ह्या प्रसंगाने खरोखरीच खूप अस्वस्थ केलं आहे.
तब्बल ४ वर्षांनी Make-A-Wish Foundation मधून फोन आला. जुन्या-नव्या स्वयंसेवकांचे छोटेसे संम्मेलन आयोजीत केलं होतं. साधरणत: १३ वर्षांपूर्वी MAWF ची दुबई शाखा लॉरी डिल्लनच्या पुढाकाराने आणि समरीन मलिकच्या साथीने सुरू झाली. पहिल्या काही दिवसातच मी त्यांना सामील झाले. आम्हां तिघींची एक टीम होती जी इथल्या बदलत्या, प्रवाही जनसंख्येमुळे फुटली. लॉरी कॅनडाला परत गेली, समरीनने पाकिस्तान मार्गे अमेरिकेचा रस्ता धरला. मीही नंतर ह्या संस्थेपासून विलग होत गेले.
मोजकीच मंडळी बोलावलेली. इतक्या वर्षांनी गेल्यामुळे ओळखीचे कोणीच नव्हते. नाही म्हणायला भारतीय वंशाचे एक-दोन चेहरे दिसले. जमलेले सगळे वेगवेगळ्या देशांचे असल्याने अशा वेळेस गप्पांचे विषय हा एक वेगळाच ’विषय’ असतो. आधीच ओळख नाही त्यात देश, संस्कृती, सगळंच भिन्न. टी.व्ही. वरच्या कार्यक्रमांवर गप्पा चालू असताना एक युरोपीयन महिला म्हणाली की अलीकडे तिला तिच्या टी.व्ही. वर दोन हिंदी सिनेमांचे चॅनल्स् दिसतात. तिला हिंदी अजिबात कळत नाही पण चॅनल सर्फींग करताना दिसलं. हे ऐकता क्षणी तिथल्या दुसऱ्या भारतीय महिलेने तिला विचारले, “त्या चित्रपटांतील गाणी पाहिली ?”
"Yeah, interesting."
Profiling करणे हे चूकच. व्यक्तीचा काहीही अनुभव नसताना केवळ वंश, देश, त्वचेचा रंग, धर्म, जात अशा अनेक गोष्टींवरून तिच्याबद्दल साचेबद्ध मत तयार करणे योग्य वाटत नाही. तरीही काही विशेषता असतातच. वरील संभाणातील भारतीय महिलेचा लागलेला किंचित चढा स्वर, बोलताना केलेले हातवारे आणि तिला मिळालेल्या उत्तरातील subtle English sarcasm ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
उत्तरातल्या ‘interesting’ या शब्दातला खोचकपणा संपूर्णत: दुर्लक्षित झाल्याने आणि स्वत:ला मिळालेल्या लक्षाने त्या बाईंना चांगलाच चेव आला. “Yeah, they are. Did you see the two flowers or two birds? That’s how love is shown in Hindi movies. They are suggestive ONLY in movies. And this is the country that produces so many children every year. One billion plus population.. hmm... Do you believe India is the country where certain subjects are not discussed public? Yet the whole world knows what they do in private ……… In some states they even force the woman to marry her late husband's younger brother ..... "
उपस्थितीत सगळे आवाक. बाई थांबायचं नावच घेइनात. मी मधे काही बोलण्याचा प्रयत्न केला. पण बाईंनी असा काही आवाज लावला होता की आम्ही दोघी अमर्त्य सेनच्या The Argumentative Indian ची उदाहरणं झालो असतो. म्हणून मी माघार घेतली खरी, पण ....... चुकलं का ?
एका टोकाच्या अस्वस्थतेने घेरलं आहे. काय हे ? ही कुठली.. कशाची तीव्र इच्छा, जी इतकं बोलायला लावते? नेमका उद्देश तरी काय होता? लक्ष वेधून घेण्याचा आटापिटा म्हणावं तर बाई अती समृद्ध घरातल्या वाटल्या. देशाभिमान नाही म्हंटलं तर, कितीही वर्ष दुबईत राहिलं तरी रहायचं ते भारतीय पासपोर्टवरच.
माझ्या पुरतं एवढंच सांगता येईल, ज्या क्षणी मी भारताबाहेर जाण्यासाठी immigration clear करते त्या क्षणापासून, चालता-बोलता, बसता-उठता, विमानात-विमानतळांवर, दुकानात-रसत्यांवर, ज्या देशात असेन तिथे.... मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करते, भारतीयांबद्दल इतरांच्या मनात तयार होणाऱ्या प्रतिमा-प्रक्रियेचा मी एक भाग आहे, हे भान विसरताच येत नाही.
Make-A-Wish Foundation ही 'terminally ill' लहान मुलांची, जवळ-जवळ शेवटची, एक इच्छा पूर्ण करणारी संस्था आहे. साधारणत: इथे भेटलेल्या एकेका मुलांबरोबर घालवलेला वेळ हा अस्वस्थ करून जाणारा अनुभव असायचा. पण ते सांभाळायला शिकले होते.
ह्या बाईंच्या बोलण्याने कदाचित त्यापेक्षाही जास्त अस्वस्थ केलं आहे.