Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

माझा Attachment


सद्ध्या मी आणि माझा लॅपटॉप, दोघेही मस्त चेष्टेचा विषय झालो आहोत.
तेव्हा म्हंटलं, जरा एकदा शोध घ्यावाच...
माझं आणि माझ्या 'लॅपटॉप'चं नातं नक्की आहे तरी काय?

केवळ घरात असलेल्या वॉशिंग मशीन पासून ते इलेक्ट्रिक शेव्हरपर्यंत, साधारणत: ३० एक यंत्रांपैकी एक यंत्र... एवढंच? छे, छे! काही तरीच काय? जरी ही सर्व वीजेवर चालणारी उपकरणे असली तरी, 'तो' या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे.

खरं तर त्याला एकसारखं, 'लॅपटॉप', असं सर्वनामाने संबोधणे मला अजिबात पटत नाही. जरा हिणवल्यासारखं वाटतं. म्हणजे त्या अमिताभ बच्चन सारखं- 'बिल्ला नंबर ७८६' वगैरे.

उद्या ह्याने उठून, आपलं आपणंच, काही तरी भन्नाट नाव सांगण्याआधी, मला वाटतं मीच एकदा याचं रीतसर बारसं करावं. एक छानसं, गोंडस नाव ठेवावं.. इतका हा माझ्या मांडीवर मजेत पहुडलेला असतो!

म्हणून परवा सरळ भटजीबुवांची भेट घेतली. त्यांना मुहूर्त, नावाचे अद्याक्षर इ. सांगा म्हंटलं तर त्यांनी 'शांतं पापं !' म्हणत पळ काढला. आता ज्ञान प्रबोधिनीवाल्यांकडे जाते. बघू, ते काही मदत करू शकतात का?

तसा हा माझ्या आयुष्यात दहा वर्षांपूर्वीच आला. तेव्हा चांगला बाळसेदार, गुटगुटीत होता. आता जसा मोठा व्हायला लागलाय् तसा हा पण वजनाच्या बाबतीत जागरूक व्हायला लागला आहे. जास्तीत जास्त स्लीम रहण्याच्या प्रयत्नात असतो. कपडे फक्त branded च घालणार ! मग ते LG चे असोत वा HP, Dell, Acer चे. कुठल्याही outfit मध्ये कित्ती 'साजरा' दिसतो !

तब्येत मात्र याची जरा नाजूकच असते. खरं तर जन्मल्या बरोबर virus, spyware, adware, phishing च्या इन्फेक्शन्स् पासून वाचण्यासाठीचे सर्व प्रकारचे लसीकरण केलेले आहे. पण हा रोज, लेटेस्ट अपडेटचे बूस्टर डोस घेत आहे नं, याच्याकडे सतत लक्ष ठेवायला लागते. नाही तर केव्हा डोके फिरेल ते सांगता येत नाही.

बाकी याचा काही त्रास नाही. झोपायला सुद्धा थोपटणे, अंगाई या सोपस्कारांची गरज नाही. नुसतं स्लीप मोडचं बटण दाबलं की झोपतो आणि दार उघडलं की उठतो. 'अरे, झोपतो की नाही टोण्या आता!' असले प्रकार नाहीतच.

खूप साथ देतो मला. मी कुठेही जाताना सोबतीला चल, म्हंटलं की लगेच तैयार. नवरा आणि मुलगा, या दोघांनी मला 'राष्ट्रीय महिला सबलीकरण अथवा सक्षमीकरण' कार्यक्रमात नॊंदणी केल्यासारखं फारच स्वत:च्या पायावर उभे रहायला शिकवले आहे. मी बिचारी कुठली कुठली अधिकृत कामे करत जगभर फिरत असते- एकटीच. पण हा मात्र माझी पाठ मुळीच सोडत नाही. पाठीवरच्या बॅकपॅक मध्ये कसा गुपचूप बसून असतो. मग याला तुम्ही काहीही म्हणू शकता- माझ्या पाठीवरचं बि-हाड किंवा मला उर्जा देणारा ऑक्सिजनचा सिलिंडर!!

मला पण याच्या सोबतीची खूप सवय झाली आहे. आमच्या दोघांचे एक स्वतंत्र विश्व आहे. किंबहुना खरं तर असं म्हणता येईल की हा मला माझ्या स्वतंत्र विश्वाच्या 'खिडक्या' (windows) उघडून देतो. या खिडक्यांमधून माझं मन वेगवेगळ्या वाटांनी धावायला लागतं. ३ बाय ३ फुटाच्या कुठल्याही जागेत आम्ही एकमेकांसमोर बसलो की- माहितीचा, ज्ञानाचा, मैत्रीचा महासागर!!! याच्यामुळे आजुबाजूच्या परिस्थितीतून, माणसांमधून एका क्षणात अंग काढून घेण्याची कला मला जमायला लागली आहे. विमानतळांवरचे वाट पहाणे, १७-१८ तासांचे trans-Atlantic प्रवास सुसह्य झाले आहे.

नुकतीच याने माझी एक नवीन ऒळख करून दिली आहे- Facebook. या Facebook मुळे नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींचे कोंडाळे भोवती जमायला लागले आहे. एकटेपणा मनाला शिवतच नाही. मी ठरवले आहे, यमदूत आला की त्याला २ मिनीट थांबायला सांगायचे आणि पळत जाऊन स्टेटस मेसेज टाकायचा- '... is dying', आणि मग यमदूताला स्वाधीन. तरी बरं, मी आधीच 'When I Die I Give My Friends Permission To Change My Status To "Is Dead" ' हा Facebook वरचा ग्रूप जॉईन करून ठेवलेला आहे.

आता बोला! याला काय नुसते घरातले एक यंत्र किंवा नुसतं 'लॅपटॉप' या सर्वनामाने संबोधायचे?
अशक्यच. बघते, जरा चौकशी करते. ही ज्ञान प्रबोधिनीची मंडळी काहीही नावं न ठेवता, नामकरण समारंभास मदत करतात का ते? जर कार्यक्रम ठरला तर तुम्हाला नक्कीच कळवीन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS