Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

नीरव


सकाळी ६.३० ते संध्याकाळी ७.३० घरी कुणीच नसतं. घर ३०व्या मजल्यावर. खालच्या रस्त्यावरचे आवाज नाहीत... शेजारच्या मस्जिदीतले पुकारे नाहीत… असते घर भरून राहिलेली शांतता आणि मी.

अचानक गेल्या १० वर्षात न घडलेली गोष्ट घडली. वीज गेली. आणि पूर्वी आवाजाचा स्टोव्ह बंद झाला की जसं वाटायचं, तसं झालं. AC + firidge + etc असा एक collective humming sound बंद झाला… म्हणजे ती शांतता नव्हतीच तर... त्या शांततेही एवढा गोंगाट होता !

आता एरव्ही न ऐकू येणारे आवाज ऐकू यायला लागलेत... लॅपटॉपचा फॅन... बरं झालं… त्याची बॅटरीच संपली… हे घड्याळ… नकोच त्याची टिकटिक... बंदच करावं… आता हे काय?... पुस्तकावर दिलेला ताल... मनातल्या गाण्यावर... ही कधी लागली सवय? ... बंद करायला हवी... आता तरी 'नीरव' शांतता ?

हं !… आता डोक्यातले विचार कलकलाट करायला लागलेत. मेले फारच झालेत. थोडे कमी करायला हवेत... आणि 'तो' एक विचार तर फारच घोंघावणारा... नानाच्या 'एक मच्छर' सारखा… त्याचा पहिल्यांदा खातमा केला पाहिजे... त्यात ही कसली धडधड ?… माझ्याच काळजाची की… ती कशी बंद करणार ?

चला… 'ती' नीरवता बहुतेक 'ही' धडधड थांबल्यावरच.................. !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

निरागस


तो त्याच्या वडिलांच्या खांद्यावर होता. डुगडुगणारी मान, गोल गोल डोळे, डोक्यावर तुळतुळीत टक्कल. जवळ जवळ सहा फूट वडिलांच्या खांद्यावर हा जेमतेम सव्वा फूट. वय असेल ५-६ महिने. टुकुर टुकुर डोळ्यांनी सगळीकडे पहाणं चाललं होतं. नजरेत सगळ्या जगाबद्दलची उत्सुकता ठासून भरलेली. माझी प्रत्येक हालचाल निरखून पहात होता.

त्याचं निरिक्षण करण्याच्या नादात २ coke चे cans उचलले आणि shopping trolly मध्ये टाकताना बाजूच्या २ cans ना धक्का लागला. ते खाली पडले. धप्प धप्प असा आवाज झाला. त्याला दचकायला पुरेसा. त्याच्या नजरेत धरणीकंप झाल्याचे भाव. त्याने माझ्याकडे पाहिलं. मला हसूच आलं. त्याने अर्धा क्षण डोळे बारीक केले, कपाळाला आठ्या घातल्या. मग तोंडाचं बोळकं पसरवीत मनापासून, दिलखुलास हसला. हसताना मानेचा तोल गेला. नाक वडिलांच्या खांद्यावर आपटलं, जीवणी भोवतीचा सगळा ओलावा वडिलांच्या शर्टाला पुसला गेला. ह्यावेळेस त्याचं त्यालाच हसू आलं- स्वत:च्या फजितीचं. मग बराच वेळ मान तिरपी करून मला मिश्किल हास्य देत राहिला.

माझ्यासाठीही जग खूप सुंदर झालं. उरलेला संपूर्ण दिवस मोरपीसा सारखा तरंगत, हलका गेला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ती गेली तेव्हा ...


ती गेली तेव्हा ...
खरंच पाऊस रिमझिम निनादत होता. मंद, शांत, गंभीर. तीच्याच सारखा.
खरं तर तिच्या नसण्याची एव्हाना सवय व्हायला हरकत नव्हती.
दोन्ही हातांची बोटं दोनदा वापरावी लागतील ... इतकी वर्षे झालीत.
ती गेली तेव्हा ...
अजून बरंच काही घडलं.
बाबांच्या स्कूटरचं मागचं सीट रिकामं झालं.
अंगणातील ५ रंगांच्या जास्वंदी, मोगऱ्याचा ताटवा, ३ आंब्याची आणि २ नारळाची झाडं कावरी-बावरी झाली.
शेजारच्या रमाचं कैरीचं लोणचं शिकणं अर्धवट राहिलं.
माझ्या लेकाचे 'जावयाचे पोर' म्हणत होत असलेले लाड फार बालपणी संपले.
नवऱ्याच्या तोंडातली चकलीची चव गेली.
ती गेली तेव्हा,
शिल्लक राहिले खूप आवाज.
ते कधी कानात शब्द होऊन घुमतात.
कधी डोक्यातले विचार होतात.
कधी मनावरचे संस्कार,
तर कधी हृदयाची अस्वस्थ धडधड...

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कोण म्हणतं टक्का दिला ?


फार लहानपणी आम्ही मुली एक खेळ खेळायचो. 'फार' म्हणायचे कारण की नीटसं आठवत नाही... इतक्या लहानपणी. सगळ्या मुलींनी गोल करून बसायचे. एक टाळी आपण वाजवायची. दुसरी, एकेका हाताने दोन्ही शेजारणींना एकदमच द्यायची. हे करताना कुणीतरी चालू करायचे...

"कोण म्हणतं टक्का दिला?" मग पुढचीचं नाव घेत म्हणायचे, "कुंदा म्हणते टक्का दिला." मग कुंदाला विचारायचे, "का ग कुंदा टक्का दिला?" यावर कुंदा विचारणार, "कोण म्हणतं टक्का दिला?" "मंदा म्हणते टक्का दिला" "का ग मंदा टक्का दिला?" ................ चालूच... एकीने दुसरीचे नाव घेत पुढे.

हा खेळ का खेळायचा? यात कोणी out कसं होत नाही? खेळ थांबवताना कोणावर आणि का थांबायचे? हे प्रश्न डोक्यात येण्याइतके काही आम्ही आलिकडच्या मुलांसारखे चंट नव्हतो. पुढे मोठं झाल्यावर कधी हे विचार मनात आले, पण त्यांचा फारसा पाठपुरावा केला गेला नाही. पण अगदी अलिकडेच मला या खेळाचे महत्व... नाही, खरं तर उपयोग खूप प्रकर्षाने जाणवायला लागला आहे.

आपण मोठी माणसं इतक्या सहजतेने, लीलया हा खेळ खेळतो की जसा तो रक्तातच भिनलाय. फक्त त्याचं नाव बदललंय. आता त्याला आपण 'blame game' म्हणतो. बघा नं...

Anderson ला भारतातून कोणी जाऊ दिले? ... "का रे कलेक्टर जाऊ दिले?"... "कोण म्हणतो मी जाऊ दिले? ते तर अर्जुनने जाऊ दिले"... "का रे अर्जुन जाऊ दिले?"... "कोण म्हणतो मी जाऊ दिले? ते तर राजीवने जाऊ दिले." ...................चालूच. पुन्हा हा game कधी संपतो, कुणावर संपतो हे लक्षात यायच्या आत नवीन game सुरू.

महत्वाची गोष्ट अशी की फक्त राजकारणीच नाही तर आपण सगळेच कुठल्या न कुठल्या स्तरावर हे करतच असतो. आरुषीची हत्या कोणी केली?, २०-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे पानिपत का झाले?....ते थेट कौटुंबीक कलहांपर्यंत... "मी तर असं म्हणालेच नाही, तोच म्हणाला."... "का रे तू असं म्हणाला?... "कोण म्हणतं टक्का दिला?".....................

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS