Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

प्रेरणा

आज लहानपणीची शाळा आठवायचं कारण म्हणजे अर्थातच आजचा शिक्षक दिन.

आमच्या नाशिकच्या शाळेची दगडी इमारत लवकरच १०० वर्षांची होईल. 'गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल' किंवा 'शासकीय कन्या शाळा असं अत्यंत रूक्ष नाव असण्यार्‍या या शाळेने, सांगून होणारे 'शिक्षण' तर दिलेच पण न सांगता होणारे संस्कार जास्त दिले.

पूर्वी एकदा मी शाळेनंतरच्या आयुष्यात, माझी शाळा घेणार्‍या, माझ्या अनुभवांविषयी लिहिलं होतं.
कारण आता 'अभ्यास' या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट आणि नेमका समजायला लागला आहे. 'धडे' पाठ्यपुस्तकांतून निघून जीवनाचे झाले आहेत. 'शिस्त' शब्दाने मनाच्या नियमनाची वाट धरली आहे.
तरी या सगळ्याची पायाभरणी शाळेत सुरू झाली, हे तर नक्कीच.

आमच्या शाळेत प्रार्थनेचा तास घड्याळ लावून एक तासाचा असायचा. अगदी सविस्तर.
मग ४५ मिनिटांचे इतर विषयांचे ८ ते ९ तास.

विषयांच्या तासांनी पुढे जाऊन मूल्यार्जनाची दिशा ठरवली. पण प्रार्थनेच्या तासाने जीवनातल्या मूल्यांची नीव ठेवली.

प्रार्थनेच्या तासाची सुरूवात राष्ट्र्गीत मग लगेचच 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत....' अशी प्रतिज्ञा घेऊन व्हायची. पुढे त्यात बरंच काही होतं.

आमची त्या तासात दर शनिवारी गायच्या समरगीतांची चांगली शंभर पानी वही होती. समूहस्वरात ही पदं त्या बालवयात म्हंटल्याने येणारी राष्ट्रभावना फार खोलवर रुजली. 'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते..', 'भास्वर तुज सम भास्वर..',... सारखी अनेक अनवट समरगीतं, प्रेरणागीतं अजूनही तोंडपाठ आहेत. यातली काही आम्हाला शिकवायला तर स्वत: वसंत देसाई आले होते. याच पदांनी 'आठवणीतली गाणी'चा स्फूर्तीगीतांचा विभाग समृद्ध केला.

साने गुरुजींची 'भारतीय संस्कृती' याच तासात भेटली. गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय संपूर्ण शाळेने एकत्र म्हणताना गुरुकुल संस्कृतीतील मंत्र पठणाचा अनुभव घेतला. हे किंवा यासरखे काही ना काही प्रत्येकाच्याच शाळेत असते.

पण आमच्या शाळेत प्रार्थनेच्या तासाला एक अशी गोष्ट करण्यात यायची की जिच्या वेगळेपणाची आणि असामान्य असण्याची जाणीव तेव्हाही होती आणि आजही आहे.

पद्धत अशी होती की प्रार्थनास्थळास जाण्यासाठी वर्गातून निघताना जेव्हा एका रांगेत आम्ही सगळ्या मुली उभ्या राहायचो, तेव्हा आम्हाला प्रत्येकीला विचारण्यात यायचं की, तू डबा घेऊन आली आहेस का?
कधी कुणी डबा आणायचं विसरतं, किंवा डबा घेऊन न येऊ शकण्याचं दुसरं कुठलंही कारण असू शकेल..
हे विचारण्याची जबाबदारी रोज पटसंख्येप्रमाणे फिरती असायची. मग त्या मुलीने वर्गातल्या फळ्यावर उजव्या कोपर्‍यात लिहून ठेवायचे- वर्गाच्या पटावर किती, त्यापैकी आज हजर किती आणि त्यातील किती जणींनी डबा आणलेला नाही.

हे अशासाठी की, सगळ्या वर्गाच्या हे दिवसभर लक्षात रहावं, आज आपल्या किती वर्गमैत्रिणी उपाशी राहाण्याची शक्यता आहे.
जेवणाच्या सुट्टीला सगळा वर्ग मोठ्ठा गोल करून एकत्र जेवायला बसायचा. शाळेला तीन भली मोठ्ठी पटांगणे असल्याने ते शक्य होतं. त्यावेळेस सकाळची ती मुलगी, जितक्या मुलींकडे डबा नाही तितक्या ताटल्या घेऊन वर्गाच्या गोलात फिरणार. प्रत्येक मुलीने त्यात आपल्या डब्यातल्या फक्त एक घास, प्रत्येक थाळीत ठेवायचा. या नियमामुळे डबा आणलेल्या मुलींना फक्त दोन-तीन घास कमी मिळायचे पण न आणलेल्या मुलींसाठी ते पन्‍नास-साठ घास पोटभर असायचे.

'एक तीळ सात जणांनी वाटून खावा.' हे फळ्यावर लिहिण्याचं केवळ एक सुभाषित झालं.
पण (शब्दश:) वाटून खाण्याची प्रथा, हे संस्कार झाले.
हे संस्कार माझ्यासाठी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर दिशादर्शक ठरले.
'आठवणीतली गाणी'ची काही अत्यंत मोजकी प्रेरणास्थाने आहेत त्यात आमच्या शाळेचे स्थान फार वरचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षकदिनी आदरपूर्वक वंदन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मी वाजवीन मुरली

यापूर्वी मी या घटनेचा उल्लेख केला आहे पण आज त्याच घटनेच्या तर्कसंगतीपर्यंत पोचणे आणि त्या पलीकडेही थोडं,.... असं काही घडल्याने, पुन्हा एकदा सुधीर मोघे.
आणि वसंत पवार.
आणि आता गदिमाही.

सुधीरजींशी ओळख झाली तेव्हाच केव्हातरी त्यांनी मला एका गाण्याच्या पहिल्या काही ओळी ऐकवल्या होत्या. गाणं खूप जुनं होतं. 'मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका…'

मी ते पहिल्यांदाच ऐकत होते. ते म्हणाले, " १९५३ सालच्या 'अबोली' चित्रपटात आहे. संगीतकार आहेत वसंत पवार. लक्ष देऊन ऐक. ह्या गाण्याची चाल हुबेहूब १९६० सालच्या 'अवघाचि संसार'मधील 'रूपास भाळलो मी…'ची आहे. दोन्ही चित्रपटांचे संगीत वसंत पवारांचेच असल्याने बाकी प्रश्न उद्भवत नाहीत. पण का एका संगीतकाराला आपलीच चाल अशी काही वर्षांनी परत वापरावी असं वाटलं असेल ?"

मला त्यांच्या कवितांविषयीचे त्यांचे मत माहीत होते. त्यांना वाटे, एका उर्मीतून जन्माला आलेली कविता अथवा गीतरचना, तशीच्या तशीच असू द्यावी. त्यात नंतर काही बदल करू नयेत. तसे बदल करायला त्यांचा विरोध असायचा. अगदी एखाद्या संगीतकाराने काही कारणाने त्यांना विनंती केली तरीही. एकदा निर्मिती झाली की तिला तिच्या नशिबावर सोडून कवीने पुढे जावं, असं त्यांना वाटे. त्यामुळे हे चाल परत वापरण्याचे त्यांना खूपच आश्चर्य वाटत होते.
मी म्हंटलं, "पवारांना, या चालीला म्हणावा तितका न्याय मिळाला नाही, असं वाटलं असेल. आणि 'रूपास भाळलो मी… 'चे रसिकांच्या मनातील स्थान पाहता, ही शक्यता अधिक वाटते."
"असेल कदाचित.", सुधीरजी म्हणाले.

या संभाषणामुळे "मी वाजवीन मुरली…'चे कुतुहल मात्र कायम जागृत राहिलं. पुढे त्याची संपूर्ण ध्वनीफित मिळाली आणि ते 'आठवणीतली गाणी'वर पोचलं.

गेल्या आठवड्यात 'अबोली' चित्रपटातील गीतांची चित्रफित यूट्यूबर बघायला मिळाली. त्याच चित्रपटात अजून एक गाणं  आहे. 'रिमझिम करी बरसात, मेघा" हे पं. सुरेश हळदणकर यांनी गायले आहे. त्यांचे सूर जणू या गाण्यात नुसते रिमझिम बरसत नाहीत तर कोसळून आपल्याला आनंदाने चिंब भिजवतात…. पण पडद्यावर चित्रपटाचा नायक मात्र बाथ टबमध्ये बसून शॉवरच्या धारांकडे बघून हे गाणं गाताना दिसतो. थोडक्यात गीताचे शब्द आणि चित्रिकरणाचा फारसा ताळमेळ नाही.
वसंत पवारांचे या चित्रपटाचं संगीत दुर्लक्षित राहिलं, असं परत एकदा वाटून गेलं.

यानिमित्ताने गेले काही वर्ष जितक्या वेळा 'मी वाजवीन…' ऐकलं, तितक्या वेळा या गीताच्या शेवटच्या कडव्यातील शब्दांनी माझं लक्ष न चुकता वेधून घेतलं. शब्द गदिमांचे आहेत.

गदिमा हे गीतकार आणि कवी यातली सीमारेषा पार मिटवून टाकतात. त्यांच्या गीतरचनांमधील काव्य, यावर पुष्कळ काही लिहिता येईल. तसंच त्यांनी लिहिलेलं एखादं चित्रपट गीत 'संतवाणी'ची उंची गाठतं.

राधाकृष्णाचे प्रेम, हा मध्यवर्ती विषय असलेले हे गीत, त्याच्या शेवटच्या कडव्यात वेगळं वळण घेते. हा चित्रपट सामाजिक असल्याने गीतातील 'राधा' आणि 'कृष्ण' ही अर्थातच रूपकं आहेत.

कृष्ण राधेला म्हणतो,
मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा

या गीतरचनेत कृष्ण, त्यांच्या दोघांच्या प्रेमाला 'माया' असं म्हणतो.
खरं तर दोघं कालिंदीच्या तीरी आहेत. कदंब वृक्ष आहे. वाळूत काढलेलल्या रेघा आहे. ती दोघंच आहेत. तीसरं कुणीही नाही.  तरी तो राधेला म्हणतो,  'माया' तुझी नि माझी…
कालिंदीचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, तिसरे न तेथ कोणी
माया तुझी नि माझी सांगू नकोस लोकां !

पुढे जाऊन कृष्ण राधेला म्हणतो, जरी आपण आत्ता प्रेमिक असलो तरी-
मायेत याच दोघे, ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे, होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का?

हे जे आपले प्रेम आहे राधे,…
आणि प्रेम म्हणजे जर एकमेकांत जीव अडकणे आहे….
तर जन्मांतरीच्या फेर्‍यात आपण कुठल्याही नात्याने समोर आलो, तरी ते तसंच राहील.
कधी माय-लेक असू, कधी बहिण-भाऊ, कधी प्रियकर-प्रेयसी…
कधी सखा-सखी तर कधी गुरू-शिष्य किंवा अजून काहीही.

राधा-कृष्ण यांच्या प्रचलित प्रेमसंबंधाच्या कल्पनेला, फक्त तीन ओळीत, पार उधळून लावत गदिमांनी त्याला खोल आणि व्यापक संदर्भ दिला आहे.

माया तीच आणि तेवढीच…. नात्याचं रूप काहीही असो !
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का ?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

दृष्टिकोन

काही लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेल्या कलाकृतींबद्दल माझं ’जरा वेगळं मत आहे’, असं 'politically correct' म्हणू की ’त्या मला फारशा आवडत नाहीत’ इतकं सौम्य म्हणू की ’त्यांच्यामुळे माझी चिडचिड होते’ असं बेधडक म्हणू? - हा मोठा गहन प्रश्न मला पडला आहे. पण याकडे केवळ एक वैयक्तिक दृष्टीकोन म्हणून पहावे.
ज्या दोन गझलांचा मी उल्लेख करणार आहे, त्यांची ख्याती सर्वदूर आहे.

या उर्दू शेराने एका प्रसिद्ध गझलेची सुरुवात होते. गायक हा सरतेशेवटी गाण्याचा चेहरा होत असल्याने ही गझल श्री. जगजीत सींह यांची आहे.
शेर कसा गायला ह्या विषयी नाही तर त्याच्या विषयाशी मी असहमत असल्याने त्याचे रचियता ’इब्न-ए-इंशा’ या शायरचा मला उल्लेख करावा लागेल. त्यांचं नाव सहसा कुणाला माहिती नसावं.
कारण ’कल चौदहवीं की रात थी’ ही गझल जगजीतजींचीच.

कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा ।
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहा चेहरा तेरा ।

आठ-दहा पुरुषांनी हातात ’साकी’ने भरलेला ’जाम’ घेऊन एका स्‍त्रीच्या शरीर सौंदर्याची चर्चा करत, मयखान्यात रात्र काढावी, हे मला फार भयानक वाटतं. त्या माणसांच्या रिकामटेकडेपणाची हद्द वाटते व त्या कुणा सौंदर्यवतीचे दुर्दैव. अलीकडच्या भाषेत ह्या वागण्याला ’sexist’ आहे असं म्हणतात किंवा हे 'objectification' आहे, असं म्हणतात. त्या कुणा सुंदरीला अशी चर्चा होणे नुसते आवडणारच नाही तर तिला तिचा हा सन्मान वाटेल, हा पुरुषी अहंकार या शेरात आहे. पुढे जाऊन जेव्हा..

हम भी वहीं मौजूद थे, हम से भी सब पूछा किए,
हम हँस दिए, हम चुप रहे....

यानंतर मी पूर्णत: disconnect होते.
मुळातून हे माझे इतके टोकाचे मत असताना, एखाद्या गाण्याच्या मैफलीत माझ्या आजूबाजूस बसलेले स्त्री-पुरुष, ही गझल सादर व्हायला लागली की, "वाह, वाह !" करायला लागतात. मग ही दाद त्या गायकाच्या गाण्याला आहे की या शेरात वर्णन केलेल्या वातावरणाला, हे मला कळत नाही आणि मी तिथून सरळ काढता पाय घेते.

दुसरी आहे ती ’अहमद फ़राज़” या गझलकाराची ’रंजिश ही सही”. मेहदी हसन साहेबांनी तिला अजरामर करून ठेवली आहे. त्यांचं भावपूर्ण सादरीकरण इतकं मनास भिडतं की (मला) गझलेचे शब्द अजिबात आवडत नसताना सुद्धा सूर मनात रुंजी घालत रहातात. दिवसभर पाठलाग करतात.

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ

कुछ तो मिरे पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिए आ

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिर्या से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-ख़ुश-फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शमएँ भी बुझाने के लिए आ

ही पुन: एक स्वकेंद्रित रचना. स्वत:पुढे काहीच नाही. 'मला परत सोडून जाण्यासाठी ये.’, ’माझी समजूत काढायला ये.’, ’समाज-रीत पाळण्यासाठी ये.’, ’लोक काय म्हणतील म्हणून ये.’, ’मला परत एकदा रडवायला ये.’, पण ये....

ही प्रेयसी नुसती नाराज होऊन गेलेली नाही तर ती नाराज होऊन, सोडून गेली आहे. ही break-up situation आहे. त्यामुळे ही गझल फक्त कवितेच्याच मर्यादेत रहावी. प्रत्यक्षात असे मागे लागणे चीड आणू शकते. जिथे स्त्रियांच्या ’नाही’ म्हणण्याचा मान ठेवा, असे शिकवण्याची गरज आहे, तिथे हा हात धुवून मागे लागण्याचा सोहळा फार विरोधाभास निर्माण करतो.

पण या गझलेकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनापेक्षाही नुकतीच ती एका अशा अर्थाने माझ्यासमोर अचानकपणे आली की मी अक्षरश: स्तब्ध झाले. हातातले काम हातातच राहिले. हा नजरिया फार वेगळा होता. दूरचित्रवाणीवरील ’दोन स्पेशल’ कार्यक्रमात जितेंद्र जोशी मुलाखत घेत होते. समोर शुभांगी गोखले बसल्या होत्या. विषय त्यांचे दिवंगत पती मोहन गोखले यांचा चालला होता. तेव्हा शुभांगीताईंना अश्रू अनावर झाले आणि त्या म्हणाल्या,
"मोहन फार लवकर गेला. मला कधी कधी असं वाटतं की त्याला सांगावं, आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, रंजिश ही सही ...."


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विनवित मेघा तुला


आषाढ मासारंभ झाला की रसिकजनांचा 'आषाढ दर्द' जागा होतो.
हुरहुर, विरह, ओल्या सर्द हवेची न सोसणारी जडता, कवी शंकर रामाणींनी वर्णन केलेले डोळ्यांतले 'मूढ पाणी'.... आणि मेघदूत.
या आषाढ प्रतिपदेलाही अशीच कुणाचीतरी एक हळवी स्मृती जागी झाली आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या कुणी फारसं न ऐकलेल्या एका गाण्याने सोशल मिडिआचे जग व्यापून गेले.

'आठवणीतली गाणी'- ही आता केवळ 'एक संकेतस्थळ' म्हणण्याइतकी रूक्ष जागा राहिलेली नाहीये. असंख्य दर्दीजनांशी तिची भावनिक नाळ जोडली गेली असल्याने, माझ्याकडे या गाण्याची ध्वनिफीत लगेच पोचली. 'हे ऐक. वेगळं आणि चांगलं आहे. बाकी सगळं सोड आणि याच्या खोलात जा.' असं मला हक्काने सांगितलं गेलं.
आणि मग सुरू झालेला शोध....

आषाढाच्या पहिल्या दिवशी
अवचित दिसशी मला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू, तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

प्रिया दूर मम, तिला भेटशी
मनी वाटते, नाही न म्हणशील
विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो,
सांगुनी नंतर निरोप कथितो
दूत होवुनी पोचीव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

या पदाचे गायक अभिषेकीबुवा असल्याने शौनकजींशी सगळ्यात पहिला संपर्क केला. ते फार तत्परतेने माहिती देतात. त्यांनी सांगितले, हे गीत 'गीत-मेघ' (अनुवादित 'मेघदूत') या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी तयार केले गेले होते.

त्यांच्याशी संपर्क करत असताना एकीकडे माझा इंटरनेटवर शोध सुरू होताच.
फक्त एका लेखात या गीताचा संदर्भ मिळाला. लेख श्री. अरुण काकतकर यांनी २०१२ मधे लिहिला होता. लेखाचं नाव होतं 'पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं'.
त्यांना फोन केला. ते म्हणाले, "दूरदर्शनवरील ह्या रूपकाचा प्रस्तुतकर्ता मीच होतो. यात एकूण सात गाणी होती. दोन बुवांची, दोन रामदास कामतांची, आणिक काही. निवेदन ज्योत्‍स्‍ना किरपेकर यांनी केले होते. दूरदर्शनकडे या कार्यक्रमाची चित्रफित आता नाही. पण माझ्याकडे ती सगळी गाणी आहेत. ती मी देईन."
न राहून शेवटी मी विचारलंच, "मला यातली एक ओळ अडली आहे. त्यातील शब्दांचे अर्थ मला माहिती आहेत. पण 'मेघदूत'चा माझा काही आभ्यास नाही. म्हणून संदर्भ लागत नाहीये."
त्यांनी लगेच सांगितले, मी हा प्रश्न डॉ. वसंतराव पटवर्धन (महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष) यांना विचारावा. ते या पदाचे रचियता आहेत. आणि मेघदूताचे हे भाषांतरही त्यांनीच केले आहे. हा त्यांचा फोन नंबर.

आज सकाळी वसंतरावांशी बोलणे झाले. त्यांना विचारले,
"मी, 'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला' इथे अडले आहे. 'बरवी' म्हणजे चांगली. 'शठ' म्हणजे लुच्चा. पण संदर्भ लागत नाहीये."
ते म्हणाले, " 'मेघदूता'ची मराठीत सी. डी. देशमुखांसकट २६ जणांनी भाषांतरे केली आहेत. त्यातलं माझं- 'विनवित मेघा तुला' या नावाने आहे. हे पुस्तक आता उपलब्द्ध नाही. पण मी त्याची फोटोप्रत करून तुला देतो. ही ओळ ज्या संदर्भात येते, त्या मेघदूतातल्या ओळी अशा ..

(तेनार्थित्वं त्वयि विधिवशादूरबन्‍धुर्गतो हं)
याण्‍चा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्ध्कामा ॥

(मी दुर्दैवाने माझ्या स्वजनांपासून दूर असल्याने तुलाच विनंती करतो. आणि कसं आहे,..)
एकवेळ सुजनांना केलेली विनंती 'विफल' झाली तरी चालेल, पण एका 'शठा'ला केलेली विनवणी 'सफल' होणे नको.
'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला'

ही अशी गाणी, त्यांबद्दलची सर्व माहिती देणारे असे हे सुहृद - मान्यवर, 'आठवणीतली गाणी'स अधिक श्रीमंत करतात.
ज्यांनी माझ्यापर्यंत हे गाणे पोचवले ते सर्व, श्री. शौनक अभिषेकी, श्री. अरुण काकतकर (वय वर्षे ७५) आणि डॉ. वसंतराव पटवर्धन (वय वर्षे ९२) यांच्या ऋणात मी व्यक्तीश: आहे.

टीप : हे पद ऐकण्यासाठी 'आठवणीतली गाणी'वर उपलब्द्ध आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS