ते आमचं राहतं घर नव्हतं, पण काही कारणाने तिथे मुक्काम करावा लागणार होता. धो धो कोसळणाऱ्या पावसात काही basic स्वच्छता, व्यवस्था करण्यात एक आठवडा गेला. हे करताना खालच्या ज्ञानेश्वरची (watchman) खूप मदत झाली. त्याच्या बरोबर त्याची दोन वर्षांची मुलगी पण यायची. त्या सगळ्या धमाधमीत त्या पोरीचं नाव ’श्रुती’, ती तिच्या वयापेक्षा खूप छोटी-नाजूक दिसते आणि ती आली की तिच्या हातावर खाऊ ठेवायचा या पलिकडे माझ्या क्षितीजावर तिचं अस्तित्व नव्हतं.
जशी त्या जागेत स्थिरस्थावर झाले, तसा माझ्या क्षितिजाचा परीघ मोठा व्हायला लागलं. थोडं आजुबाजूला लक्ष जाऊ लागलं आणि ऐकू येऊ लागला तो श्रुतीचा सारखा किंचाळण्याचा आवाज. त्या आवाजातला चिरकेपणा, कर्कशता, सातत्य, तडप मला दुसऱ्या मजल्यावरही अस्वस्थ करायला लागली. वाटलं, आजारी पडलं लेकरू. कुठं दुखतंय् ते नीट सांगता येत नाहीये. १५ दिवस झाले तरी ते तसंच. रोज मला भेटायला येणाऱ्या निमाच्याही ही गोष्ट लक्षात आली. मग आम्ही येता-जाता श्रुतीच्या तब्येतीची चौकशी करणे चालू केले.
एक दिवस निमा पळतच वरती आली. म्हणाली, "अगं, ती पोर काही त्रास होतो म्हणून नाही ओरडत. सहज खेळता-खेळता, गप्पा मारल्यासारखी, मधुनच किंचाळते. मी पाहिलं आत्ता."
मग आमच्यातली ’आई’ जागी झाली. चहा घेताघेता मुलांना बोलायला शिकवणं-वाढवणं, चांगल्या/चुकीच्या वर्तनासाठी देण्यात येणारे +ve/-ve re-enforcements, अशी parenting वर आम्ही बरीच चर्चा केली. ’श्रुती’ या शब्दाचा dictionary अर्थ, भारतीय शास्त्रीय संगीतातल्या ’श्रुती’ आणि ह्या लेकराची व्यक्त होण्याची पद्धत यातील विरोधाभास, असं बरंच काही.
म्हणता म्हणता माझा तिथला मुक्काम संपला. परतायची तयारी सुरू. तेवढ्यात ज्ञानेश्वर एक कागद घेऊन आला. कुठल्याशा श्रवणयंत्राच्या माहितीचा तो कागद. म्हणाला, या सारखं काही तुमच्या दुबईला मिळेल का? त्याच्या वयस्कर वडिलांना पाहिलं असल्यानं म्हंटलं, "हो. बघते. पण तुझ्या वडिलांसाठी हे जरा लहान नाही वाटत?"
"वडिलांसाठी नाही हे. श्रुती साठी आहे. ती कधीच ऐकू किंवा बोलू शकणार नाहीये. पण मी आपला करतो प्रयत्न."
निमा जाता-जाता म्हणाली, माणसाचा सगळ्यात अक्षम्य गुन्हा म्हणजे मला वाटतं अलका- त्याचं ’judgmental’ असणं.