Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

आरसा


आरशाचं attraction कधीच नव्हतं. लहानपणी आईकडे, घरात असायला हवा म्हणून एक आरसा लाकडी कपाटावर होता. शाळेत जाताना त्याचा उपयोग केल्याचं काही आठवत नाही. मुलांनी कसे वाढावे हे आईचे फंडे पक्के होते आणि त्यांना अनुसरून ती संस्कारांचा छिन्नी-हातोडा घेऊन आम्हां भावंडाचे व्यक्तीमत्व घडवत होती. त्यामुळे शाळेत आरसा भेटला तो फक्त भौतिक शास्‍त्रात, 'आरसा ही एक परावर्तनशील पृष्ठभाग असलेली चमकदार वस्तू असते.' या स्वरूपात.... आणि हिमगौरी आणि सात बुटके (Snow White and the Seven Dwarfs) या परीकथेत.

कॉलेजमधे असताना घरातल्या आरशाचा उपयोगही करतात याची माफक जाणीव झाली. म्हणजे घराबाहेर पडताना त्यात डोकावून जाणं, एवढंच. आरशापुढे रमण्याचे ते दिवस, खांद्यावर खादीची झोळी अडकवून, सायकलवरून फिरत आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कामं करण्यात गेले. महाष्ट्राच्या अंतर्भागात जाऊन काही किलोमिटर्सचा रस्ता तयार करून देण्यासारखी श्रमदान शिबीरं, आसाम आंदोलनाच्या निमित्ताने ठोकलेली जाहीर सभेतली भाषणे, मोर्चे..
या सगळ्यात आरसा फक्त मनाचा आणि विचारांचा राहिला, आचरणात आला नाही.

पण आरशाची आवड किती तीव्र आणि किती लहानपणापासून असू शकते याची खरी जाणीव, भाचीने, ३ वर्षांची असताना करून दिली. नवीन फ्रॉक कसा दिसतो हे बेसीनवरच्या चिटुकल्या आरशात पाहणे तिला साफ अमान्य होते. ’कशी दिसते? 'तो' आरसा हवा....’ या तिच्या रीतसर आणि साग्रसंगीत थैमानाला शरण जात घरात पहिला पूर्ण लांबीचा आरसा आला.

पुढे 'आठवणीतल्या गाणी'चं काम सुरू केल्यावर 'आरसा' त्याच्या समानार्थी 'दर्पण', 'मुकुर' या शब्दांसह एका वेगळ्या स्वरूपात समोर आला. मराठी कवींनी, गीतकारांनी आरशाला अर्थालंकारांच्या स्वरुपात भरपूर वापरलं आहे.
उगीच हातच्या कांकणाला आरसा कशाला ?.... हेच पहा ना-
खेबूडकर म्हणतात 'स्वार्थ जणु भिंतीवरला आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी.'
भटांना दु:ख हा सूर हरवलेले जीवन आणि त्यांच्यातला आरसा वाटला- 'दुःख माझातुझा आरसा.. जीवना तू तसा, मी असा !'
'अंदाज आरशाचा वाटे खराच होता' या इलाही जमादार यांच्या अप्रतीम गझलेत ते म्हणतात, 'रोज अत्याचार होतो आरशावरती आता.... आरशाला भावलेली माणसे गेली कुठे ?'

मध्यंतरी अगदीच अनपेक्षित अशा व्यक्तीकडून आरशाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन वाचनात आला.
आन्द्रे आगासी हा टेनीसपटू फार काही philosophical वगैरे बोलू शकतो, असं कधीच वाटलं नव्ह्तं. The Guardian या इंग्रजी वर्तमानपत्रात त्याने म्हंटलं आहे,

I don't spend a lot of time looking in the mirror – it takes too much energy – but when I do, I see a work in progress.
I am constantly changing and, unfortunately, I've seen my best days.....
(Read complete post)
- Andre Agassi

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

अबोध काहीसे


खिडकीच्या काचेवर टकटक.... कसं शक्य आहे? आत्ता पर्यंत असं कधीच झालं नाही आणि होणं अवघडही.... इतक्या उंचावर कोण येणार?
चक्क चिमणी.

