तसे घरात पाणी पिण्यासाठी काचेचे अनेक ग्लास होते. एकसारखे, संचातले. पण त्यामुळे फार गोंधळ उडायचा. कुणाचा कुठला? हा प्रश्न सतत चर्चेत राहायचा. त्यावर एक साधा-सरळ उपाय म्हणजे ग्लास विसळून ठेवणे. त्याने एका नवीन वादाला तोंड फुटायचे. विसळण्याची जबाबदारी कुणाची? खरं तर पाणी पिऊन झाल्यावर प्रत्येकाने विसळून ठेवायला हवा, पण..... तसे झाले नसेल तर ? ..... confusion, अविश्वास....
साधारण चार साडेचार वर्षांपूर्वी यावर मी एक उपाय सुचवला. घरातील प्रत्येकाने आपल्या व्यक्तीमत्त्वाला साजेसे असे दर डोई तीन mugs आणायचे. त्यांचा वापर पाणी-चहा-कॉफी अशा सामान्य, दैनंदिन आणि वैयक्तिक पेयपानासाठी करायचा. अर्थातच त्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्याच्या-त्याच्या डोक्यावर.
तसे मी जाऊन सगळ्यांसाठी विकत आणू शकले असते... "ह्या रंगाचे हे तुझे तीन", वगैरे. पण आपल्या 'व्यक्तिमत्त्वाला साजेसे' असा एक catch टाकून 'mugs' हा प्रश्न मी अस्मितेचा आणि तत्त्वाचा केला आणि गुपचूप त्या जबाबदारीतून सुटका मिळवली.
नवर्याने एका दिवसात एकसारखे आणि संपूर्णत: काळ्या रंगाचे mugs आणले आणि 'Black is beautiful, simple.' असं म्हणत फार मूलभूत निवड केल्याचा आव आणला.
लेकाने बाजारात mugs या प्रकारात जितके म्हणून चित्र-विचित्र रंग-आकार शोधता येतील तेवढे शोधले, त्यासाठी तब्बल तीन आठवडे घेतले आणि तीन भन्नाट mugs माझ्यासमोर आणून ठेवले.
मी मात्र फार विचार केला नाही. कारण 'व्यक्तीमत्व' वगैरे gimmick, हे निव्वळ माझ्या कमी काम करण्याच्या सोयीचे, म्हणून होते. मध्यम मार्ग स्वीकारत त्या दोघांच्याही निवडकक्षेत नसतील असे, पण जरा बरे वाटणारे, जवळच्याच सुपर मार्केटमधून उचलले.
आणल्याच्या तीसर्याच दिवशी माझ्या एका mugला छोटासा अपघात झाला आणि त्याचा कान तुटला. "टाकून दे ग, कशाला ठेवतेस ?" दोघांचं टुमणं. इतक्या लगेच, केवळ कान तुटला म्हणून, त्याला कचर्याची टोपली दाखवणे मला संपूर्णत: अमान्य होते. कारण बाकी त्यावर ओरखडासुद्धा नव्हता.
जशी मी त्याला वापरत राहिले तसे त्याचे 'कान तुटका' हे संबोधन प्रचलित होत गेले. मी ते फारसे मनावर घेतले नाही, त्याने घेण्याचा प्रश्नच नव्हता.
असे काही महिने गेले. मग वाटले, त्याच्या तुटक्या कानाचे कंगोरे फारच बेढब दिसतात. मग एक छानशी कानस आणली. stone grinding करतात तसे पाणी वापरून, कानसने घासतघासत ते कंगोरे नाहीसे केले.
या घटनेला चारहून अधिक वर्षे झाली. त्याच्याबरोबर आणलेल्या आठ जणांनी एकेक करून आमची साथ सोडली. 'कान तुटका' मात्र आहे तस्साच आहे.
दरम्यान 'तुटका कान' हे त्याचे व्यंग न राहता ती त्याची identity झाली आहे.