वेळ रात्रीची. साधारणत: १० वाजले असतील. गाडी चालवत घरी येताना लांबून जाणारी दुबईची मेट्रो दिसली. तशी ती नेहमीच दिसते. पाच डब्यांची छोटिशी गाडी. बाहेर अंधार असल्याने डब्यांच्या खिडक्यांतून उठून दिसणारा उजेड.. जशी पिटुकल्या काड्यापेटीच्या आकाराच्या, चौकोनी शेकोट्यांची माळच !
'दुबई मेट्रो' अत्यंत आधुनिक रेल्वे असल्याने हिची ना 'कूक' शिट्टी ना 'झुकझुक' आवाज.. पण अशी दुरून जाणारी, अंधारातील कुठलीही रेलगाडी पाहिली की मन न चुकता 'पाकिजा' सिनेमातच पोहोचतं. अगदी थेट.. 'ये पाव जमीं पर मत रखना, मैले हो जायेंगे..' च्या मूड मध्ये. आणि ती जर भारतातील आगगाडी असेल तर.. तो दुरून निघून हळूहळू जवळ येणारा.. पुन्हा तसाच हवेत विरत जाणारा शिट्टीचा आवाज, ती इंजिनाची धडधड.. एखाद्या तरुणीचा चुकलेला काळजाचा ठोका.. आणि 'यूही कोई मिल गया था सरे राह.... चलते चलते'
बस्स !.. दुसरं काहीच नाही. जसं अंधारातील रेलगाडी म्हणजे, फक्त आणि फक्त.. तरल romance.
पूर्वी एकदा मी हा प्रत्यय घेण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. तेही चक्क लग्नाआधी ! मद्दामहून केलेला रेल्वेचा रात्रीचा प्रवास. पण कसचं काय.. 'प्रवास' अंगात संचारलेली- बाजीप्रभू देशपांड्यांच्या आवेशात दोन्ही हातांचा किंवा हातातील सामानाचा शस्त्रांसारखा वापर करणारी माणसे.. किंचाळणारी शेंबडी पोरे, चित्रविचित्र वास, 'चाय', 'राईस प्लेट' चे पुकारे यात माझा सपशेल भ्रमनिरास झाला.. पण रात्रीची लांबून जाणारी रेल्वे आणि तरल romance यातील माझ्या मनातील दुवा आजतागायत निखळला नाही.
'पाकिजा' चित्रपटातील असाच अजून एक प्रसंग मनात घर करून गेला आहे. पुन्हा दुरून जाणारं.. अंधारातीलच.. पण ह्या वेळेस पाण्यावर तरंगत जाणारं होडकं आणि 'चलो दिलदार चलो, चांद के पार चलो' हे शब्द. आमच्या घराच्या खिडकीतून रात्री बाहेर पाहिलं की दुरून जाणा-या, पाण्यावर डुलणा-या 'ढाऊ' दिसतात. त्यांना शिडं नसतात पण असतात हेलकावे घेणारे कंदील.. माझ्या कानात मात्र लता-रफी चे सूर !
खरं तर, तो अत्यंत कृत्रीम वाटणारा नट राजकुमार, सिनेमा चौदा वर्षे रखडल्यामुळे मीनाकुमारीचे कधी अप्रतीम तर कधी उध्वस्त दिसणारं सौंदर्य.. यामुळे 'पाकिजा' या चित्रपटाबद्दल मला काहीच आत्मीयता नाही. पण या दोन romantic images मुळे तो एक कायमस्वरूपी छाप सोडून गेला एवढं नक्की !