आता भारतातून दिसेनाशी होऊ लागलेली चिऊताई.... इथे दिसते क्वचित कधी.... पण आमच्या घराच्या खिडकीच्या बाहेर प्रथमच.... आमच्या दोघींमध्ये जाड काचेची भिंत.

एवढासा जीव.... काचा उघडूच शकत नाही अशा खिडकीच्या बाहेर, तितक्याच पिटुकल्या आधाराला टेकलेला.... कृष अंगकाठी.... ही आजकालच्या फॅशनला धरून जाणीवपूर्वक की कुपोषीत? पाणी हवंय का हिला? द्यावं तरी कसं? माझं इतकं जवळ जाणं तिला घाबरवत कसं नाही? एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे बघताना मधूनच चोचीने काचेवर केलेली टकटक आणि मधल्या काचेमुळे muted वाटणारी चिवचिव....

काही सांगायचंय का हिला? पण चिमण्या कुठे बोलतात? म्हणजे विचार तरी करू शकतात का? जवळ-जवळ १० मिनिटे चाललेली ही interaction संपूर्णत: निरुद्देष्य कशी असेल?
आमचं घर ३० व्या मजल्यावर, म्हणून मला काही आकाश तितकंसं जवळ नाही.... माझ्या भोवती माझ्या घराच्या भिंती.... तिचं अभाळही तितकं मोकळं नव्हतं का?
हा ’या हृदयीचे- त्या हृदयी’ असा संवाद की.... कल्पनेच्या विलासाला लागलेले चिमणीचे पंख?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कहाणी मिडियाची.


( 'ऐका गणेशा तुमची कहाणी' या पारंपारिक कहाण्यांच्या चालीवर. )

ऐका मिडिया तुमची कहाणी.
अनेक भाषा, अगणित वाद.
वाढती प्रजा, त्यांच्या वाढत्या गरजा.
अनेक पक्ष, असंख्य नेते, त्यांचे अमर्याद घोटाळे.
न्यूज चॅनेल्सची मांदियाळी.
मनींचे चॅनल मनीं वसावे.

हा वसा कुणी घ्यावा ? हा वसा कुणीही घ्यावा.
एक छानसे चॅनल काढावे. ते चोवीस तास चालवावे. त्याला न्यूज चॅनेल असे नाव द्यावे.
खूपच आविर्भावाने बोलू शकणारी चार-दोन डोकी घ्यावी.
त्यांना 'news anchor' असे खासे नाव द्यावे.
तोंडी 'केंद्राने राज्याच्या तोंडाला पानं पुसली' अशी भडक भाषा द्यावी.
त्यांनी काय करावे?

दिवसभरातील एक छोटा-मोठा प्रसंग घ्यावा.
कॅमेरा आवडणारे आणि कॅमेऱ्याला आवडणारे तेच-तेच चेहरे घ्यावे.
त्यांच्यात झुंज लावून द्यावी. त्यास 'विद्वत्तापूर्ण चर्चा' असे नाव द्यावे. "अमुक असं म्हणतात त्यावर तमुक तुमचे काय म्हणणे आहे?" असे अधूनमधून बरळावे. अशा प्रकारे आपल्याकडे नसलेले संशोधन कौशल्य शिताफीने झाकावे.
त्यावर कॅमेराच्या चित्र-विचित्र angles चा आणि loop मध्ये टाकलेल्या स्वल्प चित्रफितींचा overlay द्यावा.

हा वसा कधी घ्यावा? दिसा उजेडी आरंभ करावा. अंधार रात्री संपूर्णास न्यावा.

संपूर्णास काय करावे? जाहिरातींचे उत्पन्न मोजावे.
भ्रष्टाचार, दहशतवाद, राजकीय नेते - त्यांची वक्‍तव्ये, चित्रपट अभिनेते - त्यांची अविद्वत्तापूर्ण भाषणे, यातील कुठल्या विषयाचा TRP जास्त याचा हिशेब मांडावा.
समाजाचा अत्यल्प विचार करावा.
अल्प दान, महापुण्य.

उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये.
ऐसा मिडिया मनीं ध्याइजे, money पाविजे, चिंतिले लाभिजे, कार्यसिध्दि करिजे.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कोमेजली कवळी पानं


programming / coding चे चाललेले काही नवे प्रयोग... त्यासाठी करावी लागणारी internet वरची सखोल शोधाशोध... एकाग्रता...
अचानक गळून पडलेल्या झाडाच्या पानाच्या आवाजाने त्या वातावरणाला छेद दिला.

घरात पंचवीस एक ’हिरवी’ चिल्ली-पिल्ली वाढत आहेत. ह्या thermostat controlled 22oc वातावरणात ही कोणी नाराजी दाखवली?
सात-साडे सात फूट ताडमाड वाढलेल्या एका झाडाचे, काहीसे नवीनच, पान खाली पडले होते. मातीची आर्द्रता, बाहेरचे तापमान अशी जुजबी पाहणी केली आणि असं होतं कधीकधी, मनात म्हणत माघारी वळले.

पण गेल्या तीन दिवसात अशी पाच पानं? माझ्या अस्वस्थतेचा कडेलोट.. त्या झाडाचे जवळ-जवळ प्रत्येक पान मागून-पुढून तपासून पाहिलं. काही अनोळखी खुणा... काही वेगळी स्पंदनं... यांचा शोध घेतला. चक्क एक छानसं भिंग घेऊन सुद्धा.

हे सर्व चालू असताना एक वेगळाच विचार मनात आला..
असे गळून पडलेल्या भावनांचे आवाज पण ऐकू आले असते तर? आणि ते ऐकू येण्यासाठी शांतता हवी की संवेदनशीलता?


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Sharing


लेक मोठा होताना त्याच्या बरोबर काय काय नाही share केलं ? त्याच्या तीन चाकी सायकलवर डबल सीट बसण्यापासून झालेल्या ह्या सुरुवातीने, त्याच्या बरोबरीने माझ्याही मोठं होण्याच्या प्रवासात अनेक थांबे घेतले.

♦ अनेक वेळा प्रयत्न करुनही १० फुटांच्यावर उडू न शकलेला आमचा पतंग...
♦ "आई... पळत ये... Tom and Jerry..." म्हणून ठोकलेली ठणठणीत आरोळी...
♦ अल्फा मराठीवरचा 'गोट्या'...
♦ swimming शिकताना ’जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली’ म्हणत, डोळे गच्च मिटून पाण्यात    मारलेली उडी...
♦ त्याच्या मित्रांबरोबर तेवढाच आरडाओरडा करत केलेले treks...
♦ सचिनची शारजा मधली तुफानी century ...
♦ पूर्वी माझ्या kinetic समोर ’फेली, फेली" चा दंगा करून मिळवलेल्या, मग तो चालवायला    लागल्यावर त्याच्याकडून तितक्याच हक्काने वसूल केलेल्या, दुचाकीवरील गावभर आणि निष्कारण    फेऱ्या...
♦ सकाळी किती वाजता उठवायचे यासाठी रोज रात्री त्याच्या खोलीच्या दारावर लिहून ठेवलेला C++    मधला एखादा किचकट program, ज्याचे output मी शोधून काढून त्या वेळेस त्याला उठवणे...
♦ त्याच्या पहिल्या SLR कॅमेराने केलेल्या प्रयोगांसाठी चादरी बांधून केलेले reflectors...
♦ टी. व्ही वर पाहून केलेले cooking चे अचाट प्रयोग...
♦ होळीचे रंग... Sherlock Holmes... पु. ल... James Bond........ असं बरंच काही.

अजूनही दोन गोष्टी त्या दिवसांशी नाळ जोडून ठेवतात. एक ’चिंटू’. आडव्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेल्या किंचित आगाऊ चिंटूला ’सकाळ’ पेपर उघडून भेटल्यावर पूर्वी दिवसाची सुरुवात होई. आता दिवसाचं पहिलं email हे लेकाकडून आलेलं, Today's Chintoo चं असतं.

आणि दुसरं म्हणजे jigsaw puzzles. सुरुवात फक्त ५० तुकड्यांपासून झाली. आता असतात ती ३००० तुकड्यांची puzzles, 3-D jigsaw puzzles, ज्यातून तयार केलेल्या आयफेल टॉवर सारख्या इमारती...

आता नातं आई-लेकापेक्षा मित्रांसारखं आधिक झालं आहे.
जगभरातून शोधून शोधून जमवलेली ही puzzles सोडवताना, ’शेजारी’ सिनेमातील कोसळणाऱ्या धरणाच्या भिंतीवर बसून पट खेळणाऱ्या दोन मित्रांची, भान विसरवणारी उत्कटता असते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Husbands


Parking lot full. अत्यंत सवकाश गाडी चालवत शोध घेणे चालू होते. तेवढ्यात अगदी अनपेक्षीत, एका गाडीने बाहेर निघण्यासाठी reverse घेतला आणि गाडीला गाडी टेकली... दोन्ही गाड्या खूपच slow असल्याने जे घडलं त्याला accident म्हणणं अवघड होतं. भारतात अशा वेळेस, दोन-चार अपशब्दांची देवाण-घेवाण होऊन दोघेही मार्गस्थ झाले असते.

ह्या देशातील नियमांप्रमाने पोलीस रिपोर्ट घेणे आवश्यक होते. आता चांगला अर्धा-पाऊण तास वाया जाणार तर... गाड्या as-it-is स्थितीत ठेवून दुसऱ्या गाडीतील जो कोणी असेल, तो driver खाली उतरेल आणि पोलीसांना फोन करेल, अशी वाट पहायला लागले. म्हणजे इथे तशा police instructions आहेत. कितीही मोठी ठोकाठोकी असली तरी, involved महिलेने गाडीतून खाली उतरायचे नाही. पण दुसऱ्या गाडीतून सुद्धा कोणी उतरेना. अच्छा, म्हणजे हा आम्हां दोन बायकांचा पराक्रम होता तर.

पोलीसांना फोन केला का, हे विचारायला दुसऱ्या गाडीपाशी गेले. ती जरा अस्वस्थ वाटली. कदाचित नवशिकी असावी. तिची गाडी reverse घेताना धडकली म्हणजे तिला papers मिळतील म्हणून घाबरली असावी. म्हंटलं, "Its OK. Don't worry."

चेहऱ्यावरचा गॉगल खाली करत म्हणाली, "पता नहीं अब घर जा के क्या क्या होगा । बडी मुश्कील से इतने सालों बाद driving सिखी हूँ । आप शायद समझ सकोगी । वैसे इंडिया के हो या पाकिस्तान के, husbands तो 'husbands' हि होते हैं !!

नेमके कसे react करावे हे न कळल्याने मी चेहऱ्यावर गॉगल चढवला आणि पोलिसांना फोन लावला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

किती तरी दिवसात


"आजकाल कसं झालंय माहिती आहे का... जिस गली में internet ना हो बालमा, उस गली से हमें तो गुजरना नहीं ।"
असं ऐटीत कुणाला तरी म्हंटलं खरं...

पण बदलती जीवनशैली कशी अंगात भिनली आहे, तिच्या चक्रात नकळत कसे गुरफटलो आहोत, याची खाडकन जाणीव झाली.

शाळेत शिकलेली मर्ढेकरांची कविता, तेव्हा जेवढी समजली नाही त्याच्या कैक पटीने आज समजली.


किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो;
किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय

आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा इथे, दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची शिरी धार, मुखी ऋचा !

- बा. सी. मर्ढेकर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Sorted (3)


५-६ महिन्यांपूर्वी गॉगलसाठी एक नवीन case आणली. आधीची खूपच bulky असल्याने पर्समधील बरीच जागा ती घ्यायची. त्यामुळे पर्स मधून काही काढणे, या साध्या गोष्टीसाठी अंदाजपंचे शोधाशोध करण्यात खूपच वेळ जायचा. ही नवीन case छान छोटीशी असल्याने ते frustration वाचणार होते.

पण मग एक नवीनच त्रास सुरू झाला. त्या नवीन case मध्ये गॉगल चटकन बसायचा नाही. तो बसवण्यासाठी त्याच्या बाजू अनेक वेळा उघडणे, त्या वेगवेगळ्या प्रकारे fold करणे, गॉगलचा angle बदलून पहाणे, कधी उलटा तर कधी सुलटा ठेवणे, असं बरंच काही- सगळे permutations and combinations- तेही बहुतेक वेळा कुठुन तरी कुठेतरी जाण्याच्या घाईत किंवा कोणाशी बोलताबोलता. नवीन वैताग.

आज शेवटी शांतपणे गॉगल आणि case, दोन्ही घेऊन बसले. तो नेमका कसा घडी करून कु्ठल्या angle ने ठेवायला हवा, याची एक निश्चित पद्धत ठरवली. हे करायला जस्तीत जास्त एक मिनिट लागलं असेल. sorted !!

किती किरकोळ गोष्टीवर वैतागण्यात केवढा वेळ गेला. हे जर आधीच केलं असतं तर?


Related posts :   Sorted ?,   Sorted (2)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Integrity


ह्या प्रसंगाने खरोखरीच खूप अस्वस्थ केलं आहे.

तब्बल ४ वर्षांनी Make-A-Wish Foundation मधून फोन आला. जुन्या-नव्या स्वयंसेवकांचे छोटेसे संम्मेलन आयोजीत केलं होतं. साधरणत: १३ वर्षांपूर्वी MAWF ची दुबई शाखा लॉरी डिल्लनच्या पुढाकाराने आणि समरीन मलिकच्या साथीने सुरू झाली. पहिल्या काही दिवसातच मी त्यांना सामील झाले. आम्हां तिघींची एक टीम होती जी इथल्या बदलत्या, प्रवाही जनसंख्येमुळे फुटली. लॉरी कॅनडाला परत गेली, समरीनने पाकिस्तान मार्गे अमेरिकेचा रस्ता धरला. मीही नंतर ह्या संस्थेपासून विलग होत गेले.

मोजकीच मंडळी बोलावलेली. इतक्या वर्षांनी गेल्यामुळे ओळखीचे कोणीच नव्हते. नाही म्हणायला भारतीय वंशाचे एक-दोन चेहरे दिसले. जमलेले सगळे वेगवेगळ्या देशांचे असल्याने अशा वेळेस गप्पांचे विषय हा एक वेगळाच ’विषय’ असतो. आधीच ओळख नाही त्यात देश, संस्कृती, सगळंच भिन्न. टी.व्ही. वरच्या कार्यक्रमांवर गप्पा चालू असताना एक युरोपीयन महिला म्हणाली की अलीकडे तिला तिच्या टी.व्ही. वर दोन हिंदी सिनेमांचे चॅनल्स्‌ दिसतात. तिला हिंदी अजिबात कळत नाही पण चॅनल सर्फींग करताना दिसलं. हे ऐकता क्षणी तिथल्या दुसऱ्या भारतीय महिलेने तिला विचारले, “त्या चित्रपटांतील गाणी पाहिली ?”
"Yeah, interesting."

Profiling करणे हे चूकच. व्यक्तीचा काहीही अनुभव नसताना केवळ वंश, देश, त्वचेचा रंग, धर्म, जात अशा अनेक गोष्टींवरून तिच्याबद्दल साचेबद्ध मत तयार करणे योग्य वाटत नाही. तरीही काही विशेषता असतातच. वरील संभाणातील भारतीय महिलेचा लागलेला किंचित चढा स्वर, बोलताना केलेले हातवारे आणि तिला मिळालेल्या उत्तरातील subtle English sarcasm ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

उत्तरातल्या ‘interesting’ या शब्दातला खोचकपणा संपूर्णत: दुर्लक्षित झाल्याने आणि स्वत:ला मिळालेल्या लक्षाने त्या बाईंना चांगलाच चेव आला. “Yeah, they are. Did you see the two flowers or two birds? That’s how love is shown in Hindi movies. They are suggestive ONLY in movies. And this is the country that produces so many children every year. One billion plus population.. hmm... Do you believe India is the country where certain subjects are not discussed public? Yet the whole world knows what they do in private ……… In some states they even force the woman to marry her late husband's younger brother ..... "

उपस्थितीत सगळे आवाक. बाई थांबायचं नावच घेइनात. मी मधे काही बोलण्याचा प्रयत्‍न केला. पण बाईंनी असा काही आवाज लावला होता की आम्ही दोघी अमर्त्य सेनच्या The Argumentative Indian ची उदाहरणं झालो असतो. म्हणून मी माघार घेतली खरी, पण ....... चुकलं का ?

एका टोकाच्या अस्वस्थतेने घेरलं आहे. काय हे ? ही कुठली.. कशाची तीव्र इच्छा, जी इतकं बोलायला लावते? नेमका उद्देश तरी काय होता? लक्ष वेधून घेण्याचा आटापिटा म्हणावं तर बाई अती समृद्ध घरातल्या वाटल्या. देशाभिमान नाही म्हंटलं तर, कितीही वर्ष दुबईत राहिलं तरी रहायचं ते भारतीय पासपोर्टवरच.

माझ्या पुरतं एवढंच सांगता येईल, ज्या क्षणी मी भारताबाहेर जाण्यासाठी immigration clear करते त्या क्षणापासून, चालता-बोलता, बसता-उठता, विमानात-विमानतळांवर, दुकानात-रसत्यांवर, ज्या देशात असेन तिथे.... मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करते, भारतीयांबद्दल इतरांच्या मनात तयार होणाऱ्या प्रतिमा-प्रक्रियेचा मी एक भाग आहे, हे भान विसरताच येत नाही.

Make-A-Wish Foundation ही 'terminally ill' लहान मुलांची, जवळ-जवळ शेवटची, एक इच्छा पूर्ण करणारी संस्था आहे. साधारणत: इथे भेटलेल्या एकेका मुलांबरोबर घालवलेला वेळ हा अस्वस्थ करून जाणारा अनुभव असायचा. पण ते सांभाळायला शिकले होते.
ह्या बाईंच्या बोलण्याने कदाचित त्यापेक्षाही जास्त अस्वस्थ केलं आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पोलीस म्हणतो... चेपेन ?


घटना पुण्यातली आहे. तशी तिथे नित्य नेमाने घडते, पण माझ्या आणि निमाच्या बाबतीत प्रथमच घडलेली. निमाच्या स्कूटरवरून जाताना- we jumped a red light !

गप्पांच्या ओघात सिग्नल चालू आहे याकडे लक्षच गेले नाही. अनेक शिट्ट्या एका क्षणात वाजल्या आणि काय झाले ते समजले. चार-पाच traffic police वेगवेगळ्या वाहनांच्या दिशांनी गेले. आमच्या समोर आलेल्या lady traffic police ला आमचं आपसूकच sorry, sorry म्हंटलं गेलं. पुढे जाऊन आम्ही असंही सांगितलं, "चुकलंच आमचं. सिग्नलकडे आम्ही लक्ष द्यायला हवं होतं."

खूपच आविर्भावाने आलेल्या त्या पोलीस बाईंच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. डोळ्यांत किंचित पाणी आणि आवाज हळवा झाल्यारखा वाटला. आमच्या दंडाची पावती फाडताना त्या म्हणाल्या, "आम्हाला sorry किंवा चुकलं असं कुणीच म्हणत नाही हो."

बाजूला पाहिलं तर इतर काही पोलीस सिग्नल तोडून पळून जाणाऱ्या गाड्यांच्या मागे अक्षरश: धावत होते. काहींची तर हातात आलेली गाडी वेडी-वाकडी करून, वेग वाढवून पळून जाणाऱ्या वाहकांच्या प्रयत्नांमुळे चक्क फरफट होत होती.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Choice (2)


निमाच्या घरामागे, थोड्या अंतरावर मोठ्ठं पटांगण आहे. तिथे नेहमी मांडव घालून लग्नं होत असतात.

भर दुपारचा मुहूर्त असलेल्या ह्या लग्नांना त्या टळटळीत वेळी सुद्धा तब्बल 10,000 watts चे 'Loud'-speakers लावलेले..

ह्या speakers वरून वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरून त्या लग्नातल्या पार्ट्यांच्या मानसीकतेचा अंदाज घेण्याचा जसा आम्हाला एक चाळा लागलेला.
कधी कधी ह्या गाण्यांचा choice खूपच धक्कादायक असतो.

म्हणजे लग्नाआधी वाजवलं जाणारं 'Oooh.. LaLaLa.. अब मैं जवाँ हो गयी' किंवा 'अप्सरा आली'.. पचायला जरा जड गेलं, तरी समजू शकतं.

पण लग्न लागल्या नंतर लगेचच 'विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती ?' ???


Related posts :   Choice

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Choice


वरच्या मजल्यावर रहाणारा मुलगा.. बहुतेक खूप 'खुष मिजाज़' तरी असावा.. नाही तर मराठी नसावा..
कारण सोमवार सकाळच्या office आधी सुद्धा तो अगदी 'मन लावून' bathroom singing करतो.
तसा तो रोजच 'गातो'.. जर त्याच्या गाणं 'म्हणण्याला' - 'गातो' म्हणण्याचे धाडस केलं तर.
म्हणजे रोज एक गाणं.. अगदी सक्काळी.. माझ्या डोक्यात पेरलं जातं !!
जरा हटके आणि छान असतं म्हणून काय झालं.... दिवसभर आपल्या मनात घोळणाऱ्या गाण्याचा choice दुसर्‍याच कोणाचा ??


Related posts :   Choice (2)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

डोह..


मध्यंतरी समृद्धीने FB वर एक link पाठवली. त्यात भालचंद्र नेमाडेंच्या ’कोसला’ आणि J. D. Salinger यांच्या ‘The Catcher in the Rye’ या दोन पुस्तकांचा एकत्र विचार करण्यात आला होता. यावर आमच्या छान गप्पा झाल्या. पण मग पुढे जाऊन तीच म्हणाली, ’कोसला’ हा कदाचित नसेल original thought, हे कळल्याने किती फरक पडतो?

बोलता बोलता तिला म्हंटलं गेलं, ’हो खरंय, प्रत्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे नाही.’

इथे विषय ’कोसला’ हा अर्थातच नाही. ही ओळ ज्या कवितेतील आहे, ती वैभव जोशींची कविता हा आहे. साधारणत: तीन वर्षांपूर्वी वाचलेल्या आणि तेव्हापासून सतत मनात घोळत राहिलेल्या या ओळी, वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे भीडत गेल्या.

एखाद्या mature मैत्रीत कधी हे काव्य जाणवले तर कधी चिकित्सकपणे उहापोह करण्याच्या नादात हरवलेल्या सौंदर्यदृष्टीत. घरातल्या माझ्या सगळ्यात आवडत्या जागी- झोक्यावर बसून खाली दिसणाऱ्या पाण्याकडे पाहताना आणि मुंबईत गेल्यावर बाबांच्या समोर नुसतं बसून रहाताना सुद्धा. आज तीच कविता आवर्जून कराविशी वाटतेय. कवितेचे नाव आहे-



डोह..
एखादा डोह असू द्यावा.. अथांग
कुठल्याही क्षणी हक्कानं जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अशा अंतरावर बसून बघत रहावं..
आपण डोहाकडे,
डोहाने आपल्याकडे..
ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील तर कसला आला अपेक्षाभंग ?
डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला ?
अन् हलकेच एखादं पान सरकवत त्याने दाखवून द्यावं
बरीच आंतरिक उर्मी आहे.. पण तळाला !
अशावेळी,
ते पान परत पाण्यात सोडून द्यावं.
हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायला हवा असे नाही,
प्रत्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे नाही.

- वैभव जोशी


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS