Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label Featured. Show all posts
Showing posts with label Featured. Show all posts

शाळा


कितीतरी कित्‍ते शाळेत गिरवले असतील.
कितीतरी धडे शिकवले गेले असतील.
कित्‍ते गिरवण्याने अक्षराला वळण लागलं, हे खरं.
काही धडे फक्‍त समजले.. उमजले कधीच नाहीत.
पण ती शाळा होती आणि अभ्यास हा शब्द, 'पाठांतर' या शब्दाला समांतर जात होता.
लेखी, तोंडी परीक्षा करत शाळा संपली.

म्हणजे, फक्त तसं वाटलं.
शाळेतल्या बाईंची जागा अनुभवांनी घेतली आणि शाळा चालूच राहिली.
त्यातील काही धडे आपणहून, आवड म्हणून शिकले.
काही शिकवले गेले, शिकावेच लागले.
काही मात्र कितीवेळा शिकवले गेले तरी डोक्यात शिरतच नाहीत.
जसा २९ चा पाढा.

शाळेनंतरच्या प्रवासात मला वळण लावणार्‍या,
माझी सतत ’शाळा’ घेणार्‍या माझ्या अनुभवांचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी खास आभार.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

अबोध काहीसे


खिडकीच्या काचेवर टकटक.... कसं शक्य आहे? आत्ता पर्यंत असं कधीच झालं नाही आणि होणं अवघडही.... इतक्या उंचावर कोण येणार?
चक्क चिमणी.

आता भारतातून दिसेनाशी होऊ लागलेली चिऊताई.... इथे दिसते क्वचित कधी.... पण आमच्या घराच्या खिडकीच्या बाहेर प्रथमच.... आमच्या दोघींमध्ये जाड काचेची भिंत.

एवढासा जीव.... काचा उघडूच शकत नाही अशा खिडकीच्या बाहेर, तितक्याच पिटुकल्या आधाराला टेकलेला.... कृष अंगकाठी.... ही आजकालच्या फॅशनला धरून जाणीवपूर्वक की कुपोषीत? पाणी हवंय का हिला? द्यावं तरी कसं? माझं इतकं जवळ जाणं तिला घाबरवत कसं नाही? एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे बघताना मधूनच चोचीने काचेवर केलेली टकटक आणि मधल्या काचेमुळे muted वाटणारी चिवचिव....

काही सांगायचंय का हिला? पण चिमण्या कुठे बोलतात? म्हणजे विचार तरी करू शकतात का? जवळ-जवळ १० मिनिटे चाललेली ही interaction संपूर्णत: निरुद्देष्य कशी असेल?
आमचं घर ३० व्या मजल्यावर, म्हणून मला काही आकाश तितकंसं जवळ नाही.... माझ्या भोवती माझ्या घराच्या भिंती.... तिचं अभाळही तितकं मोकळं नव्हतं का?
हा ’या हृदयीचे- त्या हृदयी’ असा संवाद की.... कल्पनेच्या विलासाला लागलेले चिमणीचे पंख?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Husbands


Parking lot full. अत्यंत सवकाश गाडी चालवत शोध घेणे चालू होते. तेवढ्यात अगदी अनपेक्षीत, एका गाडीने बाहेर निघण्यासाठी reverse घेतला आणि गाडीला गाडी टेकली... दोन्ही गाड्या खूपच slow असल्याने जे घडलं त्याला accident म्हणणं अवघड होतं. भारतात अशा वेळेस, दोन-चार अपशब्दांची देवाण-घेवाण होऊन दोघेही मार्गस्थ झाले असते.

ह्या देशातील नियमांप्रमाने पोलीस रिपोर्ट घेणे आवश्यक होते. आता चांगला अर्धा-पाऊण तास वाया जाणार तर... गाड्या as-it-is स्थितीत ठेवून दुसऱ्या गाडीतील जो कोणी असेल, तो driver खाली उतरेल आणि पोलीसांना फोन करेल, अशी वाट पहायला लागले. म्हणजे इथे तशा police instructions आहेत. कितीही मोठी ठोकाठोकी असली तरी, involved महिलेने गाडीतून खाली उतरायचे नाही. पण दुसऱ्या गाडीतून सुद्धा कोणी उतरेना. अच्छा, म्हणजे हा आम्हां दोन बायकांचा पराक्रम होता तर.

पोलीसांना फोन केला का, हे विचारायला दुसऱ्या गाडीपाशी गेले. ती जरा अस्वस्थ वाटली. कदाचित नवशिकी असावी. तिची गाडी reverse घेताना धडकली म्हणजे तिला papers मिळतील म्हणून घाबरली असावी. म्हंटलं, "Its OK. Don't worry."

चेहऱ्यावरचा गॉगल खाली करत म्हणाली, "पता नहीं अब घर जा के क्या क्या होगा । बडी मुश्कील से इतने सालों बाद driving सिखी हूँ । आप शायद समझ सकोगी । वैसे इंडिया के हो या पाकिस्तान के, husbands तो 'husbands' हि होते हैं !!

नेमके कसे react करावे हे न कळल्याने मी चेहऱ्यावर गॉगल चढवला आणि पोलिसांना फोन लावला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

किती तरी दिवसात


"आजकाल कसं झालंय माहिती आहे का... जिस गली में internet ना हो बालमा, उस गली से हमें तो गुजरना नहीं ।"
असं ऐटीत कुणाला तरी म्हंटलं खरं...

पण बदलती जीवनशैली कशी अंगात भिनली आहे, तिच्या चक्रात नकळत कसे गुरफटलो आहोत, याची खाडकन जाणीव झाली.

शाळेत शिकलेली मर्ढेकरांची कविता, तेव्हा जेवढी समजली नाही त्याच्या कैक पटीने आज समजली.


किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो;
किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय

आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा इथे, दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची शिरी धार, मुखी ऋचा !

- बा. सी. मर्ढेकर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

एक स्पर्श...


एक स्पर्श.. जीवनाचा... चिमुकला, लुसलुशीत... कुशीत वाढणारा.
एक स्पर्श.. सुरकुतल्या, थरथरत्या हातांचा... उबदार क्षमेचा.
एक स्पर्श.. कोऱ्या करकरीत कागदावरील छापील अक्षरांचा... उत्सुकता वाढवणारा.
एक स्पर्श.. वाकून केलेला, सश्रद्ध, आशादायी... त्या निराकाराच्या मूर्त रूपास.
एक स्पर्श.. नाळ तुटण्याआधीपासून ओळखीचा... मायेने ओथंबलेला.
एक स्पर्श.. मूल्य असलेल्या कागदांचा. भौतीक अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येणारा.
एक स्पर्श.. गर्भ रेशमी पदराचा... खानदानी, शालीन... आदराने मान आपसूक झुकवणारा.
एक स्पर्श.. कातर संधीप्रकाशातील गूढ सावल्यांचा... काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भीतीचा.
एक स्पर्श.. गर्दीतला... असभ्य, किळसवाणा, अपवित्र.
एक स्पर्श.. निखळ, सुंदर मैत्रीचा... स्‍त्री-पुरुष भेदाभेद निर्थक ठरवणारा.
एक स्पर्श.. चमकत्या, झळाळत्या धातुचा... मोहमयी.
एक स्पर्श.. लख्ख... मनातला अंध:कार नाहीसा करणाऱ्या ज्ञानाचा.
एक स्पर्श.. काळ्याभोर सृजनतेचा. आकाशाला गवसणी घालू पाहताना पायाखालील भक्कम आधाराचा.
एक स्पर्श.. चांदण्याचा... दिल्या-घेतल्या वचनांचा, जन्मसोबतीचा.
एक स्पर्श.. वरवर कठोर... शिस्त, धाक असल्या शब्दांच्या आडून दिलेल्या अनुभवी सल्ल्यांचा.
एक स्पर्श.. हरवलेला... आठवांच्या तुडुंबात बुडून धूसर होत गेलेला.
एक स्पर्श.. थंड... निर्वाणीचा. पारलौकिकाच्या दिशेने घेऊन जाणारा.


Related posts :   वाफ

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

वाफ


समोरच्या पातेल्यात भाजी शिजत होती. तिचं ते खदखदणं तिच्या भोवती आणखीनच वाफ निर्माण करत होतं. त्या गच्च साठलेल्या वाफेचा दाब वरचं झाकण मुकाट सहन करण्याच्या प्रयत्नात... पण तो ताण असह्य झाला की ते बापडं किंचित उडी मारायचं आणि आतल्या थोड्याशा वाफेला बाहेर जाऊ द्यायचं. ना त्या वाफेला धग जास्त ना जोर. नुसती मधुनच 'बुडुक' करून बाहेर पडणार. कुणाला दुखावण्याची क्षमताच तिच्यात नव्हतीच.
..... हे सगळं कसं घरातल्या एखाद्या गृहीत धरलेल्या स्त्री सारखं. तिचा वैताग, अस्वस्थता ती शक्यतो आतल्याआतच ठेवणार. बाहेर पडेल तेव्हासुद्धा 'minor irritation' च्या पलीकडे त्याचं कुणालाच महत्त्व नाही.

शेजारीच प्रेशर कुकर. त्यातल्या वाफेचं वागणं पण त्याच्याच सारखं भारदस्त. उगीच अधेमधे बाहेर पडणार नाही. आतल्या आत शांतपणे जमत राहील. पण जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मात्र जोरात. आवाज करत. सगळं घर दणाणून सोडत. तरीही केव्हा थांबायचं हे ह्या वाफेला पक्कं माहिती. हिचा safety valve शक्यतो उडत नाही.
..... जशी कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती. कुठे, केव्हा, किती आवाज चढवायचा यावर संपूर्ण ताबा.

तिस-या शेगडीवरच्या तव्यावर पोळी. हिच्या वाफेला फारसा जोर नाही. पण कुठुन, कधी बाहेर पडेल ते सांगता येत नाही. चटका लावून जाणं हिला चांगलं जमतं. मग हात पाण्याखाली गेला तरी झालेल्या जखमेची हुळहुळती जाणीव बराच वेळ रहाणार. ही मात्र करूनसवरून नामानिराळी.
..... जशी एखादी चंट, तैयार, सगळ्यांना पुरून उरणारी ठमाकी. या unpredictable, hurting nature मुळे सगळे हिच्याशी जपून वागणार.

प्रत्येक वाफेची बाहेर पडण्याची पद्धत वेगळी, परिणाम वेगळा. पण बाहेर पडणं मात्र आवश्यक.

माणसाचं खदखदणारं मन. तिथं साचणारी वाफ.. तिचाही निचरा होणं नितांत गरजेचं. नाही तर काही काळाने depression चा स्फोट किंवा करपलेलं मन !!
पण त्या वाफेची बाहेर पडण्याची पद्धत, हा मात्र ज्याचा त्याचा choice.


Related posts :   एक स्पर्श

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

बाबुराव


त्याचं ते आगंतुक येणं कोणालाच आवडलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यादेखत तो सुळकन्‌ घरात घुसला आणि कुठेतरी दडी मारून बसला. मूषक-पुत्रच तो... त्याला लपायला कितिकसा वेळ आणि जागा लागणार !

त्याच्या येण्याने रंगलेल्या गप्पांवर एकदम विरजण पडलं. फटाफट बाकीच्या खोल्यांची दारं बंद झाली. खालच्या फटींना सतरंज्या, चादरी लावण्यात आल्या. घरातले आई-बाबा काठी, कुंचा असली आयुधं घेऊन लढाईच्या पवित्र्यात उभी राहिली. छोट्या दोघांना गप्प बसण्याचा, हालचाल न करण्याचा सज्जड दम भरण्यात आला.

तो अतिशय चपळ आणि उत्साही होता. शेवटी पोरंच ते... कोणाचं का असेना ! त्याच्यासाठी सुरुवातीला हा लपंडावाचा खेळच होता... मग कुठे तो दमायला लागल्यावर त्याला हा जीवन-मरणाचा खेळ असल्याचं लक्षात आलं.

या युद्ध सदृश्य परिस्थितीत साधारणत: दोन तास गेले असतील. तेवढ्यात त्याने कुठली तरी एक फट मिळवली आणि आजोबांच्या खोलीत जीवाच्या आकांताने पळ काढला. सगळे हताश होऊन बसले.

तेवढ्यात कुणीतरी म्हंटलं, "बाबुराव आता अजोबांबरोबर वामकुक्षी घेतील."
"कोण बाबुराव ?"
"तेच ते. उंदराचं पिल्लू. रहाणारच आहे काही काळ आपल्याबरोबर तर त्याला एक छानसं नावच देऊ की."

त्या एका वाक्याने वातावरणातला ताण नाहिसाच झाला. मग काय, बाबुरावांच्या हालचालींचं live reporting कुणी न कुणी तरी द्यायला सुरुवात केली.
"बाबुरावांनी मुक्काम सध्या सोफ्याखाली हलवला आहे."
"कपाटाखालून बाबुरावांचे डोळे काय पण चमकतात !"
"बाबुरावांचा रंग काय मस्त shimmering black आहे. आई, same ह्याच colour चा dress हवाय मला."
"बाबांनी बाबुरावांची सुंदर कोंडी केली होती पण बाबांच्या हातावर तुरी देण्यात बाबुराव यशस्वी झाले आहेत."

दोन दिवसांनी घरातल्या छोटूचा फोन आला. "sad news आहे. बाबुराव expired. आम्हाला खरं तर त्यांना मारायचं नव्हतं, नुसतं घराबाहेर घालवायचं होतं. पण फटका जरा जोरातच लागला. मी आणि ताईने खाली एक खड्डा खणून त्यांना burial दिलं. वरती फुलं पण ठेवली. आज बाबुराव नाहीत तर घर कसं शांत शांत वाटतंय्‌."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Sorted ?


"एकदा नं डोकं आवरायला काढलं पाहिजे. नुसताच पसारा झालाय. सगळा वैचारीक गोंधळ."
"ते शक्य नाही.. त्यासाठी आधी तुला पसाऱ्याच्या definition पासून सुरुवात करायला लागेल."
"???"
"एखादी वस्तू त्याच्या जागेवर नसणं म्हणजे पसारा... बरोबर?"
"हो. तेच तर झालंय. सगळे कसे अस्ताव्यस्त, विखुरलेले विचार."
"पण त्यांच्या अशा ठरलेल्या जागा असतातच कुठे?"
"हं. कमीत कमी नासके, कुजके, खराब काढून तरी टाकता येतील."
"असं वाटतं तुला ? खरं सांगतो, विचारांचं मांजरासारखं असतं. घरात नको म्हणून कितीही दूर सोडून आलं तरी आपण घरी पोहोचायच्या आत ते आपल्या घरात."
"मग काही सुजलेले, bloated.. अवास्तव महत्व मिळाल्याने गर्विष्ठ झालेले.. त्यांची तरी हवा काढून घेते."
"ती जागा दुसरे भरून काढतील. म्हणजे विचारांची पिलावळ आणखीनच वाढणार."
"कमीत कमी sorting तरी?"
"ते कसं? त्यासाठी तुला प्रत्येकावर एक आणि फक्त एकच लेबल लावायला लागेल आणि त्यांना एका जागी ठेवायला लागेल. एकच लेबल लावणं अवघड आहे पण एक वेळ जमेल. एका जागी ठेवणं ? सगळेच विचार भरकटणारे..."

माझा बौद्धिक गुंता आणखीनच वाढवून तो निघून गेला.



Related posts:   Sorted(2),  Sorted (3)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

निरागस


तो त्याच्या वडिलांच्या खांद्यावर होता. डुगडुगणारी मान, गोल गोल डोळे, डोक्यावर तुळतुळीत टक्कल. जवळ जवळ सहा फूट वडिलांच्या खांद्यावर हा जेमतेम सव्वा फूट. वय असेल ५-६ महिने. टुकुर टुकुर डोळ्यांनी सगळीकडे पहाणं चाललं होतं. नजरेत सगळ्या जगाबद्दलची उत्सुकता ठासून भरलेली. माझी प्रत्येक हालचाल निरखून पहात होता.

त्याचं निरिक्षण करण्याच्या नादात २ coke चे cans उचलले आणि shopping trolly मध्ये टाकताना बाजूच्या २ cans ना धक्का लागला. ते खाली पडले. धप्प धप्प असा आवाज झाला. त्याला दचकायला पुरेसा. त्याच्या नजरेत धरणीकंप झाल्याचे भाव. त्याने माझ्याकडे पाहिलं. मला हसूच आलं. त्याने अर्धा क्षण डोळे बारीक केले, कपाळाला आठ्या घातल्या. मग तोंडाचं बोळकं पसरवीत मनापासून, दिलखुलास हसला. हसताना मानेचा तोल गेला. नाक वडिलांच्या खांद्यावर आपटलं, जीवणी भोवतीचा सगळा ओलावा वडिलांच्या शर्टाला पुसला गेला. ह्यावेळेस त्याचं त्यालाच हसू आलं- स्वत:च्या फजितीचं. मग बराच वेळ मान तिरपी करून मला मिश्किल हास्य देत राहिला.

माझ्यासाठीही जग खूप सुंदर झालं. उरलेला संपूर्ण दिवस मोरपीसा सारखा तरंगत, हलका गेला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ती गेली तेव्हा ...


ती गेली तेव्हा ...
खरंच पाऊस रिमझिम निनादत होता. मंद, शांत, गंभीर. तीच्याच सारखा.
खरं तर तिच्या नसण्याची एव्हाना सवय व्हायला हरकत नव्हती.
दोन्ही हातांची बोटं दोनदा वापरावी लागतील ... इतकी वर्षे झालीत.
ती गेली तेव्हा ...
अजून बरंच काही घडलं.
बाबांच्या स्कूटरचं मागचं सीट रिकामं झालं.
अंगणातील ५ रंगांच्या जास्वंदी, मोगऱ्याचा ताटवा, ३ आंब्याची आणि २ नारळाची झाडं कावरी-बावरी झाली.
शेजारच्या रमाचं कैरीचं लोणचं शिकणं अर्धवट राहिलं.
माझ्या लेकाचे 'जावयाचे पोर' म्हणत होत असलेले लाड फार बालपणी संपले.
नवऱ्याच्या तोंडातली चकलीची चव गेली.
ती गेली तेव्हा,
शिल्लक राहिले खूप आवाज.
ते कधी कानात शब्द होऊन घुमतात.
कधी डोक्यातले विचार होतात.
कधी मनावरचे संस्कार,
तर कधी हृदयाची अस्वस्थ धडधड...

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS