतो. हिवाळ्यात -४० अंशांपर्यंत जाणारे तापमान आणि तब्बल २०,००० फुटांहून अधिक उंच जाणारे पहाड, वाळवंटी जमीन, loose rocks.. यामुळे हे स्वाभाविकच आहे.
पण खरा सलाम आहे तो ही सगळी आव्हानं तितक्याच निधड्या छातीने झेलीत, त्यांच्याशी सामना करणार्‍या दोन संस्थांना..
एक ’सीमा सडक संघटन’- Border Road Organisation आणि दुसरी भारतीय लष्कर.
या दुर्गम भागातील रस्ते सतत वाहते ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सातत्याने होणार्‍या avalanches, दरड कोसळणे, यामुळे त्यांच्या कामात खंड तो नाहीच.

NH1 लेह - श्रीनगर महामार्ग, ही या विभागाची धमणी आहे. १९६५, १९७२ आणि १९९९ या तिन्ही युद्धांमध्ये सीमेपलिकडून, ह्याच्या काही भागावर कब्जा मिळवायचा, जेणेकरून लष्कराची रसद तोडली जाईल, असा प्रयत्‍न प्रामुख्याने केला गेला होता.
हे रस्ते बांधताना आणि त्यांना वाहतुकीस योग्य ठेवताना सैन्याचे अनेक जवान आणि BRO चे इंजिनियर्सनी देह ठेवला. त्यांच्या स्मरणार्थ रस्त्याच्याकडेने लावलेले दगड हे मैलांच्या दगडांसारखेच विखुरलेले आहेत.

कारगील शहरातील war memorial हे फक्त लष्करासाठी खुले आहे, सर्वांसाठी नाही. पण आम्ही दोघं केवळ तेवढ्यासाठी कारगीलपर्यंत गेल्याने तिथल्या station chief ने आम्हाला आत जाण्याची खास परवानगी दिली. त्यांना मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला डोळ्यांना सहज दिसणार्‍या, समोरासमोरील टेकड्यांवरच्या, भारत आणि पाकिस्तान.. अशा दोन्ही निरिक्षण चौक्या दाखवल्या. पूर्वी न ऐकलेली या युद्धांविषयीची माहिती सांगितली.. आणि ‘युद्धस्य कथा रम्या !’.. ¬एवढाच काय तो आपला युद्धांशी संबंध.. अशी तीव्र कळ नंतरच्या प्रवासात तिथल्या थंडीपेक्षा जास्त बोचत राहिली. तिथल्या तिरंग्यापुढे नतमस्तक होताना नेमके काय वाटले ते शब्दात सांगणे अवघड. छायाचित्रणास परवानगी नसल्याने ते करता आले नाही.

येथे एक विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, जिथे कॅप्टन विक्रम बात्रांचा फोटो.. त्यांची शौर्यगाथा लिहिली आहे, त्याखाली एक जापानी म्हण लिहिली आहे..
’Death is lighter than a feather, duty is heavier than a mountain.’

लेहचे war memorial मात्र सगळ्यांसाठी खुलं आहे. तिथे छायाचित्रण करता येते. इथे १९९९ मधील युद्धात सीमेपलिकडील लोकांची ताब्यात घेतलेली शस्त्रास्त्रे, war log, वैयक्तीक नोंदवही.. असं बरंच काही इथे संग्रहीत आहे.

Pangong lake-
नितळ, आदिम, प्रशांत, निळंशार, समाधीस्त..
युगानुयुगे तपश्चर्या करणार्‍या एखाद्या ध्यानमग्न ऋषीसारखं. आपल्या अंगी विनम्रता आपसूक जागवणारं..
त्याच्याकडे नुसतं बघत रहावं.. आपलं असणं त्याच्या खिजगणतीतही नसावं.. त्याच्या शांततेवर एकही तरंग उठणार नाही याची काळजी घेत, हलकेच, परत फिरावं..
समुद्रसपाटीपासून १४,२७० फुटांवरील हे एकमेव खारं पाण्याचं सरोवर. याचा ७०% भाग चीनमधे आहे.

Khardung-La-
ऑक्टोबर.. लडाख मधील हिवाळ्याची सुरुवात आणि प्रवासी मौसमाची समाप्ती. त्याचा फायदा असा की १८,३८० फुटांवरील या रस्त्यावर आत्ता बर्फ आहे. ऐन उन्हाळ्यात असतोच असं नाही. Khardung-La हे दोन हजार वर्ष जुन्या चीन ते इस्तंबूल या silk route वर येते.
Commercial aircrafts उडतात त्याच्या अर्ध्याहून अधीक उंचीवर आपण असतो आणि हसावे की रडावे हे कळत नाही.. इथेही हलदीरामची आणि लेहर कुर्कुरेची रिकामी पाकिटे पडलेली होती.

Buddhist monasteries हा येथील नागरी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अकराव्या शतकातील दोन monasteries पाहिल्या..
सुंदर कॉमेंट्रीसह चाललेली क्रिकेटची मॅच पाहिली..
आमची स्थानिक व्यवस्था पाहणारा... मनय, याच्या मुळे लडाखी वेषात चाललेलं एक लग्न पहाता आलं..
लडाखी स्त्रीया खूपच स्वयंपूर्ण आणि आत्मविश्वासू आहेत हे पाहून मनस्वी आनंद झाला..
लष्कर आणि नागरिकांमध्ये येथे असलेला मैत्रीभाव जाणवला..

लडाख सध्या हिवाळ्याच्या तयारीला लागलंय. यात लष्करही आलं. त्यात महत्वाचे म्हणजे इंधन साठा. छोट्या पाड्यांवरील घरोघरी शेणगोळे साठवणे चालू आहे आणि लष्करासाठी २५-२५ पेट्रोल टॅंकर्सचे अनेक ताफे चाललेत. २५ ऑक्टोबर नंतर लेहमध्ये स्थानिकांव्यतिरिक्त बाहेरचं फारसं कोणी नसेल.

महत्वाचे-
येथे प्रवास करताना काही काळजी घेणे आवश्यक आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रवास सुरू करण्याच्या आधी एक दिवस Diamox ही गोळी सुरू करावी. अती उंचावरील हवेचा कमी दाब व त्यामुळे मिळणारा कमी प्राणवायू (acute mountain sickness) यासाठी हे आवश्यक आहे.
पहिल्या दिवशी trekking अजिबात करू नये. नंतर दर दिवशी थोडे-थोडे करून अंतर वाढवत जावे.

* Photos by Aashay
* All photos


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

जीना


वसंत बापट...... काल जन्मदिन.
स्वातंत्र्य सैनिक, प्राध्यापक, ’साधना’ साप्ताहिकाचे संपादक, राष्ट्र सेवा दलाच्या पथनाट्यांतून लोककलांची जोपासना करणारे वसंत बापट.

गीतकार बापट.... विषयांचे इंद्रधनुष्य पेलणारे.
‘गगन सदन तेजोमय’ अशी प्रार्थना करणारे बापट.
‘या पाण्याची ओढ भयानक’ हे आत्मघाती मार्गावरचे मनोगत सांगणारे बापट.
‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ ही स्फूर्ती देणारे बापट.
‘येशिल येशिल राणी, पहाटे पहाटे येशील’ असं अत्यंत लाडिक्पणे विचारणारे बापट.
‘छडी लागे छम छम’ चा बालवयीन खोडकरपणा जपणारे बापट.
‘लाल बत्‍ती हिरवी झाली, आली कोकण गाडी’ हे थेट आगगाडीच्या ठेक्यात लिहिणारे बापट.
‘अजून त्या झुडुपांच्या मागे’…. ‘देह मंदिर चित्‍त मंदिर’ .... ‘या बकुळीच्या झाडाखाली’ ....

आणि कवी वसंत बापट.


जीना....

कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शाळा


कितीतरी कित्‍ते शाळेत गिरवले असतील.
कितीतरी धडे शिकवले गेले असतील.
कित्‍ते गिरवण्याने अक्षराला वळण लागलं, हे खरं.
काही धडे फक्‍त समजले.. उमजले कधीच नाहीत.
पण ती शाळा होती आणि अभ्यास हा शब्द, 'पाठांतर' या शब्दाला समांतर जात होता.
लेखी, तोंडी परीक्षा करत शाळा संपली.

म्हणजे, फक्त तसं वाटलं.
शाळेतल्या बाईंची जागा अनुभवांनी घेतली आणि शाळा चालूच राहिली.
त्यातील काही धडे आपणहून, आवड म्हणून शिकले.
काही शिकवले गेले, शिकावेच लागले.
काही मात्र कितीवेळा शिकवले गेले तरी डोक्यात शिरतच नाहीत.
जसा २९ चा पाढा.

शाळेनंतरच्या प्रवासात मला वळण लावणार्‍या,
माझी सतत ’शाळा’ घेणार्‍या माझ्या अनुभवांचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी खास आभार.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS