Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

कोण म्हणतं टक्का दिला ?


फार लहानपणी आम्ही मुली एक खेळ खेळायचो. 'फार' म्हणायचे कारण की नीटसं आठवत नाही... इतक्या लहानपणी. सगळ्या मुलींनी गोल करून बसायचे. एक टाळी आपण वाजवायची. दुसरी, एकेका हाताने दोन्ही शेजारणींना एकदमच द्यायची. हे करताना कुणीतरी चालू करायचे...

"कोण म्हणतं टक्का दिला?" मग पुढचीचं नाव घेत म्हणायचे, "कुंदा म्हणते टक्का दिला." मग कुंदाला विचारायचे, "का ग कुंदा टक्का दिला?" यावर कुंदा विचारणार, "कोण म्हणतं टक्का दिला?" "मंदा म्हणते टक्का दिला" "का ग मंदा टक्का दिला?" ................ चालूच... एकीने दुसरीचे नाव घेत पुढे.

हा खेळ का खेळायचा? यात कोणी out कसं होत नाही? खेळ थांबवताना कोणावर आणि का थांबायचे? हे प्रश्न डोक्यात येण्याइतके काही आम्ही आलिकडच्या मुलांसारखे चंट नव्हतो. पुढे मोठं झाल्यावर कधी हे विचार मनात आले, पण त्यांचा फारसा पाठपुरावा केला गेला नाही. पण अगदी अलिकडेच मला या खेळाचे महत्व... नाही, खरं तर उपयोग खूप प्रकर्षाने जाणवायला लागला आहे.

आपण मोठी माणसं इतक्या सहजतेने, लीलया हा खेळ खेळतो की जसा तो रक्तातच भिनलाय. फक्त त्याचं नाव बदललंय. आता त्याला आपण 'blame game' म्हणतो. बघा नं...

Anderson ला भारतातून कोणी जाऊ दिले? ... "का रे कलेक्टर जाऊ दिले?"... "कोण म्हणतो मी जाऊ दिले? ते तर अर्जुनने जाऊ दिले"... "का रे अर्जुन जाऊ दिले?"... "कोण म्हणतो मी जाऊ दिले? ते तर राजीवने जाऊ दिले." ...................चालूच. पुन्हा हा game कधी संपतो, कुणावर संपतो हे लक्षात यायच्या आत नवीन game सुरू.

महत्वाची गोष्ट अशी की फक्त राजकारणीच नाही तर आपण सगळेच कुठल्या न कुठल्या स्तरावर हे करतच असतो. आरुषीची हत्या कोणी केली?, २०-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे पानिपत का झाले?....ते थेट कौटुंबीक कलहांपर्यंत... "मी तर असं म्हणालेच नाही, तोच म्हणाला."... "का रे तू असं म्हणाला?... "कोण म्हणतं टक्का दिला?".....................

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS