Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'सन्यस्त खड्ग' नाटकातील हे पद. पण ते या नाटकाच्या पुस्तकात आपल्याला सापडणार नाही.
याचे रचियता आहेत नागपूरचे कवी- शंकर बाळाजी शास्‍त्री.
हे पद या नाटकात कसे पोचले ? पदाचा अर्थ काय? 'नेईं हरोनी' की 'ठेविं जपोनि'? थोडक्यात या पदाला थेट भिडायचं असेल तर परत एकदा आपल्याला नाटकाचा इतिहास, त्याचे कथानक आणि त्यातील 'सुलोचना' ही व्यक्तीरेखा, यांच्याकडे जावं लागेल.

रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात 'सन्यस्त खड्ग' लिहितानाचा सावरकरांचा हेतू संपूर्ण राजकीय होता. त्यांच्या विचारांच्या 'प्रचार' करणे. त्यांच्यावर इंग्रजांनी त्या काळात घातलेल्या बंधनांमुळे अभिव्यक्त होण्याचा, हे नाटक हा एक मार्ग होता. नाटकाच्या कथासूत्रात, कथेतील पात्रांत, त्या पात्रांनी केलेल्या चर्चेत तत्‍कालीन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब अगदी ठळकपणे दिसते. किंबहुना ते तसे दिसावे, हाच उद्देश आहे.

तो काळ 'महात्मा गांधी' नावाच्या एका विचारधारेच्या उगमाचा, प्रसरणाचा. हे लक्षात घेतलं तर नाटकातील पात्रं- सिद्धार्थ गौतम बुद्ध, शस्‍त्रसंन्यास सोडून परत आलेले सेनापती विक्रमसिंह, त्यांचा युद्धबंदी झालेला पुत्र वल्लभ, त्याची पत्‍नी सुलोचना, लालची लंपट शाकंभट, कोसलाचे शाक्यांवरील आक्रमण, या सगळ्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीच्या, त्यातील किरदारांच्या प्रतिमा आहेत हे नि:संशय समजते.

मा. दीनानाथ मंगेशकर आणि सावरकारांचा खास स्‍नेह होता. मा. दीनानाथांच्या 'बलवंत संगीत मंडळीं'नी १९३१ च्या सुमारास 'सन्यस्त खड्ग'चे रंगमंचिय सादरीकरण करायचे ठरवल्यावर त्यांनी मूळ कथेवर, रंगाविष्कारास पूरक असे काही संस्कार केले. सावरकरांच्या संमतीने. पण या बदलांची व्याप्‍ती, (सावरकरांच्या इच्छेनुसार) फक्त नाटकाच्या सादरीकरणापर्यंतच मर्यादित असणार होती. त्यामुळे मूळ संहितेत कुठलाही बदल करण्यात आला नाही.

त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे सुलोचनेच्या मुखी असलेले, 'मर्मबंधातली ठेव ही' हे पद. मास्तरांनी ते शं. बा. शास्त्रींकडून लिहून घेतले. शास्त्रींनीही हे पद थेट सावरकरांच्या शैलीत रचलं. नाटकाच्या कथानकास पूरक असा प्रतिमांचा, रूपकांचा खास वापर करत.

सुलोचना ही 'सन्यस्त खड्ग'ची नायिका आहे आणि नायकही. मा. दीनानाथ स्वत: हे पात्र रंगवायचे. तिचे आचार-विचार हा नाटकाचा गाभा आहे. नुसता ती गाते त्या पदांचा आलेख पाहिला तरी तिच्या व्यक्तित्वाच्या हलक्या-गहिर्‍या छटा दिसतात.
'माळ गुंफितांना ।' म्हणत वाट पाहणारी अभिसारिका 'सुलोचना'..
'सययी सखा न ये ।' म्हणून रुसणारी सुलोचना..
पतीच्या स्वागतासाठी केलेली फुलांची माळ युद्धाच्या धुमाळीत सुकून गेली तर - 'ही तर जग रहाटी आहे.. सुकतातची जगि या । फुले गळत पाकळी पाकळी ।' असा विचार करणारी सुलोचना..
एक राष्ट्रिय सैनिक म्हणून सैनिकवेषात 'रणरंगणी' रंगणारा 'सुलोचन'..
आणि शेवटी पतीसह वीरमरण.. हा तिचा प्रवास मोठा आहे.
तिच्या मनात दुविधा नाहीत. पती युद्धबंदी असतानाही तिच्या अंतर्मनात 'शरण की रण', असं द्वंद्व नाही. उलट 'मारत मारत मरण'वर ती ठाम आहे.

शाक्यांच्या उरलेल्या काही मोजक्या सैनिकांसह, विक्रमसिंह यांनी समरसभा बोलावली आहे. त्यात सुलोचना, 'सुलोचन' म्हणून गेली आहे. अर्थातच उपस्थित उर्वरीतांना याची कल्पना नाही. आक्रमण करणार्‍या कोसलाच्या राजाने, शाक्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी- शरण आलात तर सेनापती वल्लभास सोडून देऊ.

त्या वेळेस तरुण वीरवर 'सुलोचन' म्हणतो-
"कोसलावासीयांनी दाखवलेली ही फक्त लालूच आहे. उपरांत, अशा जीवनीय दुर्दशेहून मानी हौतात्म्यच सेनापती पत्करतील.
राष्ट्राराष्ट्रांच्या चिरंतन हानिलाभांच्या विचारात व्यक्तीस कोण मोजतो ! तो (शरणागतीचा) विचार विचारात घेण्याचा अविचार मी करू शकत नाही." ......

पण आतली 'सुलोचना' म्हणते (गाते),
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
नेईं हरोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥


अलि म्हणजे भुंगा, अंबुज म्हणजे कमळ. हे सर्व रूपक (metaphor) म्हणून येत असल्याने शब्दश: अर्थापेक्षा भावार्थाचा विचार करायला लागेल.

माझ्या मर्मबंधातली ठेव, माझे प्रिय पती वल्लभ, यांचे शत्रूने बलपूर्वक हरण केले आहे. पण राष्ट्रकार्यार्थ लढता लढता, पराक्रमाची पराकाष्ठा त्यांनी केली. त्यामुळे एकाच वेळेस मला अभिमान व दु:ख आहे. हा जो शत्रू त्यांच्या सुटकेची मज आशा दाखवित आहे, त्याचा मोह पडतो आहे खरा.. पण या शत्रूचा सुप्‍त हेतू शाक्यांचे राष्ट्र सर्वप्रकारे लुटून नेणे हाच आहे."

पटदीप रागात बांधलेले हे पद, पटदीपची आणि विरहाची आर्तता थेट पोचवतं. अनेक सिद्धहस्त गायकांनी गाऊन त्यास लोकप्रिय केलं आहे. स्वत: मा. दीनानाथ मंगेशकर, पं. वसंतराव देशपांडे, पं. प्रभाकर कारेकर, आशाताई भोसले, आशाताई खाडीलकर..

नाटकाच्या बाहेर या पदाच्या मुखड्याने एक वेगळीच उंची गाठली आहे. 'मर्मबंधातली ठेव' हे एखाद्या पुस्तकाचे शीर्षक असू शकते, एखाद्या लेखाचा मथळा किंवा एखाद्या हृदयस्पर्शी गाण्यांच्या कार्यक्रमाचे नाव. अशी ठेव तर जपून ठेवण्यासाठीच असते. जशी 'वाक्प्रचार' म्हणून 'मर्मबंधातली ठेव' ही उक्ती प्रचलीत होत गेली, तसं कुठेतरी 'नेईं हरोनी' जाऊन 'ठेविं जपोनि' हा बदल झाला असावा.

Related post - शत जन्‍म शोधितांना

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS