कवी सुधीर मोघे यांच्यावरचे हे माझे खरं तर दुसरे लिखाण. या आधीचे आणि हे, दोन्हीत एक समान सूत्र आहे आणि काही असमान धागे.
समान असे की या दोन्हीत त्यांची 'जीवनी' अशी नाही. किती पुस्तके लिहिली? कोणते पुरस्कार मिळाले? यात ते अडकलेलं नाही. पण,
पहिलं त्यांच्या निधनाच्या दुसर्याच दिवशी लिहिलेलं. त्यामुळे उत्स्फूर्त आणि काहिसं अचानक आलेल्या पोरकेपणाने बावरून गेल्यासारखं. तरी त्यांना वाहिलेली ती आदरांजली असल्याने त्याचे महत्त्व वेगळे.
दुसरे आजचे.. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी लिहिलेलं. भावनेच्या पगड्याच्या थोडं बाहेर येत.
त्यांच्या कविता-गाण्यांचे अवलोकन करण्याची किंवा त्यांची साहित्यिक मीमांसा करण्याची माझी योग्यता नाही. 'आठवणीतली गाणी' या माझ्या उपक्रमामुळे त्यांच्या गीतलेखनात दिसलेले सुधीरजी आणि आमच्या सात-आठ वर्षांच्या ओळखीतून दिसलेले काव्याबाहेरचे सुधीरजी.. यांच्याशी झालेल्या चर्चांतून माझे काव्यानुभव समृद्ध झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.
अलीकडचे प्रसिद्ध कवी वैभव जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
'रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.. '
पण जर कुणाला अशी 'एखादी'च नाही, तर अशा अनेक 'कविता पानोपानी' सुचल्या असतील तर.. त्यांना काय म्हणावे? कविवर्य, कविश्रेष्ठ? आणि त्याही पुढे जाऊन, ते जर फक्त शब्दचित्रेच नाही तर रंगचित्रे, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय सादरीकरण, पटकथालेखन.. असंही बरंच काही करत असतील तर?
सुधीर मोघे यांना मात्र त्यांची 'कवी सुधीर' अशी सुटसुटीत ओळख करून दिलेली अधिक आवडायची. 'Poet Sudheer' अशी झोकदार इंग्रजी सही ते करायचे. कारण कवितेव्यतिरिक्त इतर कुठल्याही माध्यामातून व्यक्त होणं, हे त्यांच्या 'कवी' असण्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटायचं. त्यांच्याच शब्दांत सागायचं तर, "माझ्या प्रत्येक असण्याला माझ्या कवी / poet असण्याचा base आहे, संदर्भ आहे." आमच्या चर्चेत हे त्यांचं कवी असणं भरून असायचं.
टेरिकॉटची पॅंट, ढगळसा झब्बा. अशी अनौपचारिक वेषभूषा. 'पद्मा फूड्स' हा अनौपचारिक गप्पांचा तितकाच अनौपचारिक अड्डा. जवळपास पन्नास वर्षांची कारर्किर्द. सांगण्यासारखे प्रचंड काही आणि ते सांगतासांगता समोरच्याला जाणून घेण्याची खुबी..
त्यांची कविता शब्दबंबाळ नाही. शैली मिताक्षरी. थोडक्यात आणि मार्मिक. बुद्धीवादी, तर्कनिष्ठ आणि त्याचवेळी तरल. scientific temperची झलक असणारी. परमेश्वराच्या सगूण आणि निर्गूण, दोन्ही रूपांचं एकाच तन्मयतेने वर्णन करणारी..
शब्दांवर प्रेम करताना त्यांच्या आहारी न जाता.. त्यांच्याकडे केवळ माध्यम म्हणून पाहताना, शब्दांविषयी ते म्हंटतात..
शब्दांच्या नकळत येती.. शब्दांच्या ओठी गाणी..
शब्दांच्या नकळत येते.. शब्दांच्या डोळा पाणी..
शब्दांना नसते दु:ख.. शब्दांना सुखही नसते..
ते वाहतात जे ओझे.. ते तुमचे माझे असते..
सुधीरजी एकदा म्हणाले होते, "मुकुंद (फणसळकर) म्हणतो, माझ्या प्रत्येक कवितेत-गाण्यात माझी सही असते. तुला वाटतं तसं?" त्यांचं काव्य-गीत लेखन जवळजवळ मुखोद्गत असल्याने मी लगेचव रुकार दिला. म्हंटलं, "हो. हो. नक्कीच.
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'पर्वतांची दिसे दूर रांग .. काजळाची जणू दाट रेघ',
'सूर कुठूनसे आले अवचित' मध्ये .. 'रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव',
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या',
.. या तुमच्या सह्याच तर आहेत."
'मन' या विषयावर सुधीरजींना खरं तर Ph.D. मिळायला हवी होती. एका कवितेत ते म्हणतात .. 'मन मनास उमगत नाही .. आधार कसा शोधावा ! .. चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही .. धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही.' आणि असंही .. 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' याच कवितेत 'मन'च कसं आपल्या भावविश्वावर नियंत्रण ठेवतं हे सांगताना, 'तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश'. एका ठिकाणी .. 'मनाचिया घावांवरी मनाची फुंकर ..' आणि 'मन' ते 'कविता' असा प्रवास ...
एकांत, लेखणी, कागद- वाया सारे
मन कागदाहुनी निरिच्छ अणि कोरे
गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे
बोटांवर अवचित मन ओठंगुन आले.
सुरेश भट, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यावर 'झी मराठी' या दूरचित्र वाहिनीने केलेल्या 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमांचे लेखन सुधीरजींनी केले आहे. एकदा त्यावर बोलत असताना, समोर बसल्याबसल्या त्यांनी संवादिनी घेतली. ती त्यांच्या खोलीत असायचीच. आणि चक्क सुरेश भटांचं 'रंगुनी रंगात सार्या रंग माझात वेगळा' गायला लागले आणि म्हणाले, "देवकी (पंडीत) अंदाजे सतरा वर्षांची असताना मी तिला हे गाणं शिकवलं ते असं. तेव्हा कोवळ्या वयामुळे तिला गीताचा संपूर्ण अर्थ उमगलाच होता, असं म्हणता येणार नाही. ती, मी शिकवलेली चाल या लयीत म्हणायची. आता थोडी ठायमधे असते. पण हा 'तिचा' व्यक्त होण्याचा भाव आहे."
'लय' वरून आठवलं ..
लय एक हुंगिली खोल खोल श्वासात,
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात,
लहडला वेल... तो पहा निघाला गगनी,
देठांना फुटल्या - कविता पानोपानी
सुधीरजी म्हणायचे, "एकदा कविता लिहिली की तिचे नशिब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने जाते .. मी माझ्या .."
एक कवी आपल्या कवितेकडे इतक्या निर्ममपणे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा कुठल्यातरी पातळीवर कवितालेखन हे त्याच्यासाठी ध्यानसाधनेसारखं असतं.
मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना- ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्यागेल्या श्रेयांवरती;
पण पुसट.. कोवळे नाव ठेवुनी गेलो.
ह्या नि:शब्दांच्या आड कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे कविता फक्त असेल