RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

एक स्पर्श...


एक स्पर्श..... जीवनाचा... चिमुकला, लुसलुशीत... कुशीत वाढणारा.
एक स्पर्श..... सुरकुतल्या, थरथरत्या हातांचा... उबदार क्षमेचा.
एक स्पर्श..... कोऱ्या करकरीत कागदावरील छापील अक्षरांचा... उत्सुकता वाढवणारा.
एक स्पर्श..... वाकून केलेला, सश्रद्ध, आशादायी... त्या निराकाराच्या मूर्त रूपास.
एक स्पर्श..... नाळ तुटण्याआधीपासून ओळखीचा... मायेने ओथंबलेला.
एक स्पर्श..... मूल्य असलेल्या कागदांचा. भौतीक अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येणारा.
एक स्पर्श..... गर्भ रेशमी पदराचा... खानदानी, शालीन... आदराने मान आपसूक झुकवणारा.
एक स्पर्श..... कातर संधीप्रकाशातील गूढ सावल्यांचा... काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भीतीचा.
एक स्पर्श..... गर्दीतला... असभ्य, किळसवाणा, अपवित्र.
एक स्पर्श..... निखळ, सुंदर मैत्रीचा... स्त्री-पुरुष भेदाभेद निर्थक ठरवणारा.
एक स्पर्श..... चमकत्या, झळाळत्या धातुचा... मोहमयी.
एक स्पर्श..... लख्ख... मनातला अंध:कार नाहीसा करणाऱ्या ज्ञानाचा.
एक स्पर्श..... काळ्याभोर सृजनतेचा... आकाशाला गवसणी घालू पाहताना पायाखालील भक्कम आधाराचा.
एक स्पर्श..... चांदण्याचा... दिल्या-घेतल्या वचनांचा, जन्म-सोबतीचा.
एक स्पर्श... वरवर कठोर... शिस्त, धाक असल्या शब्दांच्या आडून दिलेल्या अनुभवी सल्ल्यांचा.
एक स्पर्श..... हरवलेला... आठवांच्या तुडुंबात बुडून धूसर होत गेलेला.
एक स्पर्श..... थंड... निर्वाणीचा. पारलौकिकाच्या दिशेने घेऊन जाणारा.


Related posts :   वाफ

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

’देव’ ने दिलेला ’आनंद’


मनगटापासून खाली लटकलेले हात, किंचित तिरकी-अधांतरी चाल, कमी उंची, केसांचा फुगा, किशोरने त्याच्यासाठी लावलेला खास आवाज, Gregory Peck ची तद्दन copy, पण आविर्भाव असा की तोच ह्याची नक्कल करत Hollywood मध्ये वावरतोय. सगळं एकदम... filmy... very filmy.
कोण?... ते नाव सांगायची गरजच नाही.

काही दिवसांपूर्वी मोहनचा फोन आला. "देवजींबरोबर आलोय. त्यांना अलीकडे सोबतीची गरज असते. मग मी जातो त्यांच्या बरोबर, म्हणतील तिथं, सगळं बाजुला ठेवून. उद्या दुपारी थोडा रिकामा वेळ आहे. येतेस ? कॉफी पिऊ."

मोहन खूप जुना मित्र. थोड्या गप्पा झाल्यावर अचानक उठून म्हणाला, "चल. देवजींना भेटून येऊ. आवडेल त्यांना... म्हणजे ते म्हणाले आहेत तसं."

दुबईतल्या पंचताराकीत हॉटेलच्या त्या खोलीत देव‍ आनंदजी बसले होते. नव्वदीकडे झुकलेलं वय, वयाने आक्रसलेली देहयष्टी, हातांना किंचित कंप... नेमकं काय करावं ? नमस्कार करावा की handshake या संभ्रमात असताना त्यांनीच माझा हात हातात घेऊन बसवलं. तो तसाच ठेऊन ते काहीबाही विचारत होते. मी काय उत्तरं दिली आठवत नाही. कारण flashback मध्ये मला दिसत होता तो ऐन उमेदीतला देव‍ आनंद...

मधुबाला समोर ’देखी सबकी यारी’ म्हणून फुरंगटून बसणारा... साधनाला ’तो किस तरह निभाओगी’ म्हणून विचारणारा... नूतनला काचेच्या ग्लासमध्ये पहात ’इक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने’ म्हणून बजावून सांगणारा, वहिदाच्या लक्ष न देण्यामुळे हताश होऊन ’दिन ढल जाये पर रात न जाये’ म्हणणारा आणि नंदाच्या ’लिखा है तेरी आखों में किसका अफसाना?" ला उत्तर देताना खट्याळपणे आपली ’रोजाना’ आदत सांगणारा...

वर्तमानात आल्यावर मात्र समोर दिसत होतं ते फक्त एक वयोवृद्ध व्यक्तीमत्व, अतिशय प्रेमळ नजर, सुहृद स्पर्ष, बराचसा एकटेपणा आणि थकलेलं शरीर.
देव‍ आनंद हात हातात धरून बसला, म्हणून तो हात आठ दिवस न धुणे... असलं काही करण्याचं ना त्यांचं वय ना माझं !

पूर्णवेळ त्यांच्यासमोर काहीच बोलू न शकलेली मी, निघताना मात्र खाली वाकले आणि त्यांना एवढंच म्हंटलं, "देव जी, आपका और हमारा रिश्ता तो काफी पुराना है । और... जो खत्म हो इसी जगह... ये ऐसा सिलसिला नहीं ।" त्यावर ते त्यांची typical मान हलवत हलकंसं हसले.

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

वाफ


समोरच्या पातेल्यात भाजी शिजत होती. तिचं ते खदखदणं तिच्या भोवती आणखीनच वाफ निर्माण करत होतं. त्या गच्च साठलेल्या वाफेचा दाब वरचं झाकण मुकाट सहन करण्याच्या प्रयत्नात... पण तो ताण असह्य झाला की ते बापडं किंचित उडी मारायचं आणि आतल्या थोड्याशा वाफेला बाहेर जाऊ द्यायचं. ना त्या वाफेला धग जास्त ना जोर. नुसती मधुनच 'बुडुक' करून बाहेर पडणार. कुणाला दुखावण्याची क्षमताच तिच्यात नव्हतीच.

हे सगळं कसं घरातल्या एखाद्या गृहीत धरलेल्या स्त्री सारखं... तिचा वैताग, अस्वथता ती शक्यतो आतल्या आतच ठेवणार. बाहेर पडेल तेव्हा सुद्धा 'minor irritation' च्या पलिकडे त्याचं कुणालाच महत्व नाही.

शेजारीच प्रेशर कुकर. त्यातल्या वाफेचं वागणं पण त्याच्याच सारखं भारदस्त. उगीच अधे-मधे बाहेर पडणार नाही. आतल्या आत शांतपणे जमत राहील. पण जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मात्र जोरात.. आवाज करत. सगळं घर दणाणून सोडत. तरीही केव्हा थांबायचं हे ह्या वाफेला पक्कं माहिती. हिचा safety valve शक्यतो उडत नाही. जशी कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती... कुठे, केव्हा, किती आवाज चढवायचा यावर संपूर्ण ताबा.

तिस-या शेगडीवरच्या तव्यावर पोळी. हिच्या वाफेला फारसा जोर नाही. पण कुठुन, कधी बाहेर पडेल ते सांगता येत नाही. चटका लावून जाणं हिला चांगलं जमतं. मग हात पाण्याखाली गेला तरी झालेल्या जखमेची हुळहुळती जाणीव बराच वेळ रहाणार. ही मात्र करून सवरून नामानिराळी. जशी एखादी चंट, तैयार, सगळ्यांना पुरून उरणारी ठमाकी. या unpredicatable, hurting nature मुळे सगळे हिच्याशी जपून वागणार.

प्रत्येक वाफेची बाहेर पडण्याची पद्धत वेगळी, परिणाम वेगळा. पण बाहेर पडणं मात्र आवश्यक.

माणसाचं खदखदणारं मन... तिथं साचणारी वाफ... तिचाही निचरा होणं नितांत गरजेचं. नाही तर काही काळाने depression चा स्फोट किंवा करपलेलं मन !!

पण त्या वाफेची बाहेर पडण्याची पद्धत, हा मात्र ज्याचा त्याचा choice.


Related posts :   एक स्पर्श

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS

बाबुराव


त्याचं ते आगंतुक येणं कोणालाच आवडलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यादेखत तो सुळकन्‌ घरात घुसला आणि कुठेतरी दडी मारून बसला. मूषक-पुत्रच तो... त्याला लपायला कितिकसा वेळ आणि जागा लागणार !

त्याच्या येण्याने रंगलेल्या गप्पांवर एकदम विरजण पडलं. फटाफट बाकीच्या खोल्यांची दारं बंद झाली. खालच्या फटींना सतरंज्या, चादरी लावण्यात आल्या. घरातले आई-बाबा काठी, कुंचा असली आयुधं घेऊन लढाईच्या पवित्र्यात उभी राहिली. छोट्या दोघांना गप्प बसण्याचा, हालचाल न करण्याचा सज्जड दम भरण्यात आला.

तो अतिशय चपळ आणि उत्साही होता. शेवटी पोरंच ते... कोणाचं का असेना ! त्याच्यासाठी सुरुवातीला हा लपंडावाचा खेळच होता... मग कुठे तो दमायला लागल्यावर त्याला हा जीवन-मरणाचा खेळ असल्याचं लक्षात आलं.

या युद्ध सदृश्य परिस्थितीत साधारणत: दोन तास गेले असतील. तेवढ्यात त्याने कुठली तरी एक फट मिळवली आणि आजोबांच्या खोलीत जीवाच्या आकांताने पळ काढला. सगळे हताश होऊन बसले.

तेवढ्यात कुणीतरी म्हंटलं, "बाबुराव आता अजोबांबरोबर वामकुक्षी घेतील."
"कोण बाबुराव ?"
"तेच ते. उंदराचं पिल्लू. रहाणारच आहे काही काळ आपल्याबरोबर तर त्याला एक छानसं नावच देऊ की."

त्या एका वाक्याने वातावरणातला ताण नाहिसाच झाला. मग काय, बाबुरावांच्या हालचालींचं live reporting कुणी न कुणी तरी द्यायला सुरुवात केली.
"बाबुरावांनी मुक्काम सध्या सोफ्याखाली हलवला आहे."
"कपाटाखालून बाबुरावांचे डोळे काय पण चमकतात !"
"बाबुरावांचा रंग काय मस्त shimmering black आहे. आई, same ह्याच colour चा dress हवाय मला."
"बाबांनी बाबुरावांची सुंदर कोंडी केली होती पण बाबांच्या हातावर तुरी देण्यात बाबुराव यशस्वी झाले आहेत."

दोन दिवसांनी घरातल्या छोटूचा फोन आला. "sad news आहे. बाबुराव expired. आम्हाला खरं तर त्यांना मारायचं नव्हतं, नुसतं घराबाहेर घालवायचं होतं. पण फटका जरा जोरातच लागला. मी आणि ताईने खाली एक खड्डा खणून त्यांना burial दिलं. वरती फुलं पण ठेवली. आज बाबुराव नाहीत तर घर कसं शांत शांत वाटतंय्‌."

 • Digg
 • Del.icio.us
 • StumbleUpon
 • Reddit
 • RSS