( 'ऐका गणेशा तुमची कहाणी' या पारंपारिक कहाण्यांच्या चालीवर. )
ऐका मिडिया तुमची कहाणी.
अनेक भाषा, अगणित वाद.
वाढती प्रजा, त्यांच्या वाढत्या गरजा.
अनेक पक्ष, असंख्य नेते, त्यांचे अमर्याद घोटाळे.
न्यूज चॅनेल्सची मांदियाळी.
मनींचे चॅनल मनीं वसावे.
हा वसा कुणी घ्यावा ? हा वसा कुणीही घ्यावा.
एक छानसे चॅनल काढावे. ते चोवीस तास चालवावे. त्याला न्यूज चॅनेल असे नाव द्यावे.
खूपच आविर्भावाने बोलू शकणारी चार-दोन डोकी घ्यावी.
त्यांना 'news anchor' असे खासे नाव द्यावे.
तोंडी 'केंद्राने राज्याच्या तोंडाला पानं पुसली' अशी भडक भाषा द्यावी.
त्यांनी काय करावे?
दिवसभरातील एक छोटा-मोठा प्रसंग घ्यावा.
कॅमेरा आवडणारे आणि कॅमेऱ्याला आवडणारे तेच-तेच चेहरे घ्यावे.
त्यांच्यात झुंज लावून द्यावी. त्यास 'विद्वत्तापूर्ण चर्चा' असे नाव द्यावे. "अमुक असं म्हणतात त्यावर तमुक तुमचे काय म्हणणे आहे?" असे अधूनमधून बरळावे. अशा प्रकारे आपल्याकडे नसलेले संशोधन कौशल्य शिताफीने झाकावे.
त्यावर कॅमेराच्या चित्र-विचित्र angles चा आणि loop मध्ये टाकलेल्या स्वल्प चित्रफितींचा overlay द्यावा.
हा वसा कधी घ्यावा? दिसा उजेडी आरंभ करावा. अंधार रात्री संपूर्णास न्यावा.
संपूर्णास काय करावे? जाहिरातींचे उत्पन्न मोजावे.
भ्रष्टाचार, दहशतवाद, राजकीय नेते - त्यांची वक्तव्ये, चित्रपट अभिनेते - त्यांची अविद्वत्तापूर्ण भाषणे, यातील कुठल्या विषयाचा TRP जास्त याचा हिशेब मांडावा.
समाजाचा अत्यल्प विचार करावा.
अल्प दान, महापुण्य.
उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये.
ऐसा मिडिया मनीं ध्याइजे, money पाविजे, चिंतिले लाभिजे, कार्यसिध्दि करिजे.
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.