खिडकीच्या काचेवर टकटक.... कसं शक्य आहे? आत्ता पर्यंत असं कधीच झालं नाही आणि होणं अवघडही.... इतक्या उंचावर कोण येणार?
चक्क चिमणी.
आता भारतातून दिसेनाशी होऊ लागलेली चिऊताई.... इथे दिसते क्वचित कधी.... पण आमच्या घराच्या खिडकीच्या बाहेर प्रथमच.... आमच्या दोघींमध्ये जाड काचेची भिंत.
एवढासा जीव.... काचा उघडूच शकत नाही अशा खिडकीच्या बाहेर, तितक्याच पिटुकल्या आधाराला टेकलेला.... कृष अंगकाठी.... ही आजकालच्या फॅशनला धरून जाणीवपूर्वक की कुपोषीत? पाणी हवंय का हिला? द्यावं तरी कसं? माझं इतकं जवळ जाणं तिला घाबरवत कसं नाही? एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे बघताना मधूनच चोचीने काचेवर केलेली टकटक आणि मधल्या काचेमुळे muted वाटणारी चिवचिव....
काही सांगायचंय का हिला? पण चिमण्या कुठे बोलतात? म्हणजे विचार तरी करू शकतात का? जवळ-जवळ १० मिनिटे चाललेली ही interaction संपूर्णत: निरुद्देष्य कशी असेल?
आमचं घर ३० व्या मजल्यावर, म्हणून मला काही आकाश तितकंसं जवळ नाही.... माझ्या भोवती माझ्या घराच्या भिंती.... तिचं अभाळही तितकं मोकळं नव्हतं का?
हा ’या हृदयीचे- त्या हृदयी’ असा संवाद की.... कल्पनेच्या विलासाला लागलेले चिमणीचे पंख?