आणि वसंत पवार.
आणि आता गदिमाही.
सुधीरजींशी ओळख झाली तेव्हाच केव्हातरी त्यांनी मला एका गाण्याच्या पहिल्या काही ओळी ऐकवल्या होत्या. गाणं खूप जुनं होतं. 'मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका…'
मी ते पहिल्यांदाच ऐकत होते. ते म्हणाले, " १९५३ सालच्या 'अबोली' चित्रपटात आहे. संगीतकार आहेत वसंत पवार. लक्ष देऊन ऐक. ह्या गाण्याची चाल हुबेहूब १९६० सालच्या 'अवघाचि संसार'मधील 'रूपास भाळलो मी…'ची आहे. दोन्ही चित्रपटांचे संगीत वसंत पवारांचेच असल्याने बाकी प्रश्न उद्भवत नाहीत. पण का एका संगीतकाराला आपलीच चाल अशी काही वर्षांनी परत वापरावी असं वाटलं असेल ?"
मला त्यांच्या कवितांविषयीचे त्यांचे मत माहीत होते. त्यांना वाटे, एका उर्मीतून जन्माला आलेली कविता अथवा गीतरचना, तशीच्या तशीच असू द्यावी. त्यात नंतर काही बदल करू नयेत. तसे बदल करायला त्यांचा विरोध असायचा. अगदी एखाद्या संगीतकाराने काही कारणाने त्यांना विनंती केली तरीही. एकदा निर्मिती झाली की तिला तिच्या नशिबावर सोडून कवीने पुढे जावं, असं त्यांना वाटे. त्यामुळे हे चाल परत वापरण्याचे त्यांना खूपच आश्चर्य वाटत होते.
मी म्हंटलं, "पवारांना, या चालीला म्हणावा तितका न्याय मिळाला नाही, असं वाटलं असेल. आणि 'रूपास भाळलो मी… 'चे रसिकांच्या मनातील स्थान पाहता, ही शक्यता अधिक वाटते."
"असेल कदाचित.", सुधीरजी म्हणाले.
या संभाषणामुळे "मी वाजवीन मुरली…'चे कुतुहल मात्र कायम जागृत राहिलं. पुढे त्याची संपूर्ण ध्वनीफित मिळाली आणि ते 'आठवणीतली गाणी'वर पोचलं.
गेल्या आठवड्यात 'अबोली' चित्रपटातील गीतांची चित्रफित यूट्यूबर बघायला मिळाली. त्याच चित्रपटात अजून एक गाणं आहे. 'रिमझिम करी बरसात, मेघा" हे पं. सुरेश हळदणकर यांनी गायले आहे. त्यांचे सूर जणू या गाण्यात नुसते रिमझिम बरसत नाहीत तर कोसळून आपल्याला आनंदाने चिंब भिजवतात…. पण पडद्यावर चित्रपटाचा नायक मात्र बाथ टबमध्ये बसून शॉवरच्या धारांकडे बघून हे गाणं गाताना दिसतो. थोडक्यात गीताचे शब्द आणि चित्रिकरणाचा फारसा ताळमेळ नाही.
वसंत पवारांचे या चित्रपटाचं संगीत दुर्लक्षित राहिलं, असं परत एकदा वाटून गेलं.
यानिमित्ताने गेले काही वर्ष जितक्या वेळा 'मी वाजवीन…' ऐकलं, तितक्या वेळा या गीताच्या शेवटच्या कडव्यातील शब्दांनी माझं लक्ष न चुकता वेधून घेतलं. शब्द गदिमांचे आहेत.
गदिमा हे गीतकार आणि कवी यातली सीमारेषा पार मिटवून टाकतात. त्यांच्या गीतरचनांमधील काव्य, यावर पुष्कळ काही लिहिता येईल. तसंच त्यांनी लिहिलेलं एखादं चित्रपट गीत 'संतवाणी'ची उंची गाठतं.
राधाकृष्णाचे प्रेम, हा मध्यवर्ती विषय असलेले हे गीत, त्याच्या शेवटच्या कडव्यात वेगळं वळण घेते. हा चित्रपट सामाजिक असल्याने गीतातील 'राधा' आणि 'कृष्ण' ही अर्थातच रूपकं आहेत.
कृष्ण राधेला म्हणतो,
मी वाजवीन मुरली वृक्षी बसून एका
होऊनिया मुकी तू वाळूत काढ रेखा
या गीतरचनेत कृष्ण, त्यांच्या दोघांच्या प्रेमाला 'माया' असं म्हणतो.
खरं तर दोघं कालिंदीच्या तीरी आहेत. कदंब वृक्ष आहे. वाळूत काढलेलल्या रेघा आहे. ती दोघंच आहेत. तीसरं कुणीही नाही. तरी तो राधेला म्हणतो, 'माया' तुझी नि माझी…
कालिंदीचा किनारा, ते शांत संथ पाणी
राधामुकुंद दोघे, तिसरे न तेथ कोणी
माया तुझी नि माझी सांगू नकोस लोकां !
पुढे जाऊन कृष्ण राधेला म्हणतो, जरी आपण आत्ता प्रेमिक असलो तरी-
मायेत याच दोघे, ये मायलेक होऊ
प्रीतीत याच राधे, होऊ बहीणभाऊ
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का?
हे जे आपले प्रेम आहे राधे,…
आणि प्रेम म्हणजे जर एकमेकांत जीव अडकणे आहे….
तर जन्मांतरीच्या फेर्यात आपण कुठल्याही नात्याने समोर आलो, तरी ते तसंच राहील.
कधी माय-लेक असू, कधी बहिण-भाऊ, कधी प्रियकर-प्रेयसी…
कधी सखा-सखी तर कधी गुरू-शिष्य किंवा अजून काहीही.
राधा-कृष्ण यांच्या प्रचलित प्रेमसंबंधाच्या कल्पनेला, फक्त तीन ओळीत, पार उधळून लावत गदिमांनी त्याला खोल आणि व्यापक संदर्भ दिला आहे.
माया तीच आणि तेवढीच…. नात्याचं रूप काहीही असो !
प्रेमास बंध नाही, ही बंधने तरी का ?