एक विहीर असावी. अंधारी.
वास्तवाच्या परिघाच्या किंचित बाहेर.. किंवा कदाचित आतही, नक्की ठरवता येत नसावं.
तिच्या भोवतीचं सगळंच अगम्य, दुर्बोध. तिच्या दिशेने पाऊल टाकलं की अंगावर शहार्याचे कोंब फुटावेत.
मी दोन-तीन पाउले टाकते.. आणि मागे फिरते.
पण विहीर परतू देत नाही.
आत डोकावून पाहणं झेपेल? नको. शक्यतो कडेकडेनेच जावं.
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने एव्हाना कुतुहल, उत्सुकतेच्या मर्यादा पार केलेल्या असतात.
विहीरही तिचा अदृश्य पगडा घट्ट.. आणखी घट्ट करते.
सर्वत्र ओला, गूढ-काळा वास. त्या वलयात मी गुरफटायला लागते. वाट अधिकच निसरडी होते.
शेवाळलेला फुटका दगडी कठडा. कालातीत असल्यासारखा. कशीबशी त्याला रेलते. त्याच्या आधाराने डोळे गच्च मिटून आत डोकावते.
ऐकू येते ती घुमणारी शांतता. डोळे उघडावे की नाही? काय असेल..आणि आपल्याला काय दिसेल?
पाणी खोल असेल? की तिला तळच नसेल? आणि असलाच तळ तर तळाशी....
असतील कदाचित काही नि:श्वास.. उमेदी सुद्धा.
आता हळूहळू डोळे उघडायचे..
उडी मारणं, डुंबणं, तळ गाठणं वगैरे...
कुणास ठाऊक..
हे नातं आहे, कवि ग्रेस यांच्या कवितांचं आणि माझं..
'गांव'
आभाळ जिथें घन गर्जे
तें गांव मनाशीं निजलें;
अंधार भिजे धारांनी
घर एक शीवेवर पडलें..
अन् पाणवठ्याच्या पाशीं
खचलेला एकट वाडा;
मोकाट कुणाचा तेथें
कधि हिंडत असतो घोडा..
झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो;
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो..
गावांतिल लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती;
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळींने मळती....
-ग्रेस
( फोटो सौजन्य- आंतरजाल )