पंडितजींच्या अस्वस्थ तब्येतीच्या वार्ता जशा कानावर यायला लागल्या, तसं कुठेतरी जाणवायला लागलं होतं की या वेळचा प्रसंग जरा अवघड आहे. एका अनामिक हुरहुरीनं ग्रासलं आणि उपाय म्हणून भीमसेनी गायन ऐकण्याचा जसा काही सपाटाच लावला. मिळेल ते, मिळेल तिथून.
त्या कोसळत्या धबधब्यात आकंठ बुडण्याचा विचार होता. पण त्या धबधब्याचा जोश आणि जोर इतका की त्याच्या काठाकाठाने नुसते तुषारच अंगावर घ्यावेत. व्यक्तीमत्वातली आक्रमकता, रग गाण्यात ठासून भरलेली. ’देहभान’ विसरणे म्हणजे काय, त्या वरच्या निराकार-निर्गुणाशी direct uplink connection जोडणे म्हणजे काय? असे प्रश्न पंडितजींना गाताना पाहिलेल्यांना पडत नाहीत.
पं. भीमसेन जोशींवर मी काही बोलावं, असा कुठलाही अधिकार माझ्याकडे नाही. ना माझा आणि त्यांचा वैयक्तिक परिचय की त्यांच्या घरगुती जीवनाबद्दलचे औत्सुक्य शमवावे, ना माझी संगीत साधना एवढी की त्यांच्या गायकीवर विश्लेषणात्मक काही बोलावे. जस्तीतजास्त एवढंच म्हणता येईल त्यांच्या स्वरवर्षावात भिजून गेलेल्या करोडो रसिकांपैकी एक.
मी मांडलेल्या भीमसेनी गान-यज्ञाची सांगता करताना असं वाटलं... भीमसेन ज्या दिव्यत्वाचा ’अनुभव’ घेत होते त्याची ’अनुभूती’ आम्हा रसिकांना फक्त आणि फक्त, त्यांच्याच मुळे मिळाली.
नामदेवांनी वर्णिलेला ’तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ पहाण्यासाठी आमची नामदेवांशी ओळख असण्याची गरज नव्हती. तो आम्हाला पंडितजींनी ’दृक-श्राव्य’ समजावून सांगितला. ’नामा म्हणे मज विठ्ठल सापडला’ म्हणताना तो पांडुरंग पंडितजींच्याही नजरेच्या टप्प्यातच असायचा. ’जो भजे हरि को सदा’ अशा व्यक्तीचे नेमके काय होते, हे ब्रम्हानंदांपेक्षा भीमसेनांमुळे जास्त चांगले समजले. ’रघुवर तुमको मेरी लाज’ सांगणारे तुलसीदास, श्रीरामाकडे, या भीमण्णांपेक्षा अधिक आर्त साकडं घालत असतील, अशी शंकाही कधी आमच्या मनात आली नाही. ’रम्य ही स्वर्गाहून लंका’ असं पंडितजी जेव्हा सांगतात, तेव्हा लंकेचे ऐश्वर्य आणि रावणाचे दशग्रंथी पांडित्यच आमच्या डोळ्यासमोर असतं.
आणि अगदी खरं सांगायचं तर, गदिमांना अभिप्रेत असलेली ’उजेडी राहिले उजेड होऊन’... ही अवस्था, निवृत्ती-सोपान-मुक्ता यांना घेऊन कल्पना करण्यापेक्षा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या रुपाने आम्हा रसिकांनी प्रत्यक्ष पाहिली.