Powered by Blogger.

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.
RSS

मित्र


"माझं नं एकनाथांसारखं झालं आहे."
"काय झालं?
"आहेत माझ्या आयुष्यात काही विंचू. प्रत्येक interaction ला चावतातच. पण मी संत नसल्याने त्रास होतो. "
"बरी आहेस नं आई ?"
"का रे, काही चुकतं आहे का माझं ?"
"हो. खूप. आता तरी शीक ग..."

माझा पडलेला चेहरा पाहून त्याने मला जवळच्या खुर्चीत बसवलं. माझा हात पकडला.
"लक्षात घे, there are some lost causes in this world."
"पण आपण प्रयत्न तर करतच राहिलं पाहिजे नं. ते थांबवून कसं चालणार? म्हणतात नं, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे."
"कसलं त्रेता युगातलं, cliché वाक्य हे !!
अशा वेळेस नं आई, तू तुझा सगळा scientific temper गुंडाळूनच ठेवतेस.
विचार कर. वाळूच ती... silicon dioxide... SiO2... त्यात कुठले आले hydrocarbons? कितीही काहीही केलं तरी तेल निघणारंच कसं?"
वाळुतून तेल हे lost cause - नाही का?"
"हं...."
"त्यापेक्षा एका point नंतर 'not my kid, not my problem’ असं म्हणून बाजुला व्हायला शीक.
एकदा ठरवलंस नं की जमेलच तुला. बघ थोडी attitude adjustment करून."

माझ्या चेहऱ्यावर येऊ लागलेला confidence पाहून त्याने समाधानाने back-pack उचलली आणि त्याच्या विमानाच्या दिशेने निघाला.
माझ्या पासून अर्धा जग दूर... त्याची स्वत:ची रोजची लढाई लढायला... ताठ मानेने.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

एक स्पर्श...


एक स्पर्श.. जीवनाचा... चिमुकला, लुसलुशीत... कुशीत वाढणारा.
एक स्पर्श.. सुरकुतल्या, थरथरत्या हातांचा... उबदार क्षमेचा.
एक स्पर्श.. कोऱ्या करकरीत कागदावरील छापील अक्षरांचा... उत्सुकता वाढवणारा.
एक स्पर्श.. वाकून केलेला, सश्रद्ध, आशादायी... त्या निराकाराच्या मूर्त रूपास.
एक स्पर्श.. नाळ तुटण्याआधीपासून ओळखीचा... मायेने ओथंबलेला.
एक स्पर्श.. मूल्य असलेल्या कागदांचा. भौतीक अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येणारा.
एक स्पर्श.. गर्भ रेशमी पदराचा... खानदानी, शालीन... आदराने मान आपसूक झुकवणारा.
एक स्पर्श.. कातर संधीप्रकाशातील गूढ सावल्यांचा... काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भीतीचा.
एक स्पर्श.. गर्दीतला... असभ्य, किळसवाणा, अपवित्र.
एक स्पर्श.. निखळ, सुंदर मैत्रीचा... स्‍त्री-पुरुष भेदाभेद निर्थक ठरवणारा.
एक स्पर्श.. चमकत्या, झळाळत्या धातुचा... मोहमयी.
एक स्पर्श.. लख्ख... मनातला अंध:कार नाहीसा करणाऱ्या ज्ञानाचा.
एक स्पर्श.. काळ्याभोर सृजनतेचा. आकाशाला गवसणी घालू पाहताना पायाखालील भक्कम आधाराचा.
एक स्पर्श.. चांदण्याचा... दिल्या-घेतल्या वचनांचा, जन्मसोबतीचा.
एक स्पर्श.. वरवर कठोर... शिस्त, धाक असल्या शब्दांच्या आडून दिलेल्या अनुभवी सल्ल्यांचा.
एक स्पर्श.. हरवलेला... आठवांच्या तुडुंबात बुडून धूसर होत गेलेला.
एक स्पर्श.. थंड... निर्वाणीचा. पारलौकिकाच्या दिशेने घेऊन जाणारा.


Related posts :   वाफ

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

’देव’ ने दिलेला ’आनंद’


मनगटापासून खाली लटकलेले हात, किंचित तिरकी-अधांतरी चाल, कमी उंची, केसांचा फुगा, किशोरने त्याच्यासाठी लावलेला खास आवाज, Gregory Peck ची तद्दन copy, पण आविर्भाव असा की तोच ह्याची नक्कल करत Hollywood मध्ये वावरतोय. सगळं एकदम... filmy... very filmy.
कोण?... ते नाव सांगायची गरजच नाही.

काही दिवसांपूर्वी मोहनचा फोन आला. "देवजींबरोबर आलोय. त्यांना अलीकडे सोबतीची गरज असते. मग मी जातो त्यांच्या बरोबर, म्हणतील तिथं, सगळं बाजुला ठेवून. उद्या दुपारी थोडा रिकामा वेळ आहे. येतेस ? कॉफी पिऊ."

मोहन खूप जुना मित्र. थोड्या गप्पा झाल्यावर अचानक उठून म्हणाला, "चल. देवजींना भेटून येऊ. आवडेल त्यांना... म्हणजे ते म्हणाले आहेत तसं."

दुबईतल्या पंचताराकीत हॉटेलच्या त्या खोलीत देव‍ आनंदजी बसले होते. नव्वदीकडे झुकलेलं वय, वयाने आक्रसलेली देहयष्टी, हातांना किंचित कंप... नेमकं काय करावं ? नमस्कार करावा की handshake या संभ्रमात असताना त्यांनीच माझा हात हातात घेऊन बसवलं. तो तसाच ठेऊन ते काहीबाही विचारत होते. मी काय उत्तरं दिली आठवत नाही. कारण flashback मध्ये मला दिसत होता तो ऐन उमेदीतला देव‍ आनंद...

मधुबाला समोर ’देखी सबकी यारी’ म्हणून फुरंगटून बसणारा... साधनाला ’तो किस तरह निभाओगी’ म्हणून विचारणारा... नूतनला काचेच्या ग्लासमध्ये पहात ’इक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने’ म्हणून बजावून सांगणारा, वहिदाच्या लक्ष न देण्यामुळे हताश होऊन ’दिन ढल जाये पर रात न जाये’ म्हणणारा आणि नंदाच्या ’लिखा है तेरी आखों में किसका अफसाना?" ला उत्तर देताना खट्याळपणे आपली ’रोजाना’ आदत सांगणारा...

वर्तमानात आल्यावर मात्र समोर दिसत होतं ते फक्त एक वयोवृद्ध व्यक्तीमत्व, अतिशय प्रेमळ नजर, सुहृद स्पर्ष, बराचसा एकटेपणा आणि थकलेलं शरीर.
देव‍ आनंद हात हातात धरून बसला, म्हणून तो हात आठ दिवस न धुणे... असलं काही करण्याचं ना त्यांचं वय ना माझं !

पूर्णवेळ त्यांच्यासमोर काहीच बोलू न शकलेली मी, निघताना मात्र खाली वाकले आणि त्यांना एवढंच म्हंटलं, "देव जी, आपका और हमारा रिश्ता तो काफी पुराना है । और... जो खत्म हो इसी जगह... ये ऐसा सिलसिला नहीं ।" त्यावर ते त्यांची typical मान हलवत हलकंसं हसले.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

वाफ


समोरच्या पातेल्यात भाजी शिजत होती. तिचं ते खदखदणं तिच्या भोवती आणखीनच वाफ निर्माण करत होतं. त्या गच्च साठलेल्या वाफेचा दाब वरचं झाकण मुकाट सहन करण्याच्या प्रयत्नात... पण तो ताण असह्य झाला की ते बापडं किंचित उडी मारायचं आणि आतल्या थोड्याशा वाफेला बाहेर जाऊ द्यायचं. ना त्या वाफेला धग जास्त ना जोर. नुसती मधुनच 'बुडुक' करून बाहेर पडणार. कुणाला दुखावण्याची क्षमताच तिच्यात नव्हतीच.
..... हे सगळं कसं घरातल्या एखाद्या गृहीत धरलेल्या स्त्री सारखं. तिचा वैताग, अस्वस्थता ती शक्यतो आतल्याआतच ठेवणार. बाहेर पडेल तेव्हासुद्धा 'minor irritation' च्या पलीकडे त्याचं कुणालाच महत्त्व नाही.

शेजारीच प्रेशर कुकर. त्यातल्या वाफेचं वागणं पण त्याच्याच सारखं भारदस्त. उगीच अधेमधे बाहेर पडणार नाही. आतल्या आत शांतपणे जमत राहील. पण जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मात्र जोरात. आवाज करत. सगळं घर दणाणून सोडत. तरीही केव्हा थांबायचं हे ह्या वाफेला पक्कं माहिती. हिचा safety valve शक्यतो उडत नाही.
..... जशी कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती. कुठे, केव्हा, किती आवाज चढवायचा यावर संपूर्ण ताबा.

तिस-या शेगडीवरच्या तव्यावर पोळी. हिच्या वाफेला फारसा जोर नाही. पण कुठुन, कधी बाहेर पडेल ते सांगता येत नाही. चटका लावून जाणं हिला चांगलं जमतं. मग हात पाण्याखाली गेला तरी झालेल्या जखमेची हुळहुळती जाणीव बराच वेळ रहाणार. ही मात्र करूनसवरून नामानिराळी.
..... जशी एखादी चंट, तैयार, सगळ्यांना पुरून उरणारी ठमाकी. या unpredictable, hurting nature मुळे सगळे हिच्याशी जपून वागणार.

प्रत्येक वाफेची बाहेर पडण्याची पद्धत वेगळी, परिणाम वेगळा. पण बाहेर पडणं मात्र आवश्यक.

माणसाचं खदखदणारं मन. तिथं साचणारी वाफ.. तिचाही निचरा होणं नितांत गरजेचं. नाही तर काही काळाने depression चा स्फोट किंवा करपलेलं मन !!
पण त्या वाफेची बाहेर पडण्याची पद्धत, हा मात्र ज्याचा त्याचा choice.


Related posts :   एक स्पर्श

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

बाबुराव


त्याचं ते आगंतुक येणं कोणालाच आवडलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यादेखत तो सुळकन्‌ घरात घुसला आणि कुठेतरी दडी मारून बसला. मूषक-पुत्रच तो... त्याला लपायला कितिकसा वेळ आणि जागा लागणार !

त्याच्या येण्याने रंगलेल्या गप्पांवर एकदम विरजण पडलं. फटाफट बाकीच्या खोल्यांची दारं बंद झाली. खालच्या फटींना सतरंज्या, चादरी लावण्यात आल्या. घरातले आई-बाबा काठी, कुंचा असली आयुधं घेऊन लढाईच्या पवित्र्यात उभी राहिली. छोट्या दोघांना गप्प बसण्याचा, हालचाल न करण्याचा सज्जड दम भरण्यात आला.

तो अतिशय चपळ आणि उत्साही होता. शेवटी पोरंच ते... कोणाचं का असेना ! त्याच्यासाठी सुरुवातीला हा लपंडावाचा खेळच होता... मग कुठे तो दमायला लागल्यावर त्याला हा जीवन-मरणाचा खेळ असल्याचं लक्षात आलं.

या युद्ध सदृश्य परिस्थितीत साधारणत: दोन तास गेले असतील. तेवढ्यात त्याने कुठली तरी एक फट मिळवली आणि आजोबांच्या खोलीत जीवाच्या आकांताने पळ काढला. सगळे हताश होऊन बसले.

तेवढ्यात कुणीतरी म्हंटलं, "बाबुराव आता अजोबांबरोबर वामकुक्षी घेतील."
"कोण बाबुराव ?"
"तेच ते. उंदराचं पिल्लू. रहाणारच आहे काही काळ आपल्याबरोबर तर त्याला एक छानसं नावच देऊ की."

त्या एका वाक्याने वातावरणातला ताण नाहिसाच झाला. मग काय, बाबुरावांच्या हालचालींचं live reporting कुणी न कुणी तरी द्यायला सुरुवात केली.
"बाबुरावांनी मुक्काम सध्या सोफ्याखाली हलवला आहे."
"कपाटाखालून बाबुरावांचे डोळे काय पण चमकतात !"
"बाबुरावांचा रंग काय मस्त shimmering black आहे. आई, same ह्याच colour चा dress हवाय मला."
"बाबांनी बाबुरावांची सुंदर कोंडी केली होती पण बाबांच्या हातावर तुरी देण्यात बाबुराव यशस्वी झाले आहेत."

दोन दिवसांनी घरातल्या छोटूचा फोन आला. "sad news आहे. बाबुराव expired. आम्हाला खरं तर त्यांना मारायचं नव्हतं, नुसतं घराबाहेर घालवायचं होतं. पण फटका जरा जोरातच लागला. मी आणि ताईने खाली एक खड्डा खणून त्यांना burial दिलं. वरती फुलं पण ठेवली. आज बाबुराव नाहीत तर घर कसं शांत शांत वाटतंय्‌."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Sorted (2)


मध्यंतरी एकदा अनघानं एक प्रश्न मांडला होता. म्हणजे असे प्रश्न तिला आणि मला सततच पडत असतात. म्हणाली, "झाडांच्या कुंड्यांचं एक बरं असतं. किडे झाले की कुंडी खिडकीच्या जवळ, सूर्याच्या प्रकाशात ठेवली की ते निघून जातात. पण डोक्यातल्या किड्यांचं काय ? "

मी ही असंच उत्तर ठोकून दिलं होतं. "डोक्याचंही बहुतेक तसंच असावं. 'ज्ञानाचा प्रकाश' पडला तर त्या किड्यांची गच्छंती."

हे उत्तर दिल्यापासून सारखं guilty वाटतंय्‌. उगीच काही तरी बरळल्या सारखं किंवा अध्यात्मिक पोपटपंची केल्या सारखं. का बोललो आपण असं? मुळात गरजच काय होती असं पुस्तकी उत्तर देण्याची? आणि अनुभवाचं काय? आपल्या डोक्यातल्या किड्यांची वसाहत तर वाढता वाढता वाढे अशीच. मग कसला हा ढुढ्ढाचार्याचा आविर्भाव ?
एका सहज संभाषणातून सुरू झालेला... 'आपुलाची वाद आपणांसी', continued...

काल एका मित्राच्या घरी गेले. घरात नेहमीची नसलेली शांतता. लेकीला नुसत्या नजरेनंच विचारलं, "काय झालं ?"

"बाबा मन्यावर चिडलाय. अभ्यास करत नाही म्हणून. कुणीही त्याच्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय्‌."
एकटा पडला असेल बिचारा असा विचार करत दुसरीतल्या मन्याच्या खोलीत डोकावलं. पुस्तक-वही-पेन्सील यांच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत त्याने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "कुणी आपल्याशी बोललं नाही तर आपण काही मरत नाही. फक्त आपल्याला काही वेळ ऐकू येत नाही. एवढंच."

त्या क्षणी तो एवढासा जीव माझ्यापेक्षा किती तरी sorted वाटून गेला.


Related posts:   Sorted ?,  Sorted (3)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

स्टेपनी


College मध्ये असताना अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या निमित्ताने गावोगावी पुष्कळ प्रवास व्हायचा. बहुतेक ठिकाणी फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची गाडी... थोडक्यात S.T. bus च पोहोचू शकायची. या प्रवासांमध्ये दिसलेल्या ग्रामीण मराठी जीवनाच्या अनेक छटांनी आम्हा शहरी मुलांना कधी बुचकळ्यात टाकलं तर कधी आचंबीत केलं... पण त्यात नेहमीच जीवनाला थेट भीडण्याच्या, विजिगिषु वृत्तीचं दर्शन घडलं. हा प्रसंग मात्र अगदीच वेगळा.....

अशाच एका प्रवासात आमचा group एका bus मधे चढला. जेमेतेम उभं रहायला जागा. मी जिथे उभी होते त्या शेजारच्या बाकड्यावर एक मुंडासंवाले काका बसले होते. रापलेला, सुरुकुतलेला पण प्रेमळ चेहरा. वयाचा अंदाज लावणं कठीण. त्यांच्या पलिकडे २ बायका. डोक्यावरून पदर, हातभर गोंदण आणि बांगड्या. सतत एकमेकींशी काहीतरी बोलत, हसत होत्या. ते काका त्यांना दामटायचे. "गपा. कवाधरून कावकाव लावलीया." त्या २ मिनिटे गप्प बसायच्या की पुन्हा गप्पा चालू.

माझ्या नेहमीच्या सवयीने मी त्या तिघांमधील नात्याचा आणि त्या नात्याच्या quality चा अंदाज बांधत होते. अर्थातच त्यांच्यात खूप सख्य होतं, पण नातं ?
थोड्यावेळाने माझी दया येऊन त्यांनी मला टेकायला जागा दिली. सहज काकांना विचारलं, "कुठं चालला?"... "जत्रंला, आमच्या 'family' ला लई आवडतं".

त्या दोघींमधील नेमकी 'family' कोण हे न कळल्याने मी दोघींकडे मोघम नजर टाकली. माझा गोंधळ त्या तिघांच्याही लक्षात आला. त्या दोघी तोंडाला पदर लावून फिदिफिदी हसायला लागल्या. मग काकांनीच माझी अडचण दूर केली. "ते पल्याड बसलंय्‌ ते आमचं खटलं, हिकडं शेजारी बसलिया ती श्टेपनी"....... !!!!!!!

आज इतक्या वर्षांनी हे आठवायचं कारण ? कुठल्यातरी T. V. मालिकेत एक बायको आपल्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी लावून देत होती. सात्वीक संतापाने चिडलेली मैत्रीण म्हणत होती, "काहीही दाखवतात मेले. reality शी काही संबंधच नाही."

Truth is stranger than fiction... Or... Fiction is just a reflection of truth?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Sorted ?


"एकदा नं डोकं आवरायला काढलं पाहिजे. नुसताच पसारा झालाय. सगळा वैचारीक गोंधळ."
"ते शक्य नाही.. त्यासाठी आधी तुला पसाऱ्याच्या definition पासून सुरुवात करायला लागेल."
"???"
"एखादी वस्तू त्याच्या जागेवर नसणं म्हणजे पसारा... बरोबर?"
"हो. तेच तर झालंय. सगळे कसे अस्ताव्यस्त, विखुरलेले विचार."
"पण त्यांच्या अशा ठरलेल्या जागा असतातच कुठे?"
"हं. कमीत कमी नासके, कुजके, खराब काढून तरी टाकता येतील."
"असं वाटतं तुला ? खरं सांगतो, विचारांचं मांजरासारखं असतं. घरात नको म्हणून कितीही दूर सोडून आलं तरी आपण घरी पोहोचायच्या आत ते आपल्या घरात."
"मग काही सुजलेले, bloated.. अवास्तव महत्व मिळाल्याने गर्विष्ठ झालेले.. त्यांची तरी हवा काढून घेते."
"ती जागा दुसरे भरून काढतील. म्हणजे विचारांची पिलावळ आणखीनच वाढणार."
"कमीत कमी sorting तरी?"
"ते कसं? त्यासाठी तुला प्रत्येकावर एक आणि फक्त एकच लेबल लावायला लागेल आणि त्यांना एका जागी ठेवायला लागेल. एकच लेबल लावणं अवघड आहे पण एक वेळ जमेल. एका जागी ठेवणं ? सगळेच विचार भरकटणारे..."

माझा बौद्धिक गुंता आणखीनच वाढवून तो निघून गेला.



Related posts:   Sorted(2),  Sorted (3)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Disclaimer


एक सात-आठ वर्षांचं पिल्लू. अमेरिकेतून सुट्टीसाठी आलेलं. एक छोटिशी सायकल चालवताना स्वत:तच मग्न. तिथेच त्याच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी लहान एक छकुली त्याच्याकडे आसुसल्या नजरेने पहात उभी. तो जे काय करतोय त्याचा आनंद आपण घेऊ शकत नसल्याचे भाव चेहर्‍यावर. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, "अरे पिल्लू, एकटाच काय चक्कर मारतोस, छकुलीला पण घे नं, double seat."

तो जरा विचारात पडला. मग Ok म्हणाला. काहीतरी पुटपुटत सायकल थांबवली. स्वत:शीच बोलत म्हणाला, "I think I should make her sign some kind of a waiver. Who knows, if she falls down... she may sue me." मी स्तब्ध.

विश्वास न बसल्याने वाटलं पुन्हा एकदा विचारावं. "पिल्लू, come again."
"Oh! You are listening. No isuues. I was just venting".
मी अक्षरश: frozen. अजून आयुष्यात जबाबदारी म्हणजे काय, याचा काडीमात्र अंदाज नाही. पण कशाला जबाबदार नाही, किंवा खरं तर जबाबदार न रहाण्यासाठी काय करावे लागेल, हे मात्र नक्की माहिती.

मग जरा जास्त खोलात जाऊन विचार करण्याचा प्रयत्न केला... ह्या disclaimers ची कल्पना नीट समजावून घेतली. आणि मस्त !!! अवतीभवतीची 'असं कसं?' म्हणून पडणारी बरीचशी कोडी सहसा उलगडली.

थोडक्यात, एकदा कायद्याच्या चौकटीत या disclaimers ची बाजू पक्की केली, की आपल्या कृतीच्या होणा-या कुठल्याही परिणामांना आपण जबाबदारच नसतो.
तो परिणाम हा भोगणा-याचा 'choice' ठरतो... हे छान समजलं.

त्यामुळे TV वरच्या वाहिन्या, घराघरात सहकुटुंब बघितल्या जाणा-या कार्यक्रमांच्या promos च्या नावाखाली, बिभत्स दृष्यांचा मारा करण्याचे धाडस कशा करतात...
वित्तीय संस्थांनी जाणिवपूर्वक, अवाजवी गुंतवणूक केली व संपूर्ण जागास वेठीस धरले. यातून त्या कशा नामानिराळ्या राहिल्या ...
CWG च्या ढिसाळ नियोजनाची, संलग्न भ्रष्टाचाराची, प्रत्यक्ष अथवा नैतीक अशी कुठलीच जबाबदारी सुरेश कलमाडींची कशी नाही ...
किंवा एखाद्या राजकीय नेत्याला निवडून देताना, त्याला मत देणे म्हणजे.. एका अर्थाने त्याने दिलेल्या 'उत्तरदायकत्वास नकार (*)'.. यावर शिक्कामोर्तब करणे कसे असते.. असं बरंच काही..

पण शेवटी हा विचार तरी उरतोच ... आपल्या जन्मा बरोबरच आपल्याशी निगडीत असलेल्या एका fine print चं काय? ज्यात लिहिलेलं असतं .... 'माझ्या आयुष्याला मी आणि फक्त मीच जबाबदार आहे.'
इथे तर कुठलेच disclaimer चालत नाही !

Disclaimer:
(*) - 'उत्तरदायकत्वास नकार' हे disclaimer या शब्दाचे मराठीत अधिकृत भाषांतर आहे. या संदर्भातील कुठल्याही दुमतास मी जबाबदार नाही.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

नीरव


सकाळी ६.३० ते संध्याकाळी ७.३० घरी कुणीच नसतं. घर ३०व्या मजल्यावर. खालच्या रस्त्यावरचे आवाज नाहीत... शेजारच्या मस्जिदीतले पुकारे नाहीत… असते घर भरून राहिलेली शांतता आणि मी.

अचानक गेल्या १० वर्षात न घडलेली गोष्ट घडली. वीज गेली. आणि पूर्वी आवाजाचा स्टोव्ह बंद झाला की जसं वाटायचं, तसं झालं. AC + firidge + etc असा एक collective humming sound बंद झाला… म्हणजे ती शांतता नव्हतीच तर... त्या शांततेही एवढा गोंगाट होता !

आता एरव्ही न ऐकू येणारे आवाज ऐकू यायला लागलेत... लॅपटॉपचा फॅन... बरं झालं… त्याची बॅटरीच संपली… हे घड्याळ… नकोच त्याची टिकटिक... बंदच करावं… आता हे काय?... पुस्तकावर दिलेला ताल... मनातल्या गाण्यावर... ही कधी लागली सवय? ... बंद करायला हवी... आता तरी 'नीरव' शांतता ?

हं !… आता डोक्यातले विचार कलकलाट करायला लागलेत. मेले फारच झालेत. थोडे कमी करायला हवेत... आणि 'तो' एक विचार तर फारच घोंघावणारा... नानाच्या 'एक मच्छर' सारखा… त्याचा पहिल्यांदा खातमा केला पाहिजे... त्यात ही कसली धडधड ?… माझ्याच काळजाची की… ती कशी बंद करणार ?

चला… 'ती' नीरवता बहुतेक 'ही' धडधड थांबल्यावरच.................. !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

निरागस


तो त्याच्या वडिलांच्या खांद्यावर होता. डुगडुगणारी मान, गोल गोल डोळे, डोक्यावर तुळतुळीत टक्कल. जवळ जवळ सहा फूट वडिलांच्या खांद्यावर हा जेमतेम सव्वा फूट. वय असेल ५-६ महिने. टुकुर टुकुर डोळ्यांनी सगळीकडे पहाणं चाललं होतं. नजरेत सगळ्या जगाबद्दलची उत्सुकता ठासून भरलेली. माझी प्रत्येक हालचाल निरखून पहात होता.

त्याचं निरिक्षण करण्याच्या नादात २ coke चे cans उचलले आणि shopping trolly मध्ये टाकताना बाजूच्या २ cans ना धक्का लागला. ते खाली पडले. धप्प धप्प असा आवाज झाला. त्याला दचकायला पुरेसा. त्याच्या नजरेत धरणीकंप झाल्याचे भाव. त्याने माझ्याकडे पाहिलं. मला हसूच आलं. त्याने अर्धा क्षण डोळे बारीक केले, कपाळाला आठ्या घातल्या. मग तोंडाचं बोळकं पसरवीत मनापासून, दिलखुलास हसला. हसताना मानेचा तोल गेला. नाक वडिलांच्या खांद्यावर आपटलं, जीवणी भोवतीचा सगळा ओलावा वडिलांच्या शर्टाला पुसला गेला. ह्यावेळेस त्याचं त्यालाच हसू आलं- स्वत:च्या फजितीचं. मग बराच वेळ मान तिरपी करून मला मिश्किल हास्य देत राहिला.

माझ्यासाठीही जग खूप सुंदर झालं. उरलेला संपूर्ण दिवस मोरपीसा सारखा तरंगत, हलका गेला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ती गेली तेव्हा ...


ती गेली तेव्हा ...
खरंच पाऊस रिमझिम निनादत होता. मंद, शांत, गंभीर. तीच्याच सारखा.
खरं तर तिच्या नसण्याची एव्हाना सवय व्हायला हरकत नव्हती.
दोन्ही हातांची बोटं दोनदा वापरावी लागतील ... इतकी वर्षे झालीत.
ती गेली तेव्हा ...
अजून बरंच काही घडलं.
बाबांच्या स्कूटरचं मागचं सीट रिकामं झालं.
अंगणातील ५ रंगांच्या जास्वंदी, मोगऱ्याचा ताटवा, ३ आंब्याची आणि २ नारळाची झाडं कावरी-बावरी झाली.
शेजारच्या रमाचं कैरीचं लोणचं शिकणं अर्धवट राहिलं.
माझ्या लेकाचे 'जावयाचे पोर' म्हणत होत असलेले लाड फार बालपणी संपले.
नवऱ्याच्या तोंडातली चकलीची चव गेली.
ती गेली तेव्हा,
शिल्लक राहिले खूप आवाज.
ते कधी कानात शब्द होऊन घुमतात.
कधी डोक्यातले विचार होतात.
कधी मनावरचे संस्कार,
तर कधी हृदयाची अस्वस्थ धडधड...

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कोण म्हणतं टक्का दिला ?


फार लहानपणी आम्ही मुली एक खेळ खेळायचो. 'फार' म्हणायचे कारण की नीटसं आठवत नाही... इतक्या लहानपणी. सगळ्या मुलींनी गोल करून बसायचे. एक टाळी आपण वाजवायची. दुसरी, एकेका हाताने दोन्ही शेजारणींना एकदमच द्यायची. हे करताना कुणीतरी चालू करायचे...

"कोण म्हणतं टक्का दिला?" मग पुढचीचं नाव घेत म्हणायचे, "कुंदा म्हणते टक्का दिला." मग कुंदाला विचारायचे, "का ग कुंदा टक्का दिला?" यावर कुंदा विचारणार, "कोण म्हणतं टक्का दिला?" "मंदा म्हणते टक्का दिला" "का ग मंदा टक्का दिला?" ................ चालूच... एकीने दुसरीचे नाव घेत पुढे.

हा खेळ का खेळायचा? यात कोणी out कसं होत नाही? खेळ थांबवताना कोणावर आणि का थांबायचे? हे प्रश्न डोक्यात येण्याइतके काही आम्ही आलिकडच्या मुलांसारखे चंट नव्हतो. पुढे मोठं झाल्यावर कधी हे विचार मनात आले, पण त्यांचा फारसा पाठपुरावा केला गेला नाही. पण अगदी अलिकडेच मला या खेळाचे महत्व... नाही, खरं तर उपयोग खूप प्रकर्षाने जाणवायला लागला आहे.

आपण मोठी माणसं इतक्या सहजतेने, लीलया हा खेळ खेळतो की जसा तो रक्तातच भिनलाय. फक्त त्याचं नाव बदललंय. आता त्याला आपण 'blame game' म्हणतो. बघा नं...

Anderson ला भारतातून कोणी जाऊ दिले? ... "का रे कलेक्टर जाऊ दिले?"... "कोण म्हणतो मी जाऊ दिले? ते तर अर्जुनने जाऊ दिले"... "का रे अर्जुन जाऊ दिले?"... "कोण म्हणतो मी जाऊ दिले? ते तर राजीवने जाऊ दिले." ...................चालूच. पुन्हा हा game कधी संपतो, कुणावर संपतो हे लक्षात यायच्या आत नवीन game सुरू.

महत्वाची गोष्ट अशी की फक्त राजकारणीच नाही तर आपण सगळेच कुठल्या न कुठल्या स्तरावर हे करतच असतो. आरुषीची हत्या कोणी केली?, २०-२० विश्वचषक स्पर्धेत भारताचे पानिपत का झाले?....ते थेट कौटुंबीक कलहांपर्यंत... "मी तर असं म्हणालेच नाही, तोच म्हणाला."... "का रे तू असं म्हणाला?... "कोण म्हणतं टक्का दिला?".....................

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पाकिजा


वेळ रात्रीची. साधारणत: १० वाजले असतील. गाडी चालवत घरी येताना लांबून जाणारी दुबईची मेट्रो दिसली. तशी ती नेहमीच दिसते. पाच डब्यांची छोटिशी गाडी. बाहेर अंधार असल्याने डब्यांच्या खिडक्यांतून उठून दिसणारा उजेड.. जशी पिटुकल्या काड्यापेटीच्या आकाराच्या, चौकोनी शेकोट्यांची माळच !

'दुबई मेट्रो' अत्यंत आधुनिक रेल्वे असल्याने हिची ना 'कूक' शिट्टी ना 'झुकझुक' आवाज.. पण अशी दुरून जाणारी, अंधारातील कुठलीही रेलगाडी पाहिली की मन न चुकता 'पाकिजा' सिनेमातच पोहोचतं. अगदी थेट.. 'ये पाव जमीं पर मत रखना, मैले हो जायेंगे..' च्या मूड मध्ये. आणि ती जर भारतातील आगगाडी असेल तर.. तो दुरून निघून हळूहळू जवळ येणारा.. पुन्हा तसाच हवेत विरत जाणारा शिट्टीचा आवाज, ती इंजिनाची धडधड.. एखाद्या तरुणीचा चुकलेला काळजाचा ठोका.. आणि 'यूही कोई मिल गया था सरे राह.... चलते चलते'
बस्स !.. दुसरं काहीच नाही. जसं अंधारातील रेलगाडी म्हणजे, फक्त आणि फक्त.. तरल romance.

पूर्वी एकदा मी हा प्रत्यय घेण्याचा प्रयत्‍न करून पाहिला होता. तेही चक्क लग्नाआधी ! मद्दामहून केलेला रेल्वेचा रात्रीचा प्रवास. पण कसचं काय.. 'प्रवास' अंगात संचारलेली- बाजीप्रभू देशपांड्यांच्या आवेशात दोन्ही हातांचा किंवा हातातील सामानाचा शस्त्रांसारखा वापर करणारी माणसे.. किंचाळणारी शेंबडी पोरे, चित्रविचित्र वास, 'चाय', 'राईस प्लेट' चे पुकारे यात माझा सपशेल भ्रमनिरास झाला.. पण रात्रीची लांबून जाणारी रेल्वे आणि तरल romance यातील माझ्या मनातील दुवा आजतागायत निखळला नाही.

'पाकिजा' चित्रपटातील असाच अजून एक प्रसंग मनात घर करून गेला आहे. पुन्हा दुरून जाणारं.. अंधारातीलच.. पण ह्या वेळेस पाण्यावर तरंगत जाणारं होडकं आणि 'चलो दिलदार चलो, चांद के पार चलो' हे शब्द. आमच्या घराच्या खिडकीतून रात्री बाहेर पाहिलं की दुरून जाणा-या, पाण्यावर डुलणा-या 'ढाऊ' दिसतात. त्यांना शिडं नसतात पण असतात हेलकावे घेणारे कंदील.. माझ्या कानात मात्र लता-रफी चे सूर !

खरं तर, तो अत्यंत कृत्रीम वाटणारा नट राजकुमार, सिनेमा चौदा वर्षे रखडल्यामुळे मीनाकुमारीचे कधी अप्रतीम तर कधी उध्वस्त दिसणारं सौंदर्य.. यामुळे 'पाकिजा' या चित्रपटाबद्दल मला काहीच आत्मीयता नाही. पण या दोन romantic images मुळे तो एक कायमस्वरूपी छाप सोडून गेला एवढं नक्की !

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ऋणानुबंध


"हे काय.. हॅरिसन कुठे ?" शेजारच्या घराचे बदलले बाह्यरूप पाहून मी गाडी पार्क करणार्‍या बहिणीला विचारले.
"गेले सोडून." मग माझ्याकडे वळून ती म्हणाली, "हॅरिसनला miss करतीयेस की त्याच्या वडिलांना?" मी नुसतीच हसले.

गेल्या वेळेस अशीच तिच्याकडे पोहोचल्यावर गाडी पार्क करताना बाहेर पाहिलं तर तिचा धाकटा लेक त्याच्या मिचमिच्या डोळ्यांच्या चायनीज मित्राला, भारतातील 'मावशी' ही संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्‍न करीत होता. माझे कुतुहल..
"हे कोण ?"
"हॅरिसन. नवे शेजारी. अलीकडे अमेरिकेत राहाणारे अनेक चायनीज, अमेरिकन टोपण नावं घेतात, उच्चारायला सोप्पं म्हणून.".. बहीण.

दुसऱ्या दिवशी पहाटेपहाटे जाग आली. कदाचित jet lag. कदाचित रोजची सवय. बाकिच्यांना त्रास होऊ नये म्हणून मी जे नेहमी करते तेच केलं. वाफाळलेला कॉफीचा कप, एखादं पुस्तक आणि घराला जाग येई पर्यंत मुक्काम बाहेरच्या लॉनवर.

साधारण सातच्या सुमारास शेजारच्या हॅरिसनच्या घरातून खूप जोरात रागावण्याचा आवाज ऐकू आला. थोड्या वेळाने घराचे दार उघडले गेले आणि..
हॅरिसनच्या बाबांना, हॅरिसनच्या आईने घराबाहेर ढकलून दिले.. दार जोरात आपटून आतून बंद केले.

माझ्या दृष्टीने प्रसंग फारच गंभीर होता. हॅरिसनचे वडील मात्र त्यामानाने शांत. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले. हसणे शक्यच नव्हते. त्यांनी नुसतेच "काय करणार... life !" अशा अर्थाने खांदे उडवले आणि लॉनवर चक्कर मारायला लागले. काही वेळाने लॉनवर आडवे झाले. एखादी डुलकीही काढली बहुतेक. साधारणत: पाऊण तासांनी त्यांनी स्वत:च्या घराची बेल वाजवली. दार उघडले गेले आणि ते आत गेले.

बहिण उठल्यावर मी हे सर्व तिला सांगितले. मग आम्ही दोघींनी, एखाद्या भारतीय नवरोबावर ही परिस्थिती येईल का? आणि आली तर तो हे सर्व कसे हाताळेल यावर अतिशय गंभीरपणे चर्चा केली.

कॉफी व पुस्तक हे माझे रोजचेच routine होते. दोन दिवस शांतपणे गेले.
तिसर्‍या दिवशी पुन्हा गेल्या वेळचाच प्रकार. आणि काय सांगू.. दर दोन-तीन दिवसांनी.. हे नेहमीचेच !

मग या सगळ्यातला गंभीरपणा सरळ नाहीसा होत गेला. हॅरिसनच्या वडिलांचे आज काय झाले, हा अगदी सहज गप्पांचा किंवा खरं तर चेष्टेचाच विषय झाला. बहिणीचा मोठा लेक तर झोपेतून उठल्याउठल्या फक्त खुणेनेच thumps up or down विचारायचा आणि उत्तर कळले की 'चलो ठीक आहे' च्या आविर्भावात बाकीच्या कामांना लागायचा.

आता तो माझा सकाळचा उद्योग झाला होता. आज 'in' or 'out' असा विचार करताकरता मी रोज जशी हॅरिसनच्या बाबांची, घराबाहेर येण्याची जशी वाटच पहायला लागले. माझ्या महिनाभराच्या मुक्कामात मी आणि ते, एकदाही, एकमेकांकडे पाहून साधे हसलो सुद्धा नाही, बोलणे तर दूरच. संवाद फक्त एकच- त्यांचे माझ्याकडे बघून दर वेळेस helplessness च्या भावनेने खांदे उडवणे. हॅरिसनच्या आईला मी, 'काळी की गोरी' हे पण पाहिले नाही.. म्हणजे ती गोरीच असणार.. पण 'काळी की गोरी' हे म्हणायची पद्धत म्हणून.

घरी परत दुबईला आले तेव्हा बहिणी इतकंच हॅरिसनच्या वडिलांना miss केलं...... आणि बहुतेक प्रत्येक वेळेस तिकडे गेले की करेन.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS