Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

आठवणीतली गाणी साठवताना


साप्‍ताहिक विवेक - दिवाळी अंक २०१७
'या आठवणीतल्या गाण्यांमुळे ICUतून ढगांत जाता जाता वाचलो. येथील गाणी ऐकणे ही माझ्यासाठी थेरपी होती.' किंवा 'मी २२ वर्षांची असताना माझ्या दोन्ही कानांची ऐकण्याची क्षमता गेली. मी hearing handicapped आहे. पण 'आठवणीतली गाणी'मुळे मला खूप गाणी वाचता व गुणगुणता येतात. रोजचा दिवस एका तरल आनंदात जातो.'

कधी अशी थेट भावनेला हात घालणारी ईमेल्स येतात, तर कधी 'लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला - हे बालगीत माझे आजोबा नारायण गोविंद शुक्ल यांनी लिहिलं आहे. ते कसबा पेठ, पुणे इथे राहतात. मी निमिषा, त्यांची नात. त्यांच्यासह आम्हां सगळयांना फार आनंद झाला की असा एक गीतसंग्रह असावा आणि त्यात स्थान मिळवून या गाण्याचा आनंद समस्तांस घेता यावा.' किंवा 'इतकी वर्षे गाणी म्हणतेय. म्हणजे तो माझा व्यवसायच आहे. पण शब्दांच्या अचूकतेकडे कधी फारसं लक्ष दिलं गेलं नाही. आता 'असोवरी मेखला' यासारखे शब्द अगदी बरोबर आणि अर्थ समजून गायल्याने माझे गायन अधिक परिणामकारक होते.' यासारखे निरोप....

थोडक्यात काय, 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळाला नियमित भेट देणाऱ्याने एकाने म्हटलं आहे तसं, 'ही वेबसाइट माझ्या कामाची नाही असं कुणीही म्हणू शकत नाही.'

जशी तुमची प्रकृती/प्रवृत्ती, तसा तुम्ही अनुभव घ्यावा. आता 'आपली आवड'सारख्या कार्यक्रमासाठी रेडिओवर अवलंबून राहण्याची गरज नाही.. फक्त आपल्याला आवडणाऱ्या गीतांची निवड करावी आणि ती मनसोक्त ऐकावी..

हे आता सहज शक्य झालंय ते 'आठवणीतली गाणी'मुळे (www.aathavanitli-gani.com).

ही वेबसाइट तयार करणं, चालवणं हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. एकीकडे मराठीतील गीतरत्नं शोधावी, दुसरीकडे बदलतं तंत्रज्ञान शिकावं - ते 'आठवणीतली गाणी'वर अंमलात आणावं, असा समन्वय साधत माझा प्रवास चालू आहे. यांस अनेकविध मार्गांनी कसं संपन्न करता येईल, हा सजग विचार सतत मनात असतो.

चौदा वर्षं झाली. सुरुवातीला फक्त गाण्यांचे शब्द लिखित स्वरूपात होते. आता तेवढंच सीमित राहिलेलं नाही. अवघड शब्दांचे अर्थ, ब्लॉग, संदर्भलेख, संतांच्या रचनांचा भावार्थ, विविध गायकांनी केलेले एकाच गाण्याचे स्वराविष्कार, गीताचा राग असे अनेक आयाम जोडले गेले. जिथे गाणी ऐकता येतात अशी अनेक संकेतस्थळं आंतरजालावर उपलब्ध आहेत. पण वर दिलेल्या आपल्याच अशा खास वैशिष्टयांमुळे 'आठवणीतली गाणी'चं स्थान अनन्य असं आहे. उपलब्ध माहिती दुर्मीळ आणि अनुभव संपन्न आहे.

या निमित्ताने अनेक कलाकारांच्या, त्यांच्या वारसदारांच्या, अभ्यासूंच्या भेटी घडत असतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक चर्चा या गीतरचनांवर वेगवेगळा प्रकाशझोत टाकते. तसंच खूप वाचनही घडतं. मध्यंतरी वि.स. खांडेकर यांचा एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी कुसुमाग्रजांच्या 'पाचोळा' कवितेविषयी लिहिलं आहे. त्यांचीच प्रस्तावना असलेल्या 'विशाखा' या कविता संग्रहातील ही कविता. तिचा त्यांनी लावलेला अर्थ, कवी मायदेव यांना वाटलेला सापेक्ष अर्थ आणि खुद्द कवीच्या मनातील कविता लिहितानाची भावना, यातील तफावत याचं गमतीदार वर्णन या लेखात त्यांनी केलं आहे. मग मी पुढे जाऊन पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेची चाल बांधताना कुठला अर्थसंस्कार केला असेल, याचा विचार करू लागले. मग दोन संगीतकार जेव्हा एकाच गाण्याला चाल लावतात तेव्हा त्यांचा काय विचार असेल? तसंच एकच गाणं दोन गायक गातात त्यातून मिळणारा आनंद.. हे सर्व रसिक श्रोत्यांना पोहोचवणं फार महत्त्वाचं आहे, असं मला वाटलं. ही सर्व माहिती 'आठवणीतली गाणी'वर वेळोवेळी संकलित केल्याने तिचा विस्तार एकसुरी राहिलेला नाही.

गदिमांच्या शब्दांचा आधार घेऊन या माझ्या उपक्रमाचं वर्णन असं करता येईल -
ज्ञानदेविच्या, मराठियेच्या नगरीतून हिंडून,
आणिले टिपुनी अमृतकण

'आठवणीतली गाणी' संपूर्णत: अव्यावसायिक तत्त्वावर आहे. म्हणजे non-commercial, non-profit. या कामासाठी कुणाकडूनही आर्थिक किंवा कुठल्याही स्वरूपात मोबदला घेतला जात नाही. त्यामुळे इथे जाहिरातींचा गोंधळ नाही.

तसंच इथल्या पानांवर भेट देणाऱ्यांचे अभिप्राय, टिप्पण्या नाहीत. त्यामुळे 'आठवणीतली गाणी' हा एक निवांत असा अनुभव आहे. येथे भेट देणं अनेकांना मन शांत करण्यास मदत करणारं वाटतं. असे अभिप्राय येतच असतात. श्री. आबा पाटील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना नेमक्या याच कारणासाठी अनेक वेळा ते येथील गाणी ऐकत असत. त्यांनी तसं कळवलं होतं. काही मानसोपचारतज्ज्ञ, संगीत आवडणाऱ्यांना या संकेतस्थळाला मुद्दामहून भेट देण्यास सांगतात. तो त्यांच्या उपचार पध्दतीचा एक भाग झाला आहे. म्हणूनच 'आठवणीतली गाणी'च्या दृश्य स्वरूपात कुठलाही बदल करताना या अनुभवास धक्का लागणार नाही याचं भान मी नेहमी ठेवते.

गाणी ऐकणं, त्यांचे शब्द लिहिणं, मग कधी अडल्यानडल्या शब्दांचे अर्थ शोधणं हा माझा नेम. यातून मी संकेतस्थळावर शब्दार्थ देणं चालू केलं. आणि ते देणं चालू केलं, म्हणून मी शब्दार्थांच्या अधिक खोलात जायला लागले. 'ॠतू हिरवा, ॠतू बरवा' - शांताबाईंची ही रचना आशाताई आणि पं. हृदयनाथ यांनी घराघरातील लहानमोठयांपर्यंत नेऊन पोहोचवली आहे. पण त्यातील 'बरवा' हा शब्द प्राकृतातून येतो. आजकाल आपण वापरत नाही. 'तो हा विठ्ठल बरवा..' बरवा म्हणजे छान, सुंदर. हा अर्थ मुद्दामहून नमूद केल्याशिवाय सहजी त्याकडे लक्ष जात नाही.

कधी गाण्यातला एखादा शब्द वर्षानुवर्षं अडतो, तर कधी एखादा शब्द नव्यानेच उलगडतो. हेच पाहा, गदिमांचं सर्वांचं तोंडपाठ असलेलं, 'गोरी गोरी पान, फुलासारखी छान' हे बालगीत. यात एक ओळ अशी आहे - 'चांदण्याच्या पदराला बिजलीचा ...' अनेक जण 'बिजलीचा बाण' म्हणतात. कुणी 'बिजलीचा मान' म्हणतात. गदिमांनी 'बिजलीचा वाण' लिहिलं आहे. 'वाण' इथे 'वर्ण' या अर्थाने येतो. यासाठी मला बरीच शोधाशोध करावी लागली. 'वाण' हा शब्द वस्त्रोद्योगात नमुना किंवा आडवा धागा या अर्थाने येतो. श्रावणातल्या सणासुदीला 'वाण' स्त्रिया 'वसा' म्हणून देतात. हे कुठेच इथे बसत नाही. मग कधीतरी पी. सावळारामांच्या एका गीतात तो वापरलेला सापडला. ते म्हणतात, 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा'. सगळा उलगडा होण्यास ते पुरेसं होतं.

ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली. पहिले मला पितृस्थानी, तर दुसरे गुरुस्थानी. दोघांचीही सांगीतिक कारकिर्द जवळपास सहा दशकांची. दोघांनीही अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलेलं. मराठी भावसंगीताच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचे ते साक्षीदार. काही वेगळं, चांगलं घडण्यास आणि घडवणाऱ्यास प्रोत्साहन देण्याची दोघांचीही वृत्ती असल्याने दोघांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्याबरोबर घडलेल्या गप्पा नेहमी दिशादर्शक ठरल्या. कवी सुधीर मोघे यांच्याकडे गेले की हा एक प्रश्न नेहमी चर्चेत असायचा. 'गाणं नेमकं कोणाचं? संगीतकाराचं की गायकाचं?' इथे 'चर्चा' किंवा 'गप्पा' म्हणणं खरं तर अवघड अशासाठी, की ते बोलायचे, खूप सांगायचे आणि मी ऐकायचे. त्यांच्या मते गाणं हे त्याच्या अंतिम टप्प्यात रसिकांचंच होतं. ते तसं व्हायलाच हवं. पण कवी आणि संगीतकार या दोघांच्या भूमिकांबद्दलची तौलनिक मतं ते स्वत:च मांडायचे. देवकीताई पंडित यांना त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी सुधीर भटांची त्यांनीच संगीत दिलेली गझल 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' गायला शिकवली. ते कसं होतं आणि आत्ता देवकीताई जसं आता गातात यात झालेला बदल त्यांनी एकदा गाऊन दाखवला होता. म्हणजे चाल तीच. पण गायिकेचं कोवळं वय ते तीच गायिका वयाच्या चाळीशीनंतर.. हा बदल त्यांनी दाखवला. यातून माझे काव्यानुभव समृध्द झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

'आठवणीतली गाणी'वर आपण शब्द वाचत गाणी ऐकतो. म्हणून गाण्याची निवड करताना प्रथमत: शब्द... मग नंतर चाल, गायकी, संगीत संयोजन, रागाचा वापर वगैरे सगळं. शब्द वाचताना गाणं ऐकण्यात शब्दप्रधान गायकी येते. शब्दांत काव्य असावं लागतं. अशा वेळेस 'कोंबडी-तंगडी' हे यमक खटकतं. त्यामुळे काही लोकप्रीय गीतं जाणीवपूर्वक बाजूला ठेवली आहेत. मराठी संगीताच्या इतिहासात त्यांचं स्वत:चं असं एक स्थान नक्कीच आहे. पण ती गाणी या संकेतस्थळाच्या निवडकक्षेत येत नाहीत, इतकंच.

२००२ साली आम्ही दुबईला राहायला आलो, तेव्हा मी भारतातील माझा अतिशय व्यग्र दिनक्रम मागे ठेवून आले. भारतात संख्याशास्त्र, गणित या विषयांची १४ वर्षं प्राध्यापिका आणि मग ओरॅकल, एएसपी या संगणक क्षेत्रातील विषयांचं व्यावसायिकांना प्रशिक्षण देणं अशी कामं करत होते. त्यामुळे सळसळती बुध्दिवादी तरुणाई आसपास असे. दुबईत आले आणि हे सगळं एकदम संपलं.

त्या काळात मराठी फाँट्स इंटरनेटवर उपलब्ध नव्हते, फारसे प्रचलित नव्हते. तो प्रयोग करून पाहावा, म्हणून लहानपणी रेडिओवर ऐकलेल्या गाण्यांची एक जुनी वही शोधली. सुमारे ३५० गाणी असतील. अगदी नेहमीची. आपल्या सगळयांच्या हृदयाजवळची. ती संगणावर टंकलेखित केली. आपल्या स्नेही-संबंधितांपर्यंत ती पोहोचवावी, म्हणून त्यांची एक वेबसाइट केली. त्यास सहज नाव दिलं, 'आठवणीतली गाणी'. वेबसाइट करणं हा माझा भारतात शिकवण्याचा विषय होता, म्हणून मला हे काही अवघड नव्हतं. हा प्रयोग फार अनोखा वाटल्याने पहिल्याच महिन्यात ज्योत्स्ना नगरकर या माझ्या मैत्रिणीने 'गल्फ न्यूज' या मध्यपूर्वेतील प्रसिध्द दैनिकात त्याची दखल घेतली आणि आपण हाती नेमकं काय घेतलं आहे, याची जाणीव झाली.

'मनाचे मराठे मराठीस ध्याती, हिची जाणुनी योग्यता थोरवी' हे संपूर्ण सत्य आहे. अशा सर्व महाराष्ट्रातील, भारतातील आणि जगभरातील, मरहट्टयांच्या ई-मेल्सचा धबधबा सुरू झाला. प्रोत्साहन, अपेक्षा यांनी ती भरून असायची. माझ्याही उत्साहाला पारावार राहिला नाही. आई मराठीची शिक्षिका असल्याने मिळालेले भाषेचे संस्कार, माझं संगणक तंत्रज्ञानाचं ज्ञान आणि काही वेगळं-अर्थपूर्ण करावं याची वाटणारी ओढ या सगळयांचा मिलाप साधणारं हे माध्यम होतं. मी त्यात बुडी मारण्याचं ठरवलं. वेगवेगळया शक्यतांची दारं उघडली गेली.

'आठवणीतली गाणी' हे संकेतस्थळ सुरुवातीला कसं दिसायचं, ते आत्ता जसं दिसतंय आणि आणखी ६ महिन्यांनी ते कसं असेल.. याचा जर विचार केला तर असं म्हणता येईल - आतापर्यंत ते तीन अतिशय महत्त्वाच्या स्थित्यंतरांतून गेलंय आणि पुढील सहा महिन्यांत आणखी एकातून - चौथ्यातून जाणार आहे. हे बदल दोन प्रकारचे असतात. पहिले संरचनेचे म्हणून दृश्य. हे बदल करताना सौंदर्यवर्धनाबरोबरच भेटकर्त्यांचा वय वर्षे 15 ते वय वर्षं 90 एवढा मोठा वयोगट विचारात घ्यावा लागतो. त्याला कारणही तसंच आहे. एकदा एका नव्व्दीच्या गृहस्थांची ईमेल आली. म्हणाले, आम्ही दोघं नवरा-बायकोच राहतो. 'आठवणीतली गाणी' हा आमचा दिनक्रम आहे. पण आमचा जुना संगणक चालेना, म्हणून नवा लॅपटॉप घेतला, तर आता काही अडचण येते आहे. हा माझा फोन नंबर. खरं तर ते मुंबईत, ठाण्याला. मी दुबईला. पण मी फोन केला. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी बोलले आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांची अडचण दूर करून दिली.

दुसरे बदल हे ही वेबसाइट तयार करण्याकरिता जे तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे, त्यात होणारे बदल. आता मोबाइल्सचा जमाना आहे. इंटरनेटवर जाणं हे लॅपटॉपपेक्षा मोबाइल उपकरणावरून अधिक घडतं. त्या पध्दतीचे काही बदल लवकरच होतील.

सध्या 'आठवणीतली गाणी'वर ३१००हून थोडी अधिक गाणी आहेत. पहिली 1000 गाणी शोधणं फारसं अवघड नाही गेलं. पण हा संच अगदी निवडक गाण्यांचा असावा, म्हणून त्यानंतरची निवड फारच काळजीपूर्वक होत आहे. जसं काही प्रत्येक गाण्याला आपली निवड इथे का व्हावी हे जणू सिध्द करायला लागत असावं.

आतापर्यंत 'आठवणीतली गाणी'चा उल्लेख मी 'माझं' म्हणून केला, ते केवळ त्याची संकल्पना आणि संचलन मी करते म्हणून. आज ते 'आपलं' वाटणाऱ्याची रसिक-प्रेमीजनांची संख्या जगभर पसरली आहे. ते ई-मेल्समधून 'आपण असं करायचं का?', 'आपल्या साइटवर ते गाणं नाहीये' असा उल्लेख करतात. या सगळया आपलेपणाचा सन्मान म्हणून गेल्या वर्षीपासून आपण एक टॅगलाइन वापरणं चालू केलं आहे. 'आठवणीतली गाणी... आपल्या सगळयांची, आपल्या सगळयांसाठी.' हा आपलेपणा माझ्या ऊर्जेचा स्रोत आहे, माझी प्रेरणा आहे.

वेबसाइटवरील 'अभिप्राय' विभागात गेल्या १४ वर्षांत कळवले गेलेले अगदी निवडक अभिप्राय दिले आहेत. त्यावरून कल्पना येते किती वेगवेगळया कारणांसाठी, किती तीव्रतेने हे संकेतस्थळ अनेकांना भिडतं. हे व्यक्त होण्यासाठी या संकेतस्थळाची फेसबुक, गूगल प्लस आणि टि्वटर पेजेस आहेत. त्यावरून तुम्ही संपर्कात राहू शकता अथवा वेबसाइटवरून ईमेल पाठवू शकता.

'आठवणीतली गाणी' वेबसाइट ही मी करत असलेल्या अनेक 'उद्योगां'पैकी एक आहे. बौध्दिक, शारीरिक आणि सर्जनशीलता या तिन्ही पातळयांवर स्वत:ला तपासून पाहणं मला खूप आवडतं. हिमालयातले अती उंच डोंगर चढणं, लांब पल्ल्याचं पळणं, क्वचित कधी ब्लॉग्ज लिहिणं, क्रोशे विणकाम हे माझे फार जिव्हाळयाचे विषय आहेत.

मराठी लोकसंगीत, संतवाङ्मय, नाटयसंगीत, भावसंगीत ही परंपरा फार थोर, उज्ज्वल आणि समृध्द आहे. दिसागणिक त्यात भर पडत असते. शाहिरी रचना ते आजची चित्रपट गीतं आणि jingles हा फार मोठा कालखंड आहे. ही वाट चालले असंख्य कलाकार.. त्यांच्या कामाचा आवाका पाहिला की मन भरून येतं. करावं तितकं कमी. 'देता किती घेशील दो करांनी' अशी अवस्था. एक निकष म्हणून ज्या पदरचनांच्या ध्वनिमुद्रिका आहेत, ज्यांचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, केवळ त्यांचाच विचार 'आठवणीतली गाणी'साठी केला जातो.

जे आजचं ते उद्याच्या आठवणीतलं.....
ही सेवा अविरत करता येवो, हीच प्रार्थना !

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS