Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label वैचारीक. Show all posts
Showing posts with label वैचारीक. Show all posts

पृथक्‌

मराठी पाऊल पडते पुढे

('पृथक्‌' या सदराखाली अधूनमधून काही लिहावं असा विचार आहे. अर्थातच एखाद्या मराठी गाण्यावर. पण हा ब्लॉग नसेल. टिप्पणी किंवा विश्लेषण. आजच्या भाषेत याला, गाण्याचं deconstruction असं म्हणता येईल. कदाचित यात काहीच नवीन नसेल, पण एकत्रितपणे मांडलेलं असेल. तळापर्यंत जायचं असल्याने बहुतेक वेळा पुष्टीकरण असेल आणि नसलं तर तुम्हालाच विचारेन.😊🙏)

सुरुवात 'मराठी पाऊल पडते पुढे' या, याच नावाच्या चित्रपटातील शांता शेळके लिखित गाण्याने करते.

'मराठी पाऊल पडते पुढे' या चारच शब्दांतून व्यक्त झालेल्या ओजस्वी भावनेने मराठी मनाचा गेले कैक वर्षे जबरदस्त ताबा घेतला आहे. घरगुती संभाषण ते भव्य-दिव्य सोहळा, अशा कुठल्याही प्रसंगी हे गाणं, या गाण्याचे शब्द सतत वापरले गेल्याने पाठ असतात.
नुकतीच या गाण्यासंबंधी अधिक उत्सुकता निर्माण झाली.

चित्रपटात चित्रित झालेला कडव्यांचा क्रम आणि रेडिओवर ऐकू येणारा क्रम वेगळा आहे, याची नोंद मी आधीच घेतली होती, तरी ते तेवढं महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं ते हे की याचे सगळेच्या सगळे शब्द शांताबाईंचे नाहीत, हे मला सतत जाणवणं.
शोध घेता जे लक्षात आले ते -

गाण्याची सुरुवात ज्या ओळींनी होते-
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला
भला देखे

या ओळी ’ज्ञानेश्वरी’तून, काही किरकोळ फेरबदल करून आल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेच्या ३र्‍या अध्यायाच्या ३५व्या श्लोकाचं विवेचन करताना ज्ञानेश्वरीत म्हंटले आहे-
अगा स्वधर्मु हा आपुला ।
जरी कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला ।
भला देखैं ॥
ज्ञानेश्वरी (३.२१९) गीता (३.३५)

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ॥
हे संत तुकाराम म्हणतात.
तुकाराम गाथा (९८१)

या अभंगात तुकारामबुवा हे मऊपण किती, हे त्यांच्या खास भाषेत सांगताना म्हणतात,
मेले जित असों निजोनियां जागे ।
जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी ।
नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥

स्वये शस्‍त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
यातील शेवटच्या शब्द समूहामुळे, या ओळींचा मी समर्थ रामदासांच्या साहित्यात (असफल) शोध घेतला.
मग अरुणाताई ढेरे आणि धनश्री लेले यांनी सांगितले, या ओळींची रचना समर्थ रामदास यांनी केली असल्याचा सार्वत्रिक समज असला तरी शांताबाईंनी आयत्या वेळी लिहिलेला हा श्लोक आहे. अगदी रामदासांचाच वाटेल इतका सशक्त.
डॉ. माधव खालकर यांनी रामदासी भाषेची वैशिष्ट्ये सांगत, या ओळी रामदास स्वामींच्या कशा नाहीत, हे समजावून सांगितले.
याबद्दल तीनही मान्यवरांचे मन:पूर्वक आभार.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

प्रेरणा

आज लहानपणीची शाळा आठवायचं कारण म्हणजे अर्थातच आजचा शिक्षक दिन.

आमच्या नाशिकच्या शाळेची दगडी इमारत लवकरच १०० वर्षांची होईल. 'गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल' किंवा 'शासकीय कन्या शाळा असं अत्यंत रूक्ष नाव असण्यार्‍या या शाळेने, सांगून होणारे 'शिक्षण' तर दिलेच पण न सांगता होणारे संस्कार जास्त दिले.

पूर्वी एकदा मी शाळेनंतरच्या आयुष्यात, माझी शाळा घेणार्‍या, माझ्या अनुभवांविषयी लिहिलं होतं.
कारण आता 'अभ्यास' या शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट आणि नेमका समजायला लागला आहे. 'धडे' पाठ्यपुस्तकांतून निघून जीवनाचे झाले आहेत. 'शिस्त' शब्दाने मनाच्या नियमनाची वाट धरली आहे.
तरी या सगळ्याची पायाभरणी शाळेत सुरू झाली, हे तर नक्कीच.

आमच्या शाळेत प्रार्थनेचा तास घड्याळ लावून एक तासाचा असायचा. अगदी सविस्तर.
मग ४५ मिनिटांचे इतर विषयांचे ८ ते ९ तास.

विषयांच्या तासांनी पुढे जाऊन मूल्यार्जनाची दिशा ठरवली. पण प्रार्थनेच्या तासाने जीवनातल्या मूल्यांची नीव ठेवली.

प्रार्थनेच्या तासाची सुरूवात राष्ट्र्गीत मग लगेचच 'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत....' अशी प्रतिज्ञा घेऊन व्हायची. पुढे त्यात बरंच काही होतं.

आमची त्या तासात दर शनिवारी गायच्या समरगीतांची चांगली शंभर पानी वही होती. समूहस्वरात ही पदं त्या बालवयात म्हंटल्याने येणारी राष्ट्रभावना फार खोलवर रुजली. 'बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते..', 'भास्वर तुज सम भास्वर..',... सारखी अनेक अनवट समरगीतं, प्रेरणागीतं अजूनही तोंडपाठ आहेत. यातली काही आम्हाला शिकवायला तर स्वत: वसंत देसाई आले होते. याच पदांनी 'आठवणीतली गाणी'चा स्फूर्तीगीतांचा विभाग समृद्ध केला.

साने गुरुजींची 'भारतीय संस्कृती' याच तासात भेटली. गीतेचा बारावा आणि पंधरावा अध्याय संपूर्ण शाळेने एकत्र म्हणताना गुरुकुल संस्कृतीतील मंत्र पठणाचा अनुभव घेतला. हे किंवा यासरखे काही ना काही प्रत्येकाच्याच शाळेत असते.

पण आमच्या शाळेत प्रार्थनेच्या तासाला एक अशी गोष्ट करण्यात यायची की जिच्या वेगळेपणाची आणि असामान्य असण्याची जाणीव तेव्हाही होती आणि आजही आहे.

पद्धत अशी होती की प्रार्थनास्थळास जाण्यासाठी वर्गातून निघताना जेव्हा एका रांगेत आम्ही सगळ्या मुली उभ्या राहायचो, तेव्हा आम्हाला प्रत्येकीला विचारण्यात यायचं की, तू डबा घेऊन आली आहेस का?
कधी कुणी डबा आणायचं विसरतं, किंवा डबा घेऊन न येऊ शकण्याचं दुसरं कुठलंही कारण असू शकेल..
हे विचारण्याची जबाबदारी रोज पटसंख्येप्रमाणे फिरती असायची. मग त्या मुलीने वर्गातल्या फळ्यावर उजव्या कोपर्‍यात लिहून ठेवायचे- वर्गाच्या पटावर किती, त्यापैकी आज हजर किती आणि त्यातील किती जणींनी डबा आणलेला नाही.

हे अशासाठी की, सगळ्या वर्गाच्या हे दिवसभर लक्षात रहावं, आज आपल्या किती वर्गमैत्रिणी उपाशी राहाण्याची शक्यता आहे.
जेवणाच्या सुट्टीला सगळा वर्ग मोठ्ठा गोल करून एकत्र जेवायला बसायचा. शाळेला तीन भली मोठ्ठी पटांगणे असल्याने ते शक्य होतं. त्यावेळेस सकाळची ती मुलगी, जितक्या मुलींकडे डबा नाही तितक्या ताटल्या घेऊन वर्गाच्या गोलात फिरणार. प्रत्येक मुलीने त्यात आपल्या डब्यातल्या फक्त एक घास, प्रत्येक थाळीत ठेवायचा. या नियमामुळे डबा आणलेल्या मुलींना फक्त दोन-तीन घास कमी मिळायचे पण न आणलेल्या मुलींसाठी ते पन्‍नास-साठ घास पोटभर असायचे.

