ती गेली तेव्हा ...
खरंच पाऊस रिमझिम निनादत होता. मंद, शांत, गंभीर. तीच्याच सारखा.
खरं तर तिच्या नसण्याची एव्हाना सवय व्हायला हरकत नव्हती.
दोन्ही हातांची बोटं दोनदा वापरावी लागतील ... इतकी वर्षे झालीत.
ती गेली तेव्हा ...
अजून बरंच काही घडलं.
बाबांच्या स्कूटरचं मागचं सीट रिकामं झालं.
अंगणातील ५ रंगांच्या जास्वंदी, मोगऱ्याचा ताटवा, ३ आंब्याची आणि २ नारळाची झाडं कावरी-बावरी झाली.
शेजारच्या रमाचं कैरीचं लोणचं शिकणं अर्धवट राहिलं.
माझ्या लेकाचे 'जावयाचे पोर' म्हणत होत असलेले लाड फार बालपणी संपले.
नवऱ्याच्या तोंडातली चकलीची चव गेली.
ती गेली तेव्हा,
शिल्लक राहिले खूप आवाज.
ते कधी कानात शब्द होऊन घुमतात.
कधी डोक्यातले विचार होतात.
कधी मनावरचे संस्कार,
तर कधी हृदयाची अस्वस्थ धडधड...