तो तसा सर्द-चिंब पावसाळा, ते वय आणि ते शहर मागे टाकल्यानंतर कधीच भेटला नाही.
आईचं घर, लहानपण, ’अद्वैत’ नावाची ती नावाला जागणारी कॉलनी, त्या कॉलनीत असलेलं आमच्या घराचं विशिष्ट असं भौगोलिक स्थान, नाशिक .... आणि कोसळून-कोसळून चराचरांत मुरलेला बेबंद पाऊस.. ह्या सगळ्यांचे जमून आलेलं ते रसायन होतं.
आता घर असलं तरी आई नाही. मनात मूलपण जपलं असलं तरी वय लहान नाही. नाशिकला देखील ’तसा’ पाऊस पडतो, असं वाटत नाही....पण अंदाजे साडेतीन दशकांपूर्वीच्या पावसाळ्यांनी सोडलेल्या त्या पाऊसखुणा, पुसट काही झाल्या नाहीत. आजच्या पावसाने काही मागे ठेवलंय का? हे भिंग घेऊन शोधत फिरताना उलट त्या अधिकच ठळक होतात.
माझ्या जन्माच्या सुमारास बांधलेलं आमचं घर काही जंगलात नव्हतं. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या कॉलनीतच... पण तिच्या सगळ्यात आतल्या टोकाला होतं. कॅनडा कॉर्नरहून आत शिरलं की एक डावं-एक उजवं-एक डावं अशी वळणं घेत तिथं पोचायचं... सगळी वर्दळ, गजबज मागे पडलेली असायची.
घराच्या मागच्या दोन बाजुंना लांबच्या लांब पसरलेली काळीभोर शेत जमीन. हे शेत पायी ओलांडायचं म्हंटलं तर तब्बल पंधरा मिनिटे लागायची... घराच्या मागे पडकी विहीर... उंचच्या उंच गवत... हे सगळं पार करून पुढे गेलं की पुन्हा घरं, दुकानं, गिरणीवाल्या बाईंची पीठाची गिरणी, इस्त्रीवाला, सायकलवाला, शाळा, कॉलेज असं सगळं....
जसं काही शहराने वाढतावाढता दम लागून एक श्वास घेण्यासाठी थांबलं असावं, तसं...
या सगळ्यामुळे पहिला पाऊस, मातीचा वास, वळीव.. हे काही फक्त कवितेत भेटलं नाही. गरमागरम तापलेली काळ्याभोर मातीची ढेकळं. त्यावर आकाशातून पडलेला पाण्याचा थेंब.. वाफाळलेला सुगंध... अशा वातावरणात आम्हा भावंडांवर पावसात भिजण्यावर नाही, तर न भिजण्यावर बंदी होती.
’ये ग ये ग सरी, माझे मडके भरी’ अशी सुरुवात केलेला पाऊस, पुढच्या चार महिन्यात आपली वेगवेगळी रुपे दाखवत ’पाऊस कधीचा पडतो...’ असा प्रवास करायचा. मातीच्या ढेकळांचा हळूहळू गच्च चिखल व्हायचा. त्यावरही संततधार पडत राहिली की सगळीकडे पाणीच पाणी.. शेतातलं पाणी कंपाउंडच्या भिंतीवरून बागेत यायचं. घराची तिसरी पायरी बुडली की रेनकोट घालून, कुदळ-फावडे घेऊन बाहेर शेतात जायचे. मधेमधे छेद देऊन पाणी मोकळे करायचे. त्या मोकळ्या झालेल्या, खळाळत धावणार्या पाण्याचा आवाज.... त्या पाण्याबरोबर वाहत येऊन पोटर्यांना अडलेले लव्हाळे... आणि ई.. शी.. करत त्याला भराभरा बाजूला काढणं.....
दहा-दहा दिवस, उभ्या सरळ रेषेत पडणार्या पावसाबरोबर अनेक पाहुणेमंडळी घरी यायची. शेतातली त्यांची घरं पाण्यात पार बुडून गेलेली असायची. चिक्कट आणि फिक्कट गुलाबी रंगाचं गांडूळ फारसं कुणालाच आवडायचं नाही. रात्रभर प्रेमसंवाद करणारे श्रीयुत आणि श्रीमती बेडुक... शेतात पाणी जितकं खोल, गच्च आणि जुनं, तितका या बेडकांचा अंदाज रुमानी.... आम्ही मुलं तर त्यांच्या ’डराव’च्या स्टाईल वरून त्यांना नावं द्यायचो आणि कोण कोणाच्या मागे लागलंय... कोणाचं कोणाशी जमलंय याचा अंदाज लावायचो.
काडी लावली की गोल वेटोळे करून बसणारा लाल-तपकिरी रंगाचा आणि शंभर पायांचा पैसा... मखमली लाल रंगाचा, तूतीची पानं खाऊन वाढणारा किडा. रिकाम्या काड्यापेटीला भोकं पाडून, त्यात खाली गवत अंथरून त्यावर याला ठेवायचं. तीव्र-उंच-चिरक्या आवाजांचे रातकिडे... पण हे सगळे तसे निरुपद्रवी.
काही भीतीदायक पाहुण्यांचे स्वागत मात्र व्हायचे नाही. आताच्या निसर्गमित्रांना हे फारसे आवडणार नाही. पण कॉलनीतल्या छोट्या मुलांची संख्या बघता हे स्वाभाविकच होते. विंचू दिसला की चपलेने मारलाच जायचा. ४-५ फुट लांबीची सापाने टाकलेली कात बागेत सहज मिळायची. ती दिसायची सुंदर पण तिची भीती वाटायची. एकदा बागेतल्या कारंजाच्या नळाच्या खोबणीत पाय सोडून बसलेल्या भावाच्या पायाला लागूनच एक पिवळा जर्द साप गोल करून बसलेला होता. अशा प्रसंगांना घाबरूनच साप-नाग-धामण-मण्यार दिसले की जोरात ओरडायचे. मग शेजारचे सगळे काका-दादा काठ्यालाठ्या घेऊन धावत यायचे. मारल्या गेलेल्या नागदेवतेने त्रास देऊ नये म्हणून रीतसर पूजा करून, दुधाचा नैवेद्य दाखवून त्याला अग्नी दिला जायचा. अनेकवेळा या साप-नागांची बोटभर लांबीची पिल्लं घरात सापडायची. ती पिटुकली पिल्लं सुद्धा काय सुंदर फणा काढायची !
एकदा एक गंमत झाली. तुडुंब पावसाळा आणि शेतात भरलेलं गुडघाभर पाणी.... मध्यरात्री झाली की कुणी स्त्री कण्हल्यासारखा आवाज यायचा. १०-१२ दिवस भरपूर पाऊस झालेला होता. त्यामुळे आधी वर्णन केलेले अनेक निर्वासित प्राणीमात्र बाहेर पाण्यावर तरंगत फिरत होते. रात्रीच्या मध्य प्रहरी बाहेर जायची कोणाचीच हिमंत होईना. चार दिवसांनी बाबा बॅटरी घेऊन गेलेच. तेव्हा लक्षात आलं कंपाउंडचा खिळखिळा झालेला एक खांब आणि त्याला बांधलेली काटेरी तार, वारं एका विशिष्ट दिशेने आले की एकमेकांना घासले जात होते आणि त्याचा तो आवाज होता.
घरची बाग या काळात फळा-फुलांनी भरून गेलेली असायची. काय नव्हतं तिथं? मोगरा, जाई-जुई-सायली, पाच रंगाच्या जास्वंदी, हिरव्या रंगाची अबोली, गुलाब (आणि त्यावर कलम करायला येणारे म्हातारे काका), द्राक्षाचे वेल, ऑगस्ट मध्ये पिकणारा हापूस, मलगोवा-पायरी अंबा, गुलमोहर, चिकू, पेरू, लिंबू, नारळ, मघई पान .....
आईचं घर आणि पाऊस यांचा आणखी एक ऋणानुबंध आहे.
ती गेली तेव्हाही आभाळ गच्च भरलेलं होतं आणि पाऊस खरोखरीच रिमझिम निनादत होता... आसमंत जसा दु:खाच्या मंद स्वराने भारलेला !!