Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'सन्यस्त खड्ग' नाटकातील हे पद. पण ते या नाटकाच्या पुस्तकात आपल्याला सापडणार नाही.
याचे रचियता आहेत नागपूरचे कवी- शंकर बाळाजी शास्‍त्री.
हे पद या नाटकात कसे पोचले ? पदाचा अर्थ काय? 'नेईं हरोनी' की 'ठेविं जपोनि'? थोडक्यात या पदाला थेट भिडायचं असेल तर परत एकदा आपल्याला नाटकाचा इतिहास, त्याचे कथानक आणि त्यातील 'सुलोचना' ही व्यक्तीरेखा, यांच्याकडे जावं लागेल.

रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात 'सन्यस्त खड्ग' लिहितानाचा सावरकरांचा हेतू संपूर्ण राजकीय होता. त्यांच्या विचारांच्या 'प्रचार' करणे. त्यांच्यावर इंग्रजांनी त्या काळात घातलेल्या बंधनांमुळे अभिव्यक्त होण्याचा, हे नाटक हा एक मार्ग होता. नाटकाच्या कथासूत्रात, कथेतील पात्रांत, त्या पात्रांनी केलेल्या चर्चेत तत्‍कालीन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब अगदी ठळकपणे दिसते. किंबहुना ते तसे दिसावे, हाच उद्देश आहे.

तो काळ 'महात्मा गांधी' नावाच्या एका विचारधारेच्या उगमाचा, प्रसरणाचा. हे लक्षात घेतलं तर नाटकातील पात्रं- सिद्धार्थ गौतम बुद्ध, शस्‍त्रसंन्यास सोडून परत आलेले सेनापती विक्रमसिंह, त्यांचा युद्धबंदी झालेला पुत्र वल्लभ, त्याची पत्‍नी सुलोचना, लालची लंपट शाकंभट, कोसलाचे शाक्यांवरील आक्रमण, या सगळ्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीच्या, त्यातील किरदारांच्या प्रतिमा आहेत हे नि:संशय समजते.

मा. दीनानाथ मंगेशकर आणि सावरकारांचा खास स्‍नेह होता. मा. दीनानाथांच्या 'बलवंत संगीत मंडळीं'नी १९३१ च्या सुमारास 'सन्यस्त खड्ग'चे रंगमंचिय सादरीकरण करायचे ठरवल्यावर त्यांनी मूळ कथेवर, रंगाविष्कारास पूरक असे काही संस्कार केले. सावरकरांच्या संमतीने. पण या बदलांची व्याप्‍ती, (सावरकरांच्या इच्छेनुसार) फक्त नाटकाच्या सादरीकरणापर्यंतच मर्यादित असणार होती. त्यामुळे मूळ संहितेत कुठलाही बदल करण्यात आला नाही.

त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे सुलोचनेच्या मुखी असलेले, 'मर्मबंधातली ठेव ही' हे पद. मास्तरांनी ते शं. बा. शास्त्रींकडून लिहून घेतले. शास्त्रींनीही हे पद थेट सावरकरांच्या शैलीत रचलं. नाटकाच्या कथानकास पूरक असा प्रतिमांचा, रूपकांचा खास वापर करत.

सुलोचना ही 'सन्यस्त खड्ग'ची नायिका आहे आणि नायकही. मा. दीनानाथ स्वत: हे पात्र रंगवायचे. तिचे आचार-विचार हा नाटकाचा गाभा आहे. नुसता ती गाते त्या पदांचा आलेख पाहिला तरी तिच्या व्यक्तित्वाच्या हलक्या-गहिर्‍या छटा दिसतात.
'माळ गुंफितांना ।' म्हणत वाट पाहणारी अभिसारिका 'सुलोचना'..
'सययी सखा न ये ।' म्हणून रुसणारी सुलोचना..
पतीच्या स्वागतासाठी केलेली फुलांची माळ युद्धाच्या धुमाळीत सुकून गेली तर - 'ही तर जग रहाटी आहे.. सुकतातची जगि या । फुले गळत पाकळी पाकळी ।' असा विचार करणारी सुलोचना..
एक राष्ट्रिय सैनिक म्हणून सैनिकवेषात 'रणरंगणी' रंगणारा 'सुलोचन'..
आणि शेवटी पतीसह वीरमरण.. हा तिचा प्रवास मोठा आहे.
तिच्या मनात दुविधा नाहीत. पती युद्धबंदी असतानाही तिच्या अंतर्मनात 'शरण की रण', असं द्वंद्व नाही. उलट 'मारत मारत मरण'वर ती ठाम आहे.

शाक्यांच्या उरलेल्या काही मोजक्या सैनिकांसह, विक्रमसिंह यांनी समरसभा बोलावली आहे. त्यात सुलोचना, 'सुलोचन' म्हणून गेली आहे. अर्थातच उपस्थित उर्वरीतांना याची कल्पना नाही. आक्रमण करणार्‍या कोसलाच्या राजाने, शाक्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी- शरण आलात तर सेनापती वल्लभास सोडून देऊ.

त्या वेळेस तरुण वीरवर 'सुलोचन' म्हणतो-
"कोसलावासीयांनी दाखवलेली ही फक्त लालूच आहे. उपरांत, अशा जीवनीय दुर्दशेहून मानी हौतात्म्यच सेनापती पत्करतील.
राष्ट्राराष्ट्रांच्या चिरंतन हानिलाभांच्या विचारात व्यक्तीस कोण मोजतो ! तो (शरणागतीचा) विचार विचारात घेण्याचा अविचार मी करू शकत नाही." ......

पण आतली 'सुलोचना' म्हणते (गाते),
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
नेईं हरोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥


अलि म्हणजे भुंगा, अंबुज म्हणजे कमळ. हे सर्व रूपक (metaphor) म्हणून येत असल्याने शब्दश: अर्थापेक्षा भावार्थाचा विचार करायला लागेल.

माझ्या मर्मबंधातली ठेव, माझे प्रिय पती वल्लभ, यांचे शत्रूने बलपूर्वक हरण केले आहे. पण राष्ट्रकार्यार्थ लढता लढता, पराक्रमाची पराकाष्ठा त्यांनी केली. त्यामुळे एकाच वेळेस मला अभिमान व दु:ख आहे. हा जो शत्रू त्यांच्या सुटकेची मज आशा दाखवित आहे, त्याचा मोह पडतो आहे खरा.. पण या शत्रूचा सुप्‍त हेतू शाक्यांचे राष्ट्र सर्वप्रकारे लुटून नेणे हाच आहे."

पटदीप रागात बांधलेले हे पद, पटदीपची आणि विरहाची आर्तता थेट पोचवतं. अनेक सिद्धहस्त गायकांनी गाऊन त्यास लोकप्रिय केलं आहे. स्वत: मा. दीनानाथ मंगेशकर, पं. वसंतराव देशपांडे, पं. प्रभाकर कारेकर, आशाताई भोसले, आशाताई खाडीलकर..

नाटकाच्या बाहेर या पदाच्या मुखड्याने एक वेगळीच उंची गाठली आहे. 'मर्मबंधातली ठेव' हे एखाद्या पुस्तकाचे शीर्षक असू शकते, एखाद्या लेखाचा मथळा किंवा एखाद्या हृदयस्पर्शी गाण्यांच्या कार्यक्रमाचे नाव. अशी ठेव तर जपून ठेवण्यासाठीच असते. जशी 'वाक्प्रचार' म्हणून 'मर्मबंधातली ठेव' ही उक्ती प्रचलीत होत गेली, तसं कुठेतरी 'नेईं हरोनी' जाऊन 'ठेविं जपोनि' हा बदल झाला असावा.

Related post - शत जन्‍म शोधितांना

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शत जन्म शोधितांना..



या पदाचे रसग्रहण करताना सर्वप्रथम मला असे नमूद करावयाचे आहे की हे पद स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचं भरतवाक्य नाही. तसंच ते या नाटकाचे सार किंवा सारांशही नाही. अगदी मूलभूत स्तरावर ते एका विरहिणीचे भावगीत आहे.. एक प्रेमकविता आहे.
हे नीटसं समजण्यासाठी- आधी 'सन्यस्त खड्ग', त्याचे कथानक आणि नाटकातील ज्या पात्राच्या तोंडी हे पद येतं ती सुलोचना, यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ.

अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्‍नागिरीला स्थानबद्ध असताना सावरकरांनी 'सन्यस्त खड्ग' लिहिलं. या काळात त्यांना राजकारणात जाण्यास बंदी होती. तिथे त्यांनी भरपूर लिखाण केले. लेख, पुस्तके, नाटकही. लिखाणाचा उद्देश आपले विचार मांडणे हाच असल्याने, 'सन्यस्त खड्ग' हे नाटकसुद्धा सावरकारांची वैचारिक सुस्पष्टता घेऊन येते. नाटकाची कथा अहिंसा, धर्म, कर्म यांचा ऊहापोह करत, नाटकातील पात्रांद्वारे विचारांचे मंडन-खंडन करीत पुढे जाते. प्रमूख पात्रं आहेत- बुद्ध, विक्रमसिंह, वल्लभ आणि सुलोचना.

सिद्धार्थ गौतम 'बुद्ध' होऊन काही वर्ष लोटली आहेत. विक्रमसिंह हे बुद्धांच्या वडिलांच्या (शुद्धोदन) राज्याचे (शाक्य) सेनापती. बुद्धांच्या सांगण्यावरून ते शस्‍त्रसंन्यास घेतात (पटत नसतानाही केवळ प्रयोग म्हणून). तथागतांबरोबर भिक्षु म्हणून प्रवासास जातात. या घटनेला चाळीस वर्षे लोटतात. दरम्यान विक्रमसिंहांचा पुत्र वल्लभ राज्याचा सेनापती होतो. वल्लभ सुद्धा शूर, पराक्रमी आहे. या चाळीस वर्षात बुद्ध धर्माचा आणि त्यात सांगितलेल्या अहिंसेचा पुष्कळ प्रसार झाला आहे. तेवढ्यात शेजारच्या 'कोसला' राज्याचे शाक्यांवर आक्रमण होते. अहिंसामार्गी झालेल्या या राज्याची युद्धाची तयारी नसते. बरीच वाताहत होते. सेनापती वल्लभ पकडले जातात. ही वार्ता पोचताच विक्रमसिंह तथागतांच्या मनाविरुद्ध खड्ग निष्कोषित करतात आणि युद्धात सामिल होतात. जाताना ते बुद्धांना म्हणतात, "मी अहिंसा सोडत आहे, बुद्धांना नाही."

हे पद नाटकात सुलोचनेच्या तोंडी येतं. सुलोचना ही वल्लभ दयिता- पत्‍नी. त्यांच्या प्रीतिविवाहाला नुकतंच एक वर्ष झालंय. हा वाढदिवस साजरा करतानाच्या प्रेमसंवादात ती दोघे मग्‍न आहेत. तोच वल्लभास राजसभेचे तातडीचे निमंत्रण येते आणि तो तिथून जातो. तो परत आल्यावर त्याच्याशी कसं बोलावं? रुसावं का? किती? या विचारात ती असतानाच दूत निरोप आणतो, सेनापती तर परस्पर युद्धावर गेले..
ही भेट अर्धीच राहिली याची तिला खंत सतावते. काही दिवसांतच अशीही बातमी येते की शाक्यांचे सैन्य उधळून गेले आणि सेनापती वल्लभ युद्धबंदी झाले. तेव्हा तिच्या तोंडी येते, ते हे पद.
शत जन्म शोधितांना..

या पदाचा संपूर्ण अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सावरकरांचा चष्मा घालावा लागेल. भावनेची तीव्रता, उत्कटता.. हातचं राखून काहीच नाही. भव्य, दिव्य, तेजस्वी.. आणि प्रखरही. स्वत: जळून इतरांस ऊर्जा देण्याचं सामर्थ्य असलेलं.

सुलोचना ही सामान्य राजस्‍नुषा नाही. फक्त प्रेमसंवादात तिचं मन रमत नाही. तो ती करतेच पण ती कर्तृत्ववान आहे. स्‍त्रीसुलभ भावनांबरोबर विचारांची परिपक्वता तिच्यात आहे. तिच्या जाणीवा प्रगल्‍भ आहेत. धैर्यधर पतीचा तिला अभिमान आहे. तो युद्धबंदी झाल्याचे समजताच तिचे पहिले वाक्य असते,
"हा सेनापती अबल आहे म्हणून पराभूत नाहीये तर-
सबल परि ना राष्ट्रचि म्हणून अपजयी हा । नसे जित पहा । सेनानि ।"
पुढे जाऊन ती सैनिक वेष घालून रणांगणात युद्ध करते व आपल्या पतीसह वीरमरण पत्करते.

ही अशी स्‍त्री जेव्हा एक विरहगीत गाईल आणि तेही सावरकरांच्या लेखणीतून उतरलेलं..
ती म्हणते,
शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥


हा माझा माझ्या प्रियकराचा शोध जन्मजन्मांतरीचा आहे. जन्म-मरणाच्या अनेक फेर्‍यांतून गेलेला. माझ्या या शोधापुढे शत 'आर्ति' व्यर्थ आहेत. 'आर्ति' या शब्दाचा अर्थ जरी दु:ख, पीडा असला तरी इथे त्याची आर्तता थेट ज्ञानेश्वरांची आहे. 'विश्वाचे आर्त'शी नातं सांगणारी. दीपावली सुद्धा तुम्हां-आम्हांसारखी मिणमिणत्या पणतींची नाही तर तेजाळ, देदिप्यमान सूर्यमालिकांची. इथे 'कवी' सावरकरांनी 'विझाल्या' असं म्हणताना 'विझल्या'तला कोरडेपणा काढून टाकला आहे. या माझ्या शोधयज्ञात मी अशा शत दीपावलींची आहुती दिली आहे, असे तिला वाटते.

तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥


प्रियकर मीलनाचे सायास तिला कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाही. तिच्यासाठी ही आनंदाने केलेली 'साधना' आहे, जिची सिद्धी आतां कुठे होऊ घातली आहे. येथे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा आणखी एक स्पर्ष जाणवतो. वरील दोन्ही ओळीतील 'गाठी' या शब्दाने त्यांनी यमक साधलाय आणि श्लेषही. पहिल्या ओळीतील 'गाठी' हे गाठभेट या अर्थाने येते तर दुसर्‍या ओळीतील 'गाठी' हे पोचणे या अर्थाने. युगायुगांच्या प्रतिक्षेनंतर आमची भेट घडली आहे तोच,

हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥


नुकतीच तर कुठे आमची भेट झाली आहे.. जो मी उठून त्याला, माझ्या प्रियकराला मिठी घालू पाहते, तोच सगळं संपून गेलं. मीलनाचा 'तो' क्षण एका क्षणांत संपून गेला..
पुलंनी एका ठिकाणी असं म्हंटलं आहे, "या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल पारितोषिक द्यावं, इतक्या श्रेष्ठ दर्जाची ही कवीकल्पना आहे."

'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा संदर्भ ठेऊन पाहिलं तर असा सगळा अर्थ आहे. पण या संदर्भाच्या पलीकडे जाऊन, अध्यात्मिक स्तरावरही हे पद फार खरं ठरतं.
मानवी जीवनातील दु:खाचं सातत्य, सुखाची क्षणभंगूरता, काळाची गतीमानता, बुद्ध धर्मात वर्णन केल्याप्रमाणे जीवनाचं 'अनित्य' असणं... असं बरंच काही.

सावरकरांच्या या पदरचनेचे आपल्या मनातील स्थान इतके अनन्य असे आहे की नुसतं 'शत जन्म..' म्हंटलं तरी हा सगळा अध्यात्मिक पट आपल्यासमोर उलगडतो.

( फोटो सौजन्य- आंतरजाल )

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS