जरी निमित्त 'आठवणीतल्या गाणी'वर नुकत्याच समाविष्ट केलेल्या ३२ गाण्याचं आहे...
तरी असे विचार आणि असा आचार माझ्यासाठी नित्यनेमाचा..........
(संदर्भ- आठवणीतली गाणी / नवीन भर / १३ डिसें. २०१८)
• विदुषी प्रभाताई अत्रे यांनी संगीत दिलेले आणि गायलेले 'दारी उभी अशी मी..' हे गझलेच्या अंगाने जाणारे पद आहे. तब्बल १० मिनिटांची एक दर्दभरी शिकायत प्रभाताई आपल्या समोर मांडतात. ऐकताना वाटलं, हे आचंबित करणारे शब्द कोणाचे असावेत?...
सुरेश भटांची झलक दिसते आहे खरी. त्यांच्या ’मी एकटीच माझी असते कधी कधी..’च्या वळणानं जाणारी रचना.., पण.. नाही, ते नसावेत. भट गाठतात त्या भावनिक उत्कटतेच्या हे थोडं खाली आहे....
मग विंदा? त्यांनी पण एका कवितेत म्हंटलंय, 'स्वप्नास सत्य असते सामील जाहलेले.'.. नक्की कळत नाही.
अतींद्र सर्वाडिकर या प्रभाताईंच्या शिष्याकडे धाव घेतली आणि कळलं गीताचे शब्द अशोकजी परांजपे यांचे आहेत. अशोकजी परांजपे तसे दुर्लक्षितच राहिलेले!..........
• पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला श्री संत नामदेवांचा अभंग 'सगुण संपन्न पंढरीच्या राया’. शौनक अभिषेकींचा सहस्वर. अभंग भिन्न षड्ज रागात आहे. हा राग म्हंटला की उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ां साहेब यांच्या 'याद पिया की आए..' या ठुमरीच्या आठवणीची कळ तर उरी येणारच...............
• गदिमांचं अगदी साधं आणि निरागस गाणं- 'आवडला मज मनापसुनी गडी तो घोड्यावरचा..' यात एक ओळ आहे- 'बाजाराला जाता जमला शिनवे त्याचा आमचा..'
आता हे 'शिनवे' म्हणजे काय? जवळचे सगळे मराठी, संस्कृत शब्दकोश धुंडाळले. इंटरनेट खंगाळलं. व्यर्थ.
मग सुमित्र माडगूळकरला हाक. त्यानेही ताबडतोब योग्य व्यक्तींमार्फत भाषातज्ञ डॉ. सयाजीराव मोकाशी यांच्यापर्यंत पोचावं आणि काही मिनिटातच 'शिनं' या माणदेशी शब्दाचा संपूर्ण अर्थ उलगडणारं सयाजीरावांच्या आवाजातलं फोनवरील रेकॉर्डींग whatsapp करावं.
आपणही गदिमांनी वापरलेल्या हटके शब्दांच्या सुयोग्य वापराने स्तिमित होऊन जावं............
• 'भातुकली उधळली अचानक..' सुमनताई कल्याणपूर यांच्या आवाजातलं हे गाणं... त्यांनी पार्श्वगायन केलेल्या त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमातलं. चित्रपट 'दिसतं तसं नसतं'. साल १९५६. बाईंच्या गाण्यातला दर्द खानदानी आहे. संयत आहे तरी खोल आहे. असाच दर्द त्यांनी 'बोलकी बाहुली' मधल्या 'आठवे अजुनी यमुनातीर..' मध्ये दाखवला आहे. या गाण्यातली 'सौख्य छळे मज......' ही ओळ लक्ष देऊन ऐकावी. गाण्यातून अभिनय केलाय सुमनताईंनी...............
• 'हे राष्ट्ररूपिणी गंगे! घेईं नमस्कार माझा.' या आनंदराव टेकाडेंच्या कवितेच्या शोधात मी गेली वर्षभर होते. दोन महिन्यांपूर्वी पुण्यात असताना, पुणे मराठी ग्रंथालयाला फोन केला. सांगितलं, माझ्याकडच्या आनंदरावांच्या 'आनंद गीते'च्या पहिल्या भागात ही कविता नाहीये. तर तुमच्याकडे भाग २, ३, ४ आहेत का? मला संदर्भासाठी चाळता येतील का? नारायण पेठ, लोखंडी तालीम या त्यांच्या पत्त्यावर पोचायच्या आधीच तिथल्या वाचन विभागात ही पुस्तके तयार होती. पान-पान पिवळं-जीर्ण झालेल्या त्या पुस्तकांतील भाग ३ मध्ये ही कविता मिळाली. ग्रंथालयाच्या परवानगीने त्या पानाचा फोटो काढला. वर त्यांनी हेही सांगितले, अशा संदर्भांकरिता कधीही भेट द्या.
आकाशवाणीवरून स्फूर्तीगीतांच्या कार्यक्रमात ही कविता अनेक वेळा सादर होते........
• 'प्रियकर:' हे संस्कृत गाणं, दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'YZ' या मराठी सिनेमातलं आहे. केतकी माटेगावकरच्या स्पष्ट उच्चारांनी आणि नादमधूर गायनाने लक्ष वेधून घेतलेलं. पण हे संस्कृत श्लोक कुठून घेतले आहेत.... ते जसेच्या तसे घेतले गेलेत की त्यात काही बदल केलेत?..... शोधयात्रा संपल्यावर वाटलं, आपल्या जे समजलं आहे ते समस्तांस कळवण्याची तातडी करावी, हे बरं.
जसं, 'तोच चंद्रमा नभात..' हे शान्ताबाईंनी एका संस्कृत श्लोकावरून घेतलं आहे, असं सगळे म्हणतात. पण आपण शीला भट्टारिका यांचा तो श्लोक शोधून काढून 'आठवणीतली गाणी'वर उपलब्ध करून दिलाय, तसं......
• तीन महिन्यांपूर्वीचं बाबांचं जीवघेणं आजारपण... खरोखरीच त्यांचा जीव घेऊन गेलं. ICU च्या बाहेर १२-१३ दिवस बसून राहणे. अनिश्चितता. कासावीस. पण हातात केशवराव भोळ्यांचं त्यांचा सांगीतिक दृष्टीकोन विषद करणारं पुस्तक. का कुणास ठाऊक, त्याचा पण कोण आधार वाटला... त्यातूनच 'आठवणीतली गाणी' करता चार-पाच संदर्भ लेखही मिळाले.
म्हणता म्हणता संकेतस्थळावरील संदर्भ लेखांची संख्या शंभरच्या वर गेली की !....
• गेल्या महिन्यातली गोष्ट. फेसबूकने स्वत:च्या वागण्यात बरेच बदल केलेत. अरे देवा!
हे फेसबुकचं नेहमीचंच तरी आपल्याला आता धावपळ करून त्याचे वेबसाईटवर झालेले परिणाम निस्तारावे लागणार! वेबसाईटच्या प्रोग्रॅम कोड मध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी इंटरनेटवर खूप सगळं संशोधन करावे लागेल. हं....!
त्यात या महिन्यात आपणच आपल्याशी केलेला एक व्यक्तीगत पातळीवरील वायदा. #Dubai30x30 fitness challenge, #DistanceRunning च्या अंतर्गत एका महिन्यात कमीत कमी शंभर कि.मी. पळण्याचे स्वीकारलेले आव्हान.... एक ती धावपळ आणि एक ही पळापळ.... दोन्हींनी तसा वेगवेगळ्या अर्थाने घाम काढला... पण पूर्ततेनंतरचे समाधान काही वेगळे.
सुधीर मोघे नेहमी म्हणायचे, "प्रश्न पडणं थांबवू नकोस. ते सतत पडावेत. उत्तरं कधी लगेच सापडतील तर कधी वेळ लागेल."
या अशा शोधयात्रांमध्ये मला पंढरीची वारी दिसते.
.. आणि अशी खोलात जायला लागले म्हणून अनेक गीतरत्नं मला सापडली आहेत,... सापडतील.
कबीर म्हणतात तसं,
जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ।