('पृथक्' या सदराखाली अधूनमधून काही लिहावं असा विचार आहे. अर्थातच एखाद्या मराठी गाण्यावर. पण हा ब्लॉग नसेल. टिप्पणी किंवा विश्लेषण. आजच्या भाषेत याला, गाण्याचं deconstruction असं म्हणता येईल. कदाचित यात काहीच नवीन नसेल, पण एकत्रितपणे मांडलेलं असेल. तळापर्यंत जायचं असल्याने बहुतेक वेळा पुष्टीकरण असेल आणि नसलं तर तुम्हालाच विचारेन.😊🙏)
सुरुवात 'मराठी पाऊल पडते पुढे' या, याच नावाच्या चित्रपटातील शांता शेळके लिखित गाण्याने करते.
'मराठी पाऊल पडते पुढे' या चारच शब्दांतून व्यक्त झालेल्या ओजस्वी भावनेने मराठी मनाचा गेले कैक वर्षे जबरदस्त ताबा घेतला आहे. घरगुती संभाषण ते भव्य-दिव्य सोहळा, अशा कुठल्याही प्रसंगी हे गाणं, या गाण्याचे शब्द सतत वापरले गेल्याने पाठ असतात.
नुकतीच या गाण्यासंबंधी अधिक उत्सुकता निर्माण झाली.
चित्रपटात चित्रित झालेला कडव्यांचा क्रम आणि रेडिओवर ऐकू येणारा क्रम वेगळा आहे, याची नोंद मी आधीच घेतली होती, तरी ते तेवढं महत्त्वाचं नव्हतं.
महत्त्वाचं होतं ते हे की याचे सगळेच्या सगळे शब्द शांताबाईंचे नाहीत, हे मला सतत जाणवणं.
शोध घेता जे लक्षात आले ते -
गाण्याची सुरुवात ज्या ओळींनी होते-
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला
भला देखे
या ओळी ’ज्ञानेश्वरी’तून, काही किरकोळ फेरबदल करून आल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेच्या ३र्या अध्यायाच्या ३५व्या श्लोकाचं विवेचन करताना ज्ञानेश्वरीत म्हंटले आहे-
अगा स्वधर्मु हा आपुला ।
जरी कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला ।
भला देखैं ॥
ज्ञानेश्वरी (३.२१९) गीता (३.३५)
मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ॥
हे संत तुकाराम म्हणतात.
तुकाराम गाथा (९८१)
या अभंगात तुकारामबुवा हे मऊपण किती, हे त्यांच्या खास भाषेत सांगताना म्हणतात,
मेले जित असों निजोनियां जागे ।
जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी ।
नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
यातील शेवटच्या शब्द समूहामुळे, या ओळींचा मी समर्थ रामदासांच्या साहित्यात (असफल) शोध घेतला.
मग अरुणाताई ढेरे आणि धनश्री लेले यांनी सांगितले, या ओळींची रचना समर्थ रामदास यांनी केली असल्याचा सार्वत्रिक समज असला तरी शांताबाईंनी आयत्या वेळी लिहिलेला हा श्लोक आहे. अगदी रामदासांचाच वाटेल इतका सशक्त.
डॉ. माधव खालकर यांनी रामदासी भाषेची वैशिष्ट्ये सांगत, या ओळी रामदास स्वामींच्या कशा नाहीत, हे समजावून सांगितले.
याबद्दल तीनही मान्यवरांचे मन:पूर्वक आभार.