Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS
Showing posts with label Friendship. Show all posts
Showing posts with label Friendship. Show all posts

Sharing


लेक मोठा होताना त्याच्या बरोबर काय काय नाही share केलं ? त्याच्या तीन चाकी सायकलवर डबल सीट बसण्यापासून झालेल्या ह्या सुरुवातीने, त्याच्या बरोबरीने माझ्याही मोठं होण्याच्या प्रवासात अनेक थांबे घेतले.

♦ अनेक वेळा प्रयत्न करुनही १० फुटांच्यावर उडू न शकलेला आमचा पतंग...
♦ "आई... पळत ये... Tom and Jerry..." म्हणून ठोकलेली ठणठणीत आरोळी...
♦ अल्फा मराठीवरचा 'गोट्या'...
♦ swimming शिकताना ’जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली’ म्हणत, डोळे गच्च मिटून पाण्यात    मारलेली उडी...
♦ त्याच्या मित्रांबरोबर तेवढाच आरडाओरडा करत केलेले treks...
♦ सचिनची शारजा मधली तुफानी century ...
♦ पूर्वी माझ्या kinetic समोर ’फेली, फेली" चा दंगा करून मिळवलेल्या, मग तो चालवायला    लागल्यावर त्याच्याकडून तितक्याच हक्काने वसूल केलेल्या, दुचाकीवरील गावभर आणि निष्कारण    फेऱ्या...
♦ सकाळी किती वाजता उठवायचे यासाठी रोज रात्री त्याच्या खोलीच्या दारावर लिहून ठेवलेला C++    मधला एखादा किचकट program, ज्याचे output मी शोधून काढून त्या वेळेस त्याला उठवणे...
♦ त्याच्या पहिल्या SLR कॅमेराने केलेल्या प्रयोगांसाठी चादरी बांधून केलेले reflectors...
♦ टी. व्ही वर पाहून केलेले cooking चे अचाट प्रयोग...
♦ होळीचे रंग... Sherlock Holmes... पु. ल... James Bond........ असं बरंच काही.

अजूनही दोन गोष्टी त्या दिवसांशी नाळ जोडून ठेवतात. एक ’चिंटू’. आडव्या पट्ट्यांचा टी शर्ट घातलेल्या किंचित आगाऊ चिंटूला ’सकाळ’ पेपर उघडून भेटल्यावर पूर्वी दिवसाची सुरुवात होई. आता दिवसाचं पहिलं email हे लेकाकडून आलेलं, Today's Chintoo चं असतं.

आणि दुसरं म्हणजे jigsaw puzzles. सुरुवात फक्त ५० तुकड्यांपासून झाली. आता असतात ती ३००० तुकड्यांची puzzles, 3-D jigsaw puzzles, ज्यातून तयार केलेल्या आयफेल टॉवर सारख्या इमारती...

आता नातं आई-लेकापेक्षा मित्रांसारखं आधिक झालं आहे.
जगभरातून शोधून शोधून जमवलेली ही puzzles सोडवताना, ’शेजारी’ सिनेमातील कोसळणाऱ्या धरणाच्या भिंतीवर बसून पट खेळणाऱ्या दोन मित्रांची, भान विसरवणारी उत्कटता असते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

मित्र


"माझं नं एकनाथांसारखं झालं आहे."
"काय झालं?
"आहेत माझ्या आयुष्यात काही विंचू. प्रत्येक interaction ला चावतातच. पण मी संत नसल्याने त्रास होतो. "
"बरी आहेस नं आई ?"
"का रे, काही चुकतं आहे का माझं ?"
"हो. खूप. आता तरी शीक ग..."

माझा पडलेला चेहरा पाहून त्याने मला जवळच्या खुर्चीत बसवलं. माझा हात पकडला.
"लक्षात घे, there are some lost causes in this world."
"पण आपण प्रयत्न तर करतच राहिलं पाहिजे नं. ते थांबवून कसं चालणार? म्हणतात नं, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे."
"कसलं त्रेता युगातलं, cliché वाक्य हे !!
अशा वेळेस नं आई, तू तुझा सगळा scientific temper गुंडाळूनच ठेवतेस.
विचार कर. वाळूच ती... silicon dioxide... SiO2... त्यात कुठले आले hydrocarbons? कितीही काहीही केलं तरी तेल निघणारंच कसं?"
वाळुतून तेल हे lost cause - नाही का?"
"हं...."
"त्यापेक्षा एका point नंतर 'not my kid, not my problem’ असं म्हणून बाजुला व्हायला शीक.
एकदा ठरवलंस नं की जमेलच तुला. बघ थोडी attitude adjustment करून."

माझ्या चेहऱ्यावर येऊ लागलेला confidence पाहून त्याने समाधानाने back-pack उचलली आणि त्याच्या विमानाच्या दिशेने निघाला.
माझ्या पासून अर्धा जग दूर... त्याची स्वत:ची रोजची लढाई लढायला... ताठ मानेने.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सहेली


पुणे विद्यापीठात संख्याशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता, तेव्हाची गोष्ट आहे. सेनापती बापट रोडवरच्या एका वसतीगृहात रहाण्याची व्यवस्था झाली होती. प्रथमच आई-वडिलांच्या छायेतून बाहेर पडलेली मी, त्यामुळे काहीशा कावऱ्या बावऱ्या नजरेनेच वसतीगृहात प्रवेश केला.

माझ्या खोलीत माझी सहनिवासी होती संगीता जोशी-शहा. काळी सावळी, उंच, केसांचा बॉयकट, स्मार्ट आणि गळ्यात मंगळसूत्र. इंग्लीश मध्ये एम्‌. ए. करीत होती. तसेच टेलिफोन एक्सचेंज मध्ये ऑपरेटरची नौकरी. त्यामुळे कधी दिवसा कामाला जायचे तर कधी रात्रपाळी. मी अगदीच नवखी असल्याने माझ्या काही लक्षात आलं नाही, म्हणून तिनेच १५ दिवसांनी सांगितले, ती ३ महिन्यांची गरोदर होती.

हळू हळू गप्पा वाढायला लागल्या. लक्षात यायला लागला, तो तिचा जीवनाचा कष्टमय प्रवास आणि सुरुवात झाली एका अतिशय जवळच्या मैत्रीची. जिग्नेश, तिचा गुजराथी नवरा, सधन आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. संगीता देशस्थ ऋग्वेदी. दोन्ही मोठ्या भावांना कोड असल्याने आपले लग्न कधीच होणार नाही असं वाटत असताना जिग्नेश जीवनात आला. दोन्ही घरचा विरोध पत्करून लग्न केलं. लग्नानंतर तिच्या लक्षात आली त्याची धरसोड वृत्ती. नौकरी पासून प्रत्येक बाबतीत. त्याला संगीताही हवी आणि आई-वडिलही. सध्या तो स्वत: रहात होता आई-वडिलांकडे आणि ही वसतीगृहात. रोज एकदा तिला भेटायला यायचा.

गर्भारपणाच्या वेदना, एम्‌. ए. चा अभ्यास, नौकरी, लूना या दुचाकी वाहनावरून सगळी धावपळ..... या सगळ्यात मी कधी तिची चक्क काळजी घ्यायला लागले ते कळलेच नाही. संगीताच्या जीवनात, त्या काळात आमच्या मैत्री इतकं आश्वासक काहीच नव्हतं. प्रसृतीच्या फक्त दोन दिवस आधी, शेवटी एकदाची जिग्नेशने एक खोली भाड्याने घेतली. दवाखान्यात तिच्या जवळ मी एकटीच. जिग्नेश घरासाठी सामान आणि बाळाचे कपडे यांसाठी बाजारात !

जिग्नेशच्या स्वभावात काहीच बदल नव्हता. माझे शिक्षण संपेपर्यंत मी तिच्या खोलीवर जायचे. मग मी नाशिकला गेले. प्राध्यापक झाले. लग्न झालं. शहरंही बदलत गेली. त्या काळात emails फोन इतके सहज नसल्याने माझा आणि तिचा संपर्क राहिला नाही.

काही वर्षांनी पुन्हा पुण्यात रहायला आलो. संगीताचा दूरध्वनी क्रमांक शोधून काढला. जुन्या आठवणींनी खूप आनंदाने मी सुरुवात केली. पण तिचा प्रतिसाद जरासा थंड. जिग्नेश दोन वर्षांपूर्वी गेला म्हणाली. त्याला कुठलेच काम नीट जमले नाही. त्याच्या पालकांनी हिचा कधीच स्वीकार केला नाही. सुदैवाने तिची नौकरीतली प्रगती फार चांगली झाली. मुलीला सांभाळून सगळी कसरत अशक्य झाल्याने एका क्षणी तिने लग्नाच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नेमके त्याच वेळेस जिग्नेशचे मानसीक संतुलन संपूर्णपणे ढासळले. त्यामुळे त्याला त्या अवस्थेत सोडताही येईना. अशी तीन वर्षे काढल्यावर दोन वर्षांपूर्वी तो गेला. म्हणाली, I want to move on. मागचं सगळं विसरायचंय. जुन्या आठवणी काहीच नकोत. ...... भेटलोच नाही तर चालेल का ? सुन्न मनाने फोन खाली ठेवला. कशा प्रकारे react करावं हेच सुचेना. मग असं वाटलं, की आमच्या त्या सच्च्या मैत्रीला जागायचं असेल, तर हा धागा हातातून सोडायलाच हवा. अगदी मनापासून.

पुढे काहीच दिवसांनी मी पुण्यात एका संगणक प्रशिक्षण संस्थेत नौकरी घेतली. आमच्या शाखेच्या front office ची प्रमुख होती, झुबेदा. २५ वर्षांची चंट तरुणी. कामात खूप सहजता. तिच्याशी माझी पहिल्यांदा ओळख करून देण्यात आली तेंव्हा तिचा एक डोळा लाल, सुजलेला. म्हणाली, धाकट्या भावाशी खेळताना लागलं. हळू हळू ओळख वाढायला लागली तेव्हा लक्षात आलं की ही स्वत:ला 'सुप्रिया' नावाने संबोधते. हे कसं काय समजेना. मैत्री जशी गडद होत गेली तशी ती मोकळी व्हायला लागली. ही मुसलमान. वडिलांच्या कामाचा ठिकाणा नाही. आई संसाराच्या धबडग्यात पिचलेली. धाकटे दोन भाऊ. पुष्कळ वेळा वडील मारायचे. त्या दिवशीचा तो सुजलेला डोळा खरं तर वडिलांचीच कृपा. आर्मितील कॅप्टन अमर कुलकर्णीचे आणि हिचे एकमेकांवर खूप प्रेम, आणि लग्नानंतर 'सुप्रिया' नाव घेणार आहे म्हणाली. पण अमर तर कानडी ब्राम्हण. घरी विधवा आई आणि लग्न झालेली बहिण. बहिणीने सगळं मान्य केलेलं पण आईचा अर्थातच संपूर्ण विरोध. आतून सतत विचारात पडलेली, पण वरतून front offce चं सगळं उसनं अवसान सांभाळणारी झुबेदा रोज डोळ्यांसमोर वावरताना दिसायची.

एक दिवस तिने, नीता आणि मी, आम्हा दोघी मैत्रिणींना बोलावलं. म्हणाली, मदत करा. पळून जाऊन लग्न करणार आहोत. नीता आणि मी विचारत पडलो. चार जणांशी बोललो. अमरशीही बोललो. सर्व विचारांती सगळ्या स्टाफने सहकार्य करायचे ठरवले. झुबेदाच्या मनाची तयारी खूप पक्की होती. सध्या तरी धर्म बदलणार नाही, पण देवांचंही करायला विरोध नाही म्हणाली. त्यामुळे खूपच गोष्टी सोप्या झाल्या. हौसेने पुण्याच्या 'पेशवाई' दुकानातून खास मराठमोळी साडी घेतली. लग्न अर्थातच 'register' होणार होतं. पण म्हणाली, तुमच्यात नवरी मुलगी जशी माहेरून अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणते तसंच मला करायचंय. तुम्ही मैत्रिणीच माझं माहेर. मग काय तिला बरोबर घेऊन चांदीच्या पूजा साहित्याची खरेदी झाली.

हे सगळं अतिशय गुपचूप. झुबेदाच्या घरी कळलं तर तिची संपूर्ण कौम चवताळून उठेल ही भिती. लग्नाच्या आदल्या दिवशी ती घरी गेलीच नाही. सरळ नीताच्या घरी. तिथे मेंदी, संगीत अशी व्यवस्था केली होती. बाहेर सर्व पुरुषवर्ग सजग बसला होता. एकीकडे आम्ही झुबेदाच्या जीवनातील एका महत्वाच्या प्रसंगातील सगळा आनंद तिला मिळावा म्हणून प्रयत्‍न करीत होतो आणि मनातून मात्र तिच्या घरी आता काय झालं असेल या कल्पनेने बेचैन होतो. दुसऱ्या दिवशी लग्न झाले. लग्नाला जाताना पठ्ठी चक्क गौरीहार पुजून, ओटी भरून गेली. लग्नाला दोन्हीकडच्या कुटुंबातील कुणीच नव्हतं. लग्नानंतर अमरची आई घरात घेणार नाही याची कल्पना होतीच. पण तरिही ही दोघं घरी गेली. आईने दार उघडले नाही. पाच तास बंद दराबाहेर बसून राहिली. अंधार पडायला लागला तशी देव दराशी ठेवून ती दोघं हॉटेलवर रहायला गेली.

ह्या घटनेला आता अकरा वार्ष झाली. झुबेदाला एक मुलगा आहे. खूप छान करीयर आहे. अमरच्या आईने तिचा स्वीकार केला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर माहेरचा संसारही तीच सांभाळते आहे. कधीही तिला फोन केला की खूप खूष होते. म्हणते, तुम्हा सगळ्या मैत्रिणींच्या जीवावर एवढा प्रवास करू शकले. कठीण प्रसंगात खूप साथ आणि आनंद दिलात.

संगीता आणि झुबेदा, दोघीही माझ्या मैत्रिणी. दोघींनीही चाकोरीबाहेरचा प्रवास करण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडला. त्यांच्या आयुषातील या महत्वाच्या टप्प्याची मी साक्षीदार, साथीदार. नंतरचा प्रवास मात्र एकीचा क्लेशकारक तर दुसरीचा सुखकारक. एवढं मात्र नक्की, स्त्रीच्या आयुष्यात मैत्रिणीचे अनन्यसाधारण महत्व आहे. ती जागा ना पालकांची ना नवऱ्याची !

ह्या मैत्रिणींना समवयस्कच असण्याची गरज असते, असं नाही. वयातील फरक, भिन्न संस्कृत्ती, भाषांचे वेगळेपणा, भौगोलीक अंतर, अनेक वर्षात न झालेली भेट, ह्या गोष्टी फारशा महत्वाच्या नसतात. कधी कधी तर जीवनातील इतर नाती आणि मैत्रिणीचं नातं, यांची सरमिसळ होते. माझ्या चुलत बहिणीची, सुजाताची तर वेगळीच तऱ्हा. तिच्या मते कुण्या एका मैत्रिणीशी असलेलं नातं, परिपूर्ण असूच शकत नाही. जीवनाचे रंगच इतके वेगवेगळे आहेत, की त्या सर्व रंगांचं इंद्रधनुष्य एकाच सख्ख्या मैत्रिणीत सापडावं, ही अपेक्षाच मुळातून अवाजवी आहे. तिच्या मैत्रिणी अनेक विभागात वाटलेल्या. अभ्यासाच्या, कथ्थक नाचाच्या, वाचनगटच्या आणि फर्ग्युसन रस्त्यावरच्या वैशालीत चकाट्या पिटण्याच्या. त्यामुळे आभ्यासाच्या मैत्रिणींकडून कथ्थक नृत्य समजण्याची अपेक्षा नाही. तसेच वैशालीवर टवाळक्या करण्या-या सख्यांकडे सद्ध्या गाजत असलेल्या पुस्तकाचा विषय काढण्याची गरज नाही. कुणा एकीकडून माफकच अपेक्षा असल्याने ही प्रत्येकीवर जाम खूष.

मैत्रिणींचं हे भावविश्व नेहमी सुंदरच असतं, असं नाही. पुष्कळ वेळा ह्या सख्यांना आपल्या दु:खात सहभागी होणं सहज शक्य असतं, पण सुखात सहभागी होणं अवघड जातं. कधी कधी तर अशी अवस्था होते की असल्या मैत्रिणीपेक्षा वैरी परवडला. तो सरळ सरळ वार तरी करतो. हिचे वार छुपे. पाच कौतुकाच्या गोष्टींबरोबर नथीतून मारलेला एक तीर. नेमका. भिडणारा. जखम करणारा. अशा मैत्रिणीला अलिकडे toxic friend म्हणतात.

तर अशी ही, मैत्रिण-सखी-सई. तसे हे सगळे समानार्थी शब्द. पण मैत्रीची वेगवेगळी खोली ते अभिप्रेत करतात. मला स्वत:ला मात्र भावतो तो अमराठी शब्द, 'सहेली'. मैत्रीचा एक वेगळाच स्तर, प्रगल्भता यात जाणवते. त्यात स्वत:च स्वत:ची सहेली असलं तर? सात आठ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध गायिका शुभा मुद्गलचा 'स्त्री शक्ती' या विषयावर एक अल्बम आला होता, 'मनके मंजिरे'. भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर शमीम पठाण हिच्या जीवनाने प्रेरीत होऊन ही चित्रफीत तयार केली होती. छ्ळ करणा-या नव-यापासून दूर होऊन, स्वत:चं आयुष्य सावरण्यासाठी, पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करणारी ती म्हणते, "अब ना अकेली हँ मैं, अपनी 'सहेली' हँ मैं, साथी हँ अपनीही।" हे तिचं स्वत:शी असलेलं नातं. जगण्याची सकारात्मक दृष्टी देणारं, जीवनास सामोरं जाण्याची उर्जा देणारं. कदाचित काहीशी अध्यात्मिक उंची गाठणारं !

( या लेखातील प्रसंग सत्य असल्याने व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत. )

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS