सुरभी नीमाची सून आणि नीमा जुनी मैत्रीण, असं सांगितलं तर वाटतं..... तितका काही हा 'बादरायणी' संबंध नव्हता.
त्यामुळे नवीन लग्न करून सुरभी दुबईला रहायला आली, तेव्हापासून ती, मला माझीच जबाबदारी वाटत होती. तसं नीमाला मी म्हंटलं देखील.. "नको ग काळजी करूस. तू आणि मी काही वेगळ्या नाही. मी बघते त्या दोघांचं अडलं-नडलं."
आणि असे अडल्या-नडल्याचे प्रसंग आलेही चिक्कार. नवीन संसार, नवा देश, नव्या नोकर्या...
नवी नवरी ते पहिल्यांदा येणारे आईपण असा सुरभीचा दोन वर्षांचा प्रवास मी नुसता काठावर बसून नाही बघितला. अनेकवेळा धावून गेले. प्रसंगानुरूप कधी घरीही घेऊन आले. कधी एखादी रेसिपी, इतकं साधं तर कधी पाच महिन्यांची गरोदर असताना गेलेला तोल, इतकं कठीण. काही महिन्यांपूर्वी सुरभी तिच्या बाळंतपणासाठी माहेरी गेली.
जानेवारीत भारतात गेले तेव्हा सुरभीला-बाळाला भेटावसं वाटलं म्हणून नीमाकडून तिच्या आईचा फोन नंबर घेतला, दिवस-वेळ ठरवली...
सुरभीच्या आईने दार उघडले. त्यांच्या छोटेखानी, दुमजली बंगल्याच्या वरच्या मजल्यावर ती दोघं आहेत आणि लवकरच खाली येतील, बसा.. असं म्हणाल्या.
दरम्यान आम्ही बेल वाजवल्यापासून दोन्ही मजल्यांच्या मधल्या जिन्यात बांधलेलं त्यांचं ’पाळीव’ श्वान, त्याच्या असलेल्या किंवा नसलेल्या बेंबीच्या देठापासून ओरडत होतं... म्हणून त्या बाईंनी aplomb bearing घेऊन ’मॅक्स’ला शांत करायला सुरुवात केली. तेवढ्यात फोन वाजला.
त्या प्रचंड गोंधळात फोनवरचं, एका बाजूचं जे संभाषण ऐकू आलं ते असं.. "हो आलेत... नाही, तो ठीक आहे. खायला दिलंय आधीच... नको.. बाहेर नको.. बाहेर ऊन आहे." वगैरे.
फोन बंद झाल्यावर त्या वळल्या आणि म्हणाल्या, "ह्यांचा ऑफिसमधून फोन होता. तुम्ही येणार माहित होतं नं, म्हणून चौकशी करत होते.... तशी यांना मॅक्सची खूपच काळजी असते.............!!!"