मध्यंतरी एकदा अनघानं एक प्रश्न मांडला होता. म्हणजे असे प्रश्न तिला आणि मला सततच पडत असतात. म्हणाली, "झाडांच्या कुंड्यांचं एक बरं असतं. किडे झाले की कुंडी खिडकीच्या जवळ, सूर्याच्या प्रकाशात ठेवली की ते निघून जातात. पण डोक्यातल्या किड्यांचं काय ? "
मी ही असंच उत्तर ठोकून दिलं होतं. "डोक्याचंही बहुतेक तसंच असावं. 'ज्ञानाचा प्रकाश' पडला तर त्या किड्यांची गच्छंती."
हे उत्तर दिल्यापासून सारखं guilty वाटतंय्. उगीच काही तरी बरळल्या सारखं किंवा अध्यात्मिक पोपटपंची केल्या सारखं. का बोललो आपण असं? मुळात गरजच काय होती असं पुस्तकी उत्तर देण्याची? आणि अनुभवाचं काय? आपल्या डोक्यातल्या किड्यांची वसाहत तर वाढता वाढता वाढे अशीच. मग कसला हा ढुढ्ढाचार्याचा आविर्भाव ?
एका सहज संभाषणातून सुरू झालेला... 'आपुलाची वाद आपणांसी', continued...
काल एका मित्राच्या घरी गेले. घरात नेहमीची नसलेली शांतता. लेकीला नुसत्या नजरेनंच विचारलं, "काय झालं ?"
"बाबा मन्यावर चिडलाय. अभ्यास करत नाही म्हणून. कुणीही त्याच्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय्."
एकटा पडला असेल बिचारा असा विचार करत दुसरीतल्या मन्याच्या खोलीत डोकावलं. पुस्तक-वही-पेन्सील यांच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत त्याने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "कुणी आपल्याशी बोललं नाही तर आपण काही मरत नाही. फक्त आपल्याला काही वेळ ऐकू येत नाही. एवढंच."
त्या क्षणी तो एवढासा जीव माझ्यापेक्षा किती तरी sorted वाटून गेला.
Related posts: Sorted ?, Sorted (3)