Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

निमित्त आणि नेम


जरी निमित्त 'आठवणीतल्या गाणी'वर नुकत्याच समाविष्ट केलेल्या ३२ गाण्याचं आहे...
तरी असे विचार आणि असा आचार माझ्यासाठी नित्यनेमाचा..........

(संदर्भ- आठवणीतली गाणी / नवीन भर / १३ डिसें. २०१८)

• विदुषी प्रभाताई अत्रे यांनी संगीत दिलेले आणि गायलेले 'दारी उभी अशी मी..' हे गझलेच्या अंगाने जाणारे पद आहे. तब्बल १० मिनिटांची एक दर्दभरी शिकायत प्रभाताई आपल्या समोर मांडतात. ऐकताना वाटलं, हे आचंबित करणारे शब्द कोणाचे असावेत?...
सुरेश भटांची झलक दिसते आहे खरी. त्यांच्या ’मी एकटीच माझी असते कधी कधी..’च्या वळणानं जाणारी रचना.., पण.. नाही, ते नसावेत. भट गाठतात त्या भावनिक उत्कटतेच्या हे थोडं खाली आहे....
मग विंदा? त्यांनी पण एका कवितेत म्हंटलंय, 'स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले.'.. नक्की कळत नाही.
अतींद्र सर्वाडिकर या प्रभाताईंच्या शिष्याकडे धाव घेतली आणि कळलं गीताचे शब्द अशोकजी परांजपे यांचे आहेत. अशोकजी परांजपे तसे दुर्लक्षितच राहिलेले!..........

• पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला श्री संत नामदेवांचा अभंग 'सगुण संपन्‍न पंढरीच्या राया’. शौनक अभिषेकींचा सहस्वर. अभंग भिन्‍न षड्‌ज रागात आहे. हा राग म्हंटला की उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ां साहेब यांच्या 'याद पिया की आए..' या ठुमरीच्या आठवणीची कळ तर उरी येणारच...............

• गदिमांचं अगदी साधं आणि निरागस गाणं- 'आवडला मज मनापसुनी गडी तो घोड्यावरचा..' यात एक ओळ आहे- 'बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा..'
आता हे 'शिनवे' म्हणजे काय? जवळचे सगळे मराठी, संस्कृत शब्दकोश धुंडाळले. इंटरनेट खंगाळलं. व्यर्थ.
मग सुमित्र माडगूळकरला हाक. त्यानेही ताबडतोब योग्य व्यक्तींमार्फत भाषातज्ञ डॉ. सयाजीराव मोकाशी यांच्यापर्यंत पोचावं आणि काही मिनिटातच 'शिनं' या माणदेशी शब्दाचा संपूर्ण अर्थ उलगडणारं सयाजीरावांच्या आवाजातलं फोनवरील रेकॉर्डींग whatsapp करावं.
आपणही गदिमांनी वापरलेल्या हटके शब्दांच्या सुयोग्य वापराने स्तिमित होऊन जावं............

• 'भातुकली उधळली अचानक..' सुमनताई कल्याणपूर यांच्या आवाजातलं हे गाणं... त्यांनी पार्श्वगायन केलेल्या त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमातलं. चित्रपट 'दिसतं तसं नसतं'. साल १९५६. बाईंच्या गाण्यातला दर्द खानदानी आहे. संयत आहे तरी खोल आहे. असाच दर्द त्यांनी 'बोलकी बाहुली' मधल्या 'आठवे अजुनी यमुनातीर..' मध्ये दाखवला आहे. या गाण्यातली 'सौख्य छळे मज......' ही ओळ लक्ष देऊन ऐकावी. गाण्यातून अभिनय केलाय सुमनताईंनी...............

• 'हे राष्ट्ररूपिणी गंगे! घेईं नमस्कार माझा.' या आनंदराव टेकाडेंच्या कवितेच्या शोधात मी गेली वर्षभर होते. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात असताना, पुणे मराठी ग्रंथालयाला फोन केला. सांगितलं, माझ्याकडच्या आनंदरावांच्या 'आनंद गीते'च्या पहिल्या भागात ही कविता नाहीये. तर तुमच्याकडे भाग २, ३, ४ आहेत का? मला संदर्भासाठी चाळता येतील का? नारायण पेठ, लोखंडी तालीम या त्यांच्या पत्त्यावर पोचायच्या आधीच तिथल्या वाचन विभागात ही पुस्तके तयार होती. पान-पान पिवळं-जीर्ण झालेल्या त्या पुस्तकांतील भाग ३ मध्ये ही कविता मिळाली. ग्रंथालयाच्या परवानगीने त्या पानाचा फोटो काढला. वर त्यांनी हेही सांगितले, अशा संदर्भांकरिता कधीही भेट द्या.
आकाशवाणीवरून स्फूर्तीगीतांच्या कार्यक्रमात ही कविता अनेक वेळा सादर होते........

• 'प्रियकर:' हे संस्कृत गाणं, दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'YZ' या मराठी सिनेमातलं आहे. केतकी माटेगावकरच्या स्पष्ट उच्चारांनी आणि नादमधूर गायनाने लक्ष वेधून घेतलेलं. पण हे संस्कृत श्लोक कुठून घेतले आहेत.... ते जसेच्या तसे घेतले गेलेत की त्यात काही बदल केलेत?..... शोधयात्रा संपल्यावर वाटलं, आपल्या जे समजलं आहे ते समस्तांस कळवण्याची तातडी करावी, हे बरं.
जसं, 'तोच चंद्रमा नभात..' हे शान्ताबाईंनी एका संस्कृत श्लोकावरून घेतलं आहे, असं सगळे म्हणतात. पण आपण शीला भट्टारिका यांचा तो श्लोक शोधून काढून 'आठवणीतली गाणी'वर उपलब्ध करून दिलाय, तसं......

• तीन महिन्यांपूर्वीचं बाबांचं जीवघेणं आजारपण... खरोखरीच त्यांचा जीव घेऊन गेलं. ICU च्या बाहेर १२-१३ दिवस बसून राहणे. अनिश्चितता. कासावीस. पण हातात केशवराव भोळ्यांचं त्यांचा सांगीतिक दृष्टीकोन विषद करणारं पुस्तक. का कुणास ठाऊक, त्याचा पण कोण आधार वाटला... त्यातूनच 'आठवणीतली गाणी' करता चार-पाच संदर्भ लेखही मिळाले.
म्हणता म्हणता संकेतस्थळावरील संदर्भ लेखांची संख्या शंभरच्या वर गेली की !....

• गेल्या महिन्यातली गोष्ट. फेसबूकने स्वत:च्या वागण्यात बरेच बदल केलेत. अरे देवा!
हे फेसबुकचं नेहमीचंच तरी आपल्याला आता धावपळ करून त्याचे वेबसाईटवर झालेले परिणाम निस्तारावे लागणार! वेबसाईटच्या प्रोग्रॅम कोड मध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी इंटरनेटवर खूप सगळं संशोधन करावे लागेल. हं....!
त्यात या महिन्यात आपणच आपल्याशी केलेला एक व्यक्तीगत पातळीवरील वायदा. #Dubai30x30 fitness challenge, #DistanceRunning च्या अंतर्गत एका महिन्यात कमीत कमी शंभर कि.मी. पळण्याचे स्वीकारलेले आव्हान.... एक ती धावपळ आणि एक ही पळापळ.... दोन्हींनी तसा वेगवेगळ्या अर्थाने घाम काढला... पण पूर्ततेनंतरचे समाधान काही वेगळे.

सुधीर मोघे नेहमी म्हणायचे, "प्रश्न पडणं थांबवू नकोस. ते सतत पडावेत. उत्तरं कधी लगेच सापडतील तर कधी वेळ लागेल."
या अशा शोधयात्रांमध्ये मला पंढरीची वारी दिसते.
.. आणि अशी खोलात जायला लागले म्हणून अनेक गीतरत्‍नं मला सापडली आहेत,... सापडतील.
कबीर म्हणतात तसं,
जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ।

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

Kilimanjaro Summit


रात्र गुरुपौर्णिमेची होती.
रात्र तेजस्वी चंद्राची होती,
दुर्बिणीतून खास निरिक्षण करावे अशा खग्रास चंद्रग्रहणाचीही होती....
रात्र समुद्रसपाटीपासून पंधरा हजार फुटांवरील आमच्या बेस कॅम्पवरून, नुसत्या डोळ्यांना स्पष्ट दिसणार्‍या लखलखीत आकाशगंगेची होती,
रात्र सुंदर होती......

रात्र वैर्‍याची नव्हतीच मुळी....
पण प्रचंड थंडीची होती. तापमापकातील अती वेगाने खाली घसणार्‍या पार्‍याच्या पातळीची होती.
हातापायांची बोटं गोठवणार्‍या बोचर्‍या वार्‍याची होती.
इतक्या उंचीवर असल्यामुळे हवेतल्या आणि त्यामुळे आमच्या रक्तात कमी झालेल्या प्राणवायूची होती.
पुढील १० तास शांतपणे, दृढतेने वर वर चढत जाण्याची तर होतीच होती....
रात्र summit climb ची होती......

रात्र उत्‍सुकतेची होती.
सखोल आणि जय्यत तयारीची होती..
मोजून ४ दिवसांपूर्वीच भेटलेल्या १५ जणांनी, एकमेकांना सांभाळत, सावरत, एकसंघ वागण्याची होती.

आम्ही आमच्या टोळीचं नाव 'Kili Ninjas' असं अगदी नुकतंच,
म्हणजे कालच्या सरावाच्यावेळी ठेवलं होतं. यातला 'Ninja' हा शब्द आमच्यातील लढाऊ वृत्तीशी, कृतनिश्चयी असण्याशी निगडीत असावा.

बडबडी, बिनधास्त, मलेशीयाची जॅकी, जपानची चिझा, पंजाबची रुपिंदर, काश्मिरचा अजय आणि त्याची २६ वर्षांची मुलगी अहिल्या आणि १६ वर्षांचा मुलगा अहान, मलेशीन असून तामिळ ब्राह्मण भारतीयाशी लग्न करून दोन मुलांची आई असलेली कॅरी, उत्तर भारतीय अरूण - या सगळ्यांचं वास्तव्य सिंगापूरला.... ते सगळे तिथून आलेले.
मी आणि आशय दुबईहून. जस्टीन अमेरिकेहून. केरळची मीरा सध्या इंडोनेशियात वास्तव्य असल्याने कौला लंपूरहून. डॉ. संजीव दिल्लीहून आले होते तर प्रेरणा आणि जयेश मुंबईहून.

अशा सगळ्यांची ही मोट,
पण एकाच उद्देशाने एकत्र आल्याने लवकरच बांधली गेली.
त्यात कालच्या सरावाच्या वेळी आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं- एका ओळीत, लागून लागून चालावे. पुढच्या माणसाच्या पावलांकडे लक्ष द्यावे. डावा पाय - उजवा पाय हा ठेका सगळ्या ग्रुपचा सारखा असावा. आधी ट्रेकिंग पोल पुढे टेकवावा आणि मग पाय उचलावा, वगैरे सगळं तर होतंच..
..... आणि बरंच काही होतं.

चार दिवसात केलेली साडेदहा हजार फुटांची चढण होती...
त्यासाठी रोज केलेली दहा तासांची तंगडतोड होती..
एकमेकांबरोबर वाटून खालेला चॉकलेट, बदाम, खाखरा सारखा खाऊ होता.
एव्हाना tree-line, shrub-line मागे पडलेली होती. त्यांचा आडोसा होता तोपर्यंत ठीक होतं. पण आता फक्त वर एक आभाळ आणि खाली धरती, एवढंच काय ते उरलेलं. मग कोणी एकीने ओरडून सांगितलेलं "all guys look on the other side. we girls need a loo break." हेही होतं.

'किबो हट' बेस कॅम्‍पला दुपारी १ वाजता पोचलो असू. पाच तास चालणं आधीच झालं होतं. जेवण झाल्यावर आम्हाला आमच्या तंबूत विश्रांतीसाठी, तसंच रात्रीच्या तयारीसाठी पाठवण्यात आलं.
सगळे summit climbs रात्रीच सुरू होतात. आमचा मुहूर्त मध्यरात्री १२.३० चा, असा आदेश होता. 'रात्रीचं' जेवण 'संध्याकाळी' सहा वाजता मिळणार होतं. जेवण झालं की रात्रीची तयारी म्हणून अंगावर सगळे कपड्यांचे थर घालायचे आणि sleeping bag मध्ये चक्क झोपायचं ते साडे बाराचं बोलावणं येईपर्यंत.

(sleeping bag -३०°C तापमानासाठी योग्य असली तरी एवढ्याशा त्या तंबूतल्या सुळसुळीत तीच्यात झोपणं, खरं तर झोपण्याचा प्रयत्‍न करणं, तंबूतून आत बाहेर करणे.. याचं वर्णन हा एका वेगळ्या स्वतंत्र blog चा विषय असू शकतो.)

रात्रीची तयारी म्हणजे काय? हे नीट समजाऊन घेऊ. अशासाठी की या सगळ्यानंतर काही खाणं किंवा फोटो काढणं यातली निर्थकता लक्षात येईल-
​• तळपाय - blister proof socks एकावर एक. सर्वात शेवटी woolen जाड, असे तीन थर
​• पाय - base layer, fleece pants, trekking pants, shell pants
​• धड - base layer, t-shirt, fleece jacket, light down jacket, shell jacket​
​• डोकं - bandana, woolen cap, hood of down or shell jacket
• तळहात - liner gloves, fleece gloves, shell gloves
​• 2 trekking poles
​• headlamp
​• backpack मध्ये water bladder, energy bars.. बर्फावर चालण्यासाठी घालावयाचे, शूजवर लावायचे cleats..
अशी सगळी तयारी पूर्ण झाली.

"OK guys.. time to move" अशी साडे बारा वाजता हाळी आली आणि Kilimanjaro नावाच्या महाकाय पर्वताच्या शेवटच्या चढणीची सुरुवात झाली. हा सगळा चढ थेट, अंगावर येणारा आहे. सर्वाधिक काळ तो जमिनीशी ३० अंशाचा कोन करतो तर काही भागात तो ४५ अंशांपर्यंत जातो. असा चड चढण्याचं एक तंत्र असतं. टान्झानियाच्या स्वाहिली भाषेत त्याला 'पोले पोले' असं म्हणतात. आपण त्याला हळू-हळू किंवा पाऊल-पाऊल म्हणू शकतो. म्हणजे आपल्या स्वत:च्या पाउलाच्या लांबी इतक्याच अंतराची प्रत्येक स्‍टेप घ्यायची. असं करण्याने श्वास कधीही तोकडा पडत नाही. शांत, सावकाश पण ठाम असं चढायचं.
जोजेफ- आमचा सिस्‍टम गाईड पेस सेटर होता. सगळे त्याच्या मागे.


Kilimanjaro हा ज्वालामुखी पर्वत आहे. वर चढत त्याच्या मुखाशी पोचलं की पहिल्यांदा लागतो तो Gilman's point. इथपर्यंत पोचलं की तुम्ही Kilimajaro पर्वत चढला असं म्हणू शकता. त्या अर्थाचं प्रमाणपत्रं तुम्हाला मिळू शकतं. मग त्या crater च्या कडेकडेने चालायला लागलो की या पर्वताच्या सर्वाधिक उंचीच्या दिशेने जाऊ लागतो. इथे बर्फावर चालण्यासाठी cleats घालावे लागले. नंतर येतो तो Stella point. सगळ्यात उंचावर Uhuru peak. तिथे पोचायला सकाळचे १० वाजले. Gilman's point ते Uhuru peak हा प्रवास दोन तासांचा आहे. एव्हाना एकमेकांमधील अंतर प्रत्येकाच्या दमणूकीच्या प्रमाणात वाढत गेलेलं. पण १५ पैकी १४ जण थोडं पुढे-मागे का होईना Uhuru peak पोचलो. एक मात्र Gilman's point हून परत गेली.


Uhuru peak ला एक गंमत झाली. Kilimanjaro च्या इतिहासात घडली नसेल अशी गोष्ट घडली. रुपिंदरने माझ्याकडे तिची बॅकपॅक देत त्यातून लिपस्टिक काढली. एक छोटासा आरसा काढून त्यात डोकावत रीतसर ओठांवर लावली. डोक्यावरचा सगळा uniteresting पसारा काढून टाकला. एक छानशी हॅट घातली. एक रंगबेरंगी ओढणीही गळ्याभोवती घेतली. मग सुंदर pose देत स्वत:चे फोटो काढून घेतले.
खरं तर तिला bikini घालायची होती किंवा साडी नेसायची होती. तिचा हा बेत आम्ही आदल्या दिवशीच हाणून पाडला होता. -२० अंश तापमानात असलं काही आत्मघातकी ठरू शकलं असतं. पण या काही गोष्टी ती घेऊन आलीच.
व्यवसायाने wardrobe stylist असलेल्या रुपिंदरने हाही अनुभव खूप 'स्टाईल’ मध्ये घेतला.

Uhuru peak ची समुद्रसपाटीपासूनची उंची १९,३४१ फूट आहे. इतक्या उंचीवर हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी असते. त्याची आपल्या शरीराला सवय नसते. म्हणून इथे १५ मिनिटांपेक्षा अधिक कुणीच थांबू नये.
पण प्रत्येकाच्या येण्याच्या वेगवेगळ्या वेळा आणि मग फोटो यात आमची तब्बल ४५ मिनिटे गेली. ही अर्थातच मोठी चूक होती. त्यामुळे आमच्यापैकी चार-पाच जणांना altitude sickness चा त्रास झाला. एकाला तर oxygen देत खाली आणावे लागले.

डोंगर चढणे अवघड पण उतरणे सोपे.. अशी जर कुणाची समजूत तर ते बरोबर नाही. हे खरं की उतरण्यास वेळ कमी लागतो. पण loose, मुरमाड, तीव्र उतार असलेल्या जमिनीवरून उतरतानाची कसरत फार अवघड. दोन्ही ट्रेकिंग पोल्सचा आधार घेउनही उतरण्याच्या वेगावर आणि घसरण्यावर फार काही ताबा ठेवता आला नाही. बरेच वेळा आपटी खालली. सुरुवातीला 'किती वेळा' ते मोजायचा प्रयत्‍न केला. पण मग संख्या इतकी वाढली की मोजण्यात फारसा अर्थ उरला नाही. त्यात तासभर झालेली बर्फवृष्टी. अगदी मनापासून सांगायचं झालं तर ते पडणं आणि तो बर्फ हा माझ्यासाठी या ट्रेकचा high point होता.

बेस कॅम्पला परतायला दुपारचे दोन वाजले.. तिथे जेवण.
तिथली साडेपंधरा हजार फुटांची पातळी देखील राहण्यास योग्य नसल्याने पुढील पाच तासात बारा हजार फुटांवर उतरून रात्रीचा मुक्काम तिथे.


Kilimanjaro पर्वत चढण्याचा प्रयत्‍न करण्यार्‍यांपैकी फक्त ३५% Uhuru peak पर्यंत पोचतात, हे पाहिलं तर आम्ही आमचं Kili Ninjas हे नाव सिद्ध केलं, असं म्हणता येईल.

अशी ही summit climb च्या रात्रीची,
किंवा रात्रीची आणि नंतरच्या दिवसाची,
नव्हे एका रात्रीपासून दुसर्‍या रात्रीपर्यंतची कहाणी....

सुफळ आणि संपूर्ण.

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'सन्यस्त खड्ग' नाटकातील हे पद. पण ते या नाटकाच्या पुस्तकात आपल्याला सापडणार नाही.
याचे रचियता आहेत नागपूरचे कवी- शंकर बाळाजी शास्‍त्री.
हे पद या नाटकात कसे पोचले ? पदाचा अर्थ काय? 'नेईं हरोनी' की 'ठेविं जपोनि'? थोडक्यात या पदाला थेट भिडायचं असेल तर परत एकदा आपल्याला नाटकाचा इतिहास, त्याचे कथानक आणि त्यातील 'सुलोचना' ही व्यक्तीरेखा, यांच्याकडे जावं लागेल.

रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात 'सन्यस्त खड्ग' लिहितानाचा सावरकरांचा हेतू संपूर्ण राजकीय होता. त्यांच्या विचारांच्या 'प्रचार' करणे. त्यांच्यावर इंग्रजांनी त्या काळात घातलेल्या बंधनांमुळे अभिव्यक्त होण्याचा, हे नाटक हा एक मार्ग होता. नाटकाच्या कथासूत्रात, कथेतील पात्रांत, त्या पात्रांनी केलेल्या चर्चेत तत्‍कालीन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब अगदी ठळकपणे दिसते. किंबहुना ते तसे दिसावे, हाच उद्देश आहे.

तो काळ 'महात्मा गांधी' नावाच्या एका विचारधारेच्या उगमाचा, प्रसरणाचा. हे लक्षात घेतलं तर नाटकातील पात्रं- सिद्धार्थ गौतम बुद्ध, शस्‍त्रसंन्यास सोडून परत आलेले सेनापती विक्रमसिंह, त्यांचा युद्धबंदी झालेला पुत्र वल्लभ, त्याची पत्‍नी सुलोचना, लालची लंपट शाकंभट, कोसलाचे शाक्यांवरील आक्रमण, या सगळ्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीच्या, त्यातील किरदारांच्या प्रतिमा आहेत हे नि:संशय समजते.

मा. दीनानाथ मंगेशकर आणि सावरकारांचा खास स्‍नेह होता. मा. दीनानाथांच्या 'बलवंत संगीत मंडळीं'नी १९३१ च्या सुमारास 'सन्यस्त खड्ग'चे रंगमंचिय सादरीकरण करायचे ठरवल्यावर त्यांनी मूळ कथेवर, रंगाविष्कारास पूरक असे काही संस्कार केले. सावरकरांच्या संमतीने. पण या बदलांची व्याप्‍ती, (सावरकरांच्या इच्छेनुसार) फक्त नाटकाच्या सादरीकरणापर्यंतच मर्यादित असणार होती. त्यामुळे मूळ संहितेत कुठलाही बदल करण्यात आला नाही.

त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे सुलोचनेच्या मुखी असलेले, 'मर्मबंधातली ठेव ही' हे पद. मास्तरांनी ते शं. बा. शास्त्रींकडून लिहून घेतले. शास्त्रींनीही हे पद थेट सावरकरांच्या शैलीत रचलं. नाटकाच्या कथानकास पूरक असा प्रतिमांचा, रूपकांचा खास वापर करत.

सुलोचना ही 'सन्यस्त खड्ग'ची नायिका आहे आणि नायकही. मा. दीनानाथ स्वत: हे पात्र रंगवायचे. तिचे आचार-विचार हा नाटकाचा गाभा आहे. नुसता ती गाते त्या पदांचा आलेख पाहिला तरी तिच्या व्यक्तित्वाच्या हलक्या-गहिर्‍या छटा दिसतात.
'माळ गुंफितांना ।' म्हणत वाट पाहणारी अभिसारिका 'सुलोचना'..
'सययी सखा न ये ।' म्हणून रुसणारी सुलोचना..
पतीच्या स्वागतासाठी केलेली फुलांची माळ युद्धाच्या धुमाळीत सुकून गेली तर - 'ही तर जग रहाटी आहे.. सुकतातची जगि या । फुले गळत पाकळी पाकळी ।' असा विचार करणारी सुलोचना..
एक राष्ट्रिय सैनिक म्हणून सैनिकवेषात 'रणरंगणी' रंगणारा 'सुलोचन'..
आणि शेवटी पतीसह वीरमरण.. हा तिचा प्रवास मोठा आहे.
तिच्या मनात दुविधा नाहीत. पती युद्धबंदी असतानाही तिच्या अंतर्मनात 'शरण की रण', असं द्वंद्व नाही. उलट 'मारत मारत मरण'वर ती ठाम आहे.

शाक्यांच्या उरलेल्या काही मोजक्या सैनिकांसह, विक्रमसिंह यांनी समरसभा बोलावली आहे. त्यात सुलोचना, 'सुलोचन' म्हणून गेली आहे. अर्थातच उपस्थित उर्वरीतांना याची कल्पना नाही. आक्रमण करणार्‍या कोसलाच्या राजाने, शाक्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी- शरण आलात तर सेनापती वल्लभास सोडून देऊ.

त्या वेळेस तरुण वीरवर 'सुलोचन' म्हणतो-
"कोसलावासीयांनी दाखवलेली ही फक्त लालूच आहे. उपरांत, अशा जीवनीय दुर्दशेहून मानी हौतात्म्यच सेनापती पत्करतील.
राष्ट्राराष्ट्रांच्या चिरंतन हानिलाभांच्या विचारात व्यक्तीस कोण मोजतो ! तो (शरणागतीचा) विचार विचारात घेण्याचा अविचार मी करू शकत नाही." ......

पण आतली 'सुलोचना' म्हणते (गाते),
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
नेईं हरोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥


अलि म्हणजे भुंगा, अंबुज म्हणजे कमळ. हे सर्व रूपक (metaphor) म्हणून येत असल्याने शब्दश: अर्थापेक्षा भावार्थाचा विचार करायला लागेल.

माझ्या मर्मबंधातली ठेव, माझे प्रिय पती वल्लभ, यांचे शत्रूने बलपूर्वक हरण केले आहे. पण राष्ट्रकार्यार्थ लढता लढता, पराक्रमाची पराकाष्ठा त्यांनी केली. त्यामुळे एकाच वेळेस मला अभिमान व दु:ख आहे. हा जो शत्रू त्यांच्या सुटकेची मज आशा दाखवित आहे, त्याचा मोह पडतो आहे खरा.. पण या शत्रूचा सुप्‍त हेतू शाक्यांचे राष्ट्र सर्वप्रकारे लुटून नेणे हाच आहे."

पटदीप रागात बांधलेले हे पद, पटदीपची आणि विरहाची आर्तता थेट पोचवतं. अनेक सिद्धहस्त गायकांनी गाऊन त्यास लोकप्रिय केलं आहे. स्वत: मा. दीनानाथ मंगेशकर, पं. वसंतराव देशपांडे, पं. प्रभाकर कारेकर, आशाताई भोसले, आशाताई खाडीलकर..

नाटकाच्या बाहेर या पदाच्या मुखड्याने एक वेगळीच उंची गाठली आहे. 'मर्मबंधातली ठेव' हे एखाद्या पुस्तकाचे शीर्षक असू शकते, एखाद्या लेखाचा मथळा किंवा एखाद्या हृदयस्पर्शी गाण्यांच्या कार्यक्रमाचे नाव. अशी ठेव तर जपून ठेवण्यासाठीच असते. जशी 'वाक्प्रचार' म्हणून 'मर्मबंधातली ठेव' ही उक्ती प्रचलीत होत गेली, तसं कुठेतरी 'नेईं हरोनी' जाऊन 'ठेविं जपोनि' हा बदल झाला असावा.

Related post - शत जन्‍म शोधितांना

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

शत जन्म शोधितांना..या पदाचे रसग्रहण करताना सर्वप्रथम मला असे नमूद करावयाचे आहे की हे पद स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचं भरतवाक्य नाही. तसंच ते या नाटकाचे सार किंवा सारांशही नाही. अगदी मूलभूत स्तरावर ते एका विरहिणीचे भावगीत आहे.. एक प्रेमकविता आहे.
हे नीटसं समजण्यासाठी- आधी 'सन्यस्त खड्ग', त्याचे कथानक आणि नाटकातील ज्या पात्राच्या तोंडी हे पद येतं ती सुलोचना, यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ.

अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्‍नागिरीला स्थानबद्ध असताना सावरकरांनी 'सन्यस्त खड्ग' लिहिलं. या काळात त्यांना राजकारणात जाण्यास बंदी होती. तिथे त्यांनी भरपूर लिखाण केले. लेख, पुस्तके, नाटकही. लिखाणाचा उद्देश आपले विचार मांडणे हाच असल्याने, 'सन्यस्त खड्ग' हे नाटकसुद्धा सावरकारांची वैचारिक सुस्पष्टता घेऊन येते. नाटकाची कथा अहिंसा, धर्म, कर्म यांचा ऊहापोह करत, नाटकातील पात्रांद्वारे विचारांचे मंडन-खंडन करीत पुढे जाते. प्रमूख पात्रं आहेत- बुद्ध, विक्रमसिंह, वल्लभ आणि सुलोचना.

सिद्धार्थ गौतम 'बुद्ध' होऊन काही वर्ष लोटली आहेत. विक्रमसिंह हे बुद्धांच्या वडिलांच्या (शुद्धोदन) राज्याचे (शाक्य) सेनापती. बुद्धांच्या सांगण्यावरून ते शस्‍त्रसंन्यास घेतात (पटत नसतानाही केवळ प्रयोग म्हणून). तथागतांबरोबर भिक्षु म्हणून प्रवासास जातात. या घटनेला चाळीस वर्षे लोटतात. दरम्यान विक्रमसिंहांचा पुत्र वल्लभ राज्याचा सेनापती होतो. वल्लभ सुद्धा शूर, पराक्रमी आहे. या चाळीस वर्षात बुद्ध धर्माचा आणि त्यात सांगितलेल्या अहिंसेचा पुष्कळ प्रसार झाला आहे. तेवढ्यात शेजारच्या 'कोसला' राज्याचे शाक्यांवर आक्रमण होते. अहिंसामार्गी झालेल्या या राज्याची युद्धाची तयारी नसते. बरीच वाताहत होते. सेनापती वल्लभ पकडले जातात. ही वार्ता पोचताच विक्रमसिंह तथागतांच्या मनाविरुद्ध खड्ग निष्कोषित करतात आणि युद्धात सामिल होतात. जाताना ते बुद्धांना म्हणतात, "मी अहिंसा सोडत आहे, बुद्धांना नाही."

हे पद नाटकात सुलोचनेच्या तोंडी येतं. सुलोचना ही वल्लभ दयिता- पत्‍नी. त्यांच्या प्रीतिविवाहाला नुकतंच एक वर्ष झालंय. हा वाढदिवस साजरा करतानाच्या प्रेमसंवादात ती दोघे मग्‍न आहेत. तोच वल्लभास राजसभेचे तातडीचे निमंत्रण येते आणि तो तिथून जातो. तो परत आल्यावर त्याच्याशी कसं बोलावं? रुसावं का? किती? या विचारात ती असतानाच दूत निरोप आणतो, सेनापती तर परस्पर युद्धावर गेले..
ही भेट अर्धीच राहिली याची तिला खंत सतावते. काही दिवसांतच अशीही बातमी येते की शाक्यांचे सैन्य उधळून गेले आणि सेनापती वल्लभ युद्धबंदी झाले. तेव्हा तिच्या तोंडी येते, ते हे पद.
शत जन्म शोधितांना..

या पदाचा संपूर्ण अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सावरकरांचा चष्मा घालावा लागेल. भावनेची तीव्रता, उत्कटता.. हातचं राखून काहीच नाही. भव्य, दिव्य, तेजस्वी.. आणि प्रखरही. स्वत: जळून इतरांस ऊर्जा देण्याचं सामर्थ्य असलेलं.

सुलोचना ही सामान्य राजस्‍नुषा नाही. फक्त प्रेमसंवादात तिचं मन रमत नाही. तो ती करतेच पण ती कर्तृत्ववान आहे. स्‍त्रीसुलभ भावनांबरोबर विचारांची परिपक्वता तिच्यात आहे. तिच्या जाणीवा प्रगल्‍भ आहेत. धैर्यधर पतीचा तिला अभिमान आहे. तो युद्धबंदी झाल्याचे समजताच तिचे पहिले वाक्य असते,
"हा सेनापती अबल आहे म्हणून पराभूत नाहीये तर-
सबल परि ना राष्ट्रचि म्हणून अपजयी हा । नसे जित पहा । सेनानि ।"
पुढे जाऊन ती सैनिक वेष घालून रणांगणात युद्ध करते व आपल्या पतीसह वीरमरण पत्करते.

ही अशी स्‍त्री जेव्हा एक विरहगीत गाईल आणि तेही सावरकरांच्या लेखणीतून उतरलेलं..
ती म्हणते,
शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥


हा माझा माझ्या प्रियकराचा शोध जन्मजन्मांतरीचा आहे. जन्म-मरणाच्या अनेक फेर्‍यांतून गेलेला. माझ्या या शोधापुढे शत 'आर्ति' व्यर्थ आहेत. 'आर्ति' या शब्दाचा अर्थ जरी दु:ख, पीडा असला तरी इथे त्याची आर्तता थेट ज्ञानेश्वरांची आहे. 'विश्वाचे आर्त'शी नातं सांगणारी. दीपावली सुद्धा तुम्हां-आम्हांसारखी मिणमिणत्या पणतींची नाही तर तेजाळ, देदिप्यमान सूर्यमालिकांची. इथे 'कवी' सावरकरांनी 'विझाल्या' असं म्हणताना 'विझल्या'तला कोरडेपणा काढून टाकला आहे. या माझ्या शोधयज्ञात मी अशा शत दीपावलींची आहुती दिली आहे, असे तिला वाटते.

तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥


प्रियकर मीलनाचे सायास तिला कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाही. तिच्यासाठी ही आनंदाने केलेली 'साधना' आहे, जिची सिद्धी आतां कुठे होऊ घातली आहे. येथे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा आणखी एक स्पर्ष जाणवतो. वरील दोन्ही ओळीतील 'गाठी' या शब्दाने त्यांनी यमक साधलाय आणि श्लेषही. पहिल्या ओळीतील 'गाठी' हे गाठभेट या अर्थाने येते तर दुसर्‍या ओळीतील 'गाठी' हे पोचणे या अर्थाने. युगायुगांच्या प्रतिक्षेनंतर आमची भेट घडली आहे तोच,

हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥


नुकतीच तर कुठे आमची भेट झाली आहे.. जो मी उठून त्याला, माझ्या प्रियकराला मिठी घालू पाहते, तोच सगळं संपून गेलं. मीलनाचा 'तो' क्षण एका क्षणांत संपून गेला..
पुलंनी एका ठिकाणी असं म्हंटलं आहे, "या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल पारितोषिक द्यावं, इतक्या श्रेष्ठ दर्जाची ही कवीकल्पना आहे."

'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा संदर्भ ठेऊन पाहिलं तर असा सगळा अर्थ आहे. पण या संदर्भाच्या पलीकडे जाऊन, अध्यात्मिक स्तरावरही हे पद फार खरं ठरतं.
मानवी जीवनातील दु:खाचं सातत्य, सुखाची क्षणभंगूरता, काळाची गतीमानता, बुद्ध धर्मात वर्णन केल्याप्रमाणे जीवनाचं 'अनित्य' असणं... असं बरंच काही.

सावरकरांच्या या पदरचनेचे आपल्या मनातील स्थान इतके अनन्य असे आहे की नुसतं 'शत जन्म..' म्हंटलं तरी हा सगळा अध्यात्मिक पट आपल्यासमोर उलगडतो.

( फोटो सौजन्य- आंतरजाल )

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

गीत रामायण, गदिमा आणि शेक्सपिअर


( हा लेख २०१५ साली 'गीतरामायण हीरक महोत्सव स्मरणिका' - 'अवघ्या आशा श्रीरामार्पण' मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आभार- सुमित्र माडगूळकर आणि समस्त माडगूळकर परिवार. )

गीत रामायणाचा हीरक महोत्सव आपण अतिशय आनंदाने साजरा करत आहोत. ही कलाकृती म्हणजे प्रतिभेचा अतुलनीय आविष्कार आहे. तसेच तीने लोकप्रियतेचेही उत्तुंग शिखर गाठलं आहे. गेली चार पिढ्या आणि सहा दशकं गीत रामायण मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि पुढील अनेक शतके गाजवेल हेही निश्चित आहे. यातील हनुमंताच्या तोंडी असलेल्या ओळींमध्ये छोटासा बदल करून असं म्हणता येईल,
जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन (गीत) रामायण


गीत रामायणाच्या शाश्वततेवर इतका ठाम विश्वास जेव्हा एवढा मोठा जनसमुदाय एकमताने ठेवतो, तेव्हा या विश्वासाचा आधार, वैश्विक पातळीवरील काही कलाकृतींमध्ये शोधता येतो का? असा एक विचार मनात आला. असं साहित्य, ज्यास शब्दश: शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि ज्यास जन-सामान्यांइतकीच भाषाप्रभूंची मान्यता आहे. अर्थात शेक्सपिअरपेक्षा मोठं नाव समोर येईना.

शेक्सपिअरचे लिखाण साधारणत: इ.स १५९० ते १६१३ या काळातले. इंग्रजी भाषेतले. तात्कालीन आंग्ल संस्कृतीचा प्रभाव आणि संदर्भित विषय असलेले. त्यामुळे गदिमांच्या गीत रामायणाशी त्याचे, ना विषयाचे ना संस्कृतीचे साम्य. पण दोन्हींमध्ये काही समान धागे आहेत. तसं आधुनिक काम आहे, सर्वमान्य आहे आणि कॅलेंडरची पानं झुगारून देण्याची क्षमता आहे. या अनुषंगाने गीत रामायण व शेक्सपिसरीअन साहित्य, यात शैलीची काही साम्यस्थळं शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्‍न आहे.

शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या एकूण ३८ नाटकांपैकी ३४ नाटकांची बीजे / कथासूत्रे किंवा नाटक म्हणूनही, त्यांच्या आधी लिहिलेले होते. जसे रोमिओ-ज्युलिएट हे आर्थर ब्रूक यांनी १५६२ मध्ये लिहिले होते. किंग लिअर, मॅकबेथ इ. हॉलिंशेड्स्‌ क्रॉनिकल्स्‌ मध्ये १५८७ मधे ‍प्रकाशित झालेले होते. याची सप्रमाण माहिती उपलब्ध आहे. पण या मूळ कथाविष्कारांवर शेक्सपिअर यांनी आपल्या शब्दसंपन्‍नतेची अशी काही झळाळी चढवली की काळाचा ओरखडा त्यांवर ओढणे केवळ अशक्य.
रामकथेस हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक व्यक्‍तींनी, विविध भाषांमधून, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती समर्थपणे मांडली आहे. वाल्मीकी, तुलसीदास, मोरोपंत ही त्यातील काही मोजकी, ठोस नावे. गदिमांनी या असंख्य वेळा अभिव्यक्‍त झालेल्या रामकथेचे, गीत रामायणाच्या रुपाने सोने केले ते निव्वळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर. शब्दांची नादमधूर मांडणी, पटकथेसारखा असलेला कथानकाचा नाट्य / चित्रमय बहाव, यांच्या बळावर गीत रामायण दीर्घायू... चिरायु हे होणारच.

शेक्सपिअर हे त्यांच्या नाटकांसाठी जरी प्रामुख्याने ओळखले जात असले तरी त्यांचे वर्णन प्रथमत: कवी आणि मग नाटककार असे करता येईल. त्यांनी कविता / सुनितें (sonnets) ही कारर्किर्दीच्या सुरुवातीच्या काळात लिहिली. नंतरच्या काळात काव्य, त्यांच्या नाटकांचा जवळपास सत्तर टक्के भाग व्यापू लागले. त्यांच्या काव्यात जात्याच स्वर-तालांचा मेळ असतो. हा परिणाम साधण्यासाठी त्यांनी जी अनेक तंत्रे वापरली त्यातील एक प्रमूख तंत्र alliteration म्हणजे अनुप्रासांचा सुयोग्य आणि चौफेर वापर, हे होय. उदा.
१. “For as you were, when first your eye I eyed” (Sonnet 104)
२. “When to sessions of sweet silent thought
I summon up remembrance of things past” (Sonnet 30)
गदिमांच्या गीत रामायणातही नादांची गुंफण, ताल-स्वरांचे गुंजन भरून ओसंडते आहे. त्यांनीही अनुप्रासांचा भरगच्च वापर केला आहे. कुठलाही अट्टहास न करता, शब्दांचा सहज सुंदर खेळ करत हे साधणं, ही माडगूळकरांची signature style आहे. याची काही मोजकी उदाहरणे-
१. “कैक कैकयी करी नवसासी”
२. “दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला”
३. “जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात”
४. “प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट.. प्रभुचे लोचन पाणावती..”

अनुप्रासांचा मंजुळ खेळ जर श्रुति सुखावण्यासाठी आहे तर रूपकांचा (metaphor) प्रभावी वापर चित्र अधिक स्पष्ट करण्यासाठी... शब्दचित्राचे रंग गडद आणि गहिरे करण्यासाठी. Sonnet 73 मध्ये वार्ध्यक्यासाठी हेमंती निष्पर्णतेचे रूपक शेक्सपिअर यांनी वापरले आहे. ते म्हणतात,

“That time of year thou mayst in me behold
When yellow leaves, or none, or few do hang”
अयोध्येच्या प्रजाजनांच्या नजरेतून आदर्श असा जो नृपती- राजा दशरथ याचे वर्णन करताना गदिमांनी कल्पतरूचे रूपक वापरले आहे. ते म्हणतात,
“कल्पतरूला फूल नसे कां ? वसंत सरला तरी”
रूपकाचे आणिक काही गदिमा स्पर्श-
जेव्हा भरत कैकयीला विचारतो, “शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ”.
वाल्मीकींचे शिष्य म्हणून लव-कुश, “ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल.. वसंत-वैभव गाते कोकिल”

’हॅम्लेट’च्या आधीचे शेक्सपिअर यांचे लिखाण काहिसे अलंकारीक, शब्दबंबाळ वाटते. तो त्यांच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात मात्र साध्या, सोप्या, गेयता नसलेल्या शब्दांचा वापर सढळ आहे. अगदी टोकाची भावना व्यक्त करताना सुद्धा.. जसे राग, त्वेष, संताप. ’किंग लिअर’ या नाटकात, किंग लिअर आपली मोठी मुलगी गोनरील हिला म्हणतो, (जिने त्याचे राज्य घेऊन, त्याला घराबाहेर काढले आहे)
“... but yet thou art my flesh, my blood, my daughter; or rather a disease that’s in my flesh, which I must needs call mine” (अंक २, प्रवेश ५)
आणि हेच तर नेमके आपल्या गदिमांचे वैशिष्ट्य आहे. कुठेही शब्दांचे अवडंबर नाही. नेमक्या, मोजक्या शब्दांचा सहजाविष्कार.. मग भावना कुठलीही असो. हेच पहा ना, ’माता न तूं, वैरिणी’ मधे भरत कैकयीस म्हणतो,
“श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात ?
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं”

शेक्सपिअर यांचे लिखाण आणि गदिमांचे गीत रामायण, यांच्यात आणखी एक महत्वाचे साम्य आहे, ज्याला इंग्रजीत coining a phrase म्हणतात. अनेक वाक्‍प्रचारांच्या / idioms च्या रुपात या दोघांनी आपल्या पावलांचे ठसे, त्यांच्या त्यांच्या भाषेवर उमटवले आहेत. ज्यांच्या लिखाणाने मुळातून भाषाच अधिक संपन्‍न व्हावी एवढे कर्तुत्व या दोघांचे आहे. अशा वाक्प्रचारांची यादी खरं तर खूप मोठी आहे. वानगीदाखल काही सांगायचे झाले तर-
शेक्सपिअर-
१. “all that glitters is not gold” (The Merchant of Venice)
२. “high time” (Comedy of Errors)
३. “what’s done is done” (Macbeth)
गदिमा (गीत रामायणात)
१. “अभिषिक्‍तातें गुण वय नाहीं”
२. “अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात”
३. “दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट”

याच सूत्राचा आधार घेत शेवटी असं म्हणेन, आजचे माझे हे लिखाण हा... एका मिणमिणत्या ज्योतीने, शब्दशारदेच्या आकाशातील या दोन तेजांची आरती करण्याचा एक नम्र प्रयत्‍न आहे.


 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

आठवणीतली गाणी साठवताना


साप्‍ताहिक विवेक - दिवाळी अंक २०१७
'या आठवणीतल्या गाण्यांमुळे ICUतून ढगांत जाता जाता वाचलो. येथील गाणी ऐकणे ही माझ्यासाठी थेरपी होती.' किंवा 'मी २२ वर्षांची असताना माझ्या दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता गेली. मी hearing handicapped आहे. पण 'आठवणीतली गाणी'मुळे मला खूप गाणी वाचता व गुणगुणता येतात. रोजचा दिवस एका तरल आनंदात जातो.'

कधी अशी थेट भावनेला हात घालणारी ईमेल्स येतात, तर कधी 'लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला - हे बालगीत माझे आजोबा नारायण गोविंद शुक्ल यांनी लिहिलं आहे. ते कसबा पेठ, पुणे इथे राहतात. मी निमिषा, त्यांची नात. त्यांच्यासह आम्हां सगळयांना फार आनंद झाला की असा एक गीतसंग्रह असावा आणि त्यात स्थान मिळवून या गाण्याचा आनंद समस्तांस घेता यावा.' किंवा 'इतकी वर्षे गाणी म्हणतेय. म्हणजे तो माझा व्यवसायच आहे. पण शब्दांच्या अचूकतेकडे कधी फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आता 'असोवरी मेखला' यासारखे शब्द अगदी बरोबर आणि अर्थ समजून गायल्याने माझे गायन अधिक परिणामकारक होते.' यासारखे निरोप....

थोडक्यात काय, 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळाला नियमित भेट देणाऱ्याने एकाने म्हटलं आहे तसं, 'ही वेबसाइट माझ्या कामाची नाही असं कुणीही म्हणू शकत नाही.'

जशी तुमची प्रकृती/प्रवृत्ती, तसा तुम्ही अनुभव घ्यावा. आता 'आपली आवड'सारख्या कार्यक्रमासाठी रेडिओवर अवलंबून राहण्याची गरज नाही.. फक्त आपल्याला आवडणाऱ्या गीतांची निवड करावी आणि ती मनसोक्त ऐकावी..

हे आता सहज शक्य झालंय ते 'आठवणीतली गाणी'मुळे (www.aathavanitli-gani.com).

ही वेबसाइट तयार करणं, चालवणं हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. एकीकडे मराठीतील गीतरत्नं शोधावी, दुसरीकडे बदलतं तंत्रज्ञान शिकावं - ते 'आठवणीतली गाणी'वर अंमलात आणावं, असा समन्वय साधत माझा प्रवास चालू आहे. यांस अनेकविध मार्गांनी कसं संपन्न करता येईल, हा सजग विचार सतत मनात असतो.

चौदा वर्षं झाली. सुरुवातीला फक्त गाण्यांचे शब्द लिखित स्वरूपात होते. आता तेवढंच सीमित राहिलेलं नाही. अवघड शब्दांचे अर्थ, ब्लॉग, संदर्भलेख, संतांच्या रचनांचा भावार्थ, विविध गायकांनी केलेले एकाच गाण्याचे स्वराविष्कार, गीताचा राग असे अनेक आयाम जोडले गेले. जिथे गाणी ऐकता येतात अशी अनेक संकेतस्थळं आंतरजालावर उपलब्ध आहेत. पण वर दिलेल्या आपल्याच अशा खास वैशिष्टयांमुळे 'आठवणीतली गाणी'चं स्थान अनन्य असं आहे. उपलब्ध माहिती दुर्मीळ आणि अनुभव संपन्न आहे.

या निमित्ताने अनेक कलाकारांच्या, त्यांच्या वारसदारांच्या, अभ्यासूंच्या भेटी घडत असतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक चर्चा या गीतरचनांवर वेगवेगळा प्रकाशझोत टाकते. तसंच खूप वाचनही घडतं. मध्यंतरी वि.स. खांडेकर यांचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी कुसुमाग्रजांच्या 'पाचोळा' कवितेविषयी लिहिलं आहे. त्यांचीच प्रस्तावना असलेल्या 'विशाखा' या कविता संग्रहातील ही कविता. तिचा त्यांनी लावलेला अर्थ, कवी मायदेव यांना वाटलेला सापेक्ष अर्थ आणि खुद्द कवीच्या मनातील कविता लिहितानाची भावना, यातील तफावत याचं गमतीदार वर्णन या लेखात त्यांनी केलं आहे. मग मी पुढे जाऊन पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेची चाल बांधताना कुठला अर्थसंस्कार केला असेल, याचा विचार करू लागले. मग दोन संगीतकार जेव्हा एकाच गाण्याला चाल लावतात तेव्हा त्यांचा काय विचार असेल? तसंच एकच गाणं दोन गायक गातात त्यातून मिळणारा आनंद.. हे सर्व रसिक श्रोत्यांना पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे, असं मला वाटलं. ही सर्व माहिती 'आठवणीतली गाणी'वर वेळोवेळी संकलित केल्याने तिचा विस्तार एकसुरी राहिलेला नाही.

गदिमांच्या शब्दांचा आधार घेऊन या माझ्या उपक्रमाचं वर्णन असं करता येईल -
ज्ञानदेविच्या, मराठियेच्या नगरीतून हिंडून,
आणिले टिपुनी अमृतकण

'आठवणीतली गाणी' संपूर्णत: अव्यावसायिक तत्त्वावर आहे. म्हणजे non-commercial, non-profit. या कामासाठी कुणाकडूनही आर्थिक किंवा कुठल्याही स्वरूपात मोबदला घेतला जात नाही. त्यामुळे इथे जाहिरातींचा गोंधळ नाही.

तसंच इथल्या पानांवर भेट देणाऱ्यांचे अभिप्राय, टिप्पण्या नाहीत. त्यामुळे 'आठवणीतली गाणी' हा एक निवांत असा अनुभव आहे. येथे भेट देणं अनेकांना मन शांत करण्यास मदत करणारं वाटतं. असे अभिप्राय येतच असतात. श्री. आबा पाटील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना नेमक्या याच कारणासाठी अनेक वेळा ते येथील गाणी ऐकत असत. त्यांनी तसं कळवलं होतं. काही मानसोपचारतज्ज्ञ, संगीत आवडणाऱ्यांना या संकेतस्थळाला मुद्दामहून भेट देण्यास सांगतात. तो त्यांच्या उपचार पध्दतीचा एक भाग झाला आहे. म्हणूनच 'आठवणीतली गाणी'च्या दृश्य स्वरूपात कुठलाही बदल करताना या अनुभवास धक्का लागणार नाही याचं भान मी नेहमी ठेवते.

गाणी ऐकणं, त्यांचे शब्द लिहिणं, मग कधी अडल्यानडल्या शब्दांचे अर्थ शोधणं हा माझा नेम. यातून मी संकेतस्थळावर शब्दार्थ देणं चालू केलं. आणि ते देणं चालू केलं, म्हणून मी शब्दार्थांच्या अधिक खोलात जायला लागले. 'ॠतू हिरवा, ॠतू बरवा' - शांताबाईंची ही रचना आशाताई आणि पं. हृदयनाथ यांनी घराघरातील लहानमोठयांपर्यंत नेऊन पोहोचवली आहे. पण त्यातील 'बरवा' हा शब्द प्राकृतातून येतो. आजकाल आपण वापरत नाही. 'तो हा विठ्ठल बरवा..' बरवा म्हणजे छान, सुंदर. हा अर्थ मुद्दामहून नमूद केल्याशिवाय सहजी त्याकडे लक्ष जात नाही.

कधी गाण्यातला एखादा शब्द वर्षानुवर्षं अडतो, तर कधी एखादा शब्द नव्यानेच उलगडतो. हेच पाहा, गदिमांचं सर्वांचं तोंडपाठ असलेलं, 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान' हे बालगीत. यात एक ओळ अशी आहे - 'चांदण्याच्या पदराला बिजलीचा ...' अनेक जण 'बिजलीचा बाण' म्हणतात. कुणी 'बिजलीचा मान' म्हणतात. गदिमांनी 'बिजलीचा वाण' लिहिलं आहे. 'वाण' इथे 'वर्ण' या अर्थाने येतो. यासाठी मला बरीच शोधाशोध करावी लागली. 'वाण' हा शब्द वस्त्रोद्योगात नमुना किंवा आडवा धागा या अर्थाने येतो. श्रावणातल्या सणासुदीला 'वाण' स्त्रिया 'वसा' म्हणून देतात. हे कुठेच इथे बसत नाही. मग कधीतरी पी. सावळारामांच्या एका गीतात तो वापरलेला सापडला. ते म्हणतात, 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा'. सगळा उलगडा होण्यास ते पुरेसं होतं.

ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली. पहिले मला पितृस्थानी, तर दुसरे गुरुस्थानी. दोघांचीही सांगीतिक कारकिर्द जवळपास सहा दशकांची. दोघांनीही अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलेलं. मराठी भावसंगीताच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचे ते साक्षीदार. काही वेगळं, चांगलं घडण्यास आणि घडवणाऱ्यास प्रोत्साहन देण्याची दोघांचीही वृत्ती असल्याने दोघांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्याबरोबर घडलेल्या गप्पा नेहमी दिशादर्शक ठरल्या. कवी सुधीर मोघे यांच्याकडे गेले की हा एक प्रश्न नेहमी चर्चेत असायचा. 'गाणं नेमकं कोणाचं? संगीतकाराचं की गायकाचं?' इथे 'चर्चा' किंवा 'गप्पा' म्हणणं खरं तर अवघड अशासाठी, की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे. त्यांच्या मते गाणं हे त्याच्या अंतिम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भूमिकांबद्दलची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. देवकीताई पंडित यांना त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी सुधीर भटांची त्यांनीच संगीत दिलेली गझल 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' गायला शिकवली. ते कसं होतं आणि आत्ता देवकीताई जसं आता गातात यात झालेला बदल त्यांनी एकदा गाऊन दाखवला होता. म्हणजे चाल तीच. पण गायिकेचं कोवळं वय ते तीच गायिका वयाच्या चाळीशीनंतर.. हा बदल त्यांनी दाखवला. यातून माझे काव्यानुभव समृध्द झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

'आठवणीतली गाणी'वर आपण शब्द वाचत गाणी ऐकतो. म्हणून गाण्याची निवड करताना प्रथमत: शब्द... मग नंतर चाल, गायकी, संगीत संयोजन, रागाचा वापर वगैरे सगळं. शब्द वाचताना गाणं ऐकण्यात शब्दप्रधान गायकी येते. शब्दांत काव्य असावं लागतं. अशा वेळेस 'कोंबडी-तंगडी' हे यमक खटकतं. त्यामुळे काही लोकप्रीय गीतं जाणीवपूर्वक बाजूला ठेवली आहेत. मराठी संगीताच्या इतिहासात त्यांचं स्वत:चं असं एक स्थान नक्कीच आहे. पण ती गाणी या संकेतस्थळाच्या निवडकक्षेत येत नाहीत, इतकंच.

२००२ साली आम्ही दुबईला राहायला आलो, तेव्हा मी भारतातील माझा अतिशय व्यग्र दिनक्रम मागे ठेवून आले. भारतात संख्याशास्त्र, गणित या विषयांची १४ वर्षं प्राध्यापिका आणि मग ओरॅकल, एएसपी या संगणक क्षेत्रातील विषयांचं व्यावसायिकांना प्रशिक्षण देणं अशी कामं करत होते. त्यामुळे सळसळती बुध्दिवादी तरुणाई आसपास असे. दुबईत आले आणि हे सगळं एकदम संपलं.

त्या काळात मराठी फाँट्स इंटरनेटवर उपलब्ध नव्हते, फारसे प्रचलित नव्हते. तो प्रयोग करून पाहावा, म्हणून लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या गाण्यांची एक जुनी वही शोधली. सुमारे ३५० गाणी असतील. अगदी नेहमीची. आपल्या सगळयांच्या हृदयाजवळची. ती संगणावर टंकलेखित केली. आपल्या स्नेही-संबंधितांपर्यंत ती पोहोचवावी, म्हणून त्यांची एक वेबसाइट केली. त्यास सहज नाव दिलं, 'आठवणीतली गाणी'. वेबसाइट करणं हा माझा भारतात शिकवण्याचा विषय होता, म्हणून मला हे काही अवघड नव्हतं. हा प्रयोग फार अनोखा वाटल्याने पहिल्याच महिन्यात ज्योत्स्ना नगरकर या माझ्या मैत्रिणीने 'गल्फ न्यूज' या मध्यपूर्वेतील प्रसिध्द दैनिकात त्याची दखल घेतली आणि आपण हाती नेमकं काय घेतलं आहे, याची जाणीव झाली.

'मनाचे मराठे मराठीस ध्याती, हिची जाणुनी योग्यता थोरवी' हे संपूर्ण सत्य आहे. अशा सर्व महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगभरातील, मरहट्टयांच्या ई-मेल्सचा धबधबा सुरू झाला. प्रोत्साहन, अपेक्षा यांनी ती भरून असायची. माझ्याही उत्साहाला पारावार राहिला नाही. आई मराठीची शिक्षिका असल्याने मिळालेले भाषेचे संस्कार, माझं संगणक तंत्रज्ञानाचं ज्ञान आणि काही वेगळं-अर्थपूर्ण करावं याची वाटणारी ओढ या सगळयांचा मिलाप साधणारं हे माध्यम होतं. मी त्यात बुडी मारण्याचं ठरवलं. वेगवेगळया शक्यतांची दारं उघडली गेली.

'आठवणीतली गाणी' हे संकेतस्थळ सुरुवातीला कसं दिसायचं, ते आत्ता जसं दिसतंय आणि आणखी ६ महिन्यांनी ते कसं असेल.. याचा जर विचार केला तर असं म्हणता येईल - आतापर्यंत ते तीन अतिशय महत्त्वाच्या स्थित्यंतरांतून गेलंय आणि पुढील सहा महिन्यांत आणखी एकातून - चौथ्यातून जाणार आहे. हे बदल दोन प्रकारचे असतात. पहिले संरचनेचे म्हणून दृश्य. हे बदल करताना सौंदर्यवर्धनाबरोबरच भेटकर्त्यांचा वय वर्षे 15 ते वय वर्षं 90 एवढा मोठा वयोगट विचारात घ्यावा लागतो. त्याला कारणही तसंच आहे. एकदा एका नव्व्दीच्या गृहस्थांची ईमेल आली. म्हणाले, आम्ही दोघं नवरा-बायकोच राहतो. 'आठवणीतली गाणी' हा आमचा दिनक्रम आहे. पण आमचा जुना संगणक चालेना, म्हणून नवा लॅपटॉप घेतला, तर आता काही अडचण येते आहे. हा माझा फोन नंबर. खरं तर ते मुंबईत, ठाण्याला. मी दुबईला. पण मी फोन केला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी बोलले आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांची अडचण दूर करून दिली.

दुसरे बदल हे ही वेबसाइट तयार करण्याकरिता जे तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे, त्यात होणारे बदल. आता मोबाइल्सचा जमाना आहे. इंटरनेटवर जाणं हे लॅपटॉपपेक्षा मोबाइल उपकरणावरून अधिक घडतं. त्या पध्दतीचे काही बदल लवकरच होतील.

सध्या 'आठवणीतली गाणी'वर ३१००हून थोडी अधिक गाणी आहेत. पहिली 1000 गाणी शोधणं फारसं अवघड नाही गेलं. पण हा संच अगदी निवडक गाण्यांचा असावा, म्हणून त्यानंतरची निवड फारच काळजीपूर्वक होत आहे. जसं काही प्रत्येक गाण्याला आपली निवड इथे का व्हावी हे जणू सिध्द करायला लागत असावं.

आतापर्यंत 'आठवणीतली गाणी'चा उल्लेख मी 'माझं' म्हणून केला, ते केवळ त्याची संकल्पना आणि संचलन मी करते म्हणून. आज ते 'आपलं' वाटणाऱ्याची रसिक-प्रेमीजनांची संख्या जगभर पसरली आहे. ते ई-मेल्समधून 'आपण असं करायचं का?', 'आपल्या साइटवर ते गाणं नाहीये' असा उल्लेख करतात. या सगळया आपलेपणाचा सन्मान म्हणून गेल्या वर्षीपासून आपण एक टॅगलाइन वापरणं चालू केलं आहे. 'आठवणीतली गाणी... आपल्या सगळयांची, आपल्या सगळयांसाठी.' हा आपलेपणा माझ्या ऊर्जेचा स्रोत आहे, माझी प्रेरणा आहे.

वेबसाइटवरील 'अभिप्राय' विभागात गेल्या १४ वर्षांत कळवले गेलेले अगदी निवडक अभिप्राय दिले आहेत. त्यावरून कल्पना येते किती वेगवेगळया कारणांसाठी, किती तीव्रतेने हे संकेतस्थळ अनेकांना भिडतं. हे व्यक्त होण्यासाठी या संकेतस्थळाची फेसबुक, गूगल प्लस आणि टि्वटर पेजेस आहेत. त्यावरून तुम्ही संपर्कात राहू शकता अथवा वेबसाइटवरून ईमेल पाठवू शकता.

'आठवणीतली गाणी' वेबसाइट ही मी करत असलेल्या अनेक 'उद्योगां'पैकी एक आहे. बौध्दिक, शारीरिक आणि सर्जनशीलता या तिन्ही पातळयांवर स्वत:ला तपासून पाहणं मला खूप आवडतं. हिमालयातले अती उंच डोंगर चढणं, लांब पल्ल्याचं पळणं, क्वचित कधी ब्लॉग्ज लिहिणं, क्रोशे विणकाम हे माझे फार जिव्हाळयाचे विषय आहेत.

मराठी लोकसंगीत, संतवाङ्मय, नाटयसंगीत, भावसंगीत ही परंपरा फार थोर, उज्ज्वल आणि समृध्द आहे. दिसागणिक त्यात भर पडत असते. शाहिरी रचना ते आजची चित्रपट गीतं आणि jingles हा फार मोठा कालखंड आहे. ही वाट चालले असंख्य कलाकार.. त्यांच्या कामाचा आवाका पाहिला की मन भरून येतं. करावं तितकं कमी. 'देता किती घेशील दो करांनी' अशी अवस्था. एक निकष म्हणून ज्या पदरचनांच्या ध्वनिमुद्रिका आहेत, ज्यांचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, केवळ त्यांचाच विचार 'आठवणीतली गाणी'साठी केला जातो.

जे आजचं ते उद्याच्या आठवणीतलं.....
ही सेवा अविरत करता येवो, हीच प्रार्थना !

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS