Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

जित्या गळ्याचा माणूस


( हा लेख सुप्रसिद्ध मराठी भावगीत गायक श्री. अरुण दाते यांच्या ‘शुक्रतारा’ या आत्मचरित्रात प्रसिद्ध झालेला आहे.
शब्दांकन - सुलभा तेरणीकर : मोरया प्रकाशन, पुणे : प्रथम आवृत्ती - ४ मे २०१६ )

थोर कलाकारांभोवती नेहमीच उत्सुकतेचे वलय असते. या कुतूहलाचे निवारण वेळोवेळी, त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर- त्याच्यांवरील लेखांमधून, त्यांच्या मुलाखतींमधून होत जातं. पण काही माणसं अशी असतात की त्यांना कितीही जाणून घेतलं तरी अजून काही जाणणं दशांगुळे उरतंच. ‘अरुण दाते’ या कलाकार आणि व्यक्तिमत्त्व, अशा दोन्ही अर्थाने टोलेजंग माणसाविषयी नेमकं हेच म्हणता येईल.

तब्बल सहा दशकांची सांगीतिक कारकीर्द, २६०० हून अधिक, फक्त स्वतः गायलेल्या गाण्यांचे जगभर केलेले कार्यक्रम.. यामुळे रसिकांचा प्रचंड आदर, प्रेम ‘याचि देही याचि डोळा’ बघण्याचे भाग्य अरुणजींना लाभले आहे. जी. एन्‌. जोशी, बबनराव नावडीकर, गजाननराव वाटवे यांनी घालून दिलेल्या पायावर मराठी भावगीत परंपरेची उत्तुंग इमारत अरुणजींनी उभारली. या इमारतीस जवळपास पाच पिढ्यांचे मजले आहेत. या मजल्यांमधून अरुणजींनी गायलेल्या गीतांचं प्रसन्‍न वारं झुळझुळत असतं. त्या वार्‍याला काळाचा शिळेपणा अजिबात शिवलेला नाही, शिवूच शकत नाही. कुणीही रसिकाने येथे आश्रयास यावं. या वार्‍याची एक लहर अंगावर घ्यावी आणि ताजंतवानं होऊन जावं.

अरुणजींनी ही भावगीते जनसामान्यांपर्यंत नेऊन पोचवली. ती रसिकांच्या मनांना भिडली, हृदयांवर राज्य करू लागली. आज देखील आकाशवाणीच्या ‘आपली आवड’ सारख्या कार्यक्रमात दाते साहेबांचं गाणं वाजलं नाही असा दिवस विरळाच असेल. बोजड नसलेले शब्द, वेधक चाली आणि त्यावरचा कळस असलेला अरुणजींचा मार्दवपूर्ण आवाज, शैली.. खानदानी शालीनतेचा साज ही गीते गेली ६० वर्षे मिरवीत आहेत.
याला समांतर आणि अरुणजींच्या समकालीन उदाहरण गझल गायक जगजीत सिंह यांचं देता येईल. जगजीतजींच्या आधी आणि त्याच वेळेस अनेक गायक उर्दू गझल गात असत. पण जगजीतजींनी गझलेला रसिकांच्या मनांत रुजवलं आणि गळ्यावर चढवलं.

१९६२ च्या सुमारास अरुणजी त्यांचं पहिलं मराठी भावगीत ‘शुक्रतारा मंदवारा’ गायले. शुक्र ग्रह अवकाशात कधी जन्माला आला माहित नाही पण पाडगांवकर-खळे-दाते या त्रयीच्या ‘शुक्रतारा’ने जन्म घेतला आणि तेव्हापासून ही ‘शुक्राची चांदणी’ मराठी भावसंगीताच्या अवकाशातलं आपलं अढळ स्थान राखून आहे. ‘भारलेल्या या स्वरांनी’ रसिकांचा जन्‍म भारला गेला तो कायमचाच.

‘हात तुझा हातातुन’, ‘पहिलीच भेट झाली’, ‘येशिल येशिल राणी’, ‘श्रीरंस सांवळा तू, मी गौरकाय राधा’, ‘मज सांग सखे तू सांग मला’ सारख्या गाण्यांनी प्रेमाची परिभाषा निर्माण केली. ‘सच्ची मुहब्बत’चे तरल स्वर- मृदू, संयत आवाजात रसिकांपर्यंत पोहोचू लागले.

पण हा आवाज फक्त प्रेमतरंगांवर लहरत राहिला, असं नाही. ‘भातुकलीच्या खेळा’मधली तडप, ‘वाळवंटातून भीषण वैराण’ मधला अंगावर येणारा एकटेपणा, ‘धुके दाटलेले’ मधले औदासिन्य, ‘या जन्मावर या जगण्यावर’ मधली जिंदादिली, ‘असेन मी नसेन मी’ मधली शाश्वतता, ‘सोबती’ चित्रपटतील ‘देवाघरच्या फुलातली’ असहय्यता, ‘डोळ्यांत सांजवेळी’ मधला समजूतदारपणा, ‘अखेरचे येतील माझ्या’ मधली फकिरी, ‘जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌’ मधलं लावण्य (पाडगांवकरांनी खास अरुणजींच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी लिहिलेला हा ‘लावणा’).... हे सर्व अरुणजींनी आपल्यापर्यंत तितक्याच दृढतेने पोचवलं.

मराठी भावसंगीतावर त्यांनी उमटवलेला ठसा, इतका ठळक आणि खोल आहे की जणु ‘मराठी भावगीत’ आणि ‘अरुण दाते’ हे समानार्थी शब्द व्हावेत. मी हे धाडशी विधान करण्याचं कारणही तसंच आहे. त्याचं झालं असं, स्‍नेहासिस चॅटर्जी नावाचे माझे एक बंगाली मित्र आहेत. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर त्यांनी खूप आभ्यास, लेखन केलं आहे. लताबाईंच्या मराठी गाण्यांसाठी त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. आमच्या अनेकवेळा चर्चा झाल्या. स्वाभाविकपणे दिदींच्या भावगीतांचा उल्लेख आला. तेव्हा स्‍नेहासिस म्हणाले होते.... "भावगीत तो वहीं होता हैं ना जो अरुण दातेजी गाते हैं।"

कवी सुधीर मोघे हे मला गुरुस्थानी. त्यांच्याकडे गेले की हा एक प्रश्न नेहमी चर्चेत असायचा. ‘गाणं नेमकं कोणाचं ? संगीतकाराचं की गायकाचं ?’ इथे ‘चर्चा’ किंवा ‘गप्पा’ म्हणणं खरं तर अवघड अशासाठी- की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे.
त्यांच्या मते गाणं- हे त्याच्या अंतीम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भुमिकांबद्द्लची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. कधी एकाच्या बाजूने पारडं जड तर कधी दुसर्‍याच्या. (खरं तर ते स्वत: कवी / गीतकार / संगीतकार. पण व्यक्तीश: त्यांच्यासाठी एकदा कविता कागदावर उतरली की ती तिच्या मार्गाने, तिच्या नशिबाने जाते आणि कवी त्याच्या.)

मी त्यांना एकदा म्हंटलेलं, ‘गायक’ हा त्या गाण्याचा प्रवक्ता किंवा चेहरा असतो. म्हणून जर गीताच्या शब्दरचनेविषयी किंवा चालीविषयी बोललं जात नसेल तर उरलेला पूर्णवेळ गाणं हे (लौकिक अर्थाने) गायकाचं असतं. याची पुष्टी म्हणून आज मला हे एक उदाहरण देता येईल. ‘संगदिल’ या हिंदी चित्रपटात ‘दिल में समा गयें सजन’ असं एक गाणं आहे. त्याच्या वजनावर, मराठीतल्या एका वेगळ्या छंदात, गंगाधर महाम्बरे यांनी एक गीत लिहिलं आणि त्याला हृदयनाथांनी चाल लावली. ‘संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी..’ जेव्हा कधी या गाण्याच्या इतिसासात, खोलात जाण्याची वेळ येते तेव्हाच या तपशीलाचं महत्त्व. अन्यथा आपल्यासाठी ते फक्त अरुण दातेंचं गाणं असतं.
दाते साहेबांनी, त्यांनी गायलेल्या सर्व गाण्यांना असं सर्वाथाने आपलं करून घेतलं आहे.

जाताजाता अरुणजींच्या नावावर नसलेल्या तीन गाण्यांचा मला मुद्दामहून उल्लेख करायचा आहे. ’काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही’,’पाऊस कधीचा पडतो’ आणि ‘उष:क्काल होता होता’. ही गाणी अरुणजींच्याही आवाजात ऐकता येतात. त्या गाण्याचे प्रचलित गायक आणि अरुणजींसारख्या सिद्धहस्त गायकाने केलेला त्यांचा आविष्कार, हे दोन्ही पाठोपाठ ऐकण्याचा आनंद काही वेगळा आहे.

आणि त्यांच्या दोन युगुलगीतांच्या ध्वनीमुद्रीत स्वरुपाच्या शोधात मी बरेच वर्षे आहे. दोन्ही गीते शांताबाई शेळके यांची आहेत आणि सहगायिका आहेत कुंदा बोकिल. ‘हा मंद मंद वारा ही धुंद रातराणी, आले तुझ्या स्मृतीने डोळ्यांत आज पाणी’ आणि ‘जे सत्य मानले मी आभास तो ठरावा, दोघांतला कसा हा साहू अता दुरवा’. पूर्वी कधीतरी आकाशवाणीवर ऐकलेली ही गाणी. आज इतक्या वर्षांनी देखील त्यांचे शब्द नजरेसमोर आले तर स्वर मनात रुंजी घालू लागतात.

असा हा ‘जित्या गळ्याचा माणूस’. कविवर्य मंगेश पाडगांवकर उगीच त्याला गर्दीत आणि कोलाहलात शोधत होते. तो खरं तर त्यांना केव्हाच सापडला होता.. तो त्यांचीच गाणी गात गेली कित्येक वर्षे रसिकरंजन करतो आहे.

{ कोलाहलात सार्‍या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
..
काळ्या उभ्या तिजोऱ्या गाणे खरीदणाऱ्या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी
..
-मंगेश पाडगांवकर
}

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

'यमक'श्री गदिमा


"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळावर आज मितीस उपलब्द्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्‍त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक' हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर 'यमक' हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं 'त्या तिथे, पलीकडे... झाड एक वाकडे' किंवा 'घननिळा लडिवाळा' सारखं अनेक वेळा उद्‌धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू...

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू...

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका'तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र' रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्‍त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव’ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि ’व’चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता...
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण' हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा... प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा.... सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS