आषाढ मासारंभ झाला की रसिकजनांचा 'आषाढ दर्द' जागा होतो.
हुरहुर, विरह, ओल्या सर्द हवेची न सोसणारी जडता, कवी शंकर रामाणींनी वर्णन केलेले डोळ्यांतले 'मूढ पाणी'.... आणि मेघदूत.
या आषाढ प्रतिपदेलाही अशीच कुणाचीतरी एक हळवी स्मृती जागी झाली आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या कुणी फारसं न ऐकलेल्या एका गाण्याने सोशल मिडिआचे जग व्यापून गेले.
'आठवणीतली गाणी'- ही आता केवळ 'एक संकेतस्थळ' म्हणण्याइतकी रूक्ष जागा राहिलेली नाहीये. असंख्य दर्दीजनांशी तिची भावनिक नाळ जोडली गेली असल्याने, माझ्याकडे या गाण्याची ध्वनिफीत लगेच पोचली. 'हे ऐक. वेगळं आणि चांगलं आहे. बाकी सगळं सोड आणि याच्या खोलात जा.' असं मला हक्काने सांगितलं गेलं.
आणि मग सुरू झालेला शोध....
आषाढाच्या पहिल्या दिवशी
अवचित दिसशी मला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला
तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू, तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला
प्रिया दूर मम, तिला भेटशी
मनी वाटते, नाही न म्हणशील
विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला
कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो,
सांगुनी नंतर निरोप कथितो
दूत होवुनी पोचीव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला
या पदाचे गायक अभिषेकीबुवा असल्याने शौनकजींशी सगळ्यात पहिला संपर्क केला. ते फार तत्परतेने माहिती देतात. त्यांनी सांगितले, हे गीत 'गीत-मेघ' (अनुवादित 'मेघदूत') या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी तयार केले गेले होते.
त्यांच्याशी संपर्क करत असताना एकीकडे माझा इंटरनेटवर शोध सुरू होताच.
फक्त एका लेखात या गीताचा संदर्भ मिळाला. लेख श्री. अरुण काकतकर यांनी २०१२ मधे लिहिला होता. लेखाचं नाव होतं 'पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं'.
त्यांना फोन केला. ते म्हणाले, "दूरदर्शनवरील ह्या रूपकाचा प्रस्तुतकर्ता मीच होतो. यात एकूण सात गाणी होती. दोन बुवांची, दोन रामदास कामतांची, आणिक काही. निवेदन ज्योत्स्ना किरपेकर यांनी केले होते. दूरदर्शनकडे या कार्यक्रमाची चित्रफित आता नाही. पण माझ्याकडे ती सगळी गाणी आहेत. ती मी देईन."
न राहून शेवटी मी विचारलंच, "मला यातली एक ओळ अडली आहे. त्यातील शब्दांचे अर्थ मला माहिती आहेत. पण 'मेघदूत'चा माझा काही आभ्यास नाही. म्हणून संदर्भ लागत नाहीये."
त्यांनी लगेच सांगितले, मी हा प्रश्न डॉ. वसंतराव पटवर्धन (महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष) यांना विचारावा. ते या पदाचे रचियता आहेत. आणि मेघदूताचे हे भाषांतरही त्यांनीच केले आहे. हा त्यांचा फोन नंबर.
आज सकाळी वसंतरावांशी बोलणे झाले. त्यांना विचारले,
"मी, 'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला' इथे अडले आहे. 'बरवी' म्हणजे चांगली. 'शठ' म्हणजे लुच्चा. पण संदर्भ लागत नाहीये."
ते म्हणाले, " 'मेघदूता'ची मराठीत सी. डी. देशमुखांसकट २६ जणांनी भाषांतरे केली आहेत. त्यातलं माझं- 'विनवित मेघा तुला' या नावाने आहे. हे पुस्तक आता उपलब्द्ध नाही. पण मी त्याची फोटोप्रत करून तुला देतो. ही ओळ ज्या संदर्भात येते, त्या मेघदूतातल्या ओळी अशा ..
(तेनार्थित्वं त्वयि विधिवशादूरबन्धुर्गतो हं)
याण्चा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्ध्कामा ॥
(मी दुर्दैवाने माझ्या स्वजनांपासून दूर असल्याने तुलाच विनंती करतो. आणि कसं आहे,..)
एकवेळ सुजनांना केलेली विनंती 'विफल' झाली तरी चालेल, पण एका 'शठा'ला केलेली विनवणी 'सफल' होणे नको.
'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला'
ही अशी गाणी, त्यांबद्दलची सर्व माहिती देणारे असे हे सुहृद - मान्यवर, 'आठवणीतली गाणी'स अधिक श्रीमंत करतात.
ज्यांनी माझ्यापर्यंत हे गाणे पोचवले ते सर्व, श्री. शौनक अभिषेकी, श्री. अरुण काकतकर (वय वर्षे ७५) आणि डॉ. वसंतराव पटवर्धन (वय वर्षे ९२) यांच्या ऋणात मी व्यक्तीश: आहे.
टीप : हे पद ऐकण्यासाठी 'आठवणीतली गाणी'वर उपलब्द्ध आहे.