मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. विषय होता- ’वेगळ्या वाटेने चालताना’.
’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळाच्या १० वर्षांच्या प्रवासावर बोलायचे.
खूप उत्सुक श्रोते असल्याने संकल्पना सुचणे, विस्तार, घडत गेलेले बदल, असे अनेक मुद्दे येत गेले.
सर्वसाधारणे अशी समजूत असते की back-end ला एखादा ग्रूप किंवा कमीत कमी एक ’पुरुष’ असेल.
इथे मी एकटी स्त्री असल्याने तर अधीकच कुतूहल.
स्वाभाविकच माझे पूर्वी वेगवेगळ्या महाविद्यालयांमधे गणित, संख्याशास्त्र या विषयांचे प्राध्यापक असणे.... नंतर पुण्यात असताना शिकवलेले Oracle 8i आणि त्यातच कुठेतरी असलेले ’आठवणीतली गाणी’च्या संरचनेचे मूळ.... असे बरेच काही येत गेले.
संकेतस्थळाचा सगळा डौलारा सांभाळताना, सतत बदलत्या internet technology शी कसे जुळवावे लागते अशा तांत्रिक गोष्टींपासून ते संकेतस्थळाचा जो विषय.... गाणी निवडणे.... ती मिळवणे.... त्यांची इतर माहिती गोळा करणे.... करावा लागणारा वेगवेगळ्या स्तरांवरील जनसंपर्क.... त्यावर दुबईतील वास्तव्याचा परिणाम होतो का? तेथील जीवनशैलीमुळे काय आव्हाने येतात?.... वगैरे, वगैरे.
साधारणत: दीड तासांच्या या कार्यक्रमात औपचारिक मुलाखती बरोबर अनौपचारिक गप्पा असल्याने छान मजा आली. कार्यक्रम संपल्यावर एक गृहस्थ भेटायला आले.
"छान वाटलं सगळं ऐकून.. पण बाकी काय करता आपण?"
प्रश्नाचा रोख काहीच न समजल्याने माझे नुसतेच, "म्हणजे ?"
"नाही, म्हणजे काही job करता.. की Housewife ?"
!!