आज लहानपणीची शाळा आठवायचं कारण म्हणजे अर्थातच आजचा शिक्षक दिन.
आमच्या नाशिकच्या शाळेची दगडी इमारत लवकरच १०० वर्षांची होईल. 'गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल' किंवा 'शासकीय कन्या शाळा असं अत्यंत रूक्ष नाव असण्यार्या या शाळेने, सांगून होणारे 'शिक्षण' तर दिलेच पण न सांगता होणारे संस्कार जास्त दिले.
पूर्वी एकदा मी शाळेनंतरच्या आयुष्यात, माझी शाळा घेणार्या, माझ्या अनुभवांविषयी लिहिलं होतं.
कारण आता 'अभ्यास' या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट आणि नेमका समजायला लागला आहे. 'धडे' पाठ्यपुस्तकांतून निघून जीवनाचे झाले आहेत. 'शिस्त' शब्दाने मनाच्या नियमनाची वाट धरली आहे.
तरी या सगळ्याची पायाभरणी शाळेत सुरू झाली, हे तर नक्कीच.
आमच्या शाळेत प्रार्थनेचा तास घड्याळ लावून एक तासाचा असायचा. अगदी सविस्तर.
मग ४५ मिनिटांचे इतर विषयांचे ८ ते ९ तास.
विषयांच्या तासांनी पुढे जाऊन मूल्यार्जनाची दिशा ठरवली. पण प्रार्थनेच्या तासाने जीवनातल्या मूल्यांची नीव ठेवली.
प्रार्थनेच्या तासाची सुरूवात राष्ट्र्गीत मग लगेचच 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत....' अशी प्रतिज्ञा घेऊन व्हायची. पुढे त्यात बरंच काही होतं.
आमची त्या तासात दर शनिवारी गायच्या समरगीतांची चांगली शंभर पानी वही होती. समूहस्वरात ही पदं त्या बालवयात म्हंटल्याने येणारी राष्ट्रभावना फार खोलवर रुजली. 'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते..', 'भास्वर तुज सम भास्वर..',... सारखी अनेक अनवट समरगीतं, प्रेरणागीतं अजूनही तोंडपाठ आहेत. यातली काही आम्हाला शिकवायला तर स्वत: वसंत देसाई आले होते. याच पदांनी 'आठवणीतली गाणी'चा स्फूर्तीगीतांचा विभाग समृद्ध केला.
साने गुरुजींची 'भारतीय संस्कृती' याच तासात भेटली. गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय संपूर्ण शाळेने एकत्र म्हणताना गुरुकुल संस्कृतीतील मंत्र पठणाचा अनुभव घेतला. हे किंवा यासरखे काही ना काही प्रत्येकाच्याच शाळेत असते.
पण आमच्या शाळेत प्रार्थनेच्या तासाला एक अशी गोष्ट करण्यात यायची की जिच्या वेगळेपणाची आणि असामान्य असण्याची जाणीव तेव्हाही होती आणि आजही आहे.
पद्धत अशी होती की प्रार्थनास्थळास जाण्यासाठी वर्गातून निघताना जेव्हा एका रांगेत आम्ही सगळ्या मुली उभ्या राहायचो, तेव्हा आम्हाला प्रत्येकीला विचारण्यात यायचं की, तू डबा घेऊन आली आहेस का?
कधी कुणी डबा आणायचं विसरतं, किंवा डबा घेऊन न येऊ शकण्याचं दुसरं कुठलंही कारण असू शकेल..
हे विचारण्याची जबाबदारी रोज पटसंख्येप्रमाणे फिरती असायची. मग त्या मुलीने वर्गातल्या फळ्यावर उजव्या कोपर्यात लिहून ठेवायचे- वर्गाच्या पटावर किती, त्यापैकी आज हजर किती आणि त्यातील किती जणींनी डबा आणलेला नाही.
हे अशासाठी की, सगळ्या वर्गाच्या हे दिवसभर लक्षात रहावं, आज आपल्या किती वर्गमैत्रिणी उपाशी राहाण्याची शक्यता आहे.
जेवणाच्या सुट्टीला सगळा वर्ग मोठ्ठा गोल करून एकत्र जेवायला बसायचा. शाळेला तीन भली मोठ्ठी पटांगणे असल्याने ते शक्य होतं. त्यावेळेस सकाळची ती मुलगी, जितक्या मुलींकडे डबा नाही तितक्या ताटल्या घेऊन वर्गाच्या गोलात फिरणार. प्रत्येक मुलीने त्यात आपल्या डब्यातल्या फक्त एक घास, प्रत्येक थाळीत ठेवायचा. या नियमामुळे डबा आणलेल्या मुलींना फक्त दोन-तीन घास कमी मिळायचे पण न आणलेल्या मुलींसाठी ते पन्नास-साठ घास पोटभर असायचे.
'एक तीळ सात जणांनी वाटून खावा.' हे फळ्यावर लिहिण्याचं केवळ एक सुभाषित झालं.
पण (शब्दश:) वाटून खाण्याची प्रथा, हे संस्कार झाले.
हे संस्कार माझ्यासाठी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर दिशादर्शक ठरले.
'आठवणीतली गाणी'ची काही अत्यंत मोजकी प्रेरणास्थाने आहेत त्यात आमच्या शाळेचे स्थान फार वरचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षकदिनी आदरपूर्वक वंदन.