Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

विनवित मेघा तुला


आषाढ मासारंभ झाला की रसिकजनांचा 'आषाढ दर्द' जागा होतो.
हुरहुर, विरह, ओल्या सर्द हवेची न सोसणारी जडता, कवी शंकर रामाणींनी वर्णन केलेले डोळ्यांतले 'मूढ पाणी'.... आणि मेघदूत.
या आषाढ प्रतिपदेलाही अशीच कुणाचीतरी एक हळवी स्मृती जागी झाली आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या कुणी फारसं न ऐकलेल्या एका गाण्याने सोशल मिडिआचे जग व्यापून गेले.

'आठवणीतली गाणी'- ही आता केवळ 'एक संकेतस्थळ' म्हणण्याइतकी रूक्ष जागा राहिलेली नाहीये. असंख्य दर्दीजनांशी तिची भावनिक नाळ जोडली गेली असल्याने, माझ्याकडे या गाण्याची ध्वनिफीत लगेच पोचली. 'हे ऐक. वेगळं आणि चांगलं आहे. बाकी सगळं सोड आणि याच्या खोलात जा.' असं मला हक्काने सांगितलं गेलं.
आणि मग सुरू झालेला शोध....

आषाढाच्या पहिल्या दिवशी
अवचित दिसशी मला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू, तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

प्रिया दूर मम, तिला भेटशी
मनी वाटते, नाही न म्हणशील
विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो,
सांगुनी नंतर निरोप कथितो
दूत होवुनी पोचीव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

या पदाचे गायक अभिषेकीबुवा असल्याने शौनकजींशी सगळ्यात पहिला संपर्क केला. ते फार तत्परतेने माहिती देतात. त्यांनी सांगितले, हे गीत 'गीत-मेघ' (अनुवादित 'मेघदूत') या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी तयार केले गेले होते.

त्यांच्याशी संपर्क करत असताना एकीकडे माझा इंटरनेटवर शोध सुरू होताच.
फक्त एका लेखात या गीताचा संदर्भ मिळाला. लेख श्री. अरुण काकतकर यांनी २०१२ मधे लिहिला होता. लेखाचं नाव होतं 'पाऊसं पाऊसं, येता वाटतं हायसं'.
त्यांना फोन केला. ते म्हणाले, "दूरदर्शनवरील ह्या रूपकाचा प्रस्तुतकर्ता मीच होतो. यात एकूण सात गाणी होती. दोन बुवांची, दोन रामदास कामतांची, आणिक काही. निवेदन ज्योत्‍स्‍ना किरपेकर यांनी केले होते. दूरदर्शनकडे या कार्यक्रमाची चित्रफित आता नाही. पण माझ्याकडे ती सगळी गाणी आहेत. ती मी देईन."
न राहून शेवटी मी विचारलंच, "मला यातली एक ओळ अडली आहे. त्यातील शब्दांचे अर्थ मला माहिती आहेत. पण 'मेघदूत'चा माझा काही आभ्यास नाही. म्हणून संदर्भ लागत नाहीये."
त्यांनी लगेच सांगितले, मी हा प्रश्न डॉ. वसंतराव पटवर्धन (महाराष्ट्र बॅंकेचे माजी अध्यक्ष) यांना विचारावा. ते या पदाचे रचियता आहेत. आणि मेघदूताचे हे भाषांतरही त्यांनीच केले आहे. हा त्यांचा फोन नंबर.

आज सकाळी वसंतरावांशी बोलणे झाले. त्यांना विचारले,
"मी, 'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला' इथे अडले आहे. 'बरवी' म्हणजे चांगली. 'शठ' म्हणजे लुच्चा. पण संदर्भ लागत नाहीये."
ते म्हणाले, " 'मेघदूता'ची मराठीत सी. डी. देशमुखांसकट २६ जणांनी भाषांतरे केली आहेत. त्यातलं माझं- 'विनवित मेघा तुला' या नावाने आहे. हे पुस्तक आता उपलब्द्ध नाही. पण मी त्याची फोटोप्रत करून तुला देतो. ही ओळ ज्या संदर्भात येते, त्या मेघदूतातल्या ओळी अशा ..

(तेनार्थित्वं त्वयि विधिवशादूरबन्‍धुर्गतो हं)
याण्‍चा मोघा वरमधिगुणे नाधमे लब्ध्कामा ॥

(मी दुर्दैवाने माझ्या स्वजनांपासून दूर असल्याने तुलाच विनंती करतो. आणि कसं आहे,..)
एकवेळ सुजनांना केलेली विनंती 'विफल' झाली तरी चालेल, पण एका 'शठा'ला केलेली विनवणी 'सफल' होणे नको.
'विफल विनवणी सुजनी बरवी, नको शठी सफला'

ही अशी गाणी, त्यांबद्दलची सर्व माहिती देणारे असे हे सुहृद - मान्यवर, 'आठवणीतली गाणी'स अधिक श्रीमंत करतात.
ज्यांनी माझ्यापर्यंत हे गाणे पोचवले ते सर्व, श्री. शौनक अभिषेकी, श्री. अरुण काकतकर (वय वर्षे ७५) आणि डॉ. वसंतराव पटवर्धन (वय वर्षे ९२) यांच्या ऋणात मी व्यक्तीश: आहे.

टीप : हे पद ऐकण्यासाठी 'आठवणीतली गाणी'वर उपलब्द्ध आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मर्मबंधातली ठेव ही प्रेममय


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 'सन्यस्त खड्ग' नाटकातील हे पद. पण ते या नाटकाच्या पुस्तकात आपल्याला सापडणार नाही.
याचे रचियता आहेत नागपूरचे कवी- शंकर बाळाजी शास्‍त्री.
हे पद या नाटकात कसे पोचले ? पदाचा अर्थ काय? 'नेईं हरोनी' की 'ठेविं जपोनि'? थोडक्यात या पदाला थेट भिडायचं असेल तर परत एकदा आपल्याला नाटकाचा इतिहास, त्याचे कथानक आणि त्यातील 'सुलोचना' ही व्यक्तीरेखा, यांच्याकडे जावं लागेल.

रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात 'सन्यस्त खड्ग' लिहितानाचा सावरकरांचा हेतू संपूर्ण राजकीय होता. त्यांच्या विचारांच्या 'प्रचार' करणे. त्यांच्यावर इंग्रजांनी त्या काळात घातलेल्या बंधनांमुळे अभिव्यक्त होण्याचा, हे नाटक हा एक मार्ग होता. नाटकाच्या कथासूत्रात, कथेतील पात्रांत, त्या पात्रांनी केलेल्या चर्चेत तत्‍कालीन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब अगदी ठळकपणे दिसते. किंबहुना ते तसे दिसावे, हाच उद्देश आहे.

तो काळ 'महात्मा गांधी' नावाच्या एका विचारधारेच्या उगमाचा, प्रसरणाचा. हे लक्षात घेतलं तर नाटकातील पात्रं- सिद्धार्थ गौतम बुद्ध, शस्‍त्रसंन्यास सोडून परत आलेले सेनापती विक्रमसिंह, त्यांचा युद्धबंदी झालेला पुत्र वल्लभ, त्याची पत्‍नी सुलोचना, लालची लंपट शाकंभट, कोसलाचे शाक्यांवरील आक्रमण, या सगळ्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीच्या, त्यातील किरदारांच्या प्रतिमा आहेत हे नि:संशय समजते.

मा. दीनानाथ मंगेशकर आणि सावरकारांचा खास स्‍नेह होता. मा. दीनानाथांच्या 'बलवंत संगीत मंडळीं'नी १९३१ च्या सुमारास 'सन्यस्त खड्ग'चे रंगमंचिय सादरीकरण करायचे ठरवल्यावर त्यांनी मूळ कथेवर, रंगाविष्कारास पूरक असे काही संस्कार केले. सावरकरांच्या संमतीने. पण या बदलांची व्याप्‍ती, (सावरकरांच्या इच्छेनुसार) फक्त नाटकाच्या सादरीकरणापर्यंतच मर्यादित असणार होती. त्यामुळे मूळ संहितेत कुठलाही बदल करण्यात आला नाही.

त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे सुलोचनेच्या मुखी असलेले, 'मर्मबंधातली ठेव ही' हे पद. मास्तरांनी ते शं. बा. शास्त्रींकडून लिहून घेतले. शास्त्रींनीही हे पद थेट सावरकरांच्या शैलीत रचलं. नाटकाच्या कथानकास पूरक असा प्रतिमांचा, रूपकांचा खास वापर करत.

सुलोचना ही 'सन्यस्त खड्ग'ची नायिका आहे आणि नायकही. मा. दीनानाथ स्वत: हे पात्र रंगवायचे. तिचे आचार-विचार हा नाटकाचा गाभा आहे. नुसता ती गाते त्या पदांचा आलेख पाहिला तरी तिच्या व्यक्तित्वाच्या हलक्या-गहिर्‍या छटा दिसतात.
'माळ गुंफितांना ।' म्हणत वाट पाहणारी अभिसारिका 'सुलोचना'..
'सययी सखा न ये ।' म्हणून रुसणारी सुलोचना..
पतीच्या स्वागतासाठी केलेली फुलांची माळ युद्धाच्या धुमाळीत सुकून गेली तर - 'ही तर जग रहाटी आहे.. सुकतातची जगि या । फुले गळत पाकळी पाकळी ।' असा विचार करणारी सुलोचना..
एक राष्ट्रिय सैनिक म्हणून सैनिकवेषात 'रणरंगणी' रंगणारा 'सुलोचन'..
आणि शेवटी पतीसह वीरमरण.. हा तिचा प्रवास मोठा आहे.
तिच्या मनात दुविधा नाहीत. पती युद्धबंदी असतानाही तिच्या अंतर्मनात 'शरण की रण', असं द्वंद्व नाही. उलट 'मारत मारत मरण'वर ती ठाम आहे.

शाक्यांच्या उरलेल्या काही मोजक्या सैनिकांसह, विक्रमसिंह यांनी समरसभा बोलावली आहे. त्यात सुलोचना, 'सुलोचन' म्हणून गेली आहे. अर्थातच उपस्थित उर्वरीतांना याची कल्पना नाही. आक्रमण करणार्‍या कोसलाच्या राजाने, शाक्यांपुढे काही अटी ठेवल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी- शरण आलात तर सेनापती वल्लभास सोडून देऊ.

त्या वेळेस तरुण वीरवर 'सुलोचन' म्हणतो-
"कोसलावासीयांनी दाखवलेली ही फक्त लालूच आहे. उपरांत, अशा जीवनीय दुर्दशेहून मानी हौतात्म्यच सेनापती पत्करतील.
राष्ट्राराष्ट्रांच्या चिरंतन हानिलाभांच्या विचारात व्यक्तीस कोण मोजतो ! तो (शरणागतीचा) विचार विचारात घेण्याचा अविचार मी करू शकत नाही." ......

पण आतली 'सुलोचना' म्हणते (गाते),
मर्मबंधातली ठेव ही प्रेममय ।
नेईं हरोनि सुखाने दुखवीं जीव ॥

हृदयांबुजी लीन लोभी अलि हा ।
मकरंद ठेवा लुटण्यासी आला ।
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥


अलि म्हणजे भुंगा, अंबुज म्हणजे कमळ. हे सर्व रूपक (metaphor) म्हणून येत असल्याने शब्दश: अर्थापेक्षा भावार्थाचा विचार करायला लागेल.

माझ्या मर्मबंधातली ठेव, माझे प्रिय पती वल्लभ, यांचे शत्रूने बलपूर्वक हरण केले आहे. पण राष्ट्रकार्यार्थ लढता लढता, पराक्रमाची पराकाष्ठा त्यांनी केली. त्यामुळे एकाच वेळेस मला अभिमान व दु:ख आहे. हा जो शत्रू त्यांच्या सुटकेची मज आशा दाखवित आहे, त्याचा मोह पडतो आहे खरा.. पण या शत्रूचा सुप्‍त हेतू शाक्यांचे राष्ट्र सर्वप्रकारे लुटून नेणे हाच आहे."

पटदीप रागात बांधलेले हे पद, पटदीपची आणि विरहाची आर्तता थेट पोचवतं. अनेक सिद्धहस्त गायकांनी गाऊन त्यास लोकप्रिय केलं आहे. स्वत: मा. दीनानाथ मंगेशकर, पं. वसंतराव देशपांडे, पं. प्रभाकर कारेकर, आशाताई भोसले, आशाताई खाडीलकर..

नाटकाच्या बाहेर या पदाच्या मुखड्याने एक वेगळीच उंची गाठली आहे. 'मर्मबंधातली ठेव' हे एखाद्या पुस्तकाचे शीर्षक असू शकते, एखाद्या लेखाचा मथळा किंवा एखाद्या हृदयस्पर्शी गाण्यांच्या कार्यक्रमाचे नाव. अशी ठेव तर जपून ठेवण्यासाठीच असते. जशी 'वाक्प्रचार' म्हणून 'मर्मबंधातली ठेव' ही उक्ती प्रचलीत होत गेली, तसं कुठेतरी 'नेईं हरोनी' जाऊन 'ठेविं जपोनि' हा बदल झाला असावा.

Related post - शत जन्‍म शोधितांना

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शत जन्म शोधितांना..



या पदाचे रसग्रहण करताना सर्वप्रथम मला असे नमूद करावयाचे आहे की हे पद स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचं भरतवाक्य नाही. तसंच ते या नाटकाचे सार किंवा सारांशही नाही. अगदी मूलभूत स्तरावर ते एका विरहिणीचे भावगीत आहे.. एक प्रेमकविता आहे.
हे नीटसं समजण्यासाठी- आधी 'सन्यस्त खड्ग', त्याचे कथानक आणि नाटकातील ज्या पात्राच्या तोंडी हे पद येतं ती सुलोचना, यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊ.

अंदमानच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रत्‍नागिरीला स्थानबद्ध असताना सावरकरांनी 'सन्यस्त खड्ग' लिहिलं. या काळात त्यांना राजकारणात जाण्यास बंदी होती. तिथे त्यांनी भरपूर लिखाण केले. लेख, पुस्तके, नाटकही. लिखाणाचा उद्देश आपले विचार मांडणे हाच असल्याने, 'सन्यस्त खड्ग' हे नाटकसुद्धा सावरकारांची वैचारिक सुस्पष्टता घेऊन येते. नाटकाची कथा अहिंसा, धर्म, कर्म यांचा ऊहापोह करत, नाटकातील पात्रांद्वारे विचारांचे मंडन-खंडन करीत पुढे जाते. प्रमूख पात्रं आहेत- बुद्ध, विक्रमसिंह, वल्लभ आणि सुलोचना.

सिद्धार्थ गौतम 'बुद्ध' होऊन काही वर्ष लोटली आहेत. विक्रमसिंह हे बुद्धांच्या वडिलांच्या (शुद्धोदन) राज्याचे (शाक्य) सेनापती. बुद्धांच्या सांगण्यावरून ते शस्‍त्रसंन्यास घेतात (पटत नसतानाही केवळ प्रयोग म्हणून). तथागतांबरोबर भिक्षु म्हणून प्रवासास जातात. या घटनेला चाळीस वर्षे लोटतात. दरम्यान विक्रमसिंहांचा पुत्र वल्लभ राज्याचा सेनापती होतो. वल्लभ सुद्धा शूर, पराक्रमी आहे. या चाळीस वर्षात बुद्ध धर्माचा आणि त्यात सांगितलेल्या अहिंसेचा पुष्कळ प्रसार झाला आहे. तेवढ्यात शेजारच्या 'कोसला' राज्याचे शाक्यांवर आक्रमण होते. अहिंसामार्गी झालेल्या या राज्याची युद्धाची तयारी नसते. बरीच वाताहत होते. सेनापती वल्लभ पकडले जातात. ही वार्ता पोचताच विक्रमसिंह तथागतांच्या मनाविरुद्ध खड्ग निष्कोषित करतात आणि युद्धात सामिल होतात. जाताना ते बुद्धांना म्हणतात, "मी अहिंसा सोडत आहे, बुद्धांना नाही."

हे पद नाटकात सुलोचनेच्या तोंडी येतं. सुलोचना ही वल्लभ दयिता- पत्‍नी. त्यांच्या प्रीतिविवाहाला नुकतंच एक वर्ष झालंय. हा वाढदिवस साजरा करतानाच्या प्रेमसंवादात ती दोघे मग्‍न आहेत. तोच वल्लभास राजसभेचे तातडीचे निमंत्रण येते आणि तो तिथून जातो. तो परत आल्यावर त्याच्याशी कसं बोलावं? रुसावं का? किती? या विचारात ती असतानाच दूत निरोप आणतो, सेनापती तर परस्पर युद्धावर गेले..
ही भेट अर्धीच राहिली याची तिला खंत सतावते. काही दिवसांतच अशीही बातमी येते की शाक्यांचे सैन्य उधळून गेले आणि सेनापती वल्लभ युद्धबंदी झाले. तेव्हा तिच्या तोंडी येते, ते हे पद.
शत जन्म शोधितांना..

या पदाचा संपूर्ण अर्थ समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सावरकरांचा चष्मा घालावा लागेल. भावनेची तीव्रता, उत्कटता.. हातचं राखून काहीच नाही. भव्य, दिव्य, तेजस्वी.. आणि प्रखरही. स्वत: जळून इतरांस ऊर्जा देण्याचं सामर्थ्य असलेलं.

सुलोचना ही सामान्य राजस्‍नुषा नाही. फक्त प्रेमसंवादात तिचं मन रमत नाही. तो ती करतेच पण ती कर्तृत्ववान आहे. स्‍त्रीसुलभ भावनांबरोबर विचारांची परिपक्वता तिच्यात आहे. तिच्या जाणीवा प्रगल्‍भ आहेत. धैर्यधर पतीचा तिला अभिमान आहे. तो युद्धबंदी झाल्याचे समजताच तिचे पहिले वाक्य असते,
"हा सेनापती अबल आहे म्हणून पराभूत नाहीये तर-
सबल परि ना राष्ट्रचि म्हणून अपजयी हा । नसे जित पहा । सेनानि ।"
पुढे जाऊन ती सैनिक वेष घालून रणांगणात युद्ध करते व आपल्या पतीसह वीरमरण पत्करते.

ही अशी स्‍त्री जेव्हा एक विरहगीत गाईल आणि तेही सावरकरांच्या लेखणीतून उतरलेलं..
ती म्हणते,
शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥


हा माझा माझ्या प्रियकराचा शोध जन्मजन्मांतरीचा आहे. जन्म-मरणाच्या अनेक फेर्‍यांतून गेलेला. माझ्या या शोधापुढे शत 'आर्ति' व्यर्थ आहेत. 'आर्ति' या शब्दाचा अर्थ जरी दु:ख, पीडा असला तरी इथे त्याची आर्तता थेट ज्ञानेश्वरांची आहे. 'विश्वाचे आर्त'शी नातं सांगणारी. दीपावली सुद्धा तुम्हां-आम्हांसारखी मिणमिणत्या पणतींची नाही तर तेजाळ, देदिप्यमान सूर्यमालिकांची. इथे 'कवी' सावरकरांनी 'विझाल्या' असं म्हणताना 'विझल्या'तला कोरडेपणा काढून टाकला आहे. या माझ्या शोधयज्ञात मी अशा शत दीपावलींची आहुती दिली आहे, असे तिला वाटते.

तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी ।
सुखसाधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥


प्रियकर मीलनाचे सायास तिला कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाही. तिच्यासाठी ही आनंदाने केलेली 'साधना' आहे, जिची सिद्धी आतां कुठे होऊ घातली आहे. येथे सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा आणखी एक स्पर्ष जाणवतो. वरील दोन्ही ओळीतील 'गाठी' या शब्दाने त्यांनी यमक साधलाय आणि श्लेषही. पहिल्या ओळीतील 'गाठी' हे गाठभेट या अर्थाने येते तर दुसर्‍या ओळीतील 'गाठी' हे पोचणे या अर्थाने. युगायुगांच्या प्रतिक्षेनंतर आमची भेट घडली आहे तोच,

हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥


नुकतीच तर कुठे आमची भेट झाली आहे.. जो मी उठून त्याला, माझ्या प्रियकराला मिठी घालू पाहते, तोच सगळं संपून गेलं. मीलनाचा 'तो' क्षण एका क्षणांत संपून गेला..
पुलंनी एका ठिकाणी असं म्हंटलं आहे, "या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल पारितोषिक द्यावं, इतक्या श्रेष्ठ दर्जाची ही कवीकल्पना आहे."

'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा संदर्भ ठेऊन पाहिलं तर असा सगळा अर्थ आहे. पण या संदर्भाच्या पलीकडे जाऊन, अध्यात्मिक स्तरावरही हे पद फार खरं ठरतं.
मानवी जीवनातील दु:खाचं सातत्य, सुखाची क्षणभंगूरता, काळाची गतीमानता, बुद्ध धर्मात वर्णन केल्याप्रमाणे जीवनाचं 'अनित्य' असणं... असं बरंच काही.

सावरकरांच्या या पदरचनेचे आपल्या मनातील स्थान इतके अनन्य असे आहे की नुसतं 'शत जन्म..' म्हंटलं तरी हा सगळा अध्यात्मिक पट आपल्यासमोर उलगडतो.

( फोटो सौजन्य- आंतरजाल )

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

'यमक'श्री गदिमा


"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतस्थळावर आज मितीस उपलब्द्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्‍त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक' हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर 'यमक' हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं 'त्या तिथे, पलीकडे... झाड एक वाकडे' किंवा 'घननिळा लडिवाळा' सारखं अनेक वेळा उद्‌धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू...

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू...

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका'तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र' रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्‍त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव’ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि ’व’चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता...
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण' हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा... प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा.... सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ग्रेस


एक विहीर असावी. अंधारी.
वास्तवाच्या परिघाच्या किंचित बाहेर.. किंवा कदाचित आतही, नक्की ठरवता येत नसावं.
तिच्या भोवतीचं सगळंच अगम्य, दुर्बोध. तिच्या दिशेने पाऊल टाकलं की अंगावर शहार्‍याचे कोंब फुटावेत.

मी दोन-तीन पाउले टाकते.. आणि मागे फिरते.
पण विहीर परतू देत नाही.
आत डोकावून पाहणं झेपेल? नको. शक्यतो कडेकडेनेच जावं.
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने एव्हाना कुतुहल, उत्सुकतेच्या मर्यादा पार केलेल्या असतात.
विहीरही तिचा अदृश्य पगडा घट्ट.. आणखी घट्ट करते.

सर्वत्र ओला, गूढ-काळा वास. त्या वलयात मी गुरफटायला लागते. वाट अधिकच निसरडी होते.
शेवाळलेला फुटका दगडी कठडा. कालातीत असल्यासारखा. कशीबशी त्याला रेलते. त्याच्या आधाराने डोळे गच्च मिटून आत डोकावते.
ऐकू येते ती घुमणारी शांतता. डोळे उघडावे की नाही? काय असेल..आणि आपल्याला काय दिसेल?
पाणी खोल असेल? की तिला तळच नसेल? आणि असलाच तळ तर तळाशी....
असतील कदाचित काही नि:श्वास.. उमेदी सुद्धा.

आता हळूहळू डोळे उघडायचे..
उडी मारणं, डुंबणं, तळ गाठणं वगैरे...
कुणास ठाऊक..

हे नातं आहे, कवि ग्रेस यांच्या कवितांचं आणि माझं..

'गांव'
आभाळ जिथें घन गर्जे
तें गांव मनाशीं निजलें;
अंधार भिजे धारांनी
घर एक शीवेवर पडलें..

अन्‌ पाणवठ्याच्या पाशीं
खचलेला एकट वाडा;
मोकाट कुणाचा तेथें
कधि हिंडत असतो घोडा..

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो;
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो..

गावांतिल लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती;
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळींने मळती....

-ग्रेस


( फोटो सौजन्य- आंतरजाल )

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

झिणिझिणि वाजे बीन


झिणिझिणि वाजे बीन
सख्या रे, अनुदिन चीज नवीन

बा. भ. बोरकरांची काय सुंदर कल्पना आहे पहा.
कविता संपूर्णत: अध्यात्मिक वळणाने जाते.
ते म्हणतात ..

हे जे माझे, अव्यंग शरीर-मन आहे, ते बीन म्हणजे.. एखाद्या पुंगी-वाद्यासारखे आहे.
कवितेत ते या शब्दांत येतं .........
' सौभाग्ये या सुरांत तारा '

आणि त्यातून हा जो प्राणवायू आत-बाहेर करतोय त्यामुळे, हरघडी.. हरक्षणी एक वेगळीच सुरावट, अनोखी लयकारी बाहेर पडते.
ती कधी शांत-प्रसन्न मंत्रघोषासारखी असते .. तर कधी उगीच वायफळ .. अर्थहीन तराण्यासारखी .. तर कधी फारच कठीण .. जीवाचा लचका तोडणार्‍या अवघड तानेसारखी.

आणि हे वाजवणारा ..
या शरीररूपी वाद्यातून .... प्राणवायू फुंकून .... ही सुरावट काढणारा ... आहे तरी कोण ? ......
अर्थात ... साक्षात परमेश्वर.......
तो तर काय .. अलख निरंजन...... सहजपणात प्रवीण .....

जसा पारा हातात पकडायचा प्रयत्‍न केला तरी हाती लागत नाही.. तसा ह्या शरीररूपी वाद्याच्या तारा छेडणारा परमेश्वर आपल्या हाती येत नाही.
त्याचे अस्तित्व तर जाणवते... हे आपल्याकडून कुणीतरी सर्व करून घेत आहे, याची जाणीवही असते... पण ’तो’ मात्र आकलनाच्या पलीकडेच रहातो.

सख्या रे, झिणिझिणि वाजे बीन ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कवी सुधीर


कवी सुधीर मोघे यांच्यावरचे हे माझे खरं तर दुसरे लिखाण. या आधीचे आणि हे, दोन्हीत एक समान सूत्र आहे आणि काही असमान धागे.
समान असे की या दोन्हीत त्यांची 'जीवनी' अशी नाही. किती पुस्तके लिहिली? कोणते पुरस्कार मिळाले? यात ते अडकलेलं नाही. पण,
पहिलं त्यांच्या निधनाच्या दुसर्‍याच दिवशी लिहिलेलं. त्यामुळे उत्‍स्‍फूर्त आणि काहिसं अचानक आलेल्या पोरकेपणाने बावरून गेल्यासारखं. तरी त्यांना वाहिलेली ती आदरांजली असल्याने त्याचे महत्त्व वेगळे.
दुसरे आजचे.. त्यांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी लिहिलेलं. भावनेच्या पगड्याच्या थोडं बाहेर येत.

त्यांच्या कविता-गाण्यांचे अवलोकन करण्याची किंवा त्यांची साहित्यिक मीमांसा करण्याची माझी योग्यता नाही. 'आठवणीतली गाणी' या माझ्या उपक्रमामुळे त्यांच्या गीतलेखनात दिसलेले सुधीरजी आणि आमच्या सात-आठ वर्षांच्या ओळखीतून दिसलेले काव्याबाहेरचे सुधीरजी.. यांच्याशी झालेल्या चर्चांतून माझे काव्यानुभव समृद्ध झाले आणि मराठी भाषेच्या ज्ञानाची कक्षा रुंदावत गेली.

अलीकडचे प्रसिद्ध कवी वैभव जोशी त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
'रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते.. '

पण जर कुणाला अशी 'एखादी'च नाही, तर अशा अनेक 'कविता पानोपानी' सुचल्या असतील तर.. त्यांना काय म्हणावे? कविवर्य, कविश्रेष्ठ? आणि त्याही पुढे जाऊन, ते जर फक्त शब्दचित्रेच नाही तर रंगचित्रे, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय सादरीकरण, पटकथालेखन.. असंही बरंच काही करत असतील तर?

सुधीर मोघे यांना मात्र त्यांची 'कवी सुधीर' अशी सुटसुटीत ओळख करून दिलेली अधिक आवडायची. 'Poet Sudheer' अशी झोकदार इंग्रजी सही ते करायचे. कारण कवितेव्यतिरिक्‍त इतर कुठल्याही माध्यामातून व्यक्त होणं, हे त्यांच्या 'कवी' असण्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटायचं. त्यांच्याच शब्दांत सागायचं तर, "माझ्या प्रत्येक असण्याला माझ्या कवी / poet असण्याचा base आहे, संदर्भ आहे." आमच्या चर्चेत हे त्यांचं कवी असणं भरून असायचं.

टेरिकॉटची पॅंट, ढगळसा झब्बा. अशी अनौपचारिक वेषभूषा. 'पद्मा फूड्स' हा अनौपचारिक गप्पांचा तितकाच अनौपचारिक अड्डा. जवळपास पन्‍नास वर्षांची कारर्किर्द. सांगण्यासारखे प्रचंड काही आणि ते सांगतासांगता समोरच्याला जाणून घेण्याची खुबी..

त्यांची कविता शब्दबंबाळ नाही. शैली मिताक्षरी. थोडक्यात आणि मार्मिक. बुद्धीवादी, तर्कनिष्ठ आणि त्याचवेळी तरल. scientific temperची झलक असणारी. परमेश्वराच्या सगूण आणि निर्गूण, दोन्ही रूपांचं एकाच तन्मयतेने वर्णन करणारी..

शब्दांवर प्रेम करताना त्यांच्या आहारी न जाता.. त्यांच्याकडे केवळ माध्यम म्हणून पाहताना, शब्दांविषयी ते म्हंटतात..

शब्दांच्या नकळत येती.. शब्दांच्या ओठी गाणी..
शब्दांच्या नकळत येते.. शब्दांच्या डोळा पाणी..

शब्दांना नसते दु:ख.. शब्दांना सुखही नसते..
ते वाहतात जे ओझे.. ते तुमचे माझे असते..

सुधीरजी एकदा म्हणाले होते, "मुकुंद (फणसळकर) म्हणतो, माझ्या प्रत्येक कवितेत-गाण्यात माझी सही असते. तुला वाटतं तसं?" त्यांचं काव्य-गीत लेखन जवळजवळ मुखोद्गत असल्याने मी लगेचव रुकार दिला. म्हंटलं, "हो. हो. नक्कीच.
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'पर्वतांची दिसे दूर रांग .. काजळाची जणू दाट रेघ',
'सूर कुठूनसे आले अवचित' मध्ये .. 'रूप स्वरांचे तरल.. अपार्थिव',
'सांज ये गोकुळी' मध्ये .. 'सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या',
.. या तुमच्या सह्याच तर आहेत."

'मन' या विषयावर सुधीरजींना खरं तर Ph.D. मिळायला हवी होती. एका कवितेत ते म्हणतात .. 'मन मनास उमगत नाही .. आधार कसा शोधावा ! .. चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही .. धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही.' आणि असंही .. 'मना तुझे मनोगत मला कधी कळेल का?' याच कवितेत 'मन'च कसं आपल्या भावविश्वावर नियंत्रण ठेवतं हे सांगताना, 'तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश'. एका ठिकाणी .. 'मनाचिया घावांवरी मनाची फुंकर ..' आणि 'मन' ते 'कविता' असा प्रवास ...

एकांत, लेखणी, कागद- वाया सारे
मन कागदाहुनी निरिच्छ अणि कोरे
गिरविता अहेतुक रेषांचे गुंडाळे
बोटांवर अवचित मन ओठंगुन आले.

सुरेश भट, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यावर 'झी मराठी' या दूरचित्र वाहिनीने केलेल्या 'नक्षत्रांचे देणे' कार्यक्रमांचे लेखन सुधीरजींनी केले आहे. एकदा त्यावर बोलत असताना, समोर बसल्याबसल्या त्यांनी संवादिनी घेतली. ती त्यांच्या खोलीत असायचीच. आणि चक्क सुरेश भटांचं 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझात वेगळा' गायला लागले आणि म्हणाले, "देवकी (पंडीत) अंदाजे सतरा वर्षांची असताना मी तिला हे गाणं शिकवलं ते असं. तेव्हा कोवळ्या वयामुळे तिला गीताचा संपूर्ण अर्थ उमगलाच होता, असं म्हणता येणार नाही. ती, मी शिकवलेली चाल या लयीत म्हणायची. आता थोडी ठायमधे असते. पण हा 'तिचा' व्यक्त होण्याचा भाव आहे."

'लय' वरून आठवलं ..

लय एक हुंगिली खोल खोल श्वासात,
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात,
लहडला वेल... तो पहा निघाला गगनी,
देठांना फुटल्या - कविता पानोपानी

सुधीरजी म्हणायचे, "एकदा कविता लिहिली की तिचे नशिब माझ्या हातात नसते. ती तिच्या मार्गाने जाते .. मी माझ्या .."
एक कवी आपल्या कवितेकडे इतक्या निर्ममपणे तेव्हाच पाहू शकतो जेव्हा कुठल्यातरी पातळीवर कवितालेखन हे त्याच्यासाठी ध्यानसाधनेसारखं असतं.

मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो
जाताना- ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्यागेल्या श्रेयांवरती;
पण पुसट.. कोवळे नाव ठेवुनी गेलो.

ह्या नि:शब्दांच्या आड कुजिते कसली?
पानांच्या रेषांतुनी भाकिते कुठली ?
होशील एकटा तू देहाच्या पैल
सोबतीस तेथे कविता फक्त असेल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

जीना


वसंत बापट...... काल जन्मदिन.
स्वातंत्र्य सैनिक, प्राध्यापक, ’साधना’ साप्ताहिकाचे संपादक, राष्ट्र सेवा दलाच्या पथनाट्यांतून लोककलांची जोपासना करणारे वसंत बापट.

गीतकार बापट.... विषयांचे इंद्रधनुष्य पेलणारे.
‘गगन सदन तेजोमय’ अशी प्रार्थना करणारे बापट.
‘या पाण्याची ओढ भयानक’ हे आत्मघाती मार्गावरचे मनोगत सांगणारे बापट.
‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ ही स्फूर्ती देणारे बापट.
‘येशिल येशिल राणी, पहाटे पहाटे येशील’ असं अत्यंत लाडिक्पणे विचारणारे बापट.
‘छडी लागे छम छम’ चा बालवयीन खोडकरपणा जपणारे बापट.
‘लाल बत्‍ती हिरवी झाली, आली कोकण गाडी’ हे थेट आगगाडीच्या ठेक्यात लिहिणारे बापट.
‘अजून त्या झुडुपांच्या मागे’…. ‘देह मंदिर चित्‍त मंदिर’ .... ‘या बकुळीच्या झाडाखाली’ ....

आणि कवी वसंत बापट.


जीना....

कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

किती तरी दिवसात


"आजकाल कसं झालंय माहिती आहे का... जिस गली में internet ना हो बालमा, उस गली से हमें तो गुजरना नहीं ।"
असं ऐटीत कुणाला तरी म्हंटलं खरं...

पण बदलती जीवनशैली कशी अंगात भिनली आहे, तिच्या चक्रात नकळत कसे गुरफटलो आहोत, याची खाडकन जाणीव झाली.

शाळेत शिकलेली मर्ढेकरांची कविता, तेव्हा जेवढी समजली नाही त्याच्या कैक पटीने आज समजली.


किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो;
किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय

आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा इथे, दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची शिरी धार, मुखी ऋचा !

- बा. सी. मर्ढेकर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

डोह..


मध्यंतरी समृद्धीने FB वर एक link पाठवली. त्यात भालचंद्र नेमाडेंच्या ’कोसला’ आणि J. D. Salinger यांच्या ‘The Catcher in the Rye’ या दोन पुस्तकांचा एकत्र विचार करण्यात आला होता. यावर आमच्या छान गप्पा झाल्या. पण मग पुढे जाऊन तीच म्हणाली, ’कोसला’ हा कदाचित नसेल original thought, हे कळल्याने किती फरक पडतो?

बोलता बोलता तिला म्हंटलं गेलं, ’हो खरंय, प्रत्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे नाही.’

इथे विषय ’कोसला’ हा अर्थातच नाही. ही ओळ ज्या कवितेतील आहे, ती वैभव जोशींची कविता हा आहे. साधारणत: तीन वर्षांपूर्वी वाचलेल्या आणि तेव्हापासून सतत मनात घोळत राहिलेल्या या ओळी, वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे भीडत गेल्या.

एखाद्या mature मैत्रीत कधी हे काव्य जाणवले तर कधी चिकित्सकपणे उहापोह करण्याच्या नादात हरवलेल्या सौंदर्यदृष्टीत. घरातल्या माझ्या सगळ्यात आवडत्या जागी- झोक्यावर बसून खाली दिसणाऱ्या पाण्याकडे पाहताना आणि मुंबईत गेल्यावर बाबांच्या समोर नुसतं बसून रहाताना सुद्धा. आज तीच कविता आवर्जून कराविशी वाटतेय. कवितेचे नाव आहे-



डोह..
एखादा डोह असू द्यावा.. अथांग
कुठल्याही क्षणी हक्कानं जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अशा अंतरावर बसून बघत रहावं..
आपण डोहाकडे,
डोहाने आपल्याकडे..
ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील तर कसला आला अपेक्षाभंग ?
डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला ?
अन् हलकेच एखादं पान सरकवत त्याने दाखवून द्यावं
बरीच आंतरिक उर्मी आहे.. पण तळाला !
अशावेळी,
ते पान परत पाण्यात सोडून द्यावं.
हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायला हवा असे नाही,
प्रत्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे नाही.

- वैभव जोशी


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS