कितीतरी कित्ते शाळेत गिरवले असतील.
कितीतरी धडे शिकवले गेले असतील.
कित्ते गिरवण्याने अक्षराला वळण लागलं, हे खरं.
काही धडे फक्त समजले.. उमजले कधीच नाहीत.
पण ती शाळा होती आणि अभ्यास हा शब्द, 'पाठांतर' या शब्दाला समांतर जात होता.
लेखी, तोंडी परीक्षा करत शाळा संपली.
म्हणजे, फक्त तसं वाटलं.
शाळेतल्या बाईंची जागा अनुभवांनी घेतली आणि शाळा चालूच राहिली.
त्यातील काही धडे आपणहून, आवड म्हणून शिकले.
काही शिकवले गेले, शिकावेच लागले.
काही मात्र कितीवेळा शिकवले गेले तरी डोक्यात शिरतच नाहीत.
जसा २९ चा पाढा.
शाळेनंतरच्या प्रवासात मला वळण लावणार्या,
माझी सतत ’शाळा’ घेणार्या माझ्या अनुभवांचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी खास आभार.