तो त्याच्या वडिलांच्या खांद्यावर होता. डुगडुगणारी मान, गोल गोल डोळे, डोक्यावर तुळतुळीत टक्कल. जवळ जवळ सहा फूट वडिलांच्या खांद्यावर हा जेमतेम सव्वा फूट. वय असेल ५-६ महिने. टुकुर टुकुर डोळ्यांनी सगळीकडे पहाणं चाललं होतं. नजरेत सगळ्या जगाबद्दलची उत्सुकता ठासून भरलेली. माझी प्रत्येक हालचाल निरखून पहात होता.
त्याचं निरिक्षण करण्याच्या नादात २ coke चे cans उचलले आणि shopping trolly मध्ये टाकताना बाजूच्या २ cans ना धक्का लागला. ते खाली पडले. धप्प धप्प असा आवाज झाला. त्याला दचकायला पुरेसा. त्याच्या नजरेत धरणीकंप झाल्याचे भाव. त्याने माझ्याकडे पाहिलं. मला हसूच आलं. त्याने अर्धा क्षण डोळे बारीक केले, कपाळाला आठ्या घातल्या. मग तोंडाचं बोळकं पसरवीत मनापासून, दिलखुलास हसला. हसताना मानेचा तोल गेला. नाक वडिलांच्या खांद्यावर आपटलं, जीवणी भोवतीचा सगळा ओलावा वडिलांच्या शर्टाला पुसला गेला. ह्यावेळेस त्याचं त्यालाच हसू आलं- स्वत:च्या फजितीचं. मग बराच वेळ मान तिरपी करून मला मिश्किल हास्य देत राहिला.
माझ्यासाठीही जग खूप सुंदर झालं. उरलेला संपूर्ण दिवस मोरपीसा सारखा तरंगत, हलका गेला.