लेक मोठा होताना त्याच्या बरोबर काय काय नाही share केलं ? त्याच्या तीन चाकी सायकलवर डबल सीट बसण्यापासून झालेल्या ह्या सुरुवातीने, त्याच्या बरोबरीने माझ्याही मोठं होण्याच्या प्रवासात अनेक थांबे घेतले.
♦ अनेक वेळा प्रयत्न करुनही १० फुटांच्यावर उडू न शकलेला आमचा पतंग...
♦ "आई... पळत ये... Tom and Jerry..." म्हणून ठोकलेली ठणठणीत आरोळी...
♦ अल्फा मराठीवरचा 'गोट्या'...
♦ swimming शिकताना ’जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली’ म्हणत, डोळे गच्च मिटून पाण्यात मारलेली उडी...
♦ त्याच्या मित्रांबरोबर तेवढाच आरडाओरडा करत केलेले treks...
♦ सचिनची शारजा मधली तुफानी century ...
♦ पूर्वी माझ्या kinetic समोर ’फेली, फेली" चा दंगा करून मिळवलेल्या, मग तो चालवायला लागल्यावर त्याच्याकडून तितक्याच हक्काने वसूल केलेल्या, दुचाकीवरील गावभर आणि निष्कारण फेऱ्या...
♦ सकाळी किती वाजता उठवायचे यासाठी रोज रात्री त्याच्या खोलीच्या दारावर लिहून ठेवलेला C++ मधला एखादा किचकट program, ज्याचे output मी शोधून काढून त्या वेळेस त्याला उठवणे...
♦ त्याच्या पहिल्या SLR कॅमेराने केलेल्या प्रयोगांसाठी चादरी बांधून केलेले reflectors...
♦ टी. व्ही वर पाहून केलेले cooking चे अचाट प्रयोग...
♦ होळीचे रंग... Sherlock Holmes... पु. ल... James Bond........ असं बरंच काही.
अजूनही दोन गोष्टी त्या दिवसांशी नाळ जोडून ठेवतात. एक ’चिंटू’. आडव्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेल्या किंचित आगाऊ चिंटूला ’सकाळ’ पेपर उघडून भेटल्यावर पूर्वी दिवसाची सुरुवात होई. आता दिवसाचं पहिलं email हे लेकाकडून आलेलं, Today's Chintoo चं असतं.
आणि दुसरं म्हणजे jigsaw puzzles. सुरुवात फक्त ५० तुकड्यांपासून झाली. आता असतात ती ३००० तुकड्यांची puzzles, 3-D jigsaw puzzles, ज्यातून तयार केलेल्या आयफेल टॉवर सारख्या इमारती...
आता नातं आई-लेकापेक्षा मित्रांसारखं आधिक झालं आहे.
जगभरातून शोधून शोधून जमवलेली ही puzzles सोडवताना, ’शेजारी’ सिनेमातील कोसळणाऱ्या धरणाच्या भिंतीवर बसून पट खेळणाऱ्या दोन मित्रांची, भान विसरवणारी उत्कटता असते.