त्याचं ते आगंतुक येणं कोणालाच आवडलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यादेखत तो सुळकन् घरात घुसला आणि कुठेतरी दडी मारून बसला. मूषक-पुत्रच तो... त्याला लपायला कितिकसा वेळ आणि जागा लागणार !
त्याच्या येण्याने रंगलेल्या गप्पांवर एकदम विरजण पडलं. फटाफट बाकीच्या खोल्यांची दारं बंद झाली. खालच्या फटींना सतरंज्या, चादरी लावण्यात आल्या. घरातले आई-बाबा काठी, कुंचा असली आयुधं घेऊन लढाईच्या पवित्र्यात उभी राहिली. छोट्या दोघांना गप्प बसण्याचा, हालचाल न करण्याचा सज्जड दम भरण्यात आला.
तो अतिशय चपळ आणि उत्साही होता. शेवटी पोरंच ते... कोणाचं का असेना ! त्याच्यासाठी सुरुवातीला हा लपंडावाचा खेळच होता... मग कुठे तो दमायला लागल्यावर त्याला हा जीवन-मरणाचा खेळ असल्याचं लक्षात आलं.
या युद्ध सदृश्य परिस्थितीत साधारणत: दोन तास गेले असतील. तेवढ्यात त्याने कुठली तरी एक फट मिळवली आणि आजोबांच्या खोलीत जीवाच्या आकांताने पळ काढला. सगळे हताश होऊन बसले.
तेवढ्यात कुणीतरी म्हंटलं, "बाबुराव आता अजोबांबरोबर वामकुक्षी घेतील."
"कोण बाबुराव ?"
"तेच ते. उंदराचं पिल्लू. रहाणारच आहे काही काळ आपल्याबरोबर तर त्याला एक छानसं नावच देऊ की."
त्या एका वाक्याने वातावरणातला ताण नाहिसाच झाला. मग काय, बाबुरावांच्या हालचालींचं live reporting कुणी न कुणी तरी द्यायला सुरुवात केली.
"बाबुरावांनी मुक्काम सध्या सोफ्याखाली हलवला आहे."
"कपाटाखालून बाबुरावांचे डोळे काय पण चमकतात !"
"बाबुरावांचा रंग काय मस्त shimmering black आहे. आई, same ह्याच colour चा dress हवाय मला."
"बाबांनी बाबुरावांची सुंदर कोंडी केली होती पण बाबांच्या हातावर तुरी देण्यात बाबुराव यशस्वी झाले आहेत."
दोन दिवसांनी घरातल्या छोटूचा फोन आला. "sad news आहे. बाबुराव expired. आम्हाला खरं तर त्यांना मारायचं नव्हतं, नुसतं घराबाहेर घालवायचं होतं. पण फटका जरा जोरातच लागला. मी आणि ताईने खाली एक खड्डा खणून त्यांना burial दिलं. वरती फुलं पण ठेवली. आज बाबुराव नाहीत तर घर कसं शांत शांत वाटतंय्."