'एक तीळ सात जणांनी वाटून खावा.' हे फळ्यावर लिहिण्याचं केवळ एक सुभाषित झालं.
पण (शब्दश:) वाटून खाण्याची प्रथा, हे संस्कार झाले.
हे संस्कार माझ्यासाठी आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर दिशादर्शक ठरले.
'आठवणीतली गाणी'ची काही अत्यंत मोजकी प्रेरणास्थाने आहेत त्यात आमच्या शाळेचे स्थान फार वरचे आहे.
शाळेतील सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षकदिनी आदरपूर्वक वंदन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'सन्यस्त खड्ग' नाटकातील हे पद. पण ते या नाटकाच्या पुस्तकात आपल्याला सापडणार नाही.
याचे रचियता आहेत नागपूरचे कवी- शंकर बाळाजी शास्‍त्री.
हे पद या नाटकात कसे पोचले ? पदाचा अर्थ काय? 'नेईं हरोनी' की 'ठेविं जपोनि'? थोडक्यात या पदाला थेट भिडायचं असेल तर परत एकदा आपल्याला नाटकाचा इतिहास, त्याचे कथानक आणि त्यातील 'सुलोचना' ही व्यक्तीरेखा, यांच्याकडे जावं लागेल.

रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात 'सन्यस्त खड्ग' लिहितानाचा सावरकरांचा हेतू संपूर्ण राजकीय होता. त्यांच्या विचारांच्या 'प्रचार' करणे. त्यांच्यावर इंग्रजांनी त्या काळात घातलेल्या बंधनांमुळे अभिव्यक्त होण्याचा, हे नाटक हा एक मार्ग होता. नाटकाच्या कथासूत्रात, कथेतील पात्रांत, त्या पात्रांनी केलेल्या चर्चेत तत्‍कालीन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब अगदी ठळकपणे दिसते. किंबहुना ते तसे दिसावे, हाच उद्देश आहे.

तो काळ 'महात्मा गांधी' नावाच्या एका विचारधारेच्या उगमाचा, प्रसरणाचा. हे लक्षात घेतलं तर नाटकातील पात्रं- सिद्धार्थ गौतम बुद्ध, शस्‍त्रसंन्यास सोडून परत आलेले सेनापती विक्रमसिंह, त्यांचा युद्धबंदी झालेला पुत्र वल्लभ, त्याची पत्‍नी सुलोचना, लालची लंपट शाकंभट, कोसलाचे शाक्यांवरील आक्रमण, या सगळ्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीच्या, त्यातील किरदारांच्या प्रतिमा आहेत हे नि:संशय समजते.

मा. दीनानाथ मंगेशकर आणि सावरकारांचा खास स्‍नेह होता. मा. दीनानाथांच्या 'बलवंत संगीत मंडळीं'नी १९३१ च्या सुमारास 'सन्यस्त खड्ग'चे रंगमंचिय सादरीकरण करायचे ठरवल्यावर त्यांनी मूळ कथेवर, रंगाविष्कारास पूरक असे काही संस्कार केले. सावरकरांच्या संमतीने. पण या बदलांची व्याप्‍ती, (सावरकरांच्या इच्छेनुसार) फक्त नाटकाच्या सादरीकरणापर्यंतच मर्यादित असणार होती. त्यामुळे मूळ संहितेत कुठलाही बदल करण्यात आला नाही.

त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे सुलोचनेच्या मुखी असलेले, 'मर्मबंधातली ठेव ही' हे पद. मास्तरांनी ते शं. बा. शास्त्रींकडून लिहून घेतले. शास्त्रींनीही हे पद थेट सावरकरांच्या शैलीत रचलं. नाटकाच्या कथानकास पूरक असा प्रतिमांचा, रूपकांचा खास वापर करत.

सुलोचना ही 'सन्यस्त खड्ग'ची नायिका आहे आणि नायकही. मा. दीनानाथ स्वत: हे पात्र रंगवायचे. तिचे आचार-विचार हा नाटकाचा गाभा आहे. नुसता ती गाते त्या पदांचा आलेख पाहिला तरी तिच्या व्यक्तित्वाच्या हलक्या-गहिर्‍या छटा दिसतात.
'माळ गुंफितांना ।' म्हणत वाट पाहणारी अभिसारिका 'सुलोचना'..
'सययी सखा न ये ।' म्हणून रुसणारी सुलोचना..
पतीच्या स्वागतासाठी केलेली फुलांची माळ युद्धाच्या धुमाळीत सुकून गेली तर - 'ही तर जग रहाटी आहे.. सुकतातची जगि या । फुले गळत पाकळी पाकळी ।' असा विचार करणारी सुलोचना..
एक राष्ट्रिय सैनिक म्हणून सैनिकवेषात 'रणरंगणी' रंगणारा 'सुलोचन'..
आणि शेवटी पतीसह वीरमरण.. हा तिचा प्रवास मोठा आहे.
तिच्या मनात दुविधा नाहीत. पती युद्धबंदी असतानाही तिच्या अंतर्मनात 'शरण की रण', असं द्वंद्व नाही. उलट 'मारत मारत मरण'वर ती ठाम आहे.

शाक्यांच्या उरलेल्या काही मोजक्या सैनिकांसह, विक्रमसिंह यांनी समरसभा बोलावली आहे. त्यात सुलोचना, 'सुलोचन' म्हणून गेली आहे. अर्थातच उपस्थित उर्वरीतांना याची कल्पना नाही. आक्रमण करणार्‍या कोसलाच्या राजाने, शाक्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी- शरण आलात तर सेनापती वल्लभास सोडून देऊ.

त्या वेळेस तरुण वीरवर 'सुलोचन' म्हणतो-
"कोसलावासीयांनी दाखवलेली ही फक्त लालूच आहे. उपरांत, अशा जीवनीय दुर्दशेहून मानी हौतात्म्यच सेनापती पत्करतील.
राष्ट्राराष्ट्रांच्या चिरंतन हानिलाभांच्या विचारात व्यक्तीस कोण मोजतो ! तो (शरणागतीचा) विचार विचारात घेण्याचा अविचार मी करू शकत नाही." ......

पण आतली 'सुलोचना' म्हणते (गाते),
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
नेईं हरोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥


अलि म्हणजे भुंगा, अंबुज म्हणजे कमळ. हे सर्व रूपक (metaphor) म्हणून येत असल्याने शब्दश: अर्थापेक्षा भावार्थाचा विचार करायला लागेल.

माझ्या मर्मबंधातली ठेव, माझे प्रिय पती वल्लभ, यांचे शत्रूने बलपूर्वक हरण केले आहे. पण राष्ट्रकार्यार्थ लढता लढता, पराक्रमाची पराकाष्ठा त्यांनी केली. त्यामुळे एकाच वेळेस मला अभिमान व दु:ख आहे. हा जो शत्रू त्यांच्या सुटकेची मज आशा दाखवित आहे, त्याचा मोह पडतो आहे खरा.. पण या शत्रूचा सुप्‍त हेतू शाक्यांचे राष्ट्र सर्वप्रकारे लुटून नेणे हाच आहे."

पटदीप रागात बांधलेले हे पद, पटदीपची आणि विरहाची आर्तता थेट पोचवतं. अनेक सिद्धहस्त गायकांनी गाऊन त्यास लोकप्रिय केलं आहे. स्वत: मा. दीनानाथ मंगेशकर, पं. वसंतराव देशपांडे, पं. प्रभाकर कारेकर, आशाताई भोसले, आशाताई खाडीलकर..

नाटकाच्या बाहेर या पदाच्या मुखड्याने एक वेगळीच उंची गाठली आहे. 'मर्मबंधातली ठेव' हे एखाद्या पुस्तकाचे शीर्षक असू शकते, एखाद्या लेखाचा मथळा किंवा एखाद्या हृदयस्पर्शी गाण्यांच्या कार्यक्रमाचे नाव. अशी ठेव तर जपून ठेवण्यासाठीच असते. जशी 'वाक्प्रचार' म्हणून 'मर्मबंधातली ठेव' ही उक्ती प्रचलीत होत गेली, तसं कुठेतरी 'नेईं हरोनी' जाऊन 'ठेविं जपोनि' हा बदल झाला असावा.

Related post - शत जन्‍म शोधितांना

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शत जन्म शोधितांना..



या पदाचे रसग्रहण करताना सर्वप्रथम मला असे नमूद करावयाचे आहे की हे पद स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचं भरतवाक्य नाही. तसंच ते या नाटकाचे सार किंवा सारांशही नाही. अगदी मूलभूत स्तरावर ते एका विरहिणीचे भावगीत आहे.. एक प्रेमकविता आहे.
हे नीटसं समजण्यासाठी- आधी 'सन्यस्त खड्ग', त्याचे कथानक आणि नाटकातील ज्या पात्राच्या तोंडी हे पद येतं ती सुलोचना, यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ.

अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्‍नागिरीला स्थानबद्ध असताना सावरकरांनी 'सन्यस्त खड्ग' लिहिलं. या काळात त्यांना राजकारणात जाण्यास बंदी होती. तिथे त्यांनी भरपूर लिखाण केले. लेख, पुस्तके, नाटकही. लिखाणाचा उद्देश आपले विचार मांडणे हाच असल्याने, 'सन्यस्त खड्ग' हे नाटकसुद्धा सावरकारांची वैचारिक सुस्पष्टता घेऊन येते. नाटकाची कथा अहिंसा, धर्म, कर्म यांचा ऊहापोह करत, नाटकातील पात्रांद्वारे विचारांचे मंडन-खंडन करीत पुढे जाते. प्रमूख पात्रं आहेत- बुद्ध, विक्रमसिंह, वल्लभ आणि सुलोचना.

सिद्धार्थ गौतम 'बुद्ध' होऊन काही वर्ष लोटली आहेत. विक्रमसिंह हे बुद्धांच्या वडिलांच्या (शुद्धोदन) राज्याचे (शाक्य) सेनापती. बुद्धांच्या सांगण्यावरून ते शस्‍त्रसंन्यास घेतात (पटत नसतानाही केवळ प्रयोग म्हणून). तथागतांबरोबर भिक्षु म्हणून प्रवासास जातात. या घटनेला चाळीस वर्षे लोटतात. दरम्यान विक्रमसिंहांचा पुत्र वल्लभ राज्याचा सेनापती होतो. वल्लभ सुद्धा शूर, पराक्रमी आहे. या चाळीस वर्षात बुद्ध धर्माचा आणि त्यात सांगितलेल्या अहिंसेचा पुष्कळ प्रसार झाला आहे. तेवढ्यात शेजारच्या 'कोसला' राज्याचे शाक्यांवर आक्रमण होते. अहिंसामार्गी झालेल्या या राज्याची युद्धाची तयारी नसते. बरीच वाताहत होते. सेनापती वल्लभ पकडले जातात. ही वार्ता पोचताच विक्रमसिंह तथागतांच्या मनाविरुद्ध खड्ग निष्कोषित करतात आणि युद्धात सामिल होतात. जाताना ते बुद्धांना म्हणतात, "मी अहिंसा सोडत आहे, बुद्धांना नाही."

हे पद नाटकात सुलोचनेच्या तोंडी येतं. सुलोचना ही वल्लभ दयिता- पत्‍नी. त्यांच्या प्रीतिविवाहाला नुकतंच एक वर्ष झालंय. हा वाढदिवस साजरा करतानाच्या प्रेमसंवादात ती दोघे मग्‍न आहेत. तोच वल्लभास राजसभेचे तातडीचे निमंत्रण येते आणि तो तिथून जातो. तो परत आल्यावर त्याच्याशी कसं बोलावं? रुसावं का? किती? या विचारात ती असतानाच दूत निरोप आणतो, सेनापती तर परस्पर युद्धावर गेले..
ही भेट अर्धीच राहिली याची तिला खंत सतावते. काही दिवसांतच अशीही बातमी येते की शाक्यांचे सैन्य उधळून गेले आणि सेनापती वल्लभ युद्धबंदी झाले. तेव्हा तिच्या तोंडी येते, ते हे पद.
शत जन्म शोधितांना..

या पदाचा संपूर्ण अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सावरकरांचा चष्मा घालावा लागेल. भावनेची तीव्रता, उत्कटता.. हातचं राखून काहीच नाही. भव्य, दिव्य, तेजस्वी.. आणि प्रखरही. स्वत: जळून इतरांस ऊर्जा देण्याचं सामर्थ्य असलेलं.

सुलोचना ही सामान्य राजस्‍नुषा नाही. फक्त प्रेमसंवादात तिचं मन रमत नाही. तो ती करतेच पण ती कर्तृत्ववान आहे. स्‍त्रीसुलभ भावनांबरोबर विचारांची परिपक्वता तिच्यात आहे. तिच्या जाणीवा प्रगल्‍भ आहेत. धैर्यधर पतीचा तिला अभिमान आहे. तो युद्धबंदी झाल्याचे समजताच तिचे पहिले वाक्य असते,
"हा सेनापती अबल आहे म्हणून पराभूत नाहीये तर-
सबल परि ना राष्ट्रचि म्हणून अपजयी हा । नसे जित पहा । सेनानि ।"
पुढे जाऊन ती सैनिक वेष घालून रणांगणात युद्ध करते व आपल्या पतीसह वीरमरण पत्करते.

ही अशी स्‍त्री जेव्हा एक विरहगीत गाईल आणि तेही सावरकरांच्या लेखणीतून उतरलेलं..
ती म्हणते,
शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥


हा माझा माझ्या प्रियकराचा शोध जन्मजन्मांतरीचा आहे. जन्म-मरणाच्या अनेक फेर्‍यांतून गेलेला. माझ्या या शोधापुढे शत 'आर्ति' व्यर्थ आहेत. 'आर्ति' या शब्दाचा अर्थ जरी दु:ख, पीडा असला तरी इथे त्याची आर्तता थेट ज्ञानेश्वरांची आहे. 'विश्वाचे आर्त'शी नातं सांगणारी. दीपावली सुद्धा तुम्हां-आम्हांसारखी मिणमिणत्या पणतींची नाही तर तेजाळ, देदिप्यमान सूर्यमालिकांची. इथे 'कवी' सावरकरांनी 'विझाल्या' असं म्हणताना 'विझल्या'तला कोरडेपणा काढून टाकला आहे. या माझ्या शोधयज्ञात मी अशा शत दीपावलींची आहुती दिली आहे, असे तिला वाटते.

तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥


प्रियकर मीलनाचे सायास तिला कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाही. तिच्यासाठी ही आनंदाने केलेली 'साधना' आहे, जिची सिद्धी आतां कुठे होऊ घातली आहे. येथे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा आणखी एक स्पर्ष जाणवतो. वरील दोन्ही ओळीतील 'गाठी' या शब्दाने त्यांनी यमक साधलाय आणि श्लेषही. पहिल्या ओळीतील 'गाठी' हे गाठभेट या अर्थाने येते तर दुसर्‍या ओळीतील 'गाठी' हे पोचणे या अर्थाने. युगायुगांच्या प्रतिक्षेनंतर आमची भेट घडली आहे तोच,

हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥


नुकतीच तर कुठे आमची भेट झाली आहे.. जो मी उठून त्याला, माझ्या प्रियकराला मिठी घालू पाहते, तोच सगळं संपून गेलं. मीलनाचा 'तो' क्षण एका क्षणांत संपून गेला..
पुलंनी एका ठिकाणी असं म्हंटलं आहे, "या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल पारितोषिक द्यावं, इतक्या श्रेष्ठ दर्जाची ही कवीकल्पना आहे."

'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा संदर्भ ठेऊन पाहिलं तर असा सगळा अर्थ आहे. पण या संदर्भाच्या पलीकडे जाऊन, अध्यात्मिक स्तरावरही हे पद फार खरं ठरतं.
मानवी जीवनातील दु:खाचं सातत्य, सुखाची क्षणभंगूरता, काळाची गतीमानता, बुद्ध धर्मात वर्णन केल्याप्रमाणे जीवनाचं 'अनित्य' असणं... असं बरंच काही.

सावरकरांच्या या पदरचनेचे आपल्या मनातील स्थान इतके अनन्य असे आहे की नुसतं 'शत जन्म..' म्हंटलं तरी हा सगळा अध्यात्मिक पट आपल्यासमोर उलगडतो.

( फोटो सौजन्य- आंतरजाल )

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

गीत रामायण, गदिमा आणि शेक्सपिअर


( हा लेख २०१५ साली 'गीतरामायण हीरक महोत्सव स्मरणिका' - 'अवघ्या आशा श्रीरामार्पण' मध्ये प्रसिद्ध झाला आहे. आभार- सुमित्र माडगूळकर आणि समस्त माडगूळकर परिवार. )

गीत रामायणाचा हीरक महोत्सव आपण अतिशय आनंदाने साजरा करत आहोत. ही कलाकृती म्हणजे प्रतिभेचा अतुलनीय आविष्कार आहे. तसेच तीने लोकप्रियतेचेही उत्तुंग शिखर गाठलं आहे. गेली चार पिढ्या आणि सहा दशकं गीत रामायण मराठी मनावर अधिराज्य गाजवत आहे आणि पुढील अनेक शतके गाजवेल हेही निश्चित आहे. यातील हनुमंताच्या तोंडी असलेल्या ओळींमध्ये छोटासा बदल करून असं म्हणता येईल,
जोंवरि हें जग, जोंवरि भाषण
तोंवरि नूतन (गीत) रामायण


गीत रामायणाच्या शाश्वततेवर इतका ठाम विश्वास जेव्हा एवढा मोठा जनसमुदाय एकमताने ठेवतो, तेव्हा या विश्वासाचा आधार, वैश्विक पातळीवरील काही कलाकृतींमध्ये शोधता येतो का? असा एक विचार मनात आला. असं साहित्य, ज्यास शब्दश: शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि ज्यास जन-सामान्यांइतकीच भाषाप्रभूंची मान्यता आहे. अर्थात शेक्सपिअरपेक्षा मोठं नाव समोर येईना.

शेक्सपिअरचे लिखाण साधारणत: इ.स १५९० ते १६१३ या काळातले. इंग्रजी भाषेतले. तात्कालीन आंग्ल संस्कृतीचा प्रभाव आणि संदर्भित विषय असलेले. त्यामुळे गदिमांच्या गीत रामायणाशी त्याचे, ना विषयाचे ना संस्कृतीचे साम्य. पण दोन्हींमध्ये काही समान धागे आहेत. तसं आधुनिक काम आहे, सर्वमान्य आहे आणि कॅलेंडरची पानं झुगारून देण्याची क्षमता आहे. या अनुषंगाने गीत रामायण व शेक्सपिसरीअन साहित्य, यात शैलीची काही साम्यस्थळं शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्‍न आहे.

शेक्सपिअर यांनी लिहिलेल्या एकूण ३८ नाटकांपैकी ३४ नाटकांची बीजे / कथासूत्रे किंवा नाटक म्हणूनही, त्यांच्या आधी लिहिलेले होते. जसे रोमिओ-ज्युलिएट हे आर्थर ब्रूक यांनी १५६२ मध्ये लिहिले होते. किंग लिअर, मॅकबेथ इ. हॉलिंशेड्स्‌ क्रॉनिकल्स्‌ मध्ये १५८७ मधे ‍प्रकाशित झालेले होते. याची सप्रमाण माहिती उपलब्ध आहे. पण या मूळ कथाविष्कारांवर शेक्सपिअर यांनी आपल्या शब्दसंपन्‍नतेची अशी काही झळाळी चढवली की काळाचा ओरखडा त्यांवर ओढणे केवळ अशक्य.
रामकथेस हजारो वर्षांचा इतिहास आहे. अनेक व्यक्‍तींनी, विविध भाषांमधून, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती समर्थपणे मांडली आहे. वाल्मीकी, तुलसीदास, मोरोपंत ही त्यातील काही मोजकी, ठोस नावे. गदिमांनी या असंख्य वेळा अभिव्यक्‍त झालेल्या रामकथेचे, गीत रामायणाच्या रुपाने सोने केले ते निव्वळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर. शब्दांची नादमधूर मांडणी, पटकथेसारखा असलेला कथानकाचा नाट्य / चित्रमय बहाव, यांच्या बळावर गीत रामायण दीर्घायू... चिरायु हे होणारच.

शेक्सपिअर हे त्यांच्या नाटकांसाठी जरी प्रामुख्याने ओळखले जात असले तरी त्यांचे वर्णन प्रथमत: कवी आणि मग नाटककार असे करता येईल. त्यांनी कविता / सुनितें (sonnets) ही कारर्किर्दीच्या सुरुवातीच्या काळात लिहिली. नंतरच्या काळात काव्य, त्यांच्या नाटकांचा जवळपास सत्तर टक्के भाग व्यापू लागले. त्यांच्या काव्यात जात्याच स्वर-तालांचा मेळ असतो. हा परिणाम साधण्यासाठी त्यांनी जी अनेक तंत्रे वापरली त्यातील एक प्रमूख तंत्र alliteration म्हणजे अनुप्रासांचा सुयोग्य आणि चौफेर वापर, हे होय. उदा.
१. “For as you were, when first your eye I eyed” (Sonnet 104)
२. “When to sessions of sweet silent thought
I summon up remembrance of things past” (Sonnet 30)
गदिमांच्या गीत रामायणातही नादांची गुंफण, ताल-स्वरांचे गुंजन भरून ओसंडते आहे. त्यांनीही अनुप्रासांचा भरगच्च वापर केला आहे. कुठलाही अट्टहास न करता, शब्दांचा सहज सुंदर खेळ करत हे साधणं, ही माडगूळकरांची signature style आहे. याची काही मोजकी उदाहरणे-
१. “कैक कैकयी करी नवसासी”
२. “दुंदुभिचा नाद तोंच धुंद कोंदला”
३. “जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात”
४. “प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट.. प्रभुचे लोचन पाणावती..”

अनुप्रासांचा मंजुळ खेळ जर श्रुति सुखावण्यासाठी आहे तर रूपकांचा (metaphor) प्रभावी वापर चित्र अधिक स्पष्ट करण्यासाठी... शब्दचित्राचे रंग गडद आणि गहिरे करण्यासाठी. Sonnet 73 मध्ये वार्ध्यक्यासाठी हेमंती निष्पर्णतेचे रूपक शेक्सपिअर यांनी वापरले आहे. ते म्हणतात,

“That time of year thou mayst in me behold
When yellow leaves, or none, or few do hang”
अयोध्येच्या प्रजाजनांच्या नजरेतून आदर्श असा जो नृपती- राजा दशरथ याचे वर्णन करताना गदिमांनी कल्पतरूचे रूपक वापरले आहे. ते म्हणतात,
“कल्पतरूला फूल नसे कां ? वसंत सरला तरी”
रूपकाचे आणिक काही गदिमा स्पर्श-
जेव्हा भरत कैकयीला विचारतो, “शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ”.
वाल्मीकींचे शिष्य म्हणून लव-कुश, “ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल.. वसंत-वैभव गाते कोकिल”

’हॅम्लेट’च्या आधीचे शेक्सपिअर यांचे लिखाण काहिसे अलंकारीक, शब्दबंबाळ वाटते. तो त्यांच्या कारकीर्दीचा पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात मात्र साध्या, सोप्या, गेयता नसलेल्या शब्दांचा वापर सढळ आहे. अगदी टोकाची भावना व्यक्त करताना सुद्धा.. जसे राग, त्वेष, संताप. ’किंग लिअर’ या नाटकात, किंग लिअर आपली मोठी मुलगी गोनरील हिला म्हणतो, (जिने त्याचे राज्य घेऊन, त्याला घराबाहेर काढले आहे)
“... but yet thou art my flesh, my blood, my daughter; or rather a disease that’s in my flesh, which I must needs call mine” (अंक २, प्रवेश ५)
आणि हेच तर नेमके आपल्या गदिमांचे वैशिष्ट्य आहे. कुठेही शब्दांचे अवडंबर नाही. नेमक्या, मोजक्या शब्दांचा सहजाविष्कार.. मग भावना कुठलीही असो. हेच पहा ना, ’माता न तूं, वैरिणी’ मधे भरत कैकयीस म्हणतो,
“श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात ?
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं”

शेक्सपिअर यांचे लिखाण आणि गदिमांचे गीत रामायण, यांच्यात आणखी एक महत्वाचे साम्य आहे, ज्याला इंग्रजीत coining a phrase म्हणतात. अनेक वाक्‍प्रचारांच्या / idioms च्या रुपात या दोघांनी आपल्या पावलांचे ठसे, त्यांच्या त्यांच्या भाषेवर उमटवले आहेत. ज्यांच्या लिखाणाने मुळातून भाषाच अधिक संपन्‍न व्हावी एवढे कर्तुत्व या दोघांचे आहे. अशा वाक्प्रचारांची यादी खरं तर खूप मोठी आहे. वानगीदाखल काही सांगायचे झाले तर-
शेक्सपिअर-
१. “all that glitters is not gold” (The Merchant of Venice)
२. “high time” (Comedy of Errors)
३. “what’s done is done” (Macbeth)
गदिमा (गीत रामायणात)
१. “अभिषिक्‍तातें गुण वय नाहीं”
२. “अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात”
३. “दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट”

याच सूत्राचा आधार घेत शेवटी असं म्हणेन, आजचे माझे हे लिखाण हा... एका मिणमिणत्या ज्योतीने, शब्दशारदेच्या आकाशातील या दोन तेजांची आरती करण्याचा एक नम्र प्रयत्‍न आहे.


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

'यमक'श्री गदिमा


"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळावर आज मितीस उपलब्द्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्‍त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक' हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर 'यमक' हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं 'त्या तिथे, पलीकडे... झाड एक वाकडे' किंवा 'घननिळा लडिवाळा' सारखं अनेक वेळा उद्‌धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू...

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू...

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका'तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र' रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्‍त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव’ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि ’व’चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता...
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण' हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा... प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा.... सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

’पेट’ स्‍नो


समोरच्या फ्लॅटमध्ये जेमिमा राहते. गेली काही दिवस ती, तिच्या गावी इंग्लंडला सुट्टीसाठी गेली होती. त्यामुळे तिचा अडीच वर्षांचा मुलगा जेम्स आणि त्याने पाळलेली कुत्र्याची दोन पिल्लं, यांचा दंगा नव्हता आणि ती शांतता आम्हाला आवडत नव्हती.
काल रात्रीपासून परत कल्ला सुरू झालेला. आली असावी. तिच्याशी थोडं बोलावं म्हणून दार उघडलं.

"कशी गेली सुट्टी ?"
"मस्त. छान बर्फ होता ह्यावेळेस. आणि जेम्सने पहिल्यांदाच बर्फ बघितला."
"मग ? आवडला का त्याला.. white winter ?"
"खूपच. पण त्यामुळे आमच्यावर एक प्रसंग ओढवलेला.
जेम्सला नं बर्फ ...... 'pet' म्हणून पाळायचा होता."

"अरे बापरे! तू कसं सांगितलंस त्याला.... हे शक्य नाही म्हणून."

"नाही नाही. मी तसं का करू?
उलट तो आणि मी, आम्ही दोघं रोज बाहेर जायचो. थोडा बर्फ गोळा करून आणायचो आणि घरात वेगवेगळ्या जागी ठेवायचो."

माझी उत्सुकता शिगेला.
"कधी त्याच्यासाठी एखादी बास्केट तयार करून तिच्यात किंवा टॉवेलची गादी करून त्यावर....
पण कुठेही ठेवलं तरी बर्फच तो, वितळून जायचा.
मग जेम्सला कळलं. बर्फाला घरात आणलं की त्याला खूप रडू येतं.
इतकं.. की तो संपून जातो.
सात-आठ दिवसांनी हा प्रकार बंद झाला.

आता जेम्सला स्वत:ला कधीही रडू आलं की एक-दोन मिनिटातच सावरतो आणि म्हणतो,
I won't cry so much. Otherwise, I will be over too."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें


संत तुकारामांचा अभंग आहे, ’वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें’

अलीकडे पर्यावरण हा विषय निघाला की या ओळीचा वापर हमखास होतो.
रस्त्याच्या कडेने पाट्या असतात, ’झाडे लावा झाडे वाचवा’ आणि लगेच ’वृक्षवल्ली आम्हां ..’

पण या रचनेचा विषय ’पर्यावरण’ हा नाही.

या अभंगाचा गाभा काही वेगळाच आहे .. जो त्याच्या शेवटच्या दोन ओळींमधे व्यक्त होतो.
त्या अशा आहेत .............

तुका म्हणे होय, मनासी संवाद
आपुलाचि वाद आपणांसी

तुकोबा जेंव्हा विजनवासात .. एकांतात असतात .. तेंव्हा काय होतं ?

सभोवतीची झाडं-वेली-प्राणीमात्र त्यांना सगे-सोयरे वाटायला लागतात. आकाश डोईचे छप्पर होते आणि पृथ्वी बसायचे आसन.. जाडीभरडी वस्त्रे आणि एक कमंडलु एवढेच काय ते, देहाचे म्हणून जे उपचार त्यासाठी पुरेसे होते. अशा वातावरणात कुठलेही अमंगळ भाव तुकोबांच्या मनात येत नाहीत.....

सगळ्यात महत्वाचे म्हणजे या minimalistic वातावरणात तुकोबा म्हणतात, माझा.. माझ्याशी उहापोह चालू होतो.

वाद-संवाद जेव्हां दुसर्‍याशी होतो तेंव्हा त्यात चढाओढ, ईर्ष्या येते ... पण इथे मंडनही आपलंच आणि खंडनही आपलंच.

आपुलाचि वाद आपणांसी ... म्हणजे, स्वत:शी भांडण उभे करणे नव्हे ......
तर एक विषय घेतला की त्याची सर्वांगीण चर्चा .. आपणच आपल्याशी करायची.

तुका म्हणे होय...... मनासी संवाद !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

झिणिझिणि वाजे बीन


झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

बा. भ. बोरकरांची काय सुंदर कल्पना आहे पहा.
कविता संपूर्णत: अध्यात्मिक वळणाने जाते.
ते म्हणतात ..

हे जे माझे, अव्यंग शरीर-मन आहे, ते बीन म्हणजे.. एखाद्या पुंगी-वाद्यासारखे आहे.
कवितेत ते या शब्दांत येतं .........
' सौभाग्ये या सुरांत तारा '

आणि त्यातून हा जो प्राणवायू आत-बाहेर करतोय त्यामुळे, हरघडी.. हरक्षणी एक वेगळीच सुरावट, अनोखी लयकारी बाहेर पडते.
ती कधी शांत-प्रसन्न मंत्रघोषासारखी असते .. तर कधी उगीच वायफळ .. अर्थहीन तराण्यासारखी .. तर कधी फारच कठीण .. जीवाचा लचका तोडणार्‍या अवघड तानेसारखी.

आणि हे वाजवणारा ..
या शरीररूपी वाद्यातून .... प्राणवायू फुंकून .... ही सुरावट काढणारा ... आहे तरी कोण ? ......
अर्थात ... साक्षात परमेश्वर.......
तो तर काय .. अलख निरंजन...... सहजपणात प्रवीण .....

जसा पारा हातात पकडायचा प्रयत्‍न केला तरी हाती लागत नाही.. तसा ह्या शरीररूपी वाद्याच्या तारा छेडणारा परमेश्वर आपल्या हाती येत नाही.
त्याचे अस्तित्व तर जाणवते... हे आपल्याकडून कुणीतरी सर्व करून घेत आहे, याची जाणीवही असते... पण ’तो’ मात्र आकलनाच्या पलीकडेच रहातो.

सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कवी सुधीर


कवी सुधीर मोघे यांच्यावरचे हे माझे खरं तर दुसरे लिखाण. या आधीचे आणि हे, दोन्हीत एक समान सूत्र आहे आणि काही असमान धागे.
समान असे की या दोन्हीत त्यांची 'जीवनी' अशी नाही. किती पुस्तके लिहिली? कोणते पुरस्कार मिळाले? यात ते अडकलेलं नाही. पण,
पहिलं त्यांच्या निधनाच्या दुसर्‍याच दिवशी लिहिलेलं. त्यामुळे उत्‍स्‍फूर्त आणि काहिसं अचानक आलेल्या पोरकेपणाने बावरून गेल्यासारखं. तरी त्यांना वाहिलेली ती आदरांजली असल्याने त्याचे महत्त्व वेगळे.
दुसरे आजचे.. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी लिहिलेलं. भावनेच्या पगड्याच्या थोडं बाहेर येत.

त्यांच्या कविता-गाण्यांचे अवलोकन करण्याची किंवा त्यांची साहित्यिक मीमांसा करण्याची माझी योग्यता नाही. 'आठवणीतली गाणी' या माझ्या उपक्रमामुळे त्यांच्या गीतलेखनात दिसलेले सुधीरजी आणि आमच्या सात-आठ वर्षांच्या ओळखीतून दिसलेले काव्याबाहेरचे सुधीरजी.. यांच्याशी झालेल्या चर्चांतून माझे काव्यानुभव समृद्ध झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

अलीकडचे प्रसिद्ध कवी वैभव जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
'रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.. '

पण जर कुणाला अशी 'एखादी'च नाही, तर अशा अनेक 'कविता पानोपानी' सुचल्या असतील तर.. त्यांना काय म्हणावे? कविवर्य, कविश्रेष्ठ? आणि त्याही पुढे जाऊन, ते जर फक्त शब्दचित्रेच नाही तर रंगचित्रे, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय सादरीकरण, पटकथालेखन.. असंही बरंच काही करत असतील तर?

सुधीर मोघे यांना मात्र त्यांची 'कवी सुधीर' अशी सुटसुटीत ओळख करून दिलेली अधिक आवडायची. 'Poet Sudheer' अशी झोकदार इंग्रजी सही ते करायचे. कारण कवितेव्यतिरिक्‍त इतर कुठल्याही माध्यामातून व्यक्त होणं, हे त्यांच्या 'कवी' असण्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटायचं. त्यांच्याच शब्दांत सागायचं तर, "माझ्या प्रत्येक असण्याला माझ्या कवी / poet असण्याचा base आहे, संदर्भ आहे." आमच्या चर्चेत हे त्यांचं कवी असणं भरून असायचं.

टेरिकॉटची पॅंट, ढगळसा झब्बा. अशी अनौपचारिक वेषभूषा. 'पद्मा फूड्स' हा अनौपचारिक गप्पांचा तितकाच अनौपचारिक अड्डा. जवळपास पन्‍नास वर्षांची कारर्किर्द. सांगण्यासारखे प्रचंड काही आणि ते सांगतासांगता समोरच्याला जाणून घेण्याची खुबी..

त्यांची कविता शब्दबंबाळ नाही. शैली मिताक्षरी. थोडक्यात आणि मार्मिक. बुद्धीवादी, तर्कनिष्ठ आणि त्याचवेळी तरल. scientific temperची झलक असणारी. परमेश्वराच्या सगूण आणि निर्गूण, दोन्ही रूपांचं एकाच तन्मयतेने वर्णन करणारी..

शब्दांवर प्रेम करताना त्यांच्या आहारी न जाता.. त्यांच्याकडे केवळ माध्यम म्हणून पाहताना, शब्दांविषयी ते म्हंटतात..

शब्दांच्या नकळत येती.. शब्दांच्या ओठी गाणी..
शब्दांच्या नकळत येते.. शब्दांच्या डोळा पाणी..

शब्दांना नसते दु:ख.. शब्दांना सुखही नसते..
ते वाहतात जे ओझे.. ते तुमचे माझे असते..

सुधीरजी एकदा म्हणाले होते, "मुकुंद (फणसळकर) म्हणतो, माझ्या प्रत्येक कवितेत-गाण्यात माझी सही असते. तुला वाटतं तसं?" त्यांचं काव्य-गीत लेखन जवळजवळ मुखोद्गत असल्याने मी लगेचव रुकार दिला. म्हंटलं, "हो. हो. नक्कीच.
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'पर्वतांची दिसे दूर रांग .. काजळाची जणू दाट रेघ',
'सूर कुठूनसे आले अवचित' मध्ये .. 'रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव',
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या',
.. या तुमच्या सह्याच तर आहेत."

'मन' या विषयावर सुधीरजींना खरं तर Ph.D. मिळायला हवी होती. एका कवितेत ते म्हणतात .. 'मन मनास उमगत नाही .. आधार कसा शोधावा ! .. चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही .. धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही.' आणि असंही .. 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' याच कवितेत 'मन'च कसं आपल्या भावविश्वावर नियंत्रण ठेवतं हे सांगताना, 'तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश'. एका ठिकाणी .. 'मनाचिया घावांवरी मनाची फुंकर ..' आणि 'मन' ते 'कविता' असा प्रवास ...

एकांत, लेखणी, कागद- वाया सारे
मन कागदाहुनी निरिच्छ अणि कोरे
गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे
बोटांवर अवचित मन ओठंगुन आले.

सुरेश भट, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यावर 'झी मराठी' या दूरचित्र वाहिनीने केलेल्या 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमांचे लेखन सुधीरजींनी केले आहे. एकदा त्यावर बोलत असताना, समोर बसल्याबसल्या त्यांनी संवादिनी घेतली. ती त्यांच्या खोलीत असायचीच. आणि चक्क सुरेश भटांचं 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझात वेगळा' गायला लागले आणि म्हणाले, "देवकी (पंडीत) अंदाजे सतरा वर्षांची असताना मी तिला हे गाणं शिकवलं ते असं. तेव्हा कोवळ्या वयामुळे तिला गीताचा संपूर्ण अर्थ उमगलाच होता, असं म्हणता येणार नाही. ती, मी शिकवलेली चाल या लयीत म्हणायची. आता थोडी ठायमधे असते. पण हा 'तिचा' व्यक्त होण्याचा भाव आहे."

'लय' वरून आठवलं ..

लय एक हुंगिली खोल खोल श्वासात,
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात,
लहडला वेल... तो पहा निघाला गगनी,
देठांना फुटल्या - कविता पानोपानी

सुधीरजी म्हणायचे, "एकदा कविता लिहिली की तिचे नशिब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने जाते .. मी माझ्या .."
एक कवी आपल्या कवितेकडे इतक्या निर्ममपणे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा कुठल्यातरी पातळीवर कवितालेखन हे त्याच्यासाठी ध्यानसाधनेसारखं असतं.

मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना- ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्यागेल्या श्रेयांवरती;
पण पुसट.. कोवळे नाव ठेवुनी गेलो.

ह्या नि:शब्दांच्या आड कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे कविता फक्त असेल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मराठी



जैसी हरळांमाजि रत्नकिळा ।
कि रत्नांमाजि हिरा निळा ।
तैसी भासांमाजि चोखळा । भासा मराठी ॥

जैसी पुस्पांमाजि पुस्पमोगरी ।
कि परिमळांमाजि कस्तुरी ।
तैसी भासांमाजि साजिरी । मराठिया ॥

पखयांमधे मयोरू । वृखियांमधे कल्पतरू ।
भासांमधे मानु थोरू । मराठियेसि ॥

तारांमधे बारा रासी । सप्त वारांमधे रवी-ससी ।
या दिपिचेआं भासांमधे तैसी । बोली मराठिया ॥

- फादर स्टीफन्स
  ( ख्रिस्तपुराण )


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

रंग


रंग..........
स्वप्‍नांचे पहावे..
हास्याचे उधळावे..
उत्कटतेचे झेलावे..
होळीचे खेळावे..
चुकीचे पुसावे..
थोडे वेगळेही जपावे..
कधी कागदावर उतरवावे..
मनस्वितेत शोधावे..
तेजस्वितेचे पूजावे..
प्रेमरंगी भिजावे..
आत्मरंगी रंगावे..
आणि
नेत्रदानाने कुण्या एकाच्या जीवनीही आणावे .... रंग !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

छटा


डोक्यात जाते ती हवा .. शरिरात होतो तो वात ..
अंगावरून जाते ती झुळूक .. हळूवार घातलेली ती फुंकर ..
घेतलेला तो श्वास .. सोडलेला तो नि:श्वास ..
घोंघावते ते वादळ .. सोसाट्याचा तो वारा .. मंद मंद समीर ..
मनाचे ते उधाण .. विचारांचे ते थैमान ..
सभोवतीचे ते वातावरण ..
आणि प्राणांसाठी तो वायू ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

आरसा


आरशाचं attraction कधीच नव्हतं. लहानपणी आईकडे, घरात असायला हवा म्हणून एक आरसा लाकडी कपाटावर होता. शाळेत जाताना त्याचा उपयोग केल्याचं काही आठवत नाही. मुलांनी कसे वाढावे हे आईचे फंडे पक्के होते आणि त्यांना अनुसरून ती संस्कारांचा छिन्नी-हातोडा घेऊन आम्हां भावंडाचे व्यक्तीमत्व घडवत होती. त्यामुळे शाळेत आरसा भेटला तो फक्त भौतिक शास्‍त्रात, 'आरसा ही एक परावर्तनशील पृष्ठभाग असलेली चमकदार वस्तू असते.' या स्वरूपात.... आणि हिमगौरी आणि सात बुटके (Snow White and the Seven Dwarfs) या परीकथेत.

कॉलेजमधे असताना घरातल्या आरशाचा उपयोगही करतात याची माफक जाणीव झाली. म्हणजे घराबाहेर पडताना त्यात डोकावून जाणं, एवढंच. आरशापुढे रमण्याचे ते दिवस, खांद्यावर खादीची झोळी अडकवून, सायकलवरून फिरत आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची कामं करण्यात गेले. महाष्ट्राच्या अंतर्भागात जाऊन काही किलोमिटर्सचा रस्ता तयार करून देण्यासारखी श्रमदान शिबीरं, आसाम आंदोलनाच्या निमित्ताने ठोकलेली जाहीर सभेतली भाषणे, मोर्चे..
या सगळ्यात आरसा फक्त मनाचा आणि विचारांचा राहिला, आचरणात आला नाही.

पण आरशाची आवड किती तीव्र आणि किती लहानपणापासून असू शकते याची खरी जाणीव, भाचीने, ३ वर्षांची असताना करून दिली. नवीन फ्रॉक कसा दिसतो हे बेसीनवरच्या चिटुकल्या आरशात पाहणे तिला साफ अमान्य होते. ’कशी दिसते? 'तो' आरसा हवा....’ या तिच्या रीतसर आणि साग्रसंगीत थैमानाला शरण जात घरात पहिला पूर्ण लांबीचा आरसा आला.

पुढे 'आठवणीतल्या गाणी'चं काम सुरू केल्यावर 'आरसा' त्याच्या समानार्थी 'दर्पण', 'मुकुर' या शब्दांसह एका वेगळ्या स्वरूपात समोर आला. मराठी कवींनी, गीतकारांनी आरशाला अर्थालंकारांच्या स्वरुपात भरपूर वापरलं आहे.
उगीच हातच्या कांकणाला आरसा कशाला ?.... हेच पहा ना-
खेबूडकर म्हणतात 'स्वार्थ जणु भिंतीवरला आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी.'
भटांना दु:ख हा सूर हरवलेले जीवन आणि त्यांच्यातला आरसा वाटला- 'दुःख माझातुझा आरसा.. जीवना तू तसा, मी असा !'
'अंदाज आरशाचा वाटे खराच होता' या इलाही जमादार यांच्या अप्रतीम गझलेत ते म्हणतात, 'रोज अत्याचार होतो आरशावरती आता.... आरशाला भावलेली माणसे गेली कुठे ?'

मध्यंतरी अगदीच अनपेक्षित अशा व्यक्तीकडून आरशाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन वाचनात आला.
आन्द्रे आगासी हा टेनीसपटू फार काही philosophical वगैरे बोलू शकतो, असं कधीच वाटलं नव्ह्तं. The Guardian या इंग्रजी वर्तमानपत्रात त्याने म्हंटलं आहे,

I don't spend a lot of time looking in the mirror – it takes too much energy – but when I do, I see a work in progress.
I am constantly changing and, unfortunately, I've seen my best days.....
(Read complete post)
- Andre Agassi

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कहाणी मिडियाची.


( 'ऐका गणेशा तुमची कहाणी' या पारंपारिक कहाण्यांच्या चालीवर. )

ऐका मिडिया तुमची कहाणी.
अनेक भाषा, अगणित वाद.
वाढती प्रजा, त्यांच्या वाढत्या गरजा.
अनेक पक्ष, असंख्य नेते, त्यांचे अमर्याद घोटाळे.
न्यूज चॅनेल्सची मांदियाळी.
मनींचे चॅनल मनीं वसावे.

हा वसा कुणी घ्यावा ? हा वसा कुणीही घ्यावा.
एक छानसे चॅनल काढावे. ते चोवीस तास चालवावे. त्याला न्यूज चॅनेल असे नाव द्यावे.
खूपच आविर्भावाने बोलू शकणारी चार-दोन डोकी घ्यावी.
त्यांना 'news anchor' असे खासे नाव द्यावे.
तोंडी 'केंद्राने राज्याच्या तोंडाला पानं पुसली' अशी भडक भाषा द्यावी.
त्यांनी काय करावे?

दिवसभरातील एक छोटा-मोठा प्रसंग घ्यावा.
कॅमेरा आवडणारे आणि कॅमेऱ्याला आवडणारे तेच-तेच चेहरे घ्यावे.
त्यांच्यात झुंज लावून द्यावी. त्यास 'विद्वत्तापूर्ण चर्चा' असे नाव द्यावे. "अमुक असं म्हणतात त्यावर तमुक तुमचे काय म्हणणे आहे?" असे अधूनमधून बरळावे. अशा प्रकारे आपल्याकडे नसलेले संशोधन कौशल्य शिताफीने झाकावे.
त्यावर कॅमेराच्या चित्र-विचित्र angles चा आणि loop मध्ये टाकलेल्या स्वल्प चित्रफितींचा overlay द्यावा.

हा वसा कधी घ्यावा? दिसा उजेडी आरंभ करावा. अंधार रात्री संपूर्णास न्यावा.

संपूर्णास काय करावे? जाहिरातींचे उत्पन्न मोजावे.
भ्रष्टाचार, दहशतवाद, राजकीय नेते - त्यांची वक्‍तव्ये, चित्रपट अभिनेते - त्यांची अविद्वत्तापूर्ण भाषणे, यातील कुठल्या विषयाचा TRP जास्त याचा हिशेब मांडावा.
समाजाचा अत्यल्प विचार करावा.
अल्प दान, महापुण्य.

उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये.
ऐसा मिडिया मनीं ध्याइजे, money पाविजे, चिंतिले लाभिजे, कार्यसिध्दि करिजे.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कोमेजली कवळी पानं


programming / coding चे चाललेले काही नवे प्रयोग... त्यासाठी करावी लागणारी internet वरची सखोल शोधाशोध... एकाग्रता...
अचानक गळून पडलेल्या झाडाच्या पानाच्या आवाजाने त्या वातावरणाला छेद दिला.

घरात पंचवीस एक ’हिरवी’ चिल्ली-पिल्ली वाढत आहेत. ह्या thermostat controlled 22oc वातावरणात ही कोणी नाराजी दाखवली?
सात-साडे सात फूट ताडमाड वाढलेल्या एका झाडाचे, काहीसे नवीनच, पान खाली पडले होते. मातीची आर्द्रता, बाहेरचे तापमान अशी जुजबी पाहणी केली आणि असं होतं कधीकधी, मनात म्हणत माघारी वळले.

पण गेल्या तीन दिवसात अशी पाच पानं? माझ्या अस्वस्थतेचा कडेलोट.. त्या झाडाचे जवळ-जवळ प्रत्येक पान मागून-पुढून तपासून पाहिलं. काही अनोळखी खुणा... काही वेगळी स्पंदनं... यांचा शोध घेतला. चक्क एक छानसं भिंग घेऊन सुद्धा.

हे सर्व चालू असताना एक वेगळाच विचार मनात आला..
असे गळून पडलेल्या भावनांचे आवाज पण ऐकू आले असते तर? आणि ते ऐकू येण्यासाठी शांतता हवी की संवेदनशीलता?


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

विचारांचे दुकान


'विचारांचे घाऊक व किरकोळ व्यापारी. येथे फक्त स्वच्छ आणि सुंदरच विचार मिळतील.'
--------------------------------------------------------------------------------

“हे काय आहे ? नाही, मी पाटी वाचली आहे… पण अर्थ कळला नाही.”

“जे लिहिलं आहे नमकं तेच. आम्ही विचार आणि त्याच्या accessories विकतो. तुम्हाला हवा आहे एखादा ? ”
“No, thanks. पण कुतुहल म्हणून… काय भावाने विकता हो हे, 'विचार' ? ”
“ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. सर्व प्रथम म्हणजे तुमची बौद्धिक दिवाळखोरी किती हे तपासले जाते. ती जितकी जास्त तितके विचार स्वस्त. ”
“आणि ती मोजायची कशी ? ”

“तसं ते अवघड आहे. पण एक guideline म्हणून.. तुम्ही काय-काय करता हे आम्ही पाहतो.
म्हणजे जर तुम्ही राजकीय पुढारी, वृत्तवाहिन्यांचे संपादक, मालिकांचे कार्यकारी निर्माते, चमत्कारी बाबा वगैरे असाल तर तुम्हाला सर्व विचार फुकट.
तुम्ही जर प्राध्यापक असाल तर तुम्हाला कुठलाच विचार स्वतंत्रपणे करायची गरज नाही. दुसऱ्यांचे विचार उत्तम पद्धतीने मांडता यावे लागतात. तेवढं add-on skill घेतलं की झालं.
आणि जर तुम्ही FB किंवा Whatsapp वरचे किडे असाल तर 'कोई भी चिज उठाओ.. ' style सर्व पुस्तकी philosophical विचार क्षुल्लक किमतीत. कारण त्यांचा प्रत्यक्षात वापर करणे, त्यांना सत्यतेची कसोटी लावणे वगैरे, हा तुमचा प्रांत नाही. तुम्हाला ते फक्त copy-paste करायचे असतात.”

“पण मग 'स्वतंत्र' विचार करणाऱ्यांचे काय ?”
“तसा कुठलाच विचार स्वतंत्र नसतो. जन्मापासून अवतीभवती होणारी अखंड बडबड.. आपले विचार घडवत असते. यात पालक, शाळेतला अभ्यासक्रम, तो पोचवणारा शिक्षक, TV, राजकीय परिस्थिती, 'paid news' देणारी वर्तमानपत्रं… थेट घरात होणाऱ्या एखाद्या पूजेनंतर सांगितली जाणारी कहाणी.. हे सर्व आलं.
...... आणि या पलीकडे जाणाऱ्या एखाद्याला हे दुकान दिसंतच नाही.”

“हे भलतंच आहे सगळं ! मग हा घाऊक आणि किरकोळ.. हा काय प्रकार आहे ? ”
“जर तुम्हाला स्वत:ला अंमलात आणायचा असेल तर अशा विचाराला आम्ही single user समजतो. तो किरकोळ भावाने. आणि तो जर समाजमनाला द्यायचा असेल तर तो घाऊक भावाने मिळेल.
मग तुमचं काय ? ”

“नाही, मी अगदी सामान्य माणूस आहे. मी यातलं काहीच करत नाही. ”
“मग तुम्हाला फक्त 'सारासार विचार' आवश्यक आहे आणि तो आहेच तुमच्याकडे. फक्त activated नाही. तो तेवढा करा म्हणजे झालं. ”

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

आज मात्र ’सहजच’ नाही...


जंगली महाराज रोड, पुणे. ’बालगंधर्व’ समोर एक पंडाल. त्याच्या बरोबर मागे pizza hut. ह्या pizza hut ला एरव्ही प्रचंड गर्दी असते.

सद्ध्याचं गर्दीचं कारण मात्र संपूर्णत: वेगळं. म्हणजे वेयोगट तोच. कॉलेज मधली सळसळती तरुणाई. आज सगळ्यांनी ’India against corruption' चे t-shirts घातलेले. मुलं-मुली सगळ्यांच्याच डोक्यावर ’I am Anna' च्या टोप्या. गालांवर क्रिकेटच्या मॅचच्या वेळेस दिसतात तसे झेंडे रंगवलेले. ’वंदे मातरम्‌’, ’भारत माता की जय’, ’मैं भी अण्णा, तू भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा’ च्या घोषणा. जवळच post cards ठेवलेली. त्यावर पंतप्रधानांचा पत्ता छापलेला. तुम्ही तुमचा msg अणि हवे असेल तर नाव त्यावर लिहा. जवळची काही मुलं ती पोस्टात टाकणार.

मंचावर बरीच मंडळी उपोषणास बसलेली. तेथून एकजण ध्वनीक्षेपकावरून सांगत होता- "येथून बोलणारा अथवा घोषणा देणारा कोणीही, कुठल्याही राककीय पक्षाचे, पदाधिकाऱ्यांचे किंवा नेत्याचे नाव घेऊ शकत नाही."

तेवढ्यात अर्ध्या तासापूर्वी बाजीराव रोडला भेटलेली, झेंडे घेऊन घोषणा देत फिरणारी दोन टोळकी तिथे आली. सगळ्यांनी मिळून जाम नारेबाजी केली. मग ती टोळकी पुढच्या दिशेने निघून गेली.

तासभर तिथे थांबले. पूर्वी हे सगळं केलेलं. पण मध्यंतरीच्या काळात सगळ्या पिढीचा झालेला तसा एक- disconnect.

माझा लोकपाल विधेयकावर किंवा अण्णांवर फारसा अभ्यास नाही, ही सुरु होऊ घातलेली चळवळ कुठपर्यंत जाईल- किती परिणामकारक होईल? उपोषण करणे आणि भुकेलेल्यांना जेवायला घालणे यात अधिक योग्य काय? या वादातही मला जायचे नाही.

पण ’अलिकडची पिढी’ असं म्हणताना जिथे ’वाया गेलेली’ असा एक छुपा अर्थ असतो, तीच मुलं जेव्हा colleges बुडवून एका योग्य कारणासाठी, सांसदीय मार्गाने react होत असताना, ती योग्य मार्गावर आहेत हा त्यांना विश्वास वाटावा म्हणूनही असेल कदाचीत, उद्या उपोषण करणाऱ्यांच्या यादीत माझं नाव देऊन आले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

चेहरा


घरी जाताना दूध घेऊन जावे म्हणून गाडी पहिल्या दिसलेल्या सुपर मार्केटशी थांबवली. घाईतच दुधाचा कॅन उचलला आणि check out ला आले. एक counter बंद. दुसऱ्यावरची attendant आणि एक ग्राहक यांच्यात अरबीत चर्चा की वाद... देव जाणे... काही तरी चालू होते. शांतपणे थांबून राहिले. तब्बल पाच-सात मिनिटे गेली असतील.

तेवढ्यात कुठुनसा, तिथेच काम करणारा एक तरूण आला. counter चालू केले आणि म्हणाला, "इकडे या."
या अरबस्तानात, घरापासून दूर, हा अनोळखी माणूस माझ्याशी सरळ मराठीत बोलतोय? त्याच्या गणवेषावरचे नाव पाहिले. 'सादिक अहमद'.
न राहवून विचारले, "तुम्ही माझ्याशी मराठीत बोलताय. येतं तुम्हाला?"
"हो. मस्त. ठाण्याचा नं मी."
"पण मी मराठी आहे हे तुम्हाला कसं कळलं?"
"चेहऱ्यावरचं मराठीपण काही लपतं का?".

विचारांच्या नादात गाडीपाशी आले. ड्रायव्हींग सीटवर बसून बेल्ट लावता लावता rear view mirror मध्ये वाकून, वाकून बघितलं. कुठे आहे हे चेहऱ्यावरचे मराठीपण? ना गळ्यात मंगळसूत्र, ना कुंकू, ना हातभर बांगड्या. साधं jeans, t-shirt आणि कापलेले केस. कुठलाच typical 'मराठी' साजशृंगार नाही.
की ’मराठीपण’ म्हणजे, मी मगाशी रांगेत दाखवलेली चांगल्या शब्दात 'सबुरी' किंवा स्पष्ट शब्दात 'भिडस्तपणा'?

न राहवून परत दुकानात गेले. त्याला विचारलं, हे चेहऱ्यावरचं ’मराठीपण’ म्हणजे काय? तर म्हणतो कसा, "बस्स का... ते असतंच. असं सांगता नाही येत."
माझ्या डोक्यातील किड्यांच्या वसाहतीत आणखीन एकाची भर पडली.

बेरकी, साळसूद, निरागस, हासरे, आढ्यतेखोर, प्रांजळ अशा अनेक ’पणा’ मिरवणाऱ्या चेहऱ्यांनी परतीच्या प्रवासात घेरून टाकलं. खऱ्या जगातले, FB सारख्या virtual जगातले, प्रसंगी भेटणारे, अप्रसंगी टाळावेसे वाटणारे, कितीतरी... त्यांच्यावरचे हे भाव... किती खरे? की नुसतेच आविर्भाव? की हे भाव म्हणजे बघणाऱ्याचे perception... सापेक्ष.

कुठे तरी वाचलं होतं, 'You can take a person out of his country, but not the country out of the person.' ... इथे चेहऱ्याचं वांशिक मूळ असणार.
असंही म्हणतात की 'चाळिशी नंतरचा चेहरा हा तुमचा खरा चेहरा असतो.' ... म्हणजे चेहऱ्यावरचे भाव ही माणसाची आयुष्यभराची कमाई तर.
की शांताबाई म्हणतात तसं... ’हे रान चेहऱ्यांचे माझ्या सभोवती....... हे रान चेहऱ्यांचे घेरीत मज ये असे, माझ्याही चेहऱ्याची मजला न शाश्वती.’

मी आणि माझ्या डोक्यातली ever increasing entropy !!!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मित्र


"माझं नं एकनाथांसारखं झालं आहे."
"काय झालं?
"आहेत माझ्या आयुष्यात काही विंचू. प्रत्येक interaction ला चावतातच. पण मी संत नसल्याने त्रास होतो. "
"बरी आहेस नं आई ?"
"का रे, काही चुकतं आहे का माझं ?"
"हो. खूप. आता तरी शीक ग..."

माझा पडलेला चेहरा पाहून त्याने मला जवळच्या खुर्चीत बसवलं. माझा हात पकडला.
"लक्षात घे, there are some lost causes in this world."
"पण आपण प्रयत्न तर करतच राहिलं पाहिजे नं. ते थांबवून कसं चालणार? म्हणतात नं, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे."
"कसलं त्रेता युगातलं, cliché वाक्य हे !!
अशा वेळेस नं आई, तू तुझा सगळा scientific temper गुंडाळूनच ठेवतेस.
विचार कर. वाळूच ती... silicon dioxide... SiO2... त्यात कुठले आले hydrocarbons? कितीही काहीही केलं तरी तेल निघणारंच कसं?"
वाळुतून तेल हे lost cause - नाही का?"
"हं...."
"त्यापेक्षा एका point नंतर 'not my kid, not my problem’ असं म्हणून बाजुला व्हायला शीक.
एकदा ठरवलंस नं की जमेलच तुला. बघ थोडी attitude adjustment करून."

माझ्या चेहऱ्यावर येऊ लागलेला confidence पाहून त्याने समाधानाने back-pack उचलली आणि त्याच्या विमानाच्या दिशेने निघाला.
माझ्या पासून अर्धा जग दूर... त्याची स्वत:ची रोजची लढाई लढायला... ताठ मानेने.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS