वसंत बापट...... काल जन्मदिन.
स्वातंत्र्य सैनिक, प्राध्यापक, ’साधना’ साप्ताहिकाचे संपादक, राष्ट्र सेवा दलाच्या पथनाट्यांतून लोककलांची जोपासना करणारे वसंत बापट.
गीतकार बापट.... विषयांचे इंद्रधनुष्य पेलणारे.
‘गगन सदन तेजोमय’ अशी प्रार्थना करणारे बापट.
‘या पाण्याची ओढ भयानक’ हे आत्मघाती मार्गावरचे मनोगत सांगणारे बापट.
‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ ही स्फूर्ती देणारे बापट.
‘येशिल येशिल राणी, पहाटे पहाटे येशील’ असं अत्यंत लाडिक्पणे विचारणारे बापट.
‘छडी लागे छम छम’ चा बालवयीन खोडकरपणा जपणारे बापट.
‘लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी’ हे थेट आगगाडीच्या ठेक्यात लिहिणारे बापट.
‘अजून त्या झुडुपांच्या मागे’…. ‘देह मंदिर चित्त मंदिर’ .... ‘या बकुळीच्या झाडाखाली’ ....
आणि कवी वसंत बापट.
जीना....
कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला
जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड
मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा
वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी
जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी
मